दीनदलितांच्या जीवनचक्राला गती देणारे : रावसाहेब थोरात

Raosaheb Thorat
Raosaheb Thoratesakal



‘ज्ञानोपासना हा केवळ बौद्धिक व्यापार नसून समग्र मानवी जीवन उजळून टाकणारी ती एक दुर्दम्य प्रेरणा आहे.’ ही समाजधारणेची आस्था व समाज परिवर्तनाची दृष्टी समोर ठेवून कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती महाराष्ट्रात झाल्या, त्यात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अज्ञान व अंधश्रद्धा यांच्या जोखडातून ग्रामीण जनतेस मुक्ती मिळाल्याखेरीज समाजसुधारणा अशक्य आहे, हे त्यांनी ओळखले होते. समाजसुधारणा घडवून
आणण्यासाठी शिक्षणासारखे सामर्थ्यशील माध्यम पकडून विद्येच्या संस्काराला मुकलेल्या दीनदलितांच्या जीवनचक्राला शिक्षणाच्या साधनाने त्यांनी गतिशील बनवले.
- डॉ. डी. एम. जाधव

वणी हे गाव रावसाहेबांची कर्मभूमी होती. थोरात घराण्याला गावाची पाटीलकी व देशमुखी मिळाली होती. त्यांचे वडील भाऊ सखाराम पाटील (थोरात) हे वणी गावचे मुलकी पोलिसपाटील होते. त्यांचा विवाह सुकेणे गावच्या जाधवांच्या कन्येशी झाला होता. त्यांच्या पोटी सुकेणे येथे १९ ऑगस्ट १८९० ला रावसाहेबांचा जन्म झाला. रावसाहेबांचे शिक्षण वणी येथे झाले. पण इंग्रजी शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना नाशिकच्या सेंट जॉर्ज हायस्कूलमध्ये घातले. त्या वेळी रावसाहेब वडिलांचे मित्र रावबहाद्दूर वाड यांच्या घरी राहात असत. रावसाहेबांची मूळची जिज्ञासू व चिकित्सक वृत्ती या ठिकाणी अधिक धारदार बनली. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. नव्या सामाजिक जाणिवांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले होते. सेंट जॉर्ज हायस्कूलमधील विद्यार्थ्यांपैकी पाच टक्के देखील बहुजन समाजातील विद्यार्थी नाहीत, याची नोंद रावसाहेबांनी घेतली होती. इंग्रजी सहावीत असताना त्यांचा पिंपळगाव बसवंत येथील थोर समाजसेवक गणपतदादा मोरे, राजर्षी श्री शाहू छत्रपतींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन काम करणारे दत्ताजीराव भोसले व पोलिस खात्यातील कीर्तीवानराव निंबाळकर यांच्याशी परिचय झाला. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या या त्रयींबरोबर समाज जागृतीच्या कार्यात सामील होण्याचा निश्‍चय रावसाहेबांनी केला व या कार्याला सर्वस्वी वाहून घेतले.

Raosaheb Thorat
जागतिक नवरचनेचं आव्हान

‘देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही’, हे रावसाहेबांनी मनोमन जाणले होते. १९१२ मध्ये धुळे येथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन झाले. त्यात दत्ताजीराव भोसले, गणपतदादा मोरे यांच्या समवेत रावसाहेब थोरातही उपस्थित राहिले. त्या वेळी त्यांचे वय अवघे बावीस वर्षांचे होते. त्यानंतरचे अधिवेशन नाशिकला भरवावे, अशी विनंती नाशिक जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी केली व अध्यक्षांनी ती मान्य केली. ही जबाबदारी अतिशय मोठी होती. २८ डिसेंबर १९१३ ला श्रीमंत उदाजीराव महाराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये हे अधिवेशन झाले. श्रीमंत उदाजीराव महाराजांनी त्या वेळी दिलेल्या देणगीचा विनियोग आदर्श वसतिगृह स्थापन करण्यासाठी करावा, असा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला व १९१४ मध्ये उदाजी मराठा वसतिगृहाची स्थापना केली. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे हे लहानसे रोपटे लवकरच बाळसे धरू लागले. संस्थेचा विस्तार वाढू लागला होता. रावसाहेब थोरात व त्यांचे सहकारी संस्थेसाठी आपसांतील मतभेद दूर ठेवून झिजत होते व संस्था नावारूपास आणत होते. रावसाहेबांचा दृष्टिकोन उदारमतवादी होता. जनतेची नैतिक व भौतिक सुधारणा करण्यासाठी, शिक्षण प्रसार करण्यासाठी शासन संस्थेत बहुजन समाजातील व्यक्तींना स्थान मिळणे आवश्यक होते. या उद्दिष्टपूर्तीसाठी रावसाहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभाग घेण्याचे ठरवले. नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा बहुमान रावसाहेबांना मिळाला. १९२५ ते १९२७, १९३६ ते १९३८ व १९५० ते १९५२ या कालखंडात रावसाहेबांनी लोकल बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळले. त्यांच्या कारकिर्दीत ग्रामीण भागात अनेक शाळा निघाल्या. वाहतुकीसाठी रस्ते बांधण्यात आले. अनेक दवाखाने सुरू झाले.
रावसाहेबांच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता प्रकट करण्यासाठी पूर्वीपासून आजतागायत नाशिक जिल्हा परिषदेच्या (पूर्वीचे लोकल बोर्ड) सर्व शाळांतून रावसाहेबांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. रावसाहेबांचा शिक्षणासंबंधीचा दृष्टिकोन अत्यंत आधुनिक व उदारमतवादी होता. अज्ञानामुळे

आलेली गुलामगिरी, भकासपणा, भित्रेपणा, अंधश्रद्धा ही बहुजनांची दुबळी बाजू आहे, असे रावसाहेबांना वाटत असे. स्त्रियांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी तरुणांनी आपले जीवन खर्ची टाकावे, असे ते कळकळीने सांगत असत. ‘धार्मिकतेचे वा अंधश्रद्धेचे जोखड आपल्या मानेवरून दूर करावे. अस्पृश्यांना हक्क मिळवून द्यावेत. क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागून कर्तव्य पराङमुख होऊ नये, मनाची गुलामगिरी झुगारून टाकावी’, असा उपदेश ते नेहमी युवकांना करीत असत. आत्मशिक्षणाच्या योगाने आत्मविकास होणे व त्याद्वारे आपण आपला समान देश, राष्ट्र यांच्या उन्नतीस क्रमाक्रमाने हातभार लावणे, यालाच मी शिक्षण समजतो’, अशी शिक्षणाची व्याख्या रावसाहेबांनी केली होती.
रावसाहेब थोरात हे खासगी व सार्वजनिक बाबतीत शुद्ध, एकजिनसी, कळकळीने कार्य करणारे निष्काम कर्मयोगी होते. त्यांनी नाशिक जिल्ह्यात भरीव विधायक कार्य केले होते. त्यांचा स्वार्थत्याग, समाजहितैषी वृत्ती, निःस्पृह कार्यदक्षता पाहून ब्रिटिश सरकारने १२ जून १९४१ ला त्यांना ‘रावसाहेब’ ही पदवी बहाल केली. फार उशिरा का होईना; पण सरकारला रावसाहेबांच्या कार्याचे चीज करावेसे वाटले, याचा आनंद अनेकांना झाला. पण ‘रावसाहेब’ ही पदवी स्वीकारावी की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत ते होते. ‘ज्या सरकारने माझ्यावर खटला भरला ते थोरात चोर नसून सन्मान्य नागरिक आहेत. कृपणपणाने का होईना निदान ‘रावसाहेबी’ देऊन सरकारने आपली चूक सुधारली आहे म्हणून मी ही पदवी स्वीकारली आहे’, असे रावसाहेबांनी एका पत्रात लिहिले होते. पण त्याचबरोबर ही पदवी देशहिताच्या अथवा समाजहिताच्या आड येऊ लागली, तर ती जाण्यास वेळ लागणार नाही, अशी भूमिकाही स्पष्ट केली होती.

Raosaheb Thorat
निर्मितीचा हात ‘देवा’चा!

१९४६ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ‘रावसाहेब’ या पदवीचा त्याग केला. ‘सरकारी रावसाहेब’ म्हणून मिरविण्यापेक्षा ‘शेतकऱ्यांचे व गरिबांचे रावसाहेब’ राहण्यातच त्यांना आनंद व धन्यता वाटली. रावसाहेबांचा प्रपंच व्यक्तिगत स्वरूपाचा कधीच नव्हता. आयुष्यभर नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचाच प्रपंच त्यांनी केला. समाजसेवा हाच त्यांचा प्राण होता. त्यांची दृष्टीही विज्ञाननिष्ठ विचारवंताची होती. रूढीग्रस्त समाज, सामाजिक अन्याय, अंधश्रद्धा यातून सर्वसामान्य जनतेची मुक्तता करावी, असे त्यांना वाटत असे. समाज जीवनातील रूढी, अनिष्ट आचार-विचारात शिक्षणाद्वारे सुधारणा करणे हे त्यांनी आपले जीवितध्येय मानले होते.
(लेखक - सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com