जगातील एकमेवाद्वितीय : गारगोटी संग्रहालय
लेखक : के. सी. पांडे
गारगोटीला जगभर मिळालेले यश व प्रसिद्धी यामुळे अगणित चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेमामुळेच पर्यटनामध्ये (Tourism) गारगोटीचं दैनंदिन जीवनातील महत्त्व वाढत आहे. गारगोटी परिवारावर प्रेम करणाऱ्यांमध्ये याबद्दल माहिती असणारेच नव्हे, तर जे प्रथम गारगोटी बघत आहेत, असेही अनेक गारगोटीच्या प्रेमात पडले आहेत.
हा चाहता वर्ग स्त्री-पुरुष, तसेच सर्व वयोगटांतील आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रिया गारगोटी बघण्यासाठी त्यांनी केलेली धडपड यातून वारंवार सिद्ध झालं आहे. (saptarang marathi article by K C Pande on Gargoti Museum Nashik Latest Marathi Article)

गा रगोटीच्या व्यवसायात मी काम करीत असताना मला अनेक ठिकाणी बोलावले जात असे. कधी कुठे उद्घाटन, मार्गदर्शन, उद्योजक कसे बनावे व प्रमुख पाहुणे म्हणून अशा निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी छोट्या गाव, खेड्या, शहरापासून ते जगातील प्रमुख शहरांमध्ये मोठमोठ्या समारंभातही मला नेहमी बोलविण्यात येत असे.
उद्देश एकच, की या जगावेगळ्या छंदातून मी माझे जागतिक दर्जाचे करिअर कसे घडविले, या मागची प्रेरणा, संकल्पना व तसे यश मिळविण्यासाठी काय करायला हवे आहे याबद्दलचे मार्गदर्शन मिळावे म्हणून मला बोलाविले जात.
या सर्व ठिकाणी जात असताना मी छोट्या ठिकाणी किंवा मोठ्या ठिकाणी जाण्याबद्दलचा भेदभाव कधीच केला नाही. ज्यांनी बोलविले, आपली वेळ सांभाळून मी तिथे उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. अशाच एका शाळेमध्ये मला बोलविण्यात आले.

समारंभातील सर्व सोपस्कार पार पडले. मी त्यांना मार्गदर्शन केले. माझा येथे सन्मान करून माझा गुणगौरवही करण्यात आला. माझ्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हेही देण्यात आली. तेव्हा एक विद्यार्थ्यांना मी विचारले, की तुम्हाला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे. त्यावेळी एका विद्यार्थ्यांनी हात वर केला.
मी त्याला विचारले, बाळा तुला मोठे झाले काय बनायचे आहे? त्याने चटकन उत्तर दिले, की मला मोठे झाल्यावर के. सी. पांडे बनायचे आहे. हे उत्तर ऐकून संपूर्ण सभागृह माझ्याकडे बघायला लागले आणि मलाही आश्चर्य वाटले.
इतका लहान मुलगा, त्याच्याकडे असलेली समज ही त्याच्या वयापेक्षाही अधिक होती. त्याने माझे नाव घेतले यात मला आनंद झालाच; पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे, की त्याची विचार करण्याची जी कुवत आहे, ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा निश्चितच अधिक होती. असे शेकडो प्रसंग असतील.
आयुष्याच्या प्रत्येक पावलापावलावर मला गारगोटी संदर्भात असे अनुभव आले. मागे काही महिन्यांपूर्वी गारगोटी संग्रहालय बघण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आल्या होत्या.
त्यांच्या समवेत त्यांची वृद्ध आई व वडील होते. वृद्ध दांपत्याचे वय ९० वर्षांहून अधिक होते. विशेष म्हणजे, हे ज्येष्ठ दांपत्य दोघेही व्हीलचेअरवर बसून आले. गारगोटी बघावयास आल्यानंतर गारगोटी संग्रहालय बघू लागले. मी तिथे होतोच म्हणून आमचे हाय, हॅलो झाले. त्यांना कोणीतरी सांगितले, की मी या म्युझियमचा मालक आहे.
त्यांनीही त्यांची ओळख करून दिली. गारगोटीबद्दल विविध विषयांवर त्या माझ्याशी बोलू लागल्या. श्रीमती बनसोड यांनी सांगितले, की माझ्या आई व वडिलांची गारगोटी बघण्याची खूप इच्छा होती. त्यांनी तब्येतीची परवा न करता फक्त गारगोटी बघायचे आहे, असा आग्रह केला. मलाही वाटले की आपणही जाऊन बघावे म्हणून कुतूहलापोटी आज आले.
मी बघितल्यानंतर असं काही जग आहे, मला इथे आल्यावर समजले. गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रवासात असे अनेक प्रसंग, घटना संदर्भ देता येईल. त्यासाठी शब्दही अपुरे पडतील; पण एक मात्र निश्चित, गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय बघितल्यानंतर कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. त्यामुळेच हे संग्रहालय जगाच्या पटलावर एकमेव आहे.