esakal | ...त्यांना दहापैकी दहा मार्क (एन. चंद्रा)
sakal

बोलून बातमी शोधा

n chandra

‘अंकुश’ चित्रपटानं अनेक नवी समीकरणं हिंदी चित्रपटसृष्टीत तयार केली . एन. चंद्रा यांच्या या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती ती आशालता यांनी. चित्रपटाच्या शेवटपर्यंत असणारी ही भूमिका खरंतर नायक नायिकेपेक्षा वेगळी कमी महत्वाची पण आशालताबाईंनी आपल्या अभिनयानं या भूमिकेची उंची वाढवली. एन. चंद्रा यांनी जागवलाय त्यांच्याबरोबरचा तो काळ...

...त्यांना दहापैकी दहा मार्क (एन. चंद्रा)

sakal_logo
By
एन. चंद्रा

‘अंकुश’ चित्रपटानं अनेक नवी समीकरणं हिंदी चित्रपटसृष्टीत तयार केली . एन. चंद्रा यांच्या या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती ती आशालता यांनी. चित्रपटाच्या शेवटपर्यंत असणारी ही भूमिका खरंतर नायक नायिकेपेक्षा वेगळी कमी महत्वाची पण आशालताबाईंनी आपल्या अभिनयानं या भूमिकेची उंची वाढवली. एन. चंद्रा यांनी जागवलाय त्यांच्याबरोबरचा तो काळ...

आशालता यांचं दोन शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर मी ‘एव्हरग्रीन अॅक्टर’ असं करीन. गेली पस्तीस वर्षे मी त्यांना पाहत आलो आहे. एक वर्षांपूर्वी मी त्यांना भेटलोही होतो. परंतु त्यांच्यामध्ये काही बदल झालाय असं मला कधीच वाटलं नाही. त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं सगळं काही तेच मला दिसले. अत्यंत प्रतिभाशाली कलाकार. मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं ‘महानंदा’ या नाटकात. हे नाटक पाहायला मी गेलो होतो आणि त्यांचं काम पाहून मी खूप प्रभावित झालो. काय जबरदस्त अभिनय केला होता त्यांनी त्यावेळी.

त्यांचा तो अभिनय बघूनच माझ्या डोक्यात एक समीकरण पक्क झालं होतं की त्यांच्याबरोबर कधी ना कधी काम करायचेच. मग जेव्हा ‘अंकुश’ चित्रपटाची संपूर्ण संहिता तयार झाली तेव्हा त्यातील आजीच्या भूमिकेसाठी त्यांना घ्यायचंय हे मी निश्चित केले. त्यांनी ती भूमिका उत्तमरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली. त्यांना ती भूमिका चांगल्यापैकी समजली होती आणि मला अर्थात दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे हेदेखील त्यांना चांगलं ठाऊक होतं. या चित्रपटाच्या यशात अन्य मंडळींबरोबरच त्यांचाही तितकाच मोलाचा वाटा होता असे मी म्हणेन.
‘अंकुश’ मध्ये एक प्रसंग आहे.‘त्या भाजीबाजारातून चालत येत असतात आणि अंकुशमधली नाक्यावरची ती चार तरुण मुलं रस्ता क्रॉस करीत असतात. त्यातील रवी त्यांना पाहून म्हणतो, की आजी तू इकडे काय करतेस...ऑटोमधून जा..त्यावर ती म्हणते, ‘‘नाही रे ऑटोवाले कुणी थांबतच नाहीत.’’

लगेच रवी एका ऑटोवाल्याला थांबवितो व इकडे इकडे जायचे आहे असे सांगतो. तो नकार देताच रवी त्याला बाहेर खेचतो आणि त्याची कॉलर पकडून दोन थोबाडीत मारतो...आजीला म्हणतो आता यामध्ये बस..तो बरोबर घेऊन जाईल..या प्रसंगात त्यांचं जे एक्सप्रेशन आहे त्यामध्ये सगळी स्टोरी येते. कारण सुरुवातीला त्यांना वाटते की ही मुले साधी आहेत...थट्टामस्करी करणारी आहेत...छान आहेत...पण ती अशीही (हिंसाचार करणारी) आहेत याची कल्पना त्यांना त्यावेळी येते. तो सीन त्यांनी असा काही केला आहे की मी त्याला पैकीच्या पैकी मार्क देईन. त्यांचा स्वभाव म्हणून दहा पैकी दहा...एक व्यक्ती म्हणून दहा पैकी दहा..एक कलाकार म्हणून दहा पैकी दहा..मार्क मी त्यांना देईन. त्यांना सगळ्या दृष्टीने मी दहा पैकी दहा गुण देईन. एव्हरग्रीन अॅक्ट्रेस. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा आणि माधुर्य होतं. स्वभावाला अतिशय शांत. त्या गोव्याच्या होत्या आणि मीदेखील गोव्याचा. त्यामुळे आम्ही सेटवर कोकणी भाषेत कधी कधी संवाद साधायचो. गोव्याच्या मातीत कला रुजलेली आहे...काव्य रुजलेलं आहे..गाणे रुजलेले आहे. अतिशय प्रतिभावान कलाकार. त्या या सगळ्याचं प्रतीक होत्या. नाटक, चित्रपट आणि मालिका अशी सगळ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविलेली होती.

(शब्दांकनः संतोष भिंगार्डे)

loading image
go to top