...मानियले नाही बहुमता (निरंजन आगाशे)

niranjan aagashe
niranjan aagashe

राजहंस प्रकाशन व डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन संस्थे’च्या वतीने ‘श्रीगमा पुरस्कार’ प्रख्यात लेखक-संशोधक शेषराव मोरे यांना जाहीर झाला आहे. ‘माणूस’चे संपादक श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मदिनी (ता. एक ऑगस्ट) तो प्रदान करण्यात येईल. यानिमित्त मोरे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वाटचालीची ओळख.

महाराष्ट्रातल्या विचारविश्वात शेषराव मोरे यांनी स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे. संशोधक आणि अभ्यासक म्हणून झालेला त्यांचा हा प्रवास कदाचित तशा मार्गानं जाऊ पाहणाऱ्या अनेकांना स्फूर्ती देईल. त्या प्रवासावर नजर टाकली तर मनावर प्रामुख्यानं ठसा उमटतो तो म्हणजे मोरे यांच्या पूर्णपणे स्वतंत्र अशा शोधयात्रेचा. विषयाच्या निवडीपासून ते मांडणीपर्यंत, संदर्भ गोळा करण्याच्या धडपडीपासून ते अभ्यास करण्याच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या या वेगळ्या शैलीची छाप आहे. घडणीच्या काळात नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंताची अनेक व्याख्यानं त्यांना ऐकायला मिळाली. ‘कुरुंदकर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं,’ अशी कृतज्ञता ते नेहमीच व्यक्त करतात. तरीही त्यांनी कुणाचं बोट धरून वाटचाल केली असं झालं नाही. त्यांनी ऐकली ती अंतरीची हाकच.

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातलं जांब हे त्यांचं छोटेसं गाव. जेमतेम चार हजार वस्तीचं. वीज किंवा डांबरी रस्ताही नसलेलं. मात्र, अकरावीपर्यंतची शाळा या गावात होती. या शाळेत वैजनाथ उप्पे गुरुजी हे ध्येयवादी वृत्तीचे शिक्षक त्यांना लाभले. भारतीय इतिहासातल्या लोकोत्तर नेत्यांचं कर्तृत्व त्यांच्याकडून ऐकताना मोरे यांना इतिहासाची गोडी लागली, त्यातही ‘सावरकर’ हा त्यांचा त्या वेळीच ध्यासविषय आणि काही काळातच अभ्यासविषयही बनला. या अभ्यासात त्यांनी स्वतःला बुडवून घेतलं. इतकं की पुढं शासकीय तंत्रनिकेतनमधल्या प्राध्यापकपदाच्या नोकरीतून त्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. असं धाडस करणं म्हणजे वेडेपणाच; पण तसा तो केल्याशिवाय वेगळं काही घडवता येत नाही हेही खरंच. ‘महाराष्ट्राच्या प्रबोधनपरंपरेत सावरकरांचा बुद्धिवाद आणि सामाजिक सुधारणांविषयीचा विचार महत्त्वाचा आणि कार्यकर्त्यांसाठी उपयुक्तही आहे,’ असं मोरे यांना वाटतं; पण नुसतं वाटतं म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत. एखादा विषय निवडला की त्याचा अगदी तळ गाठायचा, त्या विषयासंबंधी जे जे उपलब्ध साहित्य मिळेल ते ते पूर्णतः अभ्यासायचं आणि आपले निष्कर्ष निर्भीडपणे मांडायचे अशी मोरे यांची पद्धत. ते करत असताना त्यांना एक गोष्ट अगदी लख्खपणे जाणवली व ती म्हणजे, एकीकडे पूर्वग्रहातून सावरकरविचारांचा विपर्यास होत आहे, तर दुसऱ्या बाजूला, अनेक अनुयायीदेखील सावरकरांच्या सामाजिक विचारांबाबत उदासीन आहेत. सन १९८८ मध्ये ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ आणि त्यानंतर चारच वर्षांनी ‘सावरकरांचे समाजकारण: सत्य आणि विपर्यास’ हे त्यांचे ग्रंथ म्हणजे ही कोंडी फोडण्याचा प्रभावी प्रयत्न होता.

हे निष्कर्ष मांडल्यानंतरही, या मांडणीवर विचार व्हावा, तीमधल्या मुद्द्यांचा आवश्यक तर कठोर प्रतिवाद व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती आणि नेहमीच ते ती व्यक्त करतात; पण बऱ्याच पुरोगामी मंडळींनी या पुस्तकांच्या बाबतीत उपेक्षेचं ‘अस्त्र’ वापरलं. याचं कारण, सावरकरांना त्यांनी ‘जमातवादी’ या सदरात टाकलं होतं आणि त्यात काही बदल करावा, निदान पुन्हा विचार करावा, असं त्यांना वाटलं नाही. दुसऱ्या बाजूला, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या त्यांच्या बऱ्याच अनुयायांना, वैचारिक जगतात असं काही चाललं आहे, याचा हासभासही नव्हता. त्यांच्यातही एक प्रकारचा निवांतपणा होता. ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्या बऱ्याचशा अपेक्षित आणि साचेबद्ध होत्या. याचं कारण, वैचारिक क्षेत्रातही झालेलं ध्रुवीकरण. या एकंदर वाटचालीत आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांचं कथन ‘वेगळ्या वाटेने जाताना’ या लेखात मोरे यांनी केलं असून, ते आपल्याकडच्या वैचारिक संस्कृतीवर झगझगीत प्रकाश टाकणारं आहे. एका अर्थानं मोरे यांनी या वैचारिक संस्कृतीला दाखवलेला हा आरसा आहे असं म्हणायला हवं. प्रश्न आहे तो, त्यात दिसणारं हे चित्र बदलण्याचा प्रयत्न होणार का, हाच. ‘डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास’ या त्यांच्या आणखी एका अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या प्रस्तावनेत मोरे लिहितात : ‘आजकालचे वैचारिक वास्तव असे आहे की, एखादे मत व निष्कर्ष चूक की बरोबर हे वस्तुनिष्ठपणे पुराव्यावर, म्हणजेच गुणवत्तेवर ठरवण्याऐवजी, ते मत वा निष्कर्ष मांडणारा कोण आहे, त्याचे इतर विचार कोणते आहेत, या आधारावर ते ठरवले जाऊ लागले आहे.’

मोरे हे स्वतः भारतीय राज्यघटनेतलं धर्मनिरपेक्षतेचं मूल्य शिरोधार्य मानतात. तेच देशहिताचं आहे, याविषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. ‘सर्वच धर्मग्रंथांचं स्थान कपाटात आहे, आजच्या काळासाठी निर्णय घ्यायचे ते बुद्धीच्या कसोटीवर,’ हे सावरकरसूत्र मोरे प्रमाण मानतात आणि त्यांच्या लेखनातही ते प्रतिबिंबित झालेलं आहे; परंतु ‘धर्मनिरपेक्षता’ या संकल्पनेचे आपल्याकडे वेगवेगळे अर्थ लावले गेले. त्यातच या एकूण परिचर्चेत राजकीय व्यक्तींनीच नव्हे, तर प्रागतिक अशी प्रतिमा असलेल्या विचारवंतांनीही ‘इस्लामची चिकित्सा’ हा विषय ‘ऑप्शन’ला टाकल्यानं या संकल्पनेबाबत आणखीच गोंधळ उडाला. याबाबतीत अगदीच थोडे अपवाद दाखवता येतील; पण ते अपवादच. शिवाय, या सगळ्या वातावरणात धर्मनिरपेक्षतेत अभिप्रेत असलेल्या आधुनिक मूल्यांचा आशयही गुदमरून जायला लागला. राजकीय सोईचं साधन म्हणूनच त्याकडे जास्त करून पाहिलं जाऊ लागलं. ‘आजच्या वर्तमानाशी निगडित ज्वलंत समस्यांवरच अभ्यास करून लिहायचं,’ अशी प्रतिज्ञा करून बसलेल्या मोरे यांनी ही समस्या केंद्रस्थानी ठेवून पुढच्या काळात आपला ग्रंथलेखनाचा प्रवास केल्याचं दिसतं. ‘काश्मीर : एक शापित नंदनवन,’ ‘१८५७ चा जिहाद’, ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ या सर्वच पुस्तकांतून त्यांनी काढलेले निष्कर्ष सर्वांनाच पटतील असं नाही; पण ते खोडून काढण्यासाठी तेवढ्याच खोलात उतरण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही, हेही तितकंच खरं आहे. अखंड भारत समजा राहिला असता तर त्याची घटना कशी असती, असा प्रश्न उपस्थित करून फाळणीचा इतिहास आणि गांधीजींची भूमिका याविषयी पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून मोरे यांनी भाष्य केलं आहे. ते मुळातूनच वाचायला हवं; पण या सगळ्यापेक्षा मोरे यांची लक्षणीय कामगिरी म्हणजे, मुस्लिम मनाचा शोध घेण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न. शेकडो वर्षांचं सहअस्तित्व असूनही मुस्लिम समाजाविषयीचं आपलं आकलन हे एकतर तात्कालिक अनुभवांवर, पूर्वग्रहांवर, इतिहासात वाचलेल्या काही गोष्टींवर किंवा फार तर पाश्चात्यांनी लिहिलेल्या लेखनातून घडतं; पण मोरे यांनी मोठी उडी घेतली. त्यांनी ‘कुराण’ आणि ‘हदीस’ या ग्रंथांचा मुळातून अभ्यास करायचं ठरवलं. या अभ्यासाचं फलित म्हणजे ‘मुस्लिम मनाचा शोध’ हा ग्रंथ. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या भाषांमधल्या मिळून कुराणाच्या १२ प्रती मोरे यांच्या संग्रही आहेत. त्यातल्या आयतींचा अर्थ लावताना त्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. एवढंच नव्हे तर, आपण लावलेला अर्थ योग्य आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी अनेक मुस्लिम पंडितांशी चर्चा केली. त्यासाठी या ग्रंथाची एक ‘अभिप्राय-आवृत्ती’ही काढली. त्यांनी लावलेल्या अन्वयात जिथं मतभेद आहेत तिथं ते मतभेद नोंदवणाऱ्या तळटीपाही दिलेल्या आहेत. मराठीत अशा प्रकारचं काम पहिल्यांदाच झालेलं आहे. आपण दिलेल्या प्रत्येक पुराव्याचा संदर्भ वाचकांना पडताळून पाहता आला पाहिजे, याविषयी मोरे कमालीचे दक्ष असतात. त्यांच्या प्रत्येक पुस्तकांत तळटीपा, व्यक्तिनामसूची, संदर्भसूची विस्तारानं नमूद केलेली असते. ही शिस्त त्यांनी नेहमीच पाळली आहे. ही केवळ मांडणीपुरती शिस्त नव्हे; तर संशोधनात, विचार करण्याच्या पद्धतीतही ती आहे. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कुणात असते? थोर ब्रिटिश तत्त्वज्ञ-विचारवंत बर्ट्रांड रसेल यांनी दोन प्रमुख लक्षणं सांगितली आहेत. प्रबळ अशा परंपरेच्या प्रभावावर मात करता येणं आणि स्वतःच्या उत्कट भाव-भावनांपासूनही मुक्त होणं. या दोन्ही गोष्टी अर्थातच सोप्या नाहीत. तरीही मोरे त्या वाटेनं चालत आहेत, असं नक्कीच म्हणता येतं. त्यांच्या एकूण कामाचा आवाका पाहिल्यावर तो एखाद्या संस्थेलाच पेलता येईल, असंच कुणालाही वाटेल, म्हणूनच त्यांच्या या कामगिरीची समाजानं नोंद घेणं गरजेचं आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे काही प्रमाणात ते साध्य झालं आहे. नव्या, सर्जनशील लेखनाचा अथक् शोध घेणारे ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे आणि निरलस ज्ञानोपासक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या स्मृत्यर्थ काम करणाऱ्या संस्थेच्या सहयोगानं तो दिला जातोय, हा विशेष योग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com