अगतिकतेचं आक्रंदन (मंदार कुलकर्णी)

mandar kulkarni
mandar kulkarni

ऑस्करच्या शर्यतीत असलेला ‘जोकर’ हा चित्रपट म्हणजे गॉथम शहरातल्या ऑर्थर नावाच्या एका ‘जोकर’ची ही कहाणी असली तरी ती तेवढीच नाही. ती बघताना काम न मिळाल्यामुळं नैराश्यात गेलेल्या एखाद्या अभिनेत्रीची कहाणी आठवून जाते, ‘कॉमेडी सर्कस’मधून जगाला हसवत असताना मानसिक आजारामुळं चक्क काही महिने कारमध्ये राहणारा सिद्धार्थ सागर दिसतो, कॉमेडीबरोबर डिप्रेशनचंही धन मिळालेला कपिल शर्मा दिसतो. ‘जोकर’ बघताना किरकोळ कारणांमुळे रस्त्यावर उतरणारे आणि काही वेळा किरकोळ भांडणावरून पराकोटीच्या हिंसेच्या आहारी जाणारे अनेक लोक दिसतात, असंतुलित स्रोतांमुळं एक वर्ग दुसऱ्या वर्गावर इतका का संतापतो याचीही कारणं दिसतात आणि टोकाच्या एकारलेपणामागचं दुःखही दिसत जातं. अनेक आंदोलनांचं बीज कुठं असू शकतं हे दिसतं आणि अनेक गुन्ह्यांमागची मानसिकताही दिसते...

गॉथम शहर अस्वस्थ आहे. ‘सगळीकडं कचऱ्याचं साम्राज्य आहे, उंदरांचा सुळसुळाट झालाय,’ अशा बातम्या सुरू आहेत. ट्रॅफिक जॅमचे आणि अँब्युलन्सचे आवाजही कुठं कुठं ऐकू येत आहेत. अंधार आणि प्रकाशाचा खेळ असलेली प्रकाशयोजना दिसते आणि याच वातावरणात आरशासमोर बसलेला जोकरचा मेकअप केलेला ऑर्थर दिसतोय. तो हसायचा प्रयत्न करतोय. त्याला आतून हसू येत नाहीये; पण तो प्रयत्न करतोय. तो चेहरा ताणतोय. त्या प्रयत्नात मेकअप निघतोय; पण ऑर्थरचे हसण्याचे प्रयत्न थांबत नाहीत. शहर जसं अस्वस्थ आहे, तसाच तोही आतून अस्वस्थ आहे. शहरावर ‘रिच’ माणसांनी जसा मेकअप केलाय, तसाच त्याच्याही चेहऱ्यावर आहे आणि शहरातल्या इतर लोकांना जसं आनंदातच राहता येत नाहीये, तसं त्यालाही आतून हसू येत नाहीये.

...ऑस्करसाठी सध्या चर्चेत असलेल्या ‘जोकर’ या चित्रपटाची ही सुरवात. ही सुरवात जशी प्रतीकांतून आहे, तसा संपूर्ण चित्रपटभर दिग्दर्शक टॉड फिलिप्सनं प्रतीकांचा खेळ मांडलाय. ज्याला विश्लेषण करायचं आहे, तो या चित्रपटातल्या गाळलेल्या जागा भरू शकतोच; पण कित्येक समकालीन प्रश्नांची उत्तरंसुद्धा शोधू शकतो. ‘जोकर’ हा चित्रपट म्हणजे फक्त ‘बॅटमॅन’ या जगप्रसिद्ध कॉमिक्समधल्या खलनायकाचा प्रवास नव्हे. तो त्याच्याही पलीकडचा आहे. खरं तर ‘जोकर’ हा नकारात्मक भावनांचा जन्म कुठून होतो इथपासून ते हिंसेची सुरवात कुठं होते इथपर्यंतचा आणि माणसाच्या मुखवट्यामागं दडलेलं काय असतं इथपासून ते वेगवेगळ्या भेदांमुळं काय होऊ शकतं याही गोष्टीचा शोध आहे. त्यामुळंच एकीकडं कॉमिक्सच्या चाहत्यांना हा चित्रपट त्यांना पाहिजे तसा नसल्यानं सहन होत नाहीये, त्याच वेळी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना, चित्रभाषा वाचू पाहणाऱ्यांना तो संपन्नही करतो आहे. गॉथम शहरातल्या ऑर्थर नावाच्या एका जोकरची ही कहाणी असली तरी ती तेवढीच नाही. ती बघताना काम न मिळाल्यामुळं नैराश्यात गेलेल्या एखाद्या अभिनेत्रीची कहाणी आठवून जाते, ‘कॉमेडी सर्कस’मधून जगाला हसवत असताना मानसिक आजारामुळं आणि पालकांशी वादांमुळं चक्क काही महिने कारमध्ये राहणारा सिद्धार्थ सागर दिसतो, कॉमेडीबरोबर डिप्रेशनचंही धन मिळालेला कपिल शर्मा दिसतो. ‘मेरा नाम जोकर’मधल्या राजूची वेदना किणकिणत राहते आणि त्याच वेळी चार्ली चॅप्लिनचंही ‘हसरं दुःख’ दिसतं...पण फक्त एवढंच नाही. ‘जोकर’ बघताना किरकोळ कारणांमुळे रस्त्यावर उतरणारे आणि काही वेळा किरकोळ भांडणावरून पराकोटीच्या हिंसेच्या आहारी जाणारे अनेक लोक दिसतात, असंतुलित स्रोतांमुळं एक वर्ग दुसऱ्या वर्गावर इतका का संतापतो याचीही कारणं दिसतात आणि टोकाच्या एकारलेपणामागचं दुःखही दिसत जातं. अनेक आंदोलनांचं बीज कुठं असू शकतं हे दिसतं आणि अनेक गुन्ह्यांमागची मानसिकताही दिसते. ऑर्थरची मानसिक आंदोलनं जाणवत असताना वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनांचंही बीज जाणवत राहतं.
‘जोकर’ जिंकतो तो इथं. अर्थात चित्रपटात ‘जोकर’ बनलेला ऑर्थर खरं तर जिंकत नाही. कधीच. तो कायमच हरत आलाय; किंबहुना तो हरत आलाय म्हणूनच अस्वस्थ आहे आणि अस्वस्थ आहे म्हणूनच ती बाहेर टाकण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडं स्टँडअप कॉमेडियन म्हणून उमेदवारी करू पाहणाऱ्या आणि चरितार्थासाठी कुठं कुठं जोकरचा मुखवटा चढवणाऱ्या ऑर्थरला दुसऱ्यांना हसवणं जमत नाही; उलट एका विशिष्ट आजारामुळं त्याचं हसण्यावरचं नियंत्रण सुटून कधीही हसू येण्याचा रोग जडलाय. ‘मी आयुष्यात कधीच आनंदी नव्हतो,’ असं तो सांगतो आणि ‘नकारात्मक विचार कुठून येतात,’ या प्रश्नावर ‘माझ्या आयुष्यात कायमच नकारात्मक विचार आहेत,’ असं त्याचं उत्तर आहे. एकीकडं गरिबी आहे, दुसरीकडं व्यावसायिक पातळीवर सतत येणारी अपयशं आहेत. त्याचे आयकॉन असलेले दोन जण म्हणजे महापौरपदाच्या शर्यतीतले थॉमस वेन आणि टीव्हीवरचा सूत्रसंचालक मुरे फ्रँकलिन हेही कुठल्या तरी क्षणी त्याचा अपमान करतायत. त्याच्या जन्माबद्दलचं रहस्य, भास-आभासांचा मनात चालू असलेला खेळ, इतर सगळ्या जगाकडून सतत वाट्याला येणारी अवहेलना यातून त्याला एकच उत्तर दिसतं- हिंसा!! त्याला हिंसक व्हायचं नाहीये- तो तसं सांगतोही; पण हळूहळू ती या असहाय, अगतिक जोकरच्या मनात भिनत जाते. मनाच्या कोपऱ्यात कुठं तरी ती शिरकाव करते आणि हळूहळू सगळ्या मनाचा ठाव घेते. ‘जोकर’ हा चित्रपट म्हणजे खरं तर हिंसेचं समर्थन नाही- उलट ते असहायतेचं, अगतिकतेचं आक्रंदन वाटतं आणि त्याचमुळं ते तुमच्या मुलायम दुनियेच्या कल्पनांना जास्त टोचत राहतं.

‘जोकर’ ऑर्थरची ही अगतिकता दिग्दर्शक टॉड फिलिप्स फार विलक्षण पद्धतीनं दाखवतो. एकीकडं त्यानंच स्कॉट सिल्व्हर यांच्या समवेत लिहिलेल्या उत्तम संहितेचं बळ त्याला मिळालंय. ‘इज इट जस्ट मी, ऑर इज इट गेटिंग क्रेझिअर आऊट देअर?’, ‘आय युज्ड्‌ टू थिंक दॅट माय लाइफ वॉज कॉमेडी, बट नाऊ आय रिअलाइझ, इट्स कॉमेडी’, ‘फॉर माय होल लाइफ आय डिडन्ट नो इफ आय इव्हन रिअली एक्झिस्टेड, बट आय डू आणि पीपल आर स्टार्टेड नोटिसिंग’ असे संवाद ज्या पद्धतीनं या चित्रपटात येतात ते अंगावर येतात. टॉड फिलिप्स अनेक गोष्टी विलक्षण पद्धतीनं दाखवतो. नोकरीतून काढून टाकल्यावर आर्थरनं ‘डोंट फरगेट टू स्माइल’ या बोर्डवरचं ‘फरगेट टू’ या शब्दांवर काळं फासणं आणि ‘डोंट स्माइल’ एवढीच अक्षरं उरणं, रोजच्या अपयशी दिनक्रमानंतर त्यानं मोठा जिना अतिशय खांदे पाडून चढत जाणं आणि एका विशिष्ट प्रसंगानंतर त्यानं त्याच जिन्यावरून जेत्यासारखं उतरणं, मुरे फ्रँकलिनचा शो बघत असताना अचानक तो त्याच शोमध्ये असल्याचा त्याला भास होणं, त्याचा स्टँडअप कॉमेडीचा सर्वांत अपयशी प्रसंग सुरू असताना समोरून येणारा प्रकाश; चित्रपटात सुरवातीला निळ्या-काळ्या रंगांचा वापर, नंतरचा पिवळ्या रंगाचा आणि शेवटचा पांढऱ्या रंगाचा वापर या गोष्टी विलक्षण आहेत.

अनेक गोष्टी फिलिप्सनं ओपन-एंडेड ठेवल्या आहेत. चित्रपटातले अनेक प्रसंग ऑर्थरच्या मनात चालले आहेत, की प्लॅशबॅकमध्ये चालले आहेत; त्यांचा क्रम नक्की काय आहे यात त्यानं धूसरपणा ठेवलाय. सुरवातीलाच सोशल वर्करशी बोलताना ‘मला हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं तेव्हाच मला सर्वांत बरं वाटत होतं,’ असं ऑर्थर सांगत असताना जे दृश्य दिसतं तसंच शेवटी दिसतं. म्हणजे ऑर्थर शेवटी मनोरुग्णालयात जातोय की तो मनोरुग्णालयामध्येच आहे किंवा या चित्रपटातल्या सगळ्या घटना-घडामोडी याच मुळात केवळ त्याच्या डोक्यात चालत आहेत हेही तसं अस्पष्टच आहे. त्याची शेजारीण सोफी हिच्याबरोबरचे ऑर्थरचे काही प्रसंग हेही त्याच्या मनातले भास आहेत, हे तर दिग्दर्शक एका क्षणी स्पष्टच करतो. मात्र, तिनं लिफ्टमध्ये ‘ही इमारत फार वाईट स्थितीत आहे,’ असं म्हणणं आणि ऑर्थरकडं बघून डोक्यात बंदूक मारण्याची गमतीनं खूण करणं हा प्रसंग मात्र खूप अर्थपूर्ण आहे- कारण, तीच खूण ऑर्थर नंतर शेवटी एका विशिष्ट प्रसंगात करतो. बाकी मुखवटेधारी जोकर ऑर्थरला आंदोलनादरम्यान खरंच हीरो करतात का, आणि तो कारवर उभं राहून जे नृत्य करतो ते खरं असतं, की हे सगळे त्याच्या मनातले आभासांचे खेळ आहेत हेही दिग्दर्शक अस्पष्ट ठेवतो. दिग्दर्शक टॉड फिलिप्स अशा अनेक गाळलेल्या जागा मुद्दाम ठेवतो ज्यातून हा चित्रपट म्हणजेही एक प्रकारे ‘माइंड गेम’ ठरतो.

जोआकिन फिनिक्स या अभिनेत्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. फिनिक्स हा चित्रपट अक्षरशः जगलाय. त्याचं नाव ऑस्करसाठी घेतलं जातंय आणि ते खूप योग्यही आहे. फिनिक्सनं या भूमिकेसाठी केवळ २३ किलो वजन कमी केलं नाही, तर तो संपूर्ण शूटिंगदरम्यान एका ट्रान्समध्ये राहिला. या चित्रपटातलं त्याचं हास्य अंगावर येतं. हास्याचे किती तरी प्रकार त्यानं या चित्रपटात दाखवले आहेत. या हसण्यासाठी फिनिक्सनं तासन्‌तास मेहनत घेतली. रेल्वेत तीन तरुणांचा खून झाल्यानंतर त्यानं एका अंधाऱ्या जागेत केलेलं नृत्य, थॉमस वेननं पालकत्व नाकारल्यानंतर सगळा रेफ्रिजरेटर रिकामा करून ऑर्थरनं त्यात बसणं, स्टँडअप्‌ कॉमेडीच्या एकमेव प्रसंगात लोकांना हसवताना स्वतःच भयाण रीतीनं हसणं, सोफीच्या घरात एका विशिष्ट प्रसंगानंतर शिरल्यानंतर तिच्याकडं बघताना केवळ एका नजरेत संपूर्ण कहाणी सांगणं, थॉमस वेनच्या प्रासादाबाहेर बटलरनं सत्याची कल्पना दिल्यावर त्याचा चेहरा बदलत जाणं हे प्रसंग विलक्षण आहेत. या चित्रपटातलं हिल्डर गॉनॅदातिर यांचं पार्श्वसंगीत संहिता तयार झाल्यानंतर लगेचच तयार झालं. त्यामुळं शूटिंगदरम्यान आपल्याला त्याचा उपयोग झाला असंही फिलिप्सनं सांगितलं आहे. व्हेनिस चित्रपट महोत्सवात चित्रपट संपल्यानंतर फिनिक्ससाठी तब्बल आठ मिनिटं टाळ्या वाजत राहिल्या, त्या उगाच नाहीत.

अभिनय, संगीत, कथा, छायाचित्रण, दिग्दर्शन अशा सगळ्याच पातळ्यांवर अतिशय मेहनत घेतलेला हा ‘जोकर’ तुम्हाला विलक्षण हादरवून टाकतो. त्यातली हिंसाच फक्त अंगावर येते असं नाही, तर त्यामागची कहाणी जास्त अंगावर येते. चित्रपटात संदर्भ असलेल्या चार्ली चॅप्लिनच्या ‘मॉडर्न टाइम्स’पासून खुल्या जागतिकीकरणानंतरच्या अनेक गोष्टींचे धागेही जुळायला लागतात, म्हणून त्याचं महत्त्व जास्त आहे. दुसऱ्याचं हसू आपल्याला खरं तर नेहमी प्रसन्न करतं; पण इथलं ऑर्थरचं हसू मात्र तुम्हाला ढवळून टाकतं. ‘जोकर’ तुम्हाला हलवून टाकतो- कारण, त्यातल्या काही शेड्स प्रत्येकातच थोड्या थोड्या असतात. ऑर्थर अगतिक असतो, तसे तुम्हीही अनेक प्रसंगांत अगतिक असता, असहाय असता. तेही कुठं तरी जाणवायला लागतं. तुम्ही ऑर्थर होऊ शकत नाही, त्याच्यासारखं हिंसेचं पाऊल उचलू शकत नाही. अशा वेळी तुम्ही काय करता? अशा वेळी मग तुम्ही हास्याचा एक मुखवटा चेहऱ्यावर लावता...म्हणजे थोडक्यात, तुम्हीही कधी कधी ‘जोकर’च असता की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com