जोडीदाराच्या शोधासाठी.. (योगेश बनकर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

जोडीदाराच्या शोधासाठी 'ऑनलाइन डेटिंग ऍप्स'चं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नेहमीच्या सोशल नेटवर्किंग वेबसाइटपेक्षा वेगळ्या सुविधा देणाऱ्या अशा काही ऍप्सविषयी माहिती. 

दैनंदिन जीवनात कितीतरी गोष्टी आपण नकळत ऑनलाईन करून जातो. मोबाईलच्या रिचार्जपासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सगळं काही ऑनलाइन. मग यात नवीन मित्रांचा शोध तरी कसा मागे राहील? 'डेटिंग ऍप्स'वर जो आवडेल त्याला 'राइट स्वाइप' आणि जो नाही त्याला 'लेफ्ट स्वाइप' करत जगभरातील अनेक तरुण नव्या मित्रांचा शोध घेत असतात. जगातली पहिली 'डेटिंग साइट' 1995 ला सुरू झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या डेटिंग साइट्‌स येत गेल्या. स्मार्ट फोनच्या जमान्यात आज डेटिंग साइट्‌स ऍप्सच्या रूपात अनेकांच्या मोबईलमध्ये घर करून आहेत. अर्थात बरेच जण सोशल मीडियावरही नवे मित्र मिळवतात; पण ही 'डेटिंग ऍप्स' खास नवीन लोकांना भेटण्यासाठीच बनवली असल्यानं याचा वापर जास्त केला जातो. 'प्लेस्टोअर' आणि 'ऍपस्टोअर' वर आजघडीला बरीच 'डेटिंग ऍप्स' आहेत; परंतु त्यापैकी मोजक्‍याच ऍप्सना लोकांची पसंती असल्याचं दिसून येतं. जाणून घेऊयात यापैकीच काही लोकप्रिय डेटिंग ऍप्सबद्दल. 

टिंडर (Tinder) : 
ऑनलाइन डेटिंगसाठी सध्या तरुणाईमध्ये हे ऍप बरंच लोकप्रिय आहे. टिंडरवर 'राइट स्वाइप' करून नवीन अनेळखी लोकांशी मैत्री करण्यासाठी हात पुढं करणारे बरेच जण आपल्या आजुबाजूला दिसतात. टिंडरवर आपल्या फेसबुक प्रोफाईलद्वारे लॉगइन करता येतं. सुरवातीला आपला फोटो, आवडीनिवडी, कोणत्या वयोगटातील व्यक्तींशी मैत्री करायची आहे ते एकदा निवडावं लागतं. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आणि आपल्या जवळच्या भागातल्या व्यक्तींची प्रोफाइल्स स्क्रीनवर दिसतात. आवडलेल्या व्यक्तीला 'राइट स्वाइप' आणि न आवडलेल्या व्यक्तीला लेफ्ट स्वाईप. तुम्ही 'राइट स्वाइप' केलेल्या व्यक्तीनंसुद्धा जर तुम्हाला 'राइट स्वाइप' केलं, तरच दोघांसाठी 'चॅटिंग' ऑप्शन उपलब्ध होतो. दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना 'राइट स्वाइप' केल्याशिवाय मेसेज पाठवू शकत नाही. त्यामुळंच इतर 'डेटिंग ऍप्स'पेक्षा टिंडर अधिक लोकप्रिय आहे. 'टिंडर प्लस' हे या ऍपचं 'पेड व्हर्जन'देखील उपलब्ध आहे. एका दिवसात तुम्ही किती व्यक्तींना 'राइट स्वाइप' करू शकता, याला 'फ्री व्हर्जन' मध्ये मर्यादा आहे. 'टिंडर प्लस'मध्ये ही मर्यादा वाढवून मिळते. 

हॅपन (Happn) : 
सध्या आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती किंवा काही वेळापूर्वी आपल्या जवळून गेलेल्या व्यक्तींचं प्रोफाइल हे ऍप आपल्याला स्क्रीनवर दाखवतं. इतर डेटिंग ऍप्सप्रमाणं या ऍपसाठीसुद्धा आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे लॉगइन करावं लागतं. टिंडरप्रमाणंच 'हॅपन'देखील आपल्या जवळच्या व्यक्तीचं प्रोफाइल दाखवतं. एखादी व्यक्ती नेमक्‍या कोणत्या ठिकाणी आणि किती वेळेपूर्वी आपल्या समोरून गेली, याची माहितीदेखील हे ऍप देतं. यापैकी आवडलेल्या व्यक्तीला आपण 'लाइक' करू शकतो आणि समोरच्या व्यक्तीनंसुद्धा 'लाइक' केलं, तर दोघांसाठी 'चॅटिंग' ऑप्शन उपलब्ध होतो. 

ओकेक्‍युपिड (OkCupid) : 
चांगली मैत्री होण्यासाठी आपल्याला समोरची व्यक्ती माहीत असणं गरजेचं असतं. हे ऍप प्रत्येक युजरची भरपूर माहिती सुरवातीला विचारतं. नेमक्‍या कोणत्या गोष्टीसाठी हे ऍप आपण वापरत आहोत- म्हणजे नवीन मित्र शोधण्यासाठी, शॉर्ट टर्म डेट किंवा लॉंग टर्म डेटसाठी वगैरे- ही माहिती सुरवातीला द्यावी लागते. त्यानुसारच आपल्याला मिळतीजुळती प्रोफाइल स्क्रीनवर दिसतात. हे ऍप आपली बरीच माहिती विचारत असल्यानं कदाचित कंटाळा येऊ शकतो; पण ज्यांना 'सिरीअस रिलेशनशिप्स'मध्ये इंटरेस्ट आहे, अशा व्यक्तींची एखाद्याला माहीत करून घेण्याच्या दृष्टीनं हे ऍप योग्य वाटतं. या ऍपचं पेड व्हर्जनदेखील आहे. आपल्या प्रोफाइलला किती लोकांनी भेट दिली, लाइक केलं याची माहिती यात मिळते. 

ट्रुलीमॅडली (TrulyMadly) : 
'डेटिंग ऍप्स' वापरताना सर्वांत जास्त चिंता असते ती आपल्या फोटोची. आपला फोटो कुणी डाऊनलोड तर करणार नाही ना, याची बऱ्याच जणांना भीती असते. या ऍपवर मात्र युजरला त्याबाबत दिलासा मिळतो. या ऍपवरून कुठलाही फोटो डाउनलोड करता येत नाही किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेता येत नाही. तसंच इथं प्रत्येक व्यक्तीसाठी 'ट्रस्ट स्कोअर' दिला जातो. आपण ज्या व्यक्तीसोबत 'चॅट' करतो ती व्यक्ती या 'ट्रस्ट स्कोअर'द्वारे रेटिंग देऊ शकते. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com