त्रिधा राधा! युगानुयुगे आढळणारी राधेची तीन दर्शने!

Purushottam Shivaram Rege
Purushottam Shivaram Regeesakal
Updated on

त्रिधा राधा! या कवितेत राधेच्या तीन प्रतिमा आहेत. ‘बावरी ते विप्रश्न’ या कळत-नकळत प्रेमाची निर्मिती ते तृप्ती या पायऱ्यांवरील स्त्री प्रतिमा आहेत. पहिलीत प्रेमाची हाक देणारी, दुसरीत हाक स्वीकारणारी नि तिसरीत तृप्त होणारी ही सारी रूपे सर्वत्र सर्वकाळी आढळणारी आहेत.

त्यामुळेच कवी युगानुयुगे राधाकृष्णाच्या प्रतीकातून प्रेमाचे सामान्यीकरण करत जातो, जे वाचकाला स्वतःच्या प्रेमजीवनाचा अनुभव देऊन जाते, फक्त ती बायकोचे स्थायी रूप घेत असल्याने ते तंतोतंत कळत नाही. (saptarang marathi article on Tridha Radha by dr neeraj deo nashik news)

Purushottam Shivaram Rege
एका वादग्रस्त दिग्दर्शकाची

पुरुषोत्तम शिवराम रेगे (१९१०-१९७८) यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मिठगावचा... त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. मुंबई व गोवा महाविद्यालयातून अध्यापन केले होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते १९७० मध्ये निवृत्त झाले.

कवीचे शिक्षण जरी अर्थशास्त्रासारख्या नीरस विषयात झाले असले तरी रसभरीत कविता करण्यात ते अव्वल होते. कवीच्या नावावर गंधरेखा, पुष्कळा, प्रियाळ, दोला असे सुमारे दहा काव्यसंग्रह आहेत. त्यातील ‘अनीह’ हा कवितासंग्रह कवीच्या मृत्यूनंतर सुमारे सहा वर्षांनी म्हणजे १९८४ मध्ये प्रकाशित झाला.

याचाच अर्थ कवीची काव्यप्रतिभा शेवटपर्यंत कार्यरत होती. काव्यसंग्रहाशिवाय कवीने अवलौकिकता, मातृका, रेणू नि सावित्री अशा चार कादंबऱ्या, माधवी : एक देणे, कालयवन, पालक अशा सात नाटिका, दोन समीक्षात्मक ग्रंथ नि एका पिढीचे आत्मकथन हे आत्मचरित्र असे विपुल साहित्य निर्माण केले. १९६९ मध्ये वर्धा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाने पु. शि. रेग्यांच्या साहित्य सेवेला सन्मानित करण्यात आले.

Purushottam Shivaram Rege
प्रथेतून ‘ती’ची मुक्तता

रसिका! अर्थशास्त्र शिकत शिकवित असल्यामुळे असेल रेगेंच्या काव्यात अगदी गरजेचे नि माफक शब्द वापरलेले आपल्याला दिसतात, बघा ना!

लीलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळा
पाणी मी पाहिले !
लीलीची फुले
आता कधीहि
पाहता डोळा
पाणी हे साकळे।।!

अनावश्यक शब्द न वापरता, तपशिलात शिरत न बसता किती कमी शब्दांत कवी कितीतरी मोठा अर्थ तरलतेने भरून जातो. लिलीच्या पाणफुलाला चुंबताना तिच्या डोळ्यात का कोण जाणे, पाणी तरारले हे त्याने पाहिले आणि आता कधीही लिलीचे फूल दिसले तरी त्याच्या डोळ्यात पाणी साकळून येते.

त्याच्या मनांत तिच्याप्रति असलेला ओलसर, कोमल भाव कवी किती मोजक्या शब्दांत मांडतो, हे नाते केवळ दर्शनातून मनोभावात कायमचे उतरलेले आहे. त्याला कोणताही अन्य स्पर्श नाही म्हणून मग आशा-अपेक्षा नाहीत, जबाबदारीचे ओझे नाही.

Purushottam Shivaram Rege
हुशार मुलांच्या हुशारीचं रहस्य!

एकच रुपया नीट फिरवल्याने अर्थशास्त्राचे चक्र जसे फिरते राहाते, तसाच एकच शब्द नीट घोळल्याने कविताचक्र कसे चपखल चालते, याचे विलक्षण भान कवीला होते. याची अनेक उदाहरणे असली, तरी यातील अप्रतिम उदाहरण म्हणजे कवीची पुष्कळा ही कविता. केवळ पुष्कळ शब्दाचा वापर करीत ही नितांत सुंदर रचना कवीने केली आहे, पाहा यातील रंगसंगती...

पुष्कळ अंग तुझं,
पुष्कळ पुष्कळ मन,
पुष्कळातील पुष्कळ तू,
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी
पुष्कळाच तू पुष-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी

तिच्याविषयीचा कृतज्ञताभावच या कवितेतून पुष्कळपणे प्रकटला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पुष्कळपेक्षा अगणित, अपरिमित मोठे असते. पण त्यात पुष्कळचा भाव येत नाही. पुष्कळमध्ये समाधान आहे, तृप्तीची भावना आहे, ती त्याच्यासाठी काया, वाचा, मने तृप्ती देत रहाणारी आहे.

म्हणून ती पुष्कळ आहे. प्रस्तुत कवितेवर पु. लं.नी घेतलेली विडंबनात्मक फिरकी बहुतेकांना ज्ञात असेल. स्त्रीशक्ती म्हणजे सर्जनशक्ती आहे. प्रेमभाव, सौंदर्यभाव, कामभाव हा त्याच सर्जनशक्तीचा विलास आहे.

याच धारणेतून कवीच्या कविता अवतरतात ‘अजाणबाला’ पासून ते ‘आदिमाया’पावेतोची सारी रूपे त्याच्या कवितेतून चित्रित होताना दिसतात. कवितेच्या ‘मुग्धप्रिया’तही त्रिविध छटा आहेत. त्याच ’त्रिधा राधा’तून उत्कटतेने प्रकटतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Purushottam Shivaram Rege
हुशार मुलांच्या हुशारीचं रहस्य!

आकाश निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी
युगानुयुगीची मनबाधा


हे राधेचे पहिले रूप. यात तिचा तो हरी तिच्या भावविश्वाला वेढून उभा राहिलाय. त्याच्याबाहेर तिला विश्वच उरले नाही. ते विश्व तिला मनापासून आकर्षित करत आहे, हे सारे भाव पहिल्या एकाच चरणात येतात अन् त्या निळ्या आकाशात ती एकदम छोटीशी आहे.

याचे कारण ती बावरी आहे, लाजरी आहे. बावरी म्हणजे गोंधळलेली गोंधळ हरिला घेऊन नाही, तर ती प्रेमानुभवात नवखी आहे नि त्यांचे नातेही पुरेसे स्पष्ट झालेले नाही, हरिचा भाव अजून स्पष्ट झालेला नाही.

विस्तिर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिध्द
युगानुयुगीची प्रियंवदा


या दुसऱ्या रूपात नाते पक्के झालेय, त्यात परिपक्वता आली. त्यामुळे तो मनहरण करणारा हरि न राहता भार वाहन करणारा गोविंद बनलाय. तर ती स्वतःची जागा मिळवून बसलीय. परिणामी ती आता बावरी न राहता संसिद्ध झालीय. संसिद्ध म्हणजे केवळ स्वच्छंद नव्हे. कारण स्वच्छंदमध्ये बांधिलकी नसते, येथे नाते निश्चित होत आहे, बांधिलकी आहे नि त्यात मधूरताही आहे म्हणून ती प्रियंवदा आहे,

Purushottam Shivaram Rege
तंत्रज्ञानात यावे महिलाराज

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरनिद्रा


तिसऱ्या रूपात तोही स्थिर झालाय. हे स्थिरत्व स्थितिस्थापकत्व नसून त्यात संतत प्रवाह आहे, त्याला चिर आकर्षणाची जोड आहे. त्यामुळे त्या जलवाहिनीत ती काठावरून तिचीच प्रतिमा त्याच्यात न्याहाळते आहे.

कारण ती त्याच्याशी एकरूप झाली. एकरूप झाली, पण एकच नाही. झाली एक तर सुख नाही, एकाकीपणा येतो. दोन वेगळे असून, एक होण्यात माधुर्य असते. मधुराव्दैत त्यालाच म्हणतात ती विप्रश्न आहे. विप्रश्न म्हणजे सारे प्रश्न विरून गेलेली, सारे संदेह संपून गेलेली म्हणून ती चिरनिद्रा अनुभवतेय. चिरनिद्रा तृप्तीची जाणीव देऊन जाते.

नीट पाहिले, तर कवितेत राधेच्या तीन प्रतिमा आहेत. ‘बावरी ते विप्रश्न’ या कळत-नकळत प्रेमाची निर्मिती ते तृप्ती या पायऱ्यांवरील स्त्री प्रतिमा आहेत. पहिलीत प्रेमाची हाक देणारी, दुसरीत हाक स्वीकारणारी नि तिसरीत तृप्त होणारी ही सारी रूपे सर्वत्र सर्वकाळी आढळणारी आहेत.

त्यामुळेच कवी युगानुयुगे म्हणतो कवी राधाकृष्णाच्या प्रतिकातून प्रेमाचे सामान्यीकरण करत जातो, जे वाचकाला स्वतःच्या प्रेमजीवनाचा अनुभव देऊन जाते, फक्त ती बायकोचे स्थायी रूप घेत असल्याने ते तंतोतंत कळत नाही.

येथे कवी राधेसोबतच त्याचेही हरि, गोविंद नि कृष्ण अशी तीन रूपे उलगडत जातो. पण ही तीनही रूपे राधेच्या मनोभावातील आहेत. राधा तीन प्रतिमांतून उकलत जात असली तरी ती राधा म्हणून स्थिर आहे.

राधा बंधन घालून घेत असली, तरी त्याला बंधनात अडकवत नाही. याचा अर्थ तो बंधनात नाही, असे नाही, तर कवीने त्यावर जोर दिलेला नाही. फक्त राधेवर दिलेला आहे. त्यामुळेच कविता ‘त्रिधा राधा’ आहे हे सांगणे न लगे!

Purushottam Shivaram Rege
औदार्याचा अभिमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com