सुकाणूमागच्या नवदुर्गा (राजकुमार भीतकर)

rajkumar bhitkar
rajkumar bhitkar

नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर सगळीकडं होत असताना यवतमाळमध्ये स्त्रीशक्तीचा एक वेगळाच जागर सुरू आहे. या जिल्ह्यात २१ महिला एकाच वेळी एसटीच्या चालक म्हणून रस्त्यांवर अधिराज्य गाजवणार आहेत. आदिवासी समाजातल्या या महिला. प्रत्येकीची कहाणी वेगळी, संघर्ष वेगळा. अनेकींना यापूर्वी सायकलसुद्धा चालवायची भीती वाटायची. त्या आता आत्मविश्वासानं नवी भरारी घेत आहेत. आज (रविवारी) सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या नवदुर्गांची ही कहाणी.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळानं वर्षभरापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या २१ महिलांची चालक पदासाठी नियुक्ती केली आहे. त्या सर्व महिला आदिवासी समाजातला आहेत. प्रथमच महिलांच्या हाती एसटीच्या बसचं स्टिअरिंग येणार आहे. ही कौतुकास्पद आणि ऐतिहासिक घटना आहे. ज्या क्षेत्रात महिलांचा वावर नव्हता, अशा क्षेत्रात पहिल्यांदाच महिलांनी पाऊल ठेवलं. या नवदुर्गांकडं समाज आजही केवळ आदिवासी महिला किंवा महिला म्हणूनच बघत आहे. मात्र, ज्या महिलांच्या हातात एसटीचं स्टिअरिंग येणार आहे, त्यापैकी अनेक जणी पदवी, पदव्युत्तर पदवीप्राप्तसुद्धा आहेत. मात्र, प्रत्येकीची कहाणी वेगळी आहे. संघर्ष करत आणि त्याच वेळी सकारात्मक वाटचाल करत या सगळ्या जणी इथपर्यंत आल्या आहेत. त्यांच्या या सगळ्या कहाणीतली प्रेरणा अनेकींना प्रकाशवाटा दाखवणारी आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एक वर्षापूर्वी मुंबईला एसटीत महिला चालकांची भरती करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा वेगळी होती. कारण सर्व क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना मात्र एसटीत वाहक म्हणून नियुक्त केलं जात होतं, मात्र चालक म्हणून संधी दिली जात नव्हती. प्रवासी वाहन चालवणं हे पुरुषांचं काम असल्यानं या क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी होती. प्रथमच महिलांना चालक म्हणून संधी देण्याची घोषणा होताच त्यासाठी आदिवासी जिल्हा म्हणून यवतमाळची निवड करण्यात आली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आदिवासी तरुणींना प्रोत्साहन दिलं. त्यांनी लाइट मोटर व्हेईकल लायसन्स काढून देण्यासाठी पुढाकार घेतला. यवतमाळ विभागाकडून पदभरतीची जाहिरात काढण्यात आली. जिल्ह्यातल्या २१ आदिवासी तरुणींची निवड करण्यात आली.

या २१ जणींचं १ फेब्रुवारी ते ३१ जुलै २०१९ पर्यंत वाहनचालकपदासाठीचं वर्गप्रशिक्षण पूर्ण झालं. आता एक ऑगस्टपासून त्यांना प्रत्यक्षात एसटी चालवण्याचंही प्रशिक्षण दिलं जात आहे. हे प्रशिक्षण ३१ जुलै २०२० रोजी पूर्ण होईल. त्यानंतर त्या सर्व जणी एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होणार आहेत. या सर्व मुलींची निवड आदिवासी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा आणि पुसद यांच्याकडून करण्यात आली आहे. या २१ मुलींमध्ये तीन मुली पदव्युत्तर आणि अनेक जणी पदवीप्राप्त आहेत. एसटीचं स्टिअरिंग केवळ महिलांच्या हाती नव्हे, उच्चशिक्षित महिलांच्या हाती गेलं आहे. अत्यंत आत्मविश्‍वास असलेल्या या महिलांच्या कथाही प्रेरणादायक आहेत. दारव्हा तालुक्‍यातील ज्योत्स्ना ठाकरे ही महातुली (खोपडी) इथली रहिवासी. तिनं राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात एमए केलं आहे. संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असलेली सुवर्णा मराठी आणि इंग्रजी टंकलेखक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून तिला पोलिस अधिकारी बनायचं होते. मात्र, एसटीत चालक म्हणून संधी मिळताच तिनं आव्हान स्वीकारलं. तिचे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिलं. नेर तालुक्‍यातल्या मांगलादेवीची सुवर्णा कुमरे एमकॉम आहे. प्राध्यापक बनायचं तिचं स्वप्न होतं; परंतु नोकरीसाठी द्यायला पैसे नाहीत. त्यामुळं तिनं स्टिअरिंग हातात घेतले. काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा तिला ध्यास आहे. महिला सर्व क्षेत्रांत काम करतात. एसटी-चालक या क्षेत्रातच महिला नव्हत्या. आपल्यापासून सुरुवात व्हावी, म्हणून हे क्षेत्र निवडल्याचं सुवर्णा सांगते. ‘‘आदिवासी मुलीदेखील मागं नाहीत, हे दाखवून द्यायचं होतं. इतर महिलांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी ड्रायव्हर झाले,’’ असं तिनं सांगितलं. फासेपारधी समाजातली शीतल आनंदवाडीची रहिवासी. ती बारावी उत्तीर्ण आहे. आव्हान असलेल्या क्षेत्रात जायचं म्हणून तिनं हे क्षेत्र निवडलं. सुवर्णा नागमोते ही शिवणी इथली. तिचं बारावीपर्यंत शिक्षण झालं. तिला बालपणापासूनच ड्रायव्हिंगची आवड होती. तिच्या भावानं तिला प्रोत्साहन दिलं.

पूजा नैताम विवाहित आहे. तिचं शिक्षण बीए पार्ट वनपर्यंत झालं आहे. तिला पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा आहे. सरपंच नंदू कुळसंगे यांनी तिला एसटी चालकांच्या जागा निघाल्याची माहिती दिली. तिचे पती कारपेंटर आहेत. त्यांच्या कामातून मिळणाऱ्या मिळकतीत संसाराचा गाडा चालवणं कठीण होतं. त्यामुळं तिनं ड्रायव्हर होण्याचं स्वप्न पाहिलं. कधी काळी रस्त्यानं चालायची भीती वाटणारी पूजा आता गर्दीतून एसटी बस चालवते. पतीचं पाठबळ मिळाल्यानं हे शक्‍य झाल्याचं ती सांगते. दारव्हा तालुक्‍यातली रंजना राजू शेळके विवाहित आहे. तिला नंदिनी आणि श्रावणी अशा दोन मुली आहेत. पती मजुरी करतात. ती दारव्ह्याचे डॉक्‍टर राठी यांच्या क्लि‍निकमध्ये काम करत असे. परंतु, कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी तिनं या क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यासाठी पतीचं पाठबळ मिळाल्याचं तिनं सांगितलं. शेतात काम करणाऱ्या, काम करून शिक्षण घेणाऱ्या, कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या, पतीला मदत व्हावी म्हणून काम करणाऱ्या या महिलांनी कुटुंबासोबतच एसटीचा गाडाही हाकण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वर्षभरानंतर त्या प्रत्यक्ष ड्रायव्हर म्हणून जबाबदारी स्वीकारतील. मात्र, त्यांनी स्वीकारलेलं आव्हान निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

या आहेत त्या २१ जणी
सुवर्णा कुमरे, पूजा टेकाम, महानंदा ठाकरे, रंजना शेळके, शीतल पवार, शिल्पा ताडाम, गायत्री होलगरे, शिल्पा पेंदोर, सुशीला वडेकर, सीमा गवळी, राधा दाभेकर, सुवर्णा मेश्राम, नम्रता आगलावे, हर्षा लडके, मनीषा गाडेकर, सपना कुळसंगे, पूजा नैताम, सपना कुळसंगे, अंजुता भोसले, अनसूया मडावी, सुवर्णा नागमोते.

मांगलादेवीच्या तिघी जणी
- नेर तालुक्‍यात मंगलादेवीचं प्रसिद्ध मंदिर असलेलं मांगलादेवी नावाचं गाव आहे. या गावातल्या सुवर्णा कुमरे, पूजा टेकाम आणि शिल्पा ताडाम या तिघी जणी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून एसटी महामंडळात करण्यात आलेल्या चालकाच्या भरतीत नियुक्त झाल्या आहेत.

सरळ सेवा भरतीनं दहा मुलींची नियुक्ती
प्रशिक्षणार्थी २१ महिलांची आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत पांढरकवडा आणि पुसद इथं नोंदणी झालेली आहे. त्यांच्या नियुक्तीची कारवाई प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केली जाईल. नव्यानं सरळ सेवा भरतीअंतर्गत दहा महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यांचं प्रशिक्षण १ सप्टेंबरपासून सुरू झालं आहे.
- सुदेशना खरतडे, वरिष्ठ लिपिक, परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, यवतमाळ

राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात एमए केलं. पोलिस अधिकारी बनायचं स्वप्न होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू असताना एसटी चालक भरतीची जाहिरात आली. विचार केला : पुढं खूप स्पर्धा आहे- चालक म्हणूनच करिअर सुरू करावं. अर्ज केला आणि निवड झाली. सध्या प्रशिक्षण सुरू आहे. एकदाची नोकरी मिळाली अन्‌ भविष्याची चिंता मिटली.
- ज्योत्स्ना ठाकरे, खोपडी (महातुली), ता. दारव्हा जि. यवतमाळ

एमकॉम केलं. लेक्‍चरर व्हायचं होतं. वेगळं काहीतरी करून दाखवायचं होतं. आदिवासी मुलंदेखील मागं नाहीत, हे सिद्ध करायचं होतं. महिलांसमोर एक नवा आदर्श निर्माण करायचा होता. शिवाय, रोजगाराचा प्रश्‍नही मिटवायचा होता. त्यासाठी हे क्षेत्र निवडलं.
- सुवर्णा कुमरे, मांगला (देवी), ता. नेर जि. यवतमाळ

आई-वडील शेती करतात. एक भाऊ शेती करतो, दुसरा शिकत आहे. नोकरी करून स्वत:च्या पायावर उभं व्हायचं होतं. भावानं अर्ज करायला सांगितलं. एसटी चालवण्याची सुप्त इच्छा होती. ड्रायव्हर म्हणून निवड झाली. याच क्षेत्रात चांगलं काम करायची इच्छा आहे.
- सुवर्णा नागमोते, मु. पो. शिवणी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ.

बीए झाल्यावर लग्न झालं. पती कारपेन्टर आहेत. पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. कुटुंबाला आर्थिक हातभार व्हावा, म्हणून नोकरी शोधत होते. दरम्यान, चालकाच्या जागा निघाल्या. नियुक्ती झाली. पूर्वी रस्त्यानं एकटं चालायची भीती वाटायची. आता, गर्दीतून बस काढताना भीती वाटत नाही. प्रशिक्षणातून आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे.
- पूजा नैताम, देऊळगाव (वळसा), ता. दारव्हा जि. यवतमाळ.

पती मजुरी करतात. मी दारव्ह्याचे डॉ. राठी यांच्या रुग्णालयात काम करायची. दोन मुलं आहेत. ती शाळेत जातात. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कायमस्वरूपी नोकरीची गरज होती. आता ड्रायव्हर म्हणून निवड झाल्यानं रोजगाराचा प्रश्‍न मिटला. मुलांच्या भविष्य घडविण्याची काळजीही मिटली.
- रंजना शेळके, तरोडा, ता. दारव्हा जि. यवतमाळ

बीए झाले. नोकरी शोधत होते. एसटी ड्रायव्हरच्या जागा निघाल्याची माहिती मिळाली. अर्ज केला आणि निवड झाली. पूर्वी सायकलसुद्धा चालवण्याची भीती वाटायची- आता एसटी चालवण्याची वाटत नाही. मनातला नकारात्मक भाव निघून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
- पूजा टेकाम, रा. मांगलादेवी, ता. दारव्हा जि. यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com