प्लॅस्टिक सर्जरीमुळं परिणाम नाही 

चिन्मयी खरे
रविवार, 4 मार्च 2018

शरीर आणि चेहरा हीच ओळख असणाऱ्या ती ओळख कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा, डाएटचा, स्टेरॉइड्‌स वगैरेंचा उपयोग करावा लागतो. त्यांचा नक्की काय परिणाम होतो, सेलिब्रिटींच्या जीवनचक्रावर त्याचा काही परिणाम होतो का आदीबाबत तज्ज्ञांशी केलेली चर्चा. 

शरीर आणि चेहरा हीच ओळख असणाऱ्या ती ओळख कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा, डाएटचा, स्टेरॉइड्‌स वगैरेंचा उपयोग करावा लागतो. त्यांचा नक्की काय परिणाम होतो, सेलिब्रिटींच्या जीवनचक्रावर त्याचा काही परिणाम होतो का आदीबाबत तज्ज्ञांशी केलेली चर्चा. 

श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळं कलाकारांचं डाएट आणि त्यांचा फिटनेस यांमुळं होणाऱ्या दुष्परिणामांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. श्रीदेवी यांनी 1997 मध्ये 'जुदाई' या चित्रपटानंतर बॉलिवूडमधून काही काळासाठी विश्रांती घेतली आणि 2012 मध्ये 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातून पुनरागमन केलं. एवढ्या वर्षांच्या काळानंतर श्रीदेवी यांना चित्रपटात पाहिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यात खूप बदल झाला होता. त्या खूप बारीकही दिसत होत्या. या मध्यंतरीच्या काळात त्यांनी स्वतःवर खूप काम केलं होतं. त्यांच्या नाक, ओठ अशा अनेक सर्जरी झाल्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या निधनाचं कारण त्यांनी केलेल्या या सर्जरी असू शकतात, अशी एक चर्चा सुरू होती.

ब्रीच कॅंडी आणि हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट प्लॅस्टिक सर्जन डॉ. अनिल टिब्रेवाला यांनी सगळ्या शंकांचं निरसन केलं. डॉ. अनिल म्हणाले ः ''कोणत्याही प्लॅस्टिक सर्जरीमुळं कोणाचाही मृत्यू होण्याची एक टक्काही शंका नाही. आम्ही एखाद्या माणसाची सर्जरी करतो, त्याआधी आम्ही त्यांच्या संपूर्ण शरीराचं चेकअप करतो. त्यांचा ईसीजी, ब्लड टेस्ट, स्कॅनिंग, एक्‍स-रे, ब्लडप्रेशर अशा सगळ्या प्रकारच्या तपासण्या आम्ही करतो. आम्हाला जरा जरी शंका आली, तर आम्ही त्यांच्या पुढच्या तपासण्या करतो. ती व्यक्ती सुदृढ असेल, तरच आम्ही पुढं जातो. नाही तर जात नाही. श्रीदेवी यांनी सर्जरी करून घेतल्या असतील, तरी त्या काही दहा दिवसांपूर्वी केलेल्या नाहीत. त्यांनी खूप पूर्वी सर्जरी केल्या होत्या. कोणत्याही सर्जरीचे परिणाम एवढ्या उशीरा होत नाहीत. काही व्हायचं असेलच, तर ते सर्जरीनंतर पाच-सहा दिवसांतच समजतं; पण त्यामुळं मृत्यू होत नाही. सर्जरीनंतर जी काही औषधं खावी लागतात, त्यांमध्ये पेनकिलर आणि तुरळक औषधं असतात. तशा प्रकारची औषधं आपण सर्वसामान्य माणसंही वर्षातून एखाद-दोन वेळा खातच असतो. मी स्वतः माझं डोकं दुखत असेल किंवा ताप आल्यासारखं वाटत असेल, तर कॉम्बिफ्लॅम घेतो. कारण ती गोळी मला चालते; पण एखाद्याला कॉम्बिफ्लॅमची ऍलर्जी असेल, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळं डॉक्‍टर कोणतंही औषध देताना पेशंटला कोणत्या गोष्टीची ऍलर्जी नाही ना, हे तपासूनच गोळ्या देत असतात. 

''श्रीदेवी आरोग्याबाबत खूप जागरूक होत्या, ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. चित्रपट क्षेत्रात वजन कमीच ठेवावं लागतं. त्या वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करायच्या; पण त्या स्वतःला उपाशी ठेवून डाएट करत नसत. नाही तर ते त्यांच्या प्रकृतीवर जाणवलं असतं. शरीराचं वजन कमी करण्यासाठी जेवढं योग्य आहे, ते त्या खात-पित होत्या. त्याबरोबरच डॉक्‍टरांनी सांगितलेली सप्लिमेंट्‌स म्हणजे कॅल्शिअम, व्हिटॅमिनच्या गोळ्या त्या घेत होत्या. त्या गोळ्या सर्वसामान्य माणसंही घेतात. सेलिब्रेटींना नेहमी आपण कसे दिसतो, कसं दिसायला पाहिजे याबद्दल खूप ताण असतो. त्यांना नेहमीच चांगलं दिसावं लागतं. या तणावामुळं प्रकृतीवर परिणाम होतो; पण चांगलं दिसण्यासाठीचा ताण हा हृदयविकाराचा झटका येऊ शकेल किंवा त्यामुळं कोणाचा मृत्यू होऊ शकेल, इतकाही असू शकत नाही.'' 

सेलिब्रिटीज बोटॉक्‍स आणि स्टेरॉईड्‌सचा वापर करतानाही दिसतात. यांच्या अतिवापर किंवा नियमित डोसामुळं शरीराला प्राणघातक अपाय होऊ शकतो का, यावर डॉ. अनिल म्हणाले ः ''बोटॉक्‍स हे तर शरीरातल्या नैसर्गिकपणे तयार होणाऱ्या बोटुलिनम टॉक्‍झिनपासून तयार केलेले फिलर्स असतात. या प्रोसेसमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जाव्यात, यासाठी त्वचेखालचे स्नायू तात्पुरते दुबळे करून ही कॉस्मेटिक सर्जरी केली जाते. त्याचं प्रमाण कधी कमी किंवा जास्त होऊ शकतं. मध्यंतरी अनुष्का शर्माचे ओठ काहीतरी विचित्रच दिसत होते; पण त्यानंतर ते नीट करण्यात आले. त्यामुळं बोटॉक्‍समुळं शरीराला कोणताही धोका होत नाही. त्यामुळं मृत्यू येऊच शकत नाही. स्टेरॉईड्‌सचा वापर जास्तकरून अभिनेते करतात. सलमान खानसारखे अभिनेते बॉडी कमवण्यासाठी ऍनॅबॉलिक स्टेरॉईड्‌स वापरतात. त्यामुळं शरीरावर होणारे अपाय म्हणजे केस गळणं, छाती मोठी होणं असे असतात; पण त्यामुळं मृत्यू वगैरे अजिबात होऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याही सर्जरी किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंटमुळं मृत्यू होऊ शकत नाही.'' 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Shridevi Plastic Surgery