esakal | पालकत्व म्हणजे प्रेम आणि जबाबदारी (निवेदिता सराफ)
sakal

बोलून बातमी शोधा

nivedita saraf

पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी! आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही.

पालकत्व म्हणजे प्रेम आणि जबाबदारी (निवेदिता सराफ)

sakal_logo
By
निवेदिता सराफ

पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी! आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- कारण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे.

माझी आई अतिशय खंबीर स्वभावाची होती. माझे वडील खूप लवकर गेले. त्यानंतर तिनं मला आणि माझ्या बहिणीला अतिशय समर्थपणे वाढवलं. तिनं सांगितलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आयुष्यात कधी हार मानू नका. कितीही निराशा आली तरी हाती घेतलेलं काम सोडून देऊ नका, ते पूर्ण करा.’ मी आईला कधी रडताना, दुःख उगाळताना, एखाद्या वाईट घटनेचं भांडवल करताना किंवा तीच गोष्ट पुनःपुन्हा उगाळताना कधीच पाहिलं नाही. तिला असं करण्याचा संताप यायचा. ती म्हणायची : ‘‘ठीक आहे घडली एखादी वाईट गोष्ट किंवा झाली एखादी चूक, तर ती चूक दुरुस्त करा. त्यातून तुम्ही धडा शिका. चुका चांगल्या असतात. कारण जसं डॉक्टर म्हणतात, ताप वाईट नसतो, तो तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झाला आहे हे तो दर्शवतो. तो बिघाड दूर केला, की ताप जातो. तसं चूक आपल्याला सुधारण्याची संधी देते. त्यामुळे चूक झाली तर हरकत नाही; पण तीच चूक पुन्हा करू नका.’’

आईचा आणखी एक महत्त्वाचा गुण जो अजूनही मला प्रभावित करतो तो म्हणजे, ती खूप क्षमाशील होती. कोणालाही पटकन क्षमा करायची. एखाद्याच्या कृतीवरून त्याच्याबद्दल कोणतंही मत चटकन् बनवायची नाही. तिनं आम्हाला लहानपणापासून सांगितलं आहे, की यश पचवणं खूप सोपं असतं; पण अपयश पचवणं अवघड असतं. ते पचवता आलं पाहिजे, पचवायला शिकलं पाहिजे.

आई आधी कम्युनिस्ट विचारसरणीची होती. तिचा देवावरही विश्वास नव्हता. कॉम्रेड दांडगेंची ती मानलेली मुलगी होती; पण डाव्या विचारसरणीची असणारी आई नंतर आलेल्या अनुभवांमुळे पूर्णपणे बदलली. ही गोष्ट तिनं मला खूप छान शिकवली, की तुमची एखादी विचारसरणी असू शकते, काही ठराविक कल्पना असू शकतात; पण आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून तुम्ही त्या बदलल्या नाहीत किंवा काळानुरूप बदलू शकला नाही, तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकत नाही. याबरोबर दिलेली आणखी महत्त्वाची शिकवण म्हणजे, आयुष्यातली काही मूलभूत तत्त्वं कधी सोडायची नाहीत. आईनं स्वतः तिची तत्त्वं कधी सोडली नाहीत. त्या काळी फोन घ्यायचा असेल, तर बराच वेळ लागायचा. तो लवकर मिळावा म्हणून तिनं कधी जास्तीचे पैसे दिले नाहीत किंवा सिलिंडर लवकर मिळावा म्हणून जास्तीचे पैसे दिले नाहीत. हाच अॕटिट्युड तिनं मला दिला. ही गोष्ट मी कायम माझ्या आयुष्यात लक्षात ठेवली. पुढच्या आयुष्यात मी अक्कलकोट स्वामींची भक्त झाले; पण देव किंवा गुरू मानल्यानंतर तुम्हाला हवी ती गोष्ट मिळालीच पाहिजे अथवा त्यांनी ती दिलीच पाहिजे असं अजिबात नाही. आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात; पण त्या गोष्टी मिळवण्याची आपली तेवढी लायकी आहे का, हे तपासलं पाहिजे. आपल्याला तेच मिळतं ज्यासाठी आपण डिझर्व्ह असतो. आपण इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशीच स्वतःची तुलना करावी. हेच मी माझ्या मुलाला, अनिकेतला सांगते, सांगायचा प्रयत्न करते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एखाद्याला जे काही मिळत असतं, तो त्याचा आतापर्यंतचा प्रवास असतो. मी काल कुठपर्यंत होतो, आज त्याच्या दोन पावलं पुढे आलो आहे का, हे आपण नियमितपणे तपासलं पाहिजे.

दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही काम करण्याची लाज बाळगू नये. आपल्याकडे, हे काम कमी, हे काम दर्जेदार असे शिक्के फार मारले जातात. अशाप्रकारे कामाला कमी-जास्त ठरवू नये. काम कुठलंही असलं, तरी त्यासाठी केली जाणारी प्रामाणिक मेहनत ही सारखीच असते. वेळ पडली तर कोणतंही काम करण्याची तयारी असली पाहिजे. सध्या लॉकडाऊनच्या काळानं आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने शिकवली आहे. आज सारेच जण घरातली सर्व कामं करू लागले आहेत. आज कोणी कोणाकडे जाऊ शकत नाही, तेव्हा आपलं आपल्यालाच आनंदी राहणं आवश्यक आहे. माझी आईसुद्धा सांगायची, की आहे त्या परिस्थितीत आपलं आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. वस्तूत आनंद शोधण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधावा. आपल्याला मुलंबाळं, आई-वडील असले, तरी आपला प्रवास एकट्याचा आहे. तो आपण समृद्ध केला पाहिजे. अनिकेतला मी हीच शिकवण दिली आहे. उद्या त्याचं यश मी त्यानं मिळवलेल्या पैशात अथवा वस्तूंमध्ये नाही बघणार, तर त्यानं किती माणसं जोडली, त्याच्या क्षेत्रात तो किती परिपूर्ण आहे, त्यानं नवलौकिक किती मिळवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती सचोटीनं तो आपलं काम करत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. अनिकेतही याच विचारांचा आहे.

मुलांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवली पाहिजे ती म्हणजे जबाबदारी. भारतीय नागरिक म्हणून हा माझा अधिकार आहे, हक्क आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्याबरोबर जबाबदारीही येते. चांगला नागरिक बनण्याची, चांगली वागणूक ठेवण्याची, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. खास करून सेलिब्रिटी म्हणून वावरताना तर हे भान खूप ठेवलं पाहिजे. कारण लोक माझ्याकडे आयकॉन म्हणून बघत आहेत, तर मी काय बोलते, कशी वागते ही माझी जबाबदारी आहे. घटनेनं दिलेल्या अधिकाराची किंमत समजणं हे आत्ताच्या मुलांसाठी फार गरजेचं आहे. फक्त यासाठीच नाही, तर निसर्गाप्रतीसुद्धा आपणच जबाबदार आहोत हे मुलांना शिकवलं पाहिजे. आपण मुलांसाठी कोणतं जग सोडून जाणार आहोत हे तपासणं, ही पालकांची जबाबदारी आहे. मुलं आज अदृश्य स्पर्धेच्या जगात वावरत आहेत. क्षेत्र कोणतही असो- स्पर्धा असतेच; पण यामध्ये धावताना प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे हा हट्ट कशाला हवा? एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर निराश न होता दुसऱ्या मार्गानं प्रयत्न सुरू करावेत. निराशेतून नुकतीच सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केली; पण आत्महत्या हा काही पर्याय नाही. असं होऊ नये म्हणून कुठंतरी तुमचं श्रद्धास्थान असणं फार गरजेचं आहे. तिकडे तुमचा विश्वास असला पाहिजे, तसाच स्वतःवरही विश्वास असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं खास करून मुलांनी दिवसातून स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे. या वेळेत मेडिटेशन करावं अथवा दिवसभरात आपण केलेल्या गोष्टींचा लेखाजोखा तपासून बघितला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी स्वतःला छान म्हटलं पाहिजे, तसंच वाईट घटनेबाबत स्वतःला माफही केलं पाहिजे. ज्यांना आपण प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे दुखावलं आहे त्यांची माफी मागितली पाहिजे आणि ज्यांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे आपल्याला दुखावलं असेल, त्यांना माफही केलं पाहिजे. चूक झाली असेल तर ती का झाली? ती कशी सुधारता येईल याचाही विचार करावा.

अलीकडे बहुतेकांची एकएकटीच मुलं असतात. त्यामुळे ती बऱ्यापैकी लाडात वाढतात. अशावेळी आपण कोणीतरी विशेष आहोत असा मुलांचा समज होऊ लागतो. सर्वांत प्रथम त्यांचा हा समज दूर केला पाहिजे. तूदेखील सर्वसामान्यांप्रमाणंच एक आहेस ही जाणीव त्यांना दिली पाहिजे. माझ्या आईनं ही जाणीव सतत आम्हाला दिली. ती म्हणायची : ‘‘तू कलाकार आहेस, सेलिब्रिटी आहेस, मला त्याचा अभिमान आहे; पण त्याच बरोबर तू एक सामान्य माणूसही आहेस.’’ एवढ्या मोठ्या विश्वातल्या, एका ग्रहावरच्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका शहरात कुठंतरी आपण राहतो. त्यामुळे तुमच्याभोवती जग फिरत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रसिद्धी, पैसा येईल- जाईल; पण तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे महत्त्वाचं आहे. जी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, ती तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणून आहेत, की त्यांना खरोखरच तुमच्याबद्दल आपुलकी आहे म्हणून आहेत, हे समजलं पाहिजे. अनिकेतनंही या गोष्टी समजून घ्याव्यात असं मला वाटतं. समजून घ्याव्यात असं यासाठी म्हणत आहे- कारण आपण बसवून मुलांना पालकत्वाचे धडे देऊ शकत नाही, किंवा देत नाही. पालकत्वाचा निश्चित असा कुठलाही फॉर्म्युला नाही. कोणाला वाटतं, की आपण मुलांना कडक शिस्तीत वाढवलं म्हणजे योग्य केलं, तर कोणाला वाटतं, की आपण सैल वातावरण ठेवून वाढवलं म्हणजे योग्य केलं. प्रत्येकाचा अनुभव, मुलांना वाढवण्याची पद्धत सगळं वेगळं असतं. एक अधिक एक असं निश्चित सूत्र पालकत्वामध्ये नसतं. आपण चाचपडतच पालकत्वाची भूमिका निभावत असतो. मी पण तेच केलं. माझ्या आईनं कुठलीही गोष्ट जवळ बसवून शिकवली नाही; पण मी जेव्हा बघते, की माझी आई काळा पैसा अथवा जास्तीचा पैसा देऊन सिलिंडर घेत नाही तेव्हा मी पण पैसे देऊन कुठली प्रश्नपत्रिका अथवा अन्य काही घेत नाही. आपल्या पालकांच्या वर्तणुकीतून आपण हे सहज शिकत असतो. त्याप्रमाणं आपली मुलंही आपल्या वागणुकीतून चांगलं, वाईट सगळं शिकत असतात.

काही गोष्टी पालकांनी मुलांना वाढवताना नक्की केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपली चूक झाली तर लगेच सॉरी म्हटलं पाहिजे. म्हणजे मुलंही त्यांची चूक लगेच कबूल करायला शिकतात. मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सहज म्हटलं जातं; पण मुलांकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आमच्या घरात मुलगा-मुलगी हा भेदभाव आम्हाला कधीच जाणवला नाही. आम्ही दोघी बहिणी ‘एक माणूस’ म्हणूनच वाढलो. आम्ही खूप लहान होतो, तेव्हाच आमचे वडील गेले होते. त्यामुळे आम्हाला स्वावलंबी होणं भागच होतं. घरातली प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्यालाच करायची हे माहीत होतं; तसंच प्रोटेक्ट करायलाही कोणी येणार नाही, हेही माहीत होतं. पपा होते तेव्हा त्यांना नेहमी आईचा आदर करताना पाहिलंय. त्यांना आईचं मत पटत नसेल, तर ती गोष्ट ते आमच्या अपरोक्ष आईला सांगायचे, आमच्यासमोर नाही. तसंच आईनंही त्यांचे वैचारिक मतभेद कधी आमच्यासमोर आणले नाहीत. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. कारण मुलं खूप हुशार असतात. त्यांच्या मनात या सगळ्या गोष्टींचं खूप ठळक प्रतिबिंब पडत असतं, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे.

अशाच प्रकारचं वातावरण, तत्त्वनिष्ठा मी अनिकेतला देण्याचा प्रयत्न केला आहे. ते किती योग्य, किती अयोग्य मला माहीत नाही. त्यानं त्यातून किती घेतलं हेदेखील माहीत नाही; पण एक गोष्ट मला माहीत आहे, की अनिकेत हा एक ‘खूप चांगला माणूस’ आहे आणि याचा मला विश्वास आहे. तो वाहवत जाणारा नाही. त्याला कोणी बिघडवलं आहे, असं कधी होणार नाही. तसं कोणीच कोणाला बिघडवत नाही. आपण बिघडवण्याची परवानगी देतो तेव्हाच व्यक्ती बिघडते. आपल्या चुकांची जबाबदारी आपणच घ्यायला शिकलं पाहिजे, ही शिकवणही आईचीच आहे.

पालकत्वाची जबाबदारी समजून मी अनिकेत पंधरा-सोळा वर्षांचा होईपर्यंत काम पूर्णपणे बंद केलं होतं. पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी! आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करायला हा जीव आपल्याला शिकवतो. ही गोष्ट आमच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीनं शिकणं जास्त गरजेचं आहे. कारण आज एकएकटी मुलं असतात. त्यांचे जास्त लाड केले जातात. आई-वडील बाहेर असतील, तर अपराधी भावनेनं मुलांना अधिक जास्त देण्याचा प्रयत्न करतात; पण या सगळ्यात मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- कारण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे. अशी जवळीक पुढच्या पिढीत फार गरजेची आहे. अनिकेतचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अशोक सराफांचा मुलगा म्हणून त्यानं कधी स्वतःचा फायदा करून घेतला नाही, की त्यांच भांडवल केलं नाही. कॉलेजमध्ये गेल्यावरही कधी मित्रांना वडिलांची मुद्दाम ओळख सांगितली नाही. मी माझ्या वागणुकीनं ओळखलं जावं ही त्याची इच्छा होती. अनिकेत अतिशय उदार, संतुलित विचाराचा आणि स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखणारा मुलगा आहे. त्यामुळे मी त्याच्याकडून औदार्य, संतुलितपणे विचार करणं, स्वतःला ओळखणं आणि ते स्वीकारणं अशा बऱ्याच गोष्टी शिकले. अनेक नव्या लेखकांचं साहित्य मी त्याच्यामुळे वाचायला लागले.

प्रत्येकजण आपल्या अनुभवातून मुलांना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या मते अनादी काळापासून हे असंच आहे. जग बदलतं तसं पालकत्वही बदलत जातं. आमच्या लहानपणी जग इतकं भयंकर नव्हतं. आता मुलांसमोर जास्त प्रलोभनं आली आहेत. पालक बनणं आणि पालकत्व निभावणं हे फार सोपं नाहीये. ते खूप तणावपूर्ण असतं. कारण आपल्या वागण्याचा, बोलण्याचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे आपल्याकडून असं काही होता कामा नये, की ज्यामुळे आपण आपल्या मुलांच्या डोळ्यात ताठ मानेनं बघू शकणार नाही, याचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे. आजच्या काळात पालकत्व जास्त तणावपूर्ण आहे. कारण तुम्ही घरात एखादं मूल्य शिकवलं, तरी बाहेर त्या गोष्टी वेगळ्या आणि विचित्र प्रकारे दिसतात. त्यामुळे काय योग्य आणि अयोग्य हे ठरवणं मुलांना अवघड होतं. अशावेळी पालकत्वाचा कस लागतो आणि ते अधिक तणावपूर्ण होतं. म्हणूनच मला ते अधिक जबाबदारीचं वाटतं. या जबाबदारीचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे.
(शब्दांकन : मोना भावसार)

loading image