दृष्टिकोन : बॅंकिंगमध्ये काय करू नये, हाच खरा यशाचा मूलमंत्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajaram Pangavane Patil

दृष्टिकोन : बॅंकिंगमध्ये काय करू नये, हाच खरा यशाचा मूलमंत्र!

राजाराम पानगव्हाणे- पाटील


माझ्या आजवरच्या सार्वजनिक जीवनात सर्वात मोठी माझी संपत्ती म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे असंख्य घटक. वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य मोलाची माणसे मला जोडली गेली. या मंडळींकडून मी वेळोवेळी शिकत देखील गेलो.

गोड आणि कडू अशा अनुभवांनी कायम आयुष्यात माझी सोबत केली. बँकिंगचे क्षेत्र अशाच अनुभवांनी समृद्ध झालेले आहे. काय करावं, यापेक्षा काय करु नये, हा कटाक्ष मी पाळत गेलो, त्यामुळे अर्थव्यवहारांच्या क्षेत्रात अनेक चढउतार येवूनही माझ्या संस्थेची, सहकार्यांची वाटचाल अखंडपणे सुरुच आहे....

(saptarang marathi article by Rajaram pangavane patil on drushtikon banking sector nashik news)

Bank

Bank

बँक चालवीत असताना अनेक अनुभव आले. जेव्हा कर्जासाठी मागणी होते, तेव्हा खूप खूप गोड गोड बोललं जातं. पण जेव्हा कर्ज थकीत होते, कायदेशीर नोटीस पाठवली जाते, तेव्हा मात्र चांगल्या संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

बँकिंगमध्ये कार्यरत असताना असे प्रकार घडले म्हणजे अत्यंत मनस्ताप होतो. त्यामुळे बँक अथवा कुठलीही आर्थिक संस्था चालवीत असताना  कर्जवाटपाचे व्यवहार सुरक्षित पद्धतीने आणि पारदर्शीपणे करायला हवेत.

कर्जदार व जामीनदार यांची क्षमता, बँकेचा आर्थिक ताळेबंद, उपलब्ध असलेला निधी या महत्त्वाच्या बाबींचा योग्य ताळमेळ साधल्यास बँकिंगच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांचे कल्याण करू शकतो. या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास आपले योगदान नक्कीच देता येऊ शकते. 

सहकार, कृषी, समाजकारण, राजकारण, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत असताना हजारो व्यक्तींची संस्थांशी माझा नियमित संपर्क आला. हे निरनिराळे अनुभव माझ्या पाठीशी आहेत. अनुभव अनेक प्रकारचे आले. मनोधैर्य वाढवणारे अनुभव जसे गाठीशी आहेत, तसेच मनोधैर्य खच्चीकरण करणारेही आहेत.

काहींकडून शिकता आलं तर काहींकडून काय नाही करायचं हेही शिकता आलं. पण हे करत असताना मी घडत गेलो. संवाद कौशल्य व हजरजबाबीपणा हे गुण माझ्यात होतेच पण त्यात या अनुभवांमुळे अधिक भर पडली.

आमची बँक नावारुपाला आल्यावर अनेक लोक माझ्याकडे कर्ज मागण्यासाठी अथवा ओळखीच्यांना कर्ज द्या, असं सांगण्यासाठी सतत संपर्क करत. पण मी मनाशी निश्चिय केला होता. नियमांच्या चौकटीत राहून कर्ज मंजुरी करायची. निर्देशित नियमांपैकी एकही नियम आपण तोडायचा नाही.

जे काही करायचं ते नियमाच्या अधीन राहूनच करायचं. कार्यकर्ते, नेते मंडळी, उद्योगातील लोक, नातेवाईक, मित्रपरिवार, व्यावसायिक असे एक ना अनेक क्षेत्रातील लोक कर्जाची मागणीचा आग्रह सतत माझ्याकडे करत होते.

मी नियमाबाहेर कधीही कुठलीही गोष्ट केली नाही. जे योग्य वाटलं आणि जे नियमात बसलं त्यालाच मी मंजुरी देत असे. शिवाय सर्वच महत्त्वाच्या निर्णयांसाठी सर्व संचालकांची संमती देखील मी आवर्जून घेत असे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

असाच एक प्रसंग मला आठवतो. उत्तर महाराष्ट्रातील एका माजी मंत्री महोदयांना त्यांच्या एका कार्यकर्त्यासाठी कर्ज हवे होते. याला तुम्ही कर्ज द्या, असा आग्रह त्यांनी माझ्याकडे धरला. मला तो टाळता येत नव्हता. पण हे प्रकरण नियमात बसवायचे होते, असा माझ्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.

माजी मंत्री महोदय माझ्याकडे सतत पाठपुरावा करत होते. मी त्यांना स्पष्ट सांगितले, साहेब नियमाबाहेर काहीही करता येणार नाही. कागदपत्रांची पूर्तता जर व्यवस्थित असेल, जामीनदार जर सक्षम असतील तर आपल्याला कर्ज द्यायला काहीच अडचण नाही.

तरीही त्यांचा आग्रह होता, तुम्ही ते नंतर बघा पण आधी तुम्ही कर्जाची रक्कम माझ्या कार्यकर्त्याला द्या. माझी अत्यंत जवळची अगदी घरातली व्यक्ती असल्याचे माजी मंत्री महोदय सांगत होते.

तेव्हा मी माझं संवाद कौशल्य व हजरजबाबीपणा दाखवत त्यांना प्रांजळपणे म्हणालो, जर इतकी जवळची व्यक्ती आहे तर घरातीलच एखादा  जामीनदार द्या ना ! त्यावेळी तो कार्यकर्ता समोरच उभा असल्याने माजी मंत्री महोदयांना नाही म्हणण्याची पंचाईत झाली आणि त्यांना त्यांच्या घरातील व्यक्ती जामीनदार म्हणून द्यावा लागला आणि अशा तऱ्हेने ते कर्ज मंजूर झाले.

बँकेच्या माध्यमातून अनेक उद्योजकांचे व्यवसायात उभे राहिले. नियमानुसार त्यांनी कर्ज घेतली व नियमानुसार कर्ज वसुली बँकेनेही केली. काही तर असे होते, की त्यांनी मुदतपूर्वही कर्जफेड देखील केली. कर्जाचा सुयोग्य उपयोग करणाऱ्या चांगल्या व्यक्तींची समाजात गरज आहे. त्यामुळेच समाजातील अर्थव्यवहार टिकून आहे.

कोणत्याही जाती, धर्म, पंथातील असलीत तरी व्यवहारात पारदर्शकतेसाठी चांगल्या माणसांची अत्यंत आवश्यकता असते. मोडक केबल्स ही एमआयडीसीमधील एक कंपनी आहे. या कंपनीच्या मालकांना सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचण आली होती. ते आमच्या बँकेकडे आले आणि कर्जाची मागणी केली.

नियमात बसून आम्ही त्यांना कर्ज मंजूर केले. त्या कर्जाची त्यांनी परतफेड देखील मुदतीत केली. आम्हाला बँकेत येऊन सांगितले, की तुम्ही दिलेल्या कर्जामुळेच आमची कंपनी संकटकाळात तरुन पुन्हा उभी राहिली. त्यामुळे आम्ही  अडचणीतून बाहेर येऊ शकलो. आम्ही देखील त्यांना प्रामाणिकपणे सांगितले, की यात आमचं तसं योगदान आहे, असं नाही.

तुम्ही कर्जासाठी पात्र होता, म्हणून तुम्हाला कर्ज दिले. शिवाय सर्व संचालक मंडळाच्या संमतीने दिले. तुम्हीही प्रामाणिकपणे कष्ट करुन कर्ज फेडले. कर्जदाराच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमची कामाची पावती आम्ही आजवर मानत गेलो. 

बँक चालवीत असताना जो नियमाने बँक चालवतो, त्याला कधीही मनस्ताप सहन करण्याची वेळ येत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण जेव्हा ओळखीच्या व्यक्तींकडून कर्जाची मागणी होते, तेव्हा सुरक्षित कर्ज मंजूर करताना कागद कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते.

पण एखादे कागदपत्र कमी असल्यास ऍडजेस्ट करून घ्या, सहकार्य करा, कर्ज द्या कागदपत्र नंतर आणून देतो, अशा प्रकारच्या अवाजवी अपेक्षा कर्ज मागणी करणाऱ्या व्यक्तींकडून केल्या जातात. त्यामुळे चांगले संबंध वाईटही होतात.

रिझर्व बँकेने निर्देशित केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करूनच कर्ज वाटप करायला हवे. संपूर्ण वसुली करण्याचा प्रयत्न सतत करत राहावा लागतो. सुदैवाने आम्हाला त्यात यशही मिळाले.पण काहींवर अगदी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती त्यांचा नामोल्लेख करणे योग्य होणार नाही.

या व्यक्तीने आमच्याकडून कर्ज घेतले. परतफेड करण्यासाठी आम्ही मागणी केली, तेव्हा चांगल्या संबंधांमध्ये वितृष्ट निर्माण झाले. आम्ही देतो ना, पळून जाणार आहे का? एवढी काय घाई आहे? पैसे आले की देणारच आहोत. अशी एक ना अनेक कारणे देऊन टाळाटाळ केली.

अशावेळी शासनाचा पाठपुरावा करून वसुलीसाठी आवश्यक १०१ व १०७ हे दाखले आम्ही मिळवले. या अंतर्गत कर्जदाराची तारण असलेली मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार बँकांना प्राप्त होतो. तसेच जामीनदाराची देखील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

यामुळे आम्हाला वसुली करणे सोपे झाले. कर्ज वाटप करताना बिनतारण कर्ज कधीही दिले नाही. पन्नास हजारांच्या पुढे कर्ज देताना कर्जदाराची क्षमता, त्याला मिळणारे उत्पन्न, सिबिल रिपोर्ट, सुरक्षित जामीनदार, कागदपत्रांची योग्य पूर्तता यानुसारच आम्ही कर्ज दिले. काही बँका तोट्यात जाताना, अडचणीत येताना आपण पाहतो.

आम्ही वेळोवेळी असे प्रकार घडणारन नाही, याची सतत काळजी घेतली. त्यामुळे आमच्या बँकेला नुकसान झाले नाही व ठेवीदारांचा आमच्यावरील विश्वास सार्थ ठरला. थोडक्यात बँकिंगमधील एबीसीडी पाळत या व्यवसायात पाय रोवल्यास भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल ठरु शकतो. समाजाचेही ऋण आपण काही प्रमाणात नक्कीच फेडू शकतो.

( लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)