esakal | मुलांवर विश्‍वास हवा.... (मिलिंद गुणाजी)
sakal

बोलून बातमी शोधा

milind gunaji

पालक होण्यापूर्वी किंवा झाल्यावरही आपण पालकत्वासाठी तयार नसतो. विशेषतः पुरुषांना हे लवकर कळत नाही. मला तरी कळत नव्हतं. पण स्त्रियांमध्ये मात्र ते जन्मजातच असतं असा माझा अनुभव आहे.

मुलांवर विश्‍वास हवा.... (मिलिंद गुणाजी)

sakal_logo
By
मिलिंद गुणाजी milindgunaji@gmail.com

पालक होण्यापूर्वी किंवा झाल्यावरही आपण पालकत्वासाठी तयार नसतो. विशेषतः पुरुषांना हे लवकर कळत नाही. मला तरी कळत नव्हतं. पण स्त्रियांमध्ये मात्र ते जन्मजातच असतं असा माझा अनुभव आहे. कारण राणी ज्याप्रकारे अभिषेकचं संगोपन करायची, ते मला विलक्षण वाटतं. मुलं आणि पालकांचं नातं मित्रत्वाचं असावं, त्यांच्यात मोकळा संवाद हवा. त्यांना आपल्याशी काहीही बोलताना संकोच वा भीती वाटता कामा नये. तो मोकळेपणा आपण आपल्या वागण्यातून निर्माण केला पाहिजे.

मुलांच्या जडणघडणीत आई- वडिलांचं मोठं योगदान असतं. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. माझे वडील मूळचे बेळगावचे आणि आई गोव्याची. दोघेजण सुरुवातीला गोव्यात स्थायिक झाले आणि पुढं मुंबईत आले. माझा जन्म, शिक्षण हे सारं मुंबईतच झालं. आमचे जास्तीत जास्त नातेवाईक गोव्यात आहेत, त्यामुळं माझ्यावर गोव्यातील वातावरणाचे, म्हणजे गोवन संस्कार आहेत, असं म्हणायला हरकत नाही. खाद्यसंस्कृती, सणवार हे सगळं तिथलंच आहेत. गोव्यामध्ये दिवाळीइतकंच गणेश चतुर्थीलाही महत्त्व आहे. लहानपणापासून माझ्या आई-वडिलांना अतिशय मेहनत करताना मी बघितलं आहे. माझे वडील खूप बुद्धिमान होते. एम.ए., एलएल.बी.पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणात ते नेहमी प्रत्येक वर्गात प्रथमच होते. प्रखर बुद्धिमत्तेमुळं त्यांना एकपाठी म्हटलं जायचं. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स आणि असोचॅनचे ते जनरल सेक्रेटरी होते. बॉम्बे चेंबर्सचे ते पहिले भारतीय सेक्रेटरी होते आणि कौन्सिल ऑफ इकॉनॉमिक चेंबर्सचे डायरेक्टर होते, त्यामुळं आमच्याकडं नेहमी मोठमोठ्या उद्योजकांचे फोन यायचे. त्यांमध्ये अर्थतज्ज्ञ नानी पालखीवाला यासारख्यांचाही समावेश होता. त्यांच्याशी वडिलांचा होणारा संवाद मी ऐकायचो. त्यांचं उत्तम इंग्रजी आणि विचार मांडण्याची पद्धती मी खूप जवळून पाहिली आहे, त्यामुळं माझ्यावर मराठी, आणि इंग्रजी भाषांचा खूप प्रभाव पडला, मी मराठी, इंग्रजी भाषेतून जी पुस्तकं लिहिली त्याचा पाया या निरीक्षणातून तयार झाला आहे. वडील एवढ्या मोठ्या वर्तुळात वावरायचे तरी त्यांचं राहणीमान, वागणं, बोलणं अत्यंत साधं होतं. कुठंही बडेजाव, दिखाऊ वृत्ती नव्हती. त्यामुळं त्यांच्या साध्या वागण्याचेही खूप वेगळे संस्कार आमच्यावर झालेत.
घरात माणसांचा राबता असायचा. आई सुगरण होती. खास करून गोवन पद्धतीचं जेवण ती उत्तम बनवायची. त्यामुळं बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांना माशांच्या स्वादिष्ट भोजनाचा पाहुणचार असायचाच. वीस-पंचवीस लोकांचं जेवण एकावेळी ती करायची. दोघांचं हे वागणं, कष्ट करण्याची वृत्ती मी पाहिलेली आहे. आम्हा भावंडांनाही त्यांनी उत्तम प्रकारे वाढवलं. तू अमुक गोष्ट करू नकोस, असं त्यांनी कधी सांगितलं नाही. आमच्या निर्णयाचा नेहमी आदर केला आणि त्याला पाठिंबाही दिला. वास्तविक मी इंजिनिअरिंग केलंय. एकदा अचानक मला एका मोठ्या मॉडेलिंगच्या कामाची ऑफर आली. देवानं पर्सनॅलिटी दिल्यामुळं दिग्जाम या मोठ्या ब्रँडची जाहिरात मला मिळाली आणि माझ्या करिअरची दिशाच बदलली. पण, त्या वेळी आई-बाबांनी कुठल्याही प्रकारचा विरोध मला केला नाही किंवा तू इंजिनिअरिंगमध्येच काहीतरी कर, असा आग्रहदेखील धरला नाही.

माझं विधिलिखित वेगळंच होत. मला मोठी जाहिरात मिळाली आणि मी देशातील तीन-चार प्रमुख मॉडेलपैकी एक ओळखला जाऊ लागलो. अनेक मोठ्या जाहिराती त्यानंतर मला मिळाल्या. पुढं मला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. वीरासत, फरेब, जोर, जुल्मी, फिर हेराफेरी, देवदास यांसारख्या हिंदी चित्रपटांबरोबरच वेगवेगळ्या भाषांतील दोनशेच्यावर चित्रपट मी केले आणि मालिकाही केल्या. पण, यावेळीही आई-वडिलांनी कुठलीही आडकाठी आणली नाही. तसं पाहिलं तर, आम्ही खूप श्रीमंत होतो असं अजिबात नाही. मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील होतो; पण तरी या अनिश्चित क्षेत्रात तू कशाला जातोस, असं ते म्हणाले नाहीत. उलट माझ्या इच्छेला पाठिंबा देत वडील म्हणाले होते, ‘ मी आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही.’ त्यांनी पाठिंबा दिल्यामुळंच मी या क्षेत्रात स्थिर झालो. मी या क्षेत्राशी निगडित असल्यामुळं पुढं लेखन, फोटोग्राफी या गोष्टी त्या अनुषंगानं करिअरमध्ये येत गेल्या.

आपण जे एका पिढीकडून शिकलो आहे, ते दुसऱ्या पिढीकडं हस्तांतरीत करायचं असतं, असा एक संकेत आहे, मी पण तेच केलं. माझ्याकडं आलेले हे संस्कार मी माझ्या मुलाला, अभिषेकला दिले आहेत. तो पण आय.टी. इंजिनिअर असून डिस्टिंगशनमध्ये उत्तीर्ण झाला आहे. तो एम.एस. करण्यासाठी अमेरिकेत जाणार होता; पण त्याच वेळी एका मोठ्या दिग्दर्शकानं त्याला चित्रपटासाठी करारबद्ध केलं. ते दिग्दर्शक माझ्या ओळखीचे होते, त्यांनी अभिषेकला चित्रपटासाठी निवडलंय असं मला सांगितल्यावर माझी प्रतिक्रिया फारशी सकारात्मक नव्हती. कारण मी माझ्या कुटुंबाला या क्षेत्रापासून लांबच ठेवलं होतं. पत्नी राणी या क्षेत्रात असली, तरी अभिषेकच्या जन्मानंतर बरीच वर्षं ती या क्षेत्रापासून दूर होती. खूप नंतर ती पुन्हा मालिका करू लागली. अभिषेकला तर दूरच ठेवलं होतं. पण, चित्रपटाचा विषय समोर आल्यावर मी अभिषेकला विचारलं, की ‘तुला हे करायचं आहे का? यात तुला इंटरेस्ट आहे का?’ त्यावर तो म्हणाला, ‘अभिनयाची फार आवड नाही; पण मॉडेलिंग करेन संधी मिळाली तर ! तसंच सध्या अमेरिकेत जायला वेळ आहे, तोपर्यंत हे चित्रपटाचं काम होणार असेल, तर करून बघेन.’ मी दिग्दर्शकांना सांगितलं, ‘माझा आणि राणीचा मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याला घेऊ नका, तर आधी तुम्ही त्याची ऑडिशन घ्या, मग ठरवा.’ अभिषेकनं ती ऑडिशन अतिशय उत्तम दिली आणि त्यानंतर त्याला करारबद्ध केलं गेलं. मधल्या काळात या चित्रपटाला काही कारणानं उशीर झाला; पण त्या काळात अभिषेकनं त्याच दिग्दर्शकांबरोबर साहाय्यक म्हणून काम केलं. ते केल्यानंतर त्याला दिग्दर्शनात रस निर्माण झाला. या सगळ्याच्या आधी त्यानं एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली होती. ती इतकी छान झाली, की तिला बर्लीनमध्ये उत्तम लघुपटाचं नामांकनही मिळालं होतं. त्यानंतर त्यानं एक ॲड फिल्म केली आणि पुढं दिग्दर्शनात शिरला. या सर्व प्रवासात मी अभिषेकला कधीही म्हटलं नाही, की तू हे करू नकोस. मध्यंतरी, आपण हे करायला पाहिजे का, असं त्याला वाटू लागलं, कारण या क्षेत्रात शाश्वती, खात्री कधीच नसते. मी अनेक वर्षं इथं काम केल्यानं मला काम मिळतं. काम करणं किंवा न करणं मी ठरवतो; पण दिग्दर्शक म्हणून इथं काम करणं तेवढं सोपं नाहीये. दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित होण्यासाठी बरीच वर्षं लागतात. शिवाय, मोठा चित्रपट करताना दिग्दर्शकाच्या भूमिकेतून जाताना खूपच अडचणींना सामोरं जावं लागत असतं. अनेक आघाड्यांवर लक्ष देऊन काम करावं लागतं. यात खूप मेहनत आहे. मलाही दिग्दर्शन येतं; पण ते करताना खूप त्रास होतो, म्हणून मी त्याकडं वळलो नाही. याची कल्पना मी अभिषेकला आधीच दिली होती. पण तो म्हणाला, ‘मला हे काम आवडतं.’ आपलं काम आपल्याला आवडतं यासारखा आनंद नाही. माझं ब्रीदच आहे, की ‘आपण जे करतो ते आपल्याला आवडत असेल, तर आपण सुखी होतो. भले त्यात पैसा कमी मिळाला तरी हरकत नाही.’ माझंच उदाहरण सांगतो, मला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची अतिशय आवड आहे, भटकंती आवडते. ते करत असताना काही वेळा पैसे मिळत नाहीत, तर काही वेळा कमी मिळतात. माझीच निर्मिती संस्था असल्यामुळं मी काही वेळा पैसे घेतही नाही. पण हे करत असताना मी खूप आनंदी असतो. तो आनंद मी पॉलिमर इंजिनिअर झाल्यावर जो कारखाना वगैरे सुरू केला होता, त्यात मिळत नव्हता. ते मला येत होतं, पण आवडत नव्हतं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, की तुम्हाला जे मनापासून आवडतं तेच करा, केवळ येतं म्हणून करू नका. अभिषेकला दिग्दर्शनात आनंद मिळत होता, म्हणून त्यातले खाचखळगे माहीत असूनही मी त्याला त्यासाठी पाठिंबा दिला.

अर्थात, या क्षेत्रात येताना आपली आर्थिक परिस्थिती बघणंही महत्त्वाचं आहे. कारण बरेच जण आपलं सर्वस्व सोडून इथं स्टार बनण्यासाठी येतात; पण त्यांच्या पदरी निराशा येते, लाखात एखादाच स्टार होतो. बाकीच्यांचं काय होतं ते मी जवळून बघितलं आहे. त्यामुळं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी भक्कम असेल आणि आर्थिक पाठबळ उत्तम असेल, तर या क्षेत्रात प्रयत्न करायला हरकत नाही. किंवा तुमच्याकडं भरपूर गुणवत्ता असेल आणि स्वतःच्या गुणवत्तेवर पूर्ण विश्वास असेल, तरच या क्षेत्रात यावं. जे स्वतःच्या क्षमता ओळखतात आणि त्यांना न्याय देऊ शकतात, त्यांना इथं सगळ्यात जास्त आनंद मिळू शकतो, राणीसुद्धा त्याला नेहमीच पाठिंबा देत असते. तुला जे हवं ते कर, हेच तिचंही म्हणणं आहे. आम्ही आहोत तोपर्यंत तुझ्या पाठीशी आहोत; पण, पुढं तुझं तुलाच बघायचं आहे, ही जाणीव आम्ही अभिषेकला करून दिली आहे.

मुलांच्या क्षमतांवर पालकांनी विश्वास दाखवायला हवा. माझ्या वडिलांनी तो प्रत्येक वेळी दाखवला. मला दिखावू वृत्ती आवडत नाही; पण माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून मला तसा पेहराव करावा लागतो. मला गाड्यांची आवड आहे, वेगवेगळ्या गाड्या मी चालवतो; पण माझे वडील आणि त्यांचं राहणीमान अगदीच साधं होतं. घरात गाडी होती पण ती त्यांनी फक्त गरज म्हणून वापरली, मी गाडी हौस म्हणून वापरतो. वडिलांनी स्वतःकरिता काही केल्याचं मला आठवात नाही. सगळं दुसऱ्यांकरिता केलं. आमच्या अनेक नातेवाइकांना त्यांनी नोकऱ्या लावल्या. ते रसायन वेगळंच होतं, तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही. आता काळही खूप बदलला आहे. तंत्रज्ञान अतिशय प्रगत झालं आहे, सुखसुविधा वाढल्या आहेत; पण तरीही मला माझ्या लहानपणीचाच काळ अधिक आवडतो. मोबाईल आल्यामुळं परस्परांतील संवादच खूप कमी झाला आहे. घरातील माणसंही एकमेकांना मेसेज पाठवून संवाद साधतात, हे चित्र सर्वत्र दिसतं. चारजण एकत्र जमले तरी मोबाईलमध्येच अधिक लक्ष असतं. मुलांचं खेळणंही कमी झालं आहे. आभासी दुनियेत रमणं अधिक पसंत केलं जात आहे. आमच्या लहानपणी थोडा पाऊस पडला, की सगळी मुलं खेळायला बाहेर यायची, आता असं चित्रच दिसत नाही. अर्थात, मी काही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. तंत्रज्ञानाचे खूप फायदेही आहेत, त्यामुळं कोणत्याही गोष्टीबाबत सुवर्णमध्य साधणं खूप गरजेचं असतं. दिवसातील काही तास मोबाईल न वापरणं, जेवताना तो दूर ठेवणं, यांसारख्या गोष्टी केल्या तर बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात.

अभिषेकच्या संगोपनात राणीचं योगदान जास्त आहे. कारण तो लहान होता तेव्हाच माझं करिअर जास्त बहरत होतं. मोठ्या जाहिराती, चित्रपट मिळत होते. मी त्यामुळं बाहेर असायचो. राणीनं अतिशय उत्तमपणे अभिषेकची जबाबदारी सांभाळली, ते श्रेय तिला दिलंच पाहिजे. त्याच्या शाळेत जाणं, अभ्यास बघणं, त्याचे मित्र कोण आहेत... अशा सर्वच गोष्टींवर ती लक्ष ठेवून असायची. अर्थात, मी जेव्हा घरी असायचो, तेव्हा माझी व अभिषेकची धमाल चालायची. बहुतेक वेळा मी भटकंतीसाठी त्यांना घेऊन मी बाहेर जायचो. गड-किल्ल्यांवर जायचो. अगदी अजूनही जातो. त्याच्याबरोबर क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ खेळतो.

आमच्या तिघांमध्ये मी जास्त चिडका आहे. कुठलीही गोष्ट पटकन व्हावी असं मला वाटत असतं. माझं काम अगदी नियोजनबद्ध असतं, त्यात बदल वा चूक मला चालत नाही. वेळ चुकवलेली मला आवडत नाही. हे कामाच्या ठिकाणीही सगळ्यांना माहीत आहे. कामाच्या बाबतीत अचूक असणं हा माझा चांगला गुण आहे; पण चिडणं आणि उतावीळ असणं हे दोष आहेत. या तुलनेत अभिषेक खूपच संतुलित आहे. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तरी तो शांत असतो. आताच्या पिढीच्या भाषेत सांगायचं तर तो ‘कूल’ आहे. शांत डोक्यानं तो प्रत्येक गोष्ट करतो. हल्लीच्या नव्या गोष्टींबाबत आम्हाला छान मार्गदर्शन करतो. बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी मला त्यानंच शिकवल्या आहेत. डोकं शांत ठेवून काम कसं करायचं, हे तो आम्हाला शिकवतो.

अभिषेकलाही क्रिकेट खूप आवडायचं. मी स्वतः चांगलं क्रिकेट खेळायचो. माझं खेळाचं तंत्र उत्तम होतं, त्यामुळं अभिषेक लहान असल्यापासून मी त्याला क्रिकेट शिकवलं आहे. त्याचं खेळण्यातील तंत्र अचूक केलं. तोही उत्तम क्रिकेट खेळतो. नावाजलेल्या क्लबकडून तो अंडर थर्टीनच्या स्पर्धा खेळला आहे. त्यानं क्रिकेटर व्हावं असं मला फार वाटायचं; पण नंतर त्याला फुटबॉलची आवड लागली. तो उत्तम फुटबॉल खेळू लागला. पण, दुर्दैवानं एकदा त्याला मोठी दुखापत झाली. एका बाइकनं त्याला उडवलं. पायाला लागल्यामुळं त्यानंतर त्याच्या खेळावर मर्यादा आल्या. त्यामुळं आता खेळात करिअर करता येणार नाही, असा त्याला निर्णय घ्यावा लागला. ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होती. तेव्हा तो पंधरा-सोळा वर्षांचा होता आणि भविष्यात तो खेळात नाव कमावेल अशी मला खात्री होती; पण सगळंच बदललं. माझ्यासाठी हा धक्का खूप मोठा होता. पण, नंतर मी त्यातून बाहेर आलो. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असा विचार केला. ती माझी पालक म्हणून परीक्षाच होती. पुढं त्याला दिग्दर्शनात आवड निर्माण झाल्यावर त्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. पालकत्व हे वरून आलेलं असतं असं मला वाटतं. बरेचदा पालक होण्यापूर्वी किंवा झाल्यावरही आपण पालकत्वासाठी तयार नसतो. खास करून पुरुषांना हे लवकर कळत नाही. मला तरी कळत नव्हतं. पण, स्त्रियांना मात्र ते जन्मजातच समजतं असा माझा अनुभव आहे. कारण राणी ज्याप्रकारे अभिषेकचं संगोपन करायची, ते मला विलक्षण वाटतं. मी त्यापूर्वी लहान मुलंच हाताळली नव्हती, त्यामुळं अगदी लहान अभिषेकला हाताळणं मला अवघड वाटायचं. पण तो मोठा होत गेला, तसं आमचं नातं अधिक छान होत गेलं. मुलं आणि पालकांचं नातं मित्रत्वाचं असावं. त्यांच्यात मोकळा संवाद हवा. त्यांना आपल्याशी काहीही बोलताना संकोच वा भीती वाटता कामा नये. तो मोकळेपणा आपण आपल्या वागण्यातून निर्माण केला पाहिजे.
(शब्दांकन : मोना भावसार)