दगडांच्या देशा | स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

Saptarang Marathi article
Saptarang Marathi articleesakal

लेखक - के. सी. पांडे

आई या शब्दामध्ये संपूर्ण जग दडले आहे. असे म्हणतात, की देव पृथ्वीवर येऊन सर्वांची सेवा आणि प्रेम न करू शकल्याने देवाने आईरूपी व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात पाठविली आहे. आई हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर दिव्य अशी मूर्ती उभी राहते. आईच्या मायेचा आणि ममतेचा अंत नाही. आईचे प्रेम अथांग सागरा एवढे असते. जणू ते कधीही न संपणारे असते. आईच्या मांडीवर बसण्याचा आनंद हा त्रिलोकाचा राजा सिंहासनावर बसण्याच्या आनंदा पेक्षाही मोठा असतो. त्यामुळेच म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मातृप्रेम कधीही न संपणारे प्रेम आहे. जशी आपली जन्मदात्री आई आहे, तशीच ज्या मातीत आपण जन्मलो, घडलो, वाढलो ती माती देखील आपली आई आहे. आपल्या देशाला भारत माता म्हणून संबोधतो, ही आपली आईच आहे. या भावनेवर आपले सार्वजनिक जीवनात अस्तित्व आहे.

माझ्या जीवनात माझी आई शान्‍तीदेवी, भारत माता व जिच्यामुळे मी जगभर प्रसिद्ध झालो असे जगातील एकमेव गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय या तिन्ही माझ्यासाठी आईच आहेत. जर आई नसती तर आपण यशस्वी आलो नसतो. जगात आणि आपल्या देशातही कुठल्याही क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तीच्या मागे त्याच्या आईची प्रेरणा आहे.

तसेच इतिहासातील अथवा वर्तमानातही महिला ही फार मोठी शक्ती म्हणून उदयास आलेली आहे. इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिलांचा आपणास दाखला देता येईल. जगात अशी एकही व्यक्ती नाही, की ज्याच्यामध्ये आईची प्रेरणा अथवा संस्कार पौराणिक काळापासून नसेल. अनेक नैसर्गिक गोष्टींचा स्त्रीलिंगी उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ नद्या, माती अशा अनेक गोष्टींचा दाखला देता येऊ शकतो. याचा अर्थ असा आहे, की आपल्या जीवनातील स्त्रीचे महत्त्व हे अनेक शतकांपासून आहेच. तसेच वर्तमानातही असं एकही क्षेत्र नाही, की ज्यामध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नाही.

Saptarang Marathi article
परिवर्तनाचा ‘विजय’ प्रयोग

राजमाता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, मदर टेरेसा, लता मंगेशकर अशी एक नाअनेक उदाहरणे म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जण देऊ शकेल. गारगोटीची ख्याती जगभर निर्माण झाली, यामागे देखील माझ्या आईचीच प्रेरणा आहे. लहानपणी वडिलांचे लवकर निधन झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतून मला व माझ्या भावांना आईने जिद्दीने आणि हिंमतीने शिकवून उभं केलं. त्यामुळे माझ्या मते आई हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ होय. कुठल्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रते शिवाय मुलांना सर्वांगाने घडविण्याचे कार्य जगात फक्त आईच करू शकते. माझ्या आईने आमच्यावर संस्कार घडविले. त्यातूनच खरी मला गारगोटी बद्दलची जिज्ञासा निर्माण झाली आणि आगळा वेगळा छंद जोपासूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर माझी ओळख तयार झाली. आज जागतिक दर्जाची गारगोटीसारखी एकमेव संस्था उभारून ऐतिहासिक काम करण्याची प्रेरणा आईने घडविलेल्या संस्कारांमुळेच मिळाली, हे सर्व श्रेय माझ्या आईस आहे. जीवनात आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्त्रीचा सहभाग पुरुषाच्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्या सोबती शिवाय आपण आयुष्याचा प्रवास करू शकत नाही. माझी पत्नी निरा, मुलगी निवेदिता, सून नीतू, रोशनी तसेच माझ्या नात रुनझुनसाई व किमाया यांचा सहवास जीवनात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रेरणा, आनंद, प्रेम, भक्ती या स्वरूपात कायम लाभला आहे. सर्वांनी प्रत्येक प्रवासात मला खंबीरपणे साथ दिली आहे.

Saptarang Marathi article
संकट आणि नवीन संधी

माझ्या प्रवासातून मला नव्या पिढीला हा संदेश द्यायचा आहे की, आपण अनेकदा आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल तक्रारी करत राहतो. मला या अमुक गोष्टी उपलब्ध करुन दिल्या असत्या तर मी असा असतो वैगरे. घरांमध्ये देखील वडिलधाऱ्या मंडळींनी, भावंडांशी आपण सलोख्याने राहत नाही. आपलं कुठलंही यश हे केवळ आपल्यामुळे लाभत नाही. त्यात केवळ स्वतःचे योगदान कधीच नसते. घरातील मंडळी, आई-वडील यांच्यासोबत आपण पुढे जायला हवं. त्यांच्या अनुभवाचा योग्य फायदा घेत आपण पुढे जात राहायला हवं. स्त्री शक्तीला दुर्लक्षून तर अजिबात चालणार नाही, अन्यथा ध्येय गाठणे अत्यंत कठीण बनेल, याचा सारासार विचार यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने जरुर करायला हवा...

(लेखक सिन्नर स्थित प्रख्यात गारगोटी या आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com