रंग‘बाधा’ (प्रमोद बोंद्रे)

प्रमोद बोंद्रे, pcbondre@gmail.com
रविवार, 22 सप्टेंबर 2019

‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला. त्यांची नजर खिडकीतून दिसणाऱ्या हिरव्यागार वनश्रीवर पडली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नतेची जागा प्रसन्नता घेऊ लागली. काळजीबरोबरच माझी उत्कंठा वाढू लागली...’’

‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला. त्यांची नजर खिडकीतून दिसणाऱ्या हिरव्यागार वनश्रीवर पडली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नतेची जागा प्रसन्नता घेऊ लागली. काळजीबरोबरच माझी उत्कंठा वाढू लागली...’’

प्रख्यात सर्जन डॉ. शारंगपाणी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आले आणि अतिशय गंभीर आणि संथ आवाजात बोलू लागले. ‘‘न्यायमूर्ती महोदय, आरोपी दीनानाथ यांच्यावरच्या खूनखटल्याबद्दल मला जी काही माहिती आहे, ती मी जशीच्या तशी इथं सांगणार आहे. कारण या खटल्याच्या निकालाशी केवळ दीनानाथांचं भवितव्यच नव्हे, तर त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या भावनाही निगडित आहेत. दीनानाथांसारखा प्रथितयश चित्रकार आपल्याला आयुष्यभर साथ देणाऱ्या प्रेमळ आणि ज्येष्ठ सहकाऱ्याचा जेव्हा अचानक खून करतो आणि त्यामागचा हेतू नीटसा सिद्ध होत नाही, तेव्हा यातलं सर्व सत्य त्यांच्या चाहत्यांसमोर येणं मला अत्यावश्यक वाटतं.
‘‘दीनानाथांची पोर्ट्रेट्स म्हणजे जिवंत भावभावनांचा आविष्कार! विशिष्ट रंगांनी विशिष्ट भावना व्यक्त करण्याची त्यांची किमया केवळ अद्‍भुत आहे. आनंद, दुःख, वैफल्य, काम, भय, राग अशा कितीतरी भावना रंगांच्या अचूक वापरानं दीनानाथ कुशलतेनं आपल्या पोर्ट्रेट्समध्ये चितारतात.

परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे रंग आणि भावना यांचं कॅनव्हासवर अतूट नातं सांगणारा हा अवलिया स्वतः मात्र निर्विकार होता. भावनांचे रंग जणू त्याच्या कलाविश्वापुरतेच मर्यादित होते, वैयक्तिक जीवनात ते कधी उमटलेच नाहीत.
‘‘मी जेव्हापासून त्यांना बघतो आहे तेव्हापासून ते एकटेच आहेत. त्यांना कुणी नातेवाईकही नसावेत. नाही म्हणायला, त्यांच्याकडं बद्रीप्रसाद नावाचा एक ज्येष्ठ सहायक होता. दीनानाथांचा तो ‘सर्व काही’ होता. नोकराप्रमाणं तो सर्व कामं करी आणि एखाद्या कुटुंबीयाप्रमाणं दीनानाथांवर माया करी.

त्यांचे जवळचे मित्र म्हणजे पोलिस इन्स्पेक्टर सावंत, अॅडव्होकेट रानडे, कॅप्टन भोसले आणि मी. आमची मैत्री आम्हाला त्यांच्या कलेविषयी वाटणाऱ्या आदराच्या पायावर उभी आहे; पण आमच्या सहवासातही दीनानाथ अलिप्तपणे वावरत.
‘‘दीनानाथांना एखादं पारितोषिक मिळालं, की आम्ही छोटी पार्टी करत असू. आम्हाला दुखवायचं नाही म्हणून ते भागही घेत. परंतु मनापासून ते त्यात सामील नसत. बद्रीप्रसाद आमच्यात सहभागी होई आणि संयोजनाचा भार चोख सांभाळी.
‘‘डिसेंबरची चोवीस तारीख उजाडली. सकाळी ११ वाजता मुंबईला दीनानाथांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला जाणार होता. सावंत, भोसले, बद्रीप्रसाद आणि मी त्यांच्याबरोबर जाणार होतो. रानडे आपल्या कुटुंबासह नुकतेच महिनाभरासाठी बाहेरगावी गेले होते. आम्ही पहाटे सहा वाजता दीनानाथांच्या गाडीनं निघालो. थंडीचे दिवस असल्यामुळं निघताना अंधार होता. दिवसही पावसाळ्याचे नव्हते. त्यामुळे आकाशातल्या ढगांची पूर्वकल्पना येण्याची शक्यताच नव्हती आणि अचानक पाऊस कोसळू लागला. समोरचा रस्ता जसा अदृश्य होऊ लागला तसे आम्ही कडेला गाडी उभी करून पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागलो.

‘‘पावसानं आमचा दीड तास खाल्ला. दीनानाथ वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर! त्यामुळे वेळेवर पोचण्यासाठी त्यांनी गाडी भन्नाट वेगानं पळवण्यास सुरवात केली. एका धोकादायक वळणावर त्यांचा गाडीवरचा ताबा सुटून, गाडी रस्त्याच्या कडेला एका खडकावर जाऊन धडकली. मार लागल्यामुळं दीनानाथ तत्काळ बेशुद्ध पडले. बाजूचा दरवाजा जोरदार धडकेमुळं उघडल्यामुळं ते सरळ गाडीतून खाली पडले. एक टोकदार सुळका लागून त्यांच्या डोक्याला खोल जखम झाली. तिच्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. बद्रीप्रसाद आणि आम्हा तिघांना किरकोळ दुखापती झाल्या; पण दीनानाथांची अवस्था गंभीर होती. मागून येणाऱ्या एखाद्या गाडीतून जवळच्या गावात जाऊन मुंबईला संयोजकांना फोन करून झाला प्रकार कळवण्यास बद्रीप्रसादला सांगितलं. आम्ही दीनानाथांना घेऊन दुसऱ्या गाडीनं पुण्याला परत आलो.
‘‘त्यांच्या कवटीच्या हाडाचे तुकडे होऊन ते मेंदूत घुसले होते. तातडीनं शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. त्यांच्या जिवाला धोका होता. त्यांच्या मेंदूतून हाडाचे सात-आठ तुकडे काढून टाकण्यात मला यश आलं; पण मेंदूला झालेली इजा गंभीर होती. दीनानाथांचा मेंदू शारीरिकदृष्ट्या बरा झाला, तरी तो पूर्ववत काम करेल की नाही याची शाश्वती नव्हती. चार दिवस दीनानाथ शुद्धीवर आले नाहीत. डोक्याची जखम मात्र भरत चालली होती. पाचव्या दिवशी मात्र दीनानाथांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवू लागली. आमच्या आशा पल्लवित झाल्या. बऱ्याच वेळानं, ते डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले. परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो.

‘‘रात्रभर मी झाल्या प्रकाराचा विचार करत होतो. दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला. नर्सच्या मदतीनं मी त्यांना उठवून बसवलं. त्यांची नजर खिडकीतून दिसणाऱ्या हिरव्यागार वनश्रीवर पडली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नतेची जागा प्रसन्नता घेऊ लागली. काळजीबरोबरच माझी उत्कंठा वाढू लागली. अजून निदान आठवडाभर तरी दीनानाथांना निरीक्षणाखाली ठेवण्याचा मी निर्णय घेतला. तोपर्यंत त्यांना कोणालाही भेटू न देण्याचं मी ठरवलं.
‘‘दीनानाथांच्या अपघाताची बातमी समजताच, आपला महिन्याभराचा दौरा अर्धवट सोडून रानडे पुण्याला परत आले. आल्या आल्या आपल्या पत्नीसह ते तडक हॉस्पिटलमध्येच आले. त्यांना नाही म्हणणं मला शक्यच नव्हतं. आम्ही आत गेलो. दीनानाथ खिडकीबाहेर प्रसन्न मुद्रेनं पाहत होते.

‘‘काय दीनानाथ भाऊजी, कसे आहात?’’ दीनानाथांची तंद्री भंग पावली. त्यांनी वळून मिसेस रानडे यांच्याकडं पाहिलं आणि त्यांची नजर त्यांच्या गुलाबी साडीवर पडली. चेहऱ्यावरची प्रसन्नता जाऊन त्या जागी चक्क कामुकता दिसू लागली. मी सावध होतो. वेळीच मध्ये पडल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. माझी अटकळ दुर्दैवानं खरी ठरणार असं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा चाचणी घ्यायचं ठरवलं.
‘‘ठरल्याप्रमाणं, दुसऱ्या दिवशी मी बद्रीप्रसादला लालभडक पोषाख घालून यायला सांगितलं. तो येताच त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि तो दीनानाथांना देऊन येण्यास सांगितले. ‘धनी, पाणी’ असं म्हणत बद्रीप्रसादनं ग्लास पुढं केला. दीनानाथांनी आपली नजर छतावरून काढून बद्रीप्रसादकडं वळवली. लालभडक रंग त्यांच्या नजरेत भिनला. खिन्न चेहरा हळूहळू क्रूद्ध दिसू लागला. त्यांनी पाण्याचा ग्लास हिसकावून घेऊन खिडकीच्या दिशेनं भिरकावला. खिडकीबाहेर नजर जाताच त्यांचा पारा लगेच उतरला.

‘‘दीनानाथांचा मेंदू शारीरिकदृष्ट्या बरा झाला होता, त्यामुळं ते मृत्यूच्या दाढेतून वाचले होते खरे; पण त्यांचा मेंदू पूर्ववत काम करत नव्हता हे निश्चित! रंग आणि भावनांचं नातं दीनानाथांनी अपघातानंतरही जोपासलं होतं, परंतु विचित्र तऱ्हेनं! विशिष्ट रंगानं विशिष्ट भावना उत्तेजित करण्याचं काहीसं विचित्र काम त्यांचा मेंदू करू लागला होता.

‘‘आपल्या मेंदूमध्ये असंख्य ज्ञानकेंद्रं असतात. डोळ्यांकडून विशिष्ट रंगाची संवेदना घेऊन येणारा मज्जातंतू मेंदूतल्या दृष्टीचं केंद्र उत्तेजित करतो आणि आपल्याला त्या रंगाचं ज्ञान होतं. वेगवेगळ्या रंगांच्या संवेदना वेगवेगळ्या असतात. तसंच मेंदूमध्ये एक भावना उत्पन्न करणारं केंद्र असतं. त्याच्याकडं संवेदना घेऊन येणारा मज्जातंतू ते केंद्र उत्तेजित करतो आणि भावना उत्पन्न होतात. वेगवेगळ्या संवेदनांमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उत्पन्न होतात.

‘‘अपघातात दीनानाथांच्या मेंदूला झालेल्या गंभीर इजेमुळं मेंदूतल्या दृष्टीचं केंद्र आणि भावनांचं केंद्र ही एकमेकांत मिसळून गेली होती. त्यामुळं रंगाच्या संवेदनेनं दृष्टीकेंद्राबरोबरच भावनेचं केंद्रही उत्तेजित होऊ लागलं. त्यामुळंच विविध रंगांनी विविध भावना उत्पन्न होऊ लागल्या. हिरव्या रंगानं प्रसन्नता, पांढऱ्या रंगानं खिन्नता, गुलाबी रंगानं कामुकता, तर लाल रंगानं क्रोध! अशा अजून कितीतरी रंगांचा संबंध इतर भावनांशी असण्याचा दाट संभव होता. त्याची प्रचिती घेण्यात धोका होता. कारण माहीत झाल्यावर इलाज करणं सोपं असतं. हिरव्या रंगानं दीनानाथांना प्रसन्न वाटतं हे दिसून आल्यावर त्यांना हिरव्या रंगाखेरीज दुसरा कोणताही रंग दिसू न देणं हाच त्यावरचा त्यातल्या त्यात योग्य इलाज होता.

‘‘एका विशिष्ट प्रकारच्या काचेमधून कोणत्याही रंगाच्या प्रकाशलहरी जाऊ दिल्या, तरी त्या काचेतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशलहरी या हिरव्या रंगाच्याच असतात. या विशिष्ट काचेच्या contact lenses जर दीनानाथांनी वापरल्या, तर त्यांना सर्व हिरवंच दिसेल. त्यामुळं अशा contact lenses ताबडतोब बनवून घेऊन त्या मी दीनानाथांच्या डोळ्यांवर बसवून टाकल्या. दोन दिवस मी दीनानाथांच्या वागण्यावर बारकाईनं लक्ष ठेवून होतो. उपाय शंभर टक्के यशस्वी झाल्याची मला खात्री पटली आणि मी दीनानाथांना डिस्चार्ज दिला. त्यांचा जणू पुनर्जन्मच झाला होता.
‘‘आम्ही सर्वांनी दीनानाथांचा पुनर्जन्म साजरा करायचं ठरवलं. त्यांच्या बंगल्यावरच छोटीशी पार्टी करायची ठरली. बद्रीप्रसादनं सगळा दिवाणखाना सुशोभित करून टाकला. डायनिंग टेबलावर जांभळ्या रंगाच्या सुंदर फुलांचे गुच्छ घालून फुलदाण्या ठेवल्या. बद्रीप्रसाद सर्वांना सर्व्ह करणार होता. दीनानाथांना विश करण्यासाठी मी माझा ग्लास पुढं केला; पण त्यांचं लक्ष नव्हतं. ते आपला उजवा डोळा चोळत होते. बहुधा लेन्स नीट बसलं नसावं किंवा त्यांना ते खुपत असावं. त्यांच्या डोळ्यातून पाणीही वाहत होतं. डोळा चोळता चोळता लेन्स निसटून खाली पडल्याचं कोणाच्याच लक्षात आलं नाही आणि दीनानाथांची नजर जांभळ्या फुलांवर पडली. जांभळ्या रंगानं दीनानाथांच्या मेंदूत क्रौर्य भावना जागृत करण्याचं आपलं काम चोखपणे पार पाडलं. काय होतंय हे कळायच्या आत त्यांनी समोरची फुलदाणी उचलून जवळच उभ्या असलेल्या बद्रीप्रसादच्या दिशेनं भिरकावली. बिचारा बद्रीप्रसाद घाव वर्मी लागून तत्काळ गतप्राण झाला.

‘‘न्यायमूर्ती महोदय, ही घटना आमच्या डोळ्यांसमोरच घडली. त्यामुळ दीनानाथांच्या हातून खून झालाय हे निर्विवाद! प्रश्न आहे तो ते अपराधी आहेत का याचा. आपण या सर्वाचा विचार करावा आणि मगच काय शिक्षा द्यायची याचा निर्णय घ्यावा, एवढीच माझी आपणास नम्र विनंती आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang pramod bondre write kathastu article