'इंटरेस्टिंग पालक बना' (मृणाल कुलकर्णी)

mrunal kulkarni
mrunal kulkarni

विराजस लहानपणापासून खूप चांगलं लिहितो. तो लहान असताना मी जेव्हा शूटिंगसाठी बाहेर असायचे, तेव्हा त्याला एक एक्‍सरसाइज द्यायचे. त्यानं रोज एक पत्र मराठीत लिहायचं. त्याचं इंग्रजीत आणि हिंदीत भाषांतर करायचं. हा खूप सोपा एक्‍सरसाइज आहे खरं तर; पण मुलांना कंटाळा येतो. विराजस तर खूप गंमतीजमती करायचा; पण असं करताकरता त्याचं पत्रलेखन खूप सुधारलं, तिन्ही भाषांवर प्रभुत्व आलं. आता तो तिन्ही भाषांत उत्तम नाटकं लिहितो.

माझ्या पालकांकडून मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकले ती म्हणजे "आई आणि बाबा यांच्यामध्ये फरक नसतो, अमुक गोष्टी आईनंच करायच्या तमुक गोष्टी बाबांनीच करायच्या असं काही नाही. स्त्री आणि पुरुष समान आहेत. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या या दोघांच्या आहेत आणि त्या दोघांनी मिळून पार पाडल्या पाहिजेत.' हा संस्कार मला खूप महत्त्वाचा वाटतो. कारण मोठी झाल्यानंतर मी जेव्हा इतर कुटुंबांकडे बघते, तेव्हा मला जाणवतं, की काही कुटुंबं आमच्यासारखी नक्कीच आहेत; पण बरीच कुटुंबं आजही अशी आहेत जिथं स्त्री-पुरुष समानता नाही. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद केला जातो. यामध्ये मी नकारात्मक बाजू नाही बघत- कारण आता मुलीलासुद्धा चांगलं शिक्षण मिळू लागलं आहे; पण दोघांना जबाबदाऱ्या समान वाटून दिल्या जातात का, याचं उत्तर अजून समाधानकारक असल्याचं दिसत नाही. त्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मिळून करायच्या असतात, हा संस्कार मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे वाचन संस्कार होय. माझे आजोबा गो. नी. दांडेकर हे मोठे लेखक होते, त्यामुळे हे स्वाभाविक होतं; पण वाचन संस्कार हा जाणीवपूर्वक करावा लागतो. घरात आई-बाबा पुस्तक वाचताना दिसले, म्हणजे मुलांवर आपोआप वाचनाचे संस्कार होतात. मी हे घरात पाहिलं, अनुभवलं. हेच संस्कार मी आणि माझे पती रुचिर यांनी मिळून मुलगा विराजस याच्यावर केले. मला आणि रुचिर आम्हाला दोघांनाही वाचनाची खूप आवड! त्यामुळे विराजसला वाचनाची आवड असेल का, अशी शंका आमच्या मनात नव्हती; पण तरीही एक संस्कार म्हणून विराजस लहान होता, जेव्हा त्याला वाचायलाही येत नव्हतं, तेव्हापासून आम्हा दोघांपैकी एकजण रोज रात्री एक पुस्तक त्याला वाचून दाखवत असे. कामानिमित्त एक जण बाहेर असेल, तरी दुसरा पुस्तक वाचून दाखवत असे. त्यामुळे लहानपणापासूनच विराजसच्या मनात पुस्तकांबद्दल अत्यंत कुतूहल निर्माण झालं. आमचं घरच पुस्तकांचं आहे. तरी तो संस्कार त्याच्यावर व्हावा असं वाटलं, म्हणून आम्ही अत्यंत जाणीवपूर्वक पद्धतीनं तो केला. माझे सासरे जयराम कुलकर्णी हे अभिनय क्षेत्रात होते. रुचिरनंही या क्षेत्रात काम केलं आहे, त्यामुळे आमच्यासाठी पुस्तकाचं अभिवाचन करणं सहज होतं. ते इतर सर्व पालकांना जमेलच असं नाही; पण सरावानं ते जमू शकतं. या गोष्टी पालकांनी केल्या पाहिजेत, असं मला वाटतं. पण मुळात पालक पुस्तकं वाचतात का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदा लहानपणी विराजस त्याच्या मित्राकडे गेला होता. तिथून आल्यावर तो आश्‍चर्यानं मला सांगू लागला ः ""आई, त्यांच्याकडे एकपण पुस्तक नाही. त्यांच्याकडे पेपरही नाही.'' त्याच्यासाठी तेव्हा तो खूप मोठा शॉक होता. अशी घरं असू शकतात हे मोठं झाल्यावर अर्थातच त्याला कळलं. ज्यांना इतर गोष्टींची आवड आहे, त्यांचा इंटरेस्ट दुसराही असू शकतो; पण मुलांच्या मनाची आणि बुद्धीची वाढ होण्यासाठी वाचन हे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात, तरी आवश्‍यक आहे. कदाचित आवडीप्रमाणे पुस्तक बदलेल. म्हणजे माझ्या लहानपणी मला खूप साहित्यिक पुस्तकं वाचातला मिळाली. कारण घरात ते वातावरण होतं; पण मी मोठी झाले तशी तशी माझ्या आवडीच्या विषयांवरची वेगवेगळी पुस्तकं वाचू लागले. माझे आई-बाबा आजोबांच्या कादंबऱ्यांचं जाहीर वाचन करायचे. नंतर मी माझी बहिण मधुरा, रुचिर आम्ही सगळेच यात सहभागी होऊ लागलो. यात सर्वाधिक कार्यक्रम रुचिरनंच केले. नंतर विराजसही त्यात सहभागी झाला. आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, की आमच्या कुटुंबातल्या एका लेखकानं लिहिलेल्या कादंबरींचं आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे जाहीर वाचन करू शकतो. पूर्वी ब्रिटनमध्ये चार्ल्स डिकन्स नावाचा लेखक स्वतःच्या कादंबऱ्यांचं असं जाहीर वाचन करायचा. आपल्याकडे असा कादंबरीवाचनाचा प्रयोग माझ्या मते प्रथम आम्हीच सुरू केला असावा. वाचक वर्ग कमी झाला, हे त्यावेळी जे बोललं जात होतं, त्यावर उपाय म्हणून हा प्रयोग सुरू केला. जेणेकरून या ना त्या प्रकारे पुस्तक त्यांच्यापर्यंत पोचेल. हा उद्देश बऱ्याच अंशी साध्य झाला, असं मला वाटतं. "स्टोरीटेल'च्या माध्यमातूनही आजोबांची पुस्तकं लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी केला. तसंच लक्ष्मीबाई टिळक यांचं "स्मृतिचित्रे', चार्ली चॅप्लीनचं चरित्र "हसरं दुःख' ही पुस्तकंही या माध्यमातून ध्वनिमुद्रित केली. हेतू हाच, की वाचनाचा आणि साहित्याचा संस्कार हा आपल्याकडून जाणीवपूर्वक झाला पाहिजे. आपल्या मुलांना तर झाला पाहिजेच; पण इतरांवरही झाला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं.

माझ्या पालकांकडून झालेला आणखी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे दुर्ग संस्कार होय. यामुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे इतिहासाची मुलांना आवड निर्माण होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मुलं राहायला शिकतात. तसंच इतिहास फक्त पुस्तकात न राहता त्याचा काही प्रमाणात मुलांना अनुभव घेता यावा, हेही यातून साध्य होतं. "रमा माधव', "फत्तेशिकस्त' यांसारखे चित्रपट यासाठीच केलेत.

कुटुंबातल्या सदस्यांमध्ये बॉंड निर्माण होण्यासाठीदेखील पुस्तकं महत्त्वाची ठरतात. मुलं आणि पालक यांनी जर सारखीच पुस्तकं वाचली असतील, चित्रपट पाहिले असतील किंवा समान ठिकाणी ते गेले असतील आणि त्याच्यावर त्यांनी एकमेकांशी संवाद केला असेल, तर कुटुंबामध्ये तो बॉंड तयार होतो. कुटुंबातल्या प्रत्येकाचं विश्व जर वेगळं असलं, त्यांच्यात कोणतीही कृती एकत्र होत नसेल, संवाद होत नसेल तर असा बॉंड निर्माण होऊ शकत नाही. तो निर्माण करायचा असेल, तर प्रत्येक पालकानं मुलांना वेळ दिला पाहिजे. त्यात आई आणि बाबा यांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण फक्त काय करायचं नाही एवढंच सांगणं म्हणजे संस्कार नाहीत, तर त्याबरोबर काय करायचं हे सांगणं म्हणजे संस्कार होय. त्यात पालक मुलांबरोबर सहभागी होत असतील, तर ते संस्कार अधिक उत्तम ठरतात. याचा एक अनुभव मी सांगते. विराजस लहानपणापासून खूप चांगलं लिहितो. तो लहान असताना मी जेव्हा शूटिंगसाठी बाहेर असायचे, तेव्हा त्याला एक एक्‍सरसाइज द्यायचे. त्यानं रोज एक पत्र मराठीत लिहायचं. त्याचं इंग्रजीत आणि हिंदीत भाषांतर करायचं. हा खूप सोपा एक्‍सरसाइज आहे खरं तर; पण मुलांना कंटाळा येतो. विराजस तर खूप गंमतीजमती करायचा. टाटा लिहिलं तरी एक ओळ झाली म्हणायचा. "प्रिय आई' ही एक ओळ झाली म्हणायचा; पण असं करताकरता त्याचं पत्रलेखन खूप सुधारलं, तिन्ही भाषांवर प्रभुत्व आलं. आता तो तिन्ही भाषांत उत्तम नाटकं लिहितो. त्याच्या नाटकांना भरभरून पारितोषिकं मिळतात. कारण तो तिन्ही भाषांत उत्तम व्यक्त व्हायला शिकलाय. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. अर्थात त्यावेळी आपण असा संस्कार करायचा, असं काही ठरवून केलं नव्हतं. मी त्यावेळी हिंदी मालिकांमध्ये काम करायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपल्या मुलांची हिंदीशी फारकतच आहे. फक्त शाळेत एक विषय तोही पन्नास मार्कांचा एवढाच त्या भाषेशी संबंध. मग मुलं हिंदी साहित्य कधी वाचणार? शिवाय हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे ती येण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे तिच्याद्वारे तुम्ही व्यक्त व्हायला शिका. मी दिलेल्या एक्‍सरसाइजद्वारे विराजस व्यक्त होऊ लागला आणि भाषा सुधारण्यासाठी त्याला याचा खूप फायदा झाला. तसंच मी शूटिंगसाठी व्यस्त असले, मुंबईत असले तरी रोज रात्री विराजसशी एक तास फोनवर बोलायचे. त्यामुळे आपली आई इथं नाही असं त्याला कधी वाटलंच नाही. तसंच आईचं काम नेमकं काय आहे, ते केवळ ग्लॅमर नाही, केवळ प्रसिद्धी नाही किंवा लोकांनी सह्या घेणं नाही, तर त्यातही किती मेहनत आहे हे त्याला समजू लागलं. मी त्याला माझ्या प्रत्येक सेटवर नेलेलं आहे. मी इतर पालकांना असं सुचवीन, की त्यांनी प्रत्येकानं आपल्या मुलांना आपल्या कामाच्या ठिकाणी घेऊन जावं. आपले आई-वडील काय काम करतात, किती मेहनत करतात हे मुलांना त्यामुळे समजू शकतं आणि हासुद्धा एक संस्कार असतो.

सुरुवातीला आम्ही कामामुळे वर्षभर फारसे एकत्र राहू शकत नसलो, तरी मे महिन्यात शाळेला आणि कोर्टाला सुट्या असत, तेव्हा तीन आठवडे बाहेर फिरायला जात असू. मी त्यावेळी माझं काम बंद ठेवायचे. विराजसच्या शाळेला आणि रुचिर वकील असल्यानं कोर्टाला मे महिन्यात सुट्या असायच्या. दर वर्षी आम्ही वेगवेगळ्या देशांत जायचो. जाताना तिथला इतिहास, भूगोल याचा अभ्यास करून जायचो. तिथलं थिएटर बघायचो, चित्रपट बघायचो. जग किती मोठं आहे याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. नाहीतर आपली गल्ली म्हणजे जग वाटलं, तर मुलांना पुढे फार अवघड होतं.
अलीकडच्या काळात मुलांना एवढं एक्‍स्पोजर उपलब्ध आहे, की त्यापुढे आपण पालक मागं पडतो. आमच्या लहानपणी आजच्याइतकं एक्‍स्पोजर नव्हतं. त्यावेळी माझे आई-बाबा वेगवेगळ्या सभांना आम्हाला घेऊन जायचे. साहित्य संमेलनं, वसंत व्याख्यानमाला, मॅजेस्टिक गप्पा, काही आवर्जून दाखवलेले चित्रपट, शास्त्रीय संगीताच्या मैफिली असं सगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. त्यातलं काही कळलं नाही, तरी ते कानावर पडणं महत्त्वाचं होतं. नंतर त्यावर चर्चा व्हायच्या. या चर्चांमुळे आम्ही घडलो असं मला वाटतं. त्या वयात या गोष्टी कानावर पडणं हे खूप उद्‌बोधक असतं. आताच्या मुलांना खूप जास्त गोष्टी उपलब्ध आहेत त्यामुळे ती नक्कीच आपल्याला शिकवतात. कॉंम्प्युटर, वेगवेगळी गॅजेट्‌स या गोष्टी विराजसनं आम्हाला शिकवल्या आहेत. तो साधारण चार वर्षांचा असेल, तेव्हा कॉंम्प्युटर घरात आला होता. त्यामुळे अत्याधुनिक वस्तू हाताळणं हे या पिढीला आमच्यापेक्षा जास्त सहज वाटतं. आमच्या पिढीचं सांस्कृतिक जग हे मर्यादित होतं. आता ते मर्यादित नाही. विराजस आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट मध्ये शिकलेला आहे. तिथं त्यानं स्क्रीनप्ले रायटर आणि दिग्दर्शक असा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात, ज्या मला त्याच्याकडून शिकायला मिळतात. त्यामुळे आमचा अनुभव आणि त्याचं तांत्रिक शिक्षण याच्यातून खूप वेगळ्या पद्धतीची चर्चा आता आमच्या घरात होते.

आमचे आई-वडील खूप जागरुक होते. आम्ही काय वाचतो, कोणता चित्रपट बघतो याकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. आम्ही खूप नशीबवान आहोत, की आम्हाला असे आई-वडील मिळाले. तसंच मी किंवा रुचिरसुद्धा विराजसच्या बाबतीत काटेकोर होतो. रुचिर त्याच्या इंग्रजी वाचनाची काळजी घ्यायचा, मी मराठी वाचनाची काळजी घ्यायचे. असं सगळं असलं, तरी एकदा विराजसनं मला विचारलं, की "आई हॅरी पॉटर हे माझं इतकं आवडतं पुस्तक आहे, त्या पुस्तकांची मी पारायणं केली आहेत, मग तुम्हाला का ते वाचावसं वाटत नाही.' हे ऐकल्यावर मी खरंच हलले. मला त्यावेळी वाटलं, खरंच आहे हे. आपण संस्कार फक्त द्यायचे नसतात, तर पुढच्या पिढीकडून घ्यायचेही असतात. मग मी हॅरी पॉटर वाचलं. त्यामुळे आम्हाला दोघांनाही माहिती असलेलं काहीतरी समान आहे, याची आम्हाला खूप गंमत येऊ लागली. आपल्या पाल्यानं आपल्याला काही सुचवलं, तर तो संस्कार नसला तरी सल्ला असू शकतो. त्याचा आपण आदर केला पाहिजे. आपल्याला एक किंवा दोन मुलं असणार आणि त्यातही आपल्यात बॉंड राहिला नाही तर मग काय राहील? त्यासाठी वेगवेगळ्या दोघांनाही आवडणाऱ्या समान गोष्टींबाबत चर्चा झाली पाहिजे. म्हणून आम्ही विराजसकडूनही खूप गोष्टी शिकतो. त्यात आनंद आहे, गंमत आहे.

माझं पालकत्व दोन-तीन टप्प्यांत विभागलं आहे. मी ज्यावेळी जास्त प्रमाणात हिंदी मालिका करायचे, तेव्हा माझ्या सासूबाईंनी विराजसची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. त्यामुळे शाळा, खाणंपिणं, अभ्यास, खेळ, क्‍लासेस अशा सर्व गोष्टी त्या अत्यंत मनापासून आणि आनंदानं बघायच्या, तर त्यानं काय वाचावं, काय पाहिलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे हे सर्व माझ्या आई-वडिलांनी पाहिलं. त्यामुळे त्या काळातली माझी जबाबदारी या लोकांनी वाटून घेतली होती आणि निभावलीसुद्धा. त्यांना तसं करू देणं, तो तुमचाही आहे ही भावना आपल्या आई-वडीलांना, सासू-सासऱ्यांना देणं हेही महत्त्वाचं असतं. आजी-आजोबांचं प्रेम आणि त्यांनी पाहिलेले उन्हाळे पावसाळे आपसुक आपल्या मुलांचे होऊन जातात. ते रोखण्याची गरज नाही. विराजस खरोखरच नशीबवान, की त्याला दोन्हीकडचे आजी-आजोबा अत्यंत सुशिक्षित, प्रेमळ आणि उत्तम संस्कार करणारे मिळाले.

पालकत्व हे जबाबदारीनं झालं पाहिजे. कारण आपण एक मूल जन्माला घातलं आहे, त्याचा एक जबाबदार माणूस होणार आहे आणि आपण घडवू तसा तो घडणार आहे. ही जबाबदारी पालकांनी ओळखली पाहिजे, त्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यासाठी आधी स्वतः तयार असलं पाहिजे. केवळ शिस्त लावणं म्हणजे पालकत्व नाही. "काय करायचं नाही', याबरोबर "काय करायचं,' हे आधिक चांगल्या प्रकारे सांगणं याला जबाबदार पालकत्व म्हणतात. माझ्या मते पालक वा मुलांमधला बॉंड हा खूपच महत्त्वाचा आहे. तो निर्माण होण्यासाठी, जपण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतात. तुमच्या मुलांना तुम्ही "इंटरेस्टिंग' वाटलात तरच तो बॉंड होईल ना? तुम्हाला आताचं काही माहीतच नाही, असं त्यांना कळलं, तर त्यांचा इंटरेस्ट संपेल. आत्ताची पिढी खूप हुशार, जागरुक आहे. त्यांना योग्य दिशा देण्याबरोबरच त्यांच्या बरोबरीनं पावलं टाकायला शिकणं हे पालकांनी केलं पाहिजे. आपण पुढच्या पिढीचं ऐकलं पाहिजे. अनेक ठिकाणी पिढ्यांतल्या अंतरामुळे संवाद खुंटतो, तर अनेक ठिकाणी तो सुरूच होत नाही. असं होऊ नये म्हणून तुम्ही एक इंटरेस्टिंग पालक असलं पाहिजे. म्हणून "इंटरेस्टिंग पालक बना' हाच माझा संदेश आहे.

(शब्दांकन ः मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com