esakal | अभ्यासाची ‘क्रम’वारी (प्रसाद मणेरीकर)
sakal

बोलून बातमी शोधा

prasad manerikar

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सगळ्याच प्रकारच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. सीबीएसईसारखे अभ्यासक्रम त्या त्या इयत्तांमध्ये यंदा तीस टक्क्यांनी कमी होणार आहेत आणि इतरही शाळा, महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम कमी होण्याचं सूतोवाच करण्यात आलं आहे.

अभ्यासाची ‘क्रम’वारी (प्रसाद मणेरीकर)

sakal_logo
By
प्रसाद मणेरीकर pmanerikar@gmail.com

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सगळ्याच प्रकारच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. सीबीएसईसारखे अभ्यासक्रम त्या त्या इयत्तांमध्ये यंदा तीस टक्क्यांनी कमी होणार आहेत आणि इतरही शाळा, महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम कमी होण्याचं सूतोवाच करण्यात आलं आहे. या सगळ्या परिस्थितीकडे नक्की कसं बघायचं, अभ्यासक्रम कव्हर करण्याची टक्केवारी कमी झाली तर पालकांपासून शाळांपर्यंत सगळ्यांनी अधिक जबाबदारीनं त्या गोष्टीकडे कसं बघायचं, केवळ अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण या समीकरणातून बाहेर कसं पडायचं आदी गोष्टींबाबत मंथन.

साधारण दोनेक वर्षांपूर्वीचा प्रसंग. एका निमशहरी भागातल्या शाळेत एका पालक दाम्पत्याशी बोलत होतो. हे लोक प्रामुख्यानं शेती करणारे आणि म्हशी पाळणारे. दोन-तीन इयत्ता शिकलेले; पण आता लेखन-वाचन काहीच न येणारे. ते अगतिक होऊन त्यांची व्यथा सांगत होते. मुलाच्या अभ्यासात मदत करावी असं त्यांना खूप वाटत होतं; पण आपणच न शिकल्यामुळे आता मुलालाही काही शिकवता येत नाही आणि म्हणून मुलाने खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांची व्यथा होती, की मुलाच्या पुस्तकातलं त्यांना काही कळत नाही, त्याच्या अभ्यासातलं त्यांना काही येत नाही किंवा तो जी भाषा बोलतो ती त्यांना समजत नाही. त्यांचा मुलगा सहावी की सातवीला होता.
मी म्हटलं : ‘‘तुम्हाला तुमच्या मुलाला अभ्यासात सहज मदत करता येईल. अगदी सोपं आहे.’’ माझं म्हणणं त्यांना समजावं म्हणून मी त्यांना उदाहरण दिलं : ‘‘तुम्ही सूर्य उगवताना पाहिला आहे का?’’ ते ‘हो’ म्हणाले.

‘‘कुठे उगवतो? म्हणजे रोज एकाच ठिकाणाहून उगवतो का वेगवेगळ्या?’’ माझ्या या प्रश्नावर बाबा खुलले, मोकळेपणाने बोलू लागले. त्यांच्या घराच्या उगवतीला म्हणजे पूर्वेला कडुनिंबाचं झाड आहे, त्याचा संदर्भ देत सूर्य झाडाच्या कोणत्या दिशेला कसा उगवतो, झाडामागून कधी उगवतो, थंडीच्या दिवसांत कुठे उगवतो, उन्हाळ्यात कुठे उगवतो, त्याची किरणं कुठे, कशी पडतात असं इत्थंभूत वर्णन हावभावासहित त्यांनी केलं.

मी विषय पुढे वाढवला. मावळताना कुठे मावळतो, दिवसभराचा सूर्याचा प्रवास कसा होतो, असे सगळे प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांची त्यांनी नीटपणे उत्तरं दिली. मी त्यांना म्हटलं : ‘‘तुमचा मुलगा शाळेत जाऊन पुस्तकं वाचून हेच शिकतो.’’ इतका वेळ गप्प बसलेली त्या मुलाची आई म्हणाली : ‘‘हे पुस्तकात कशाला शिकायला पाहिजे? डोळ्यांनी दिसतं की!’’
मग मी त्यांना डोळ्यांनी जे दिसतं ते आणि पुस्तकात विश्लेषण करून मांडलेली त्यामागची कारणं याचा संदर्भ सांगितला आणि अशी अनेक उदाहरणं घेत पाठ्यपुस्तकात लिहिलेलं समजायला ते आपल्या मुलांच्या शिक्षणात कशी मदत करू शकतात हे समजावून दिलं.
आज हा प्रसंग आठवायचं कारण म्हणजे सध्या कोविड 19च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात चर्चा. शाळा सुरू करण्यातली अनिश्चितता, ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोचवण्याच्या मर्यादा अशी कारणं यामागे आहेत. केंद्रीय माध्यमिक विद्यालयानंही त्यांचा अभ्यासक्रम कमी केला आहे, हा त्याला आणखी एक आधार. शाळा उशिरा सुरू होत असल्यानं अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असं कारण यामागे सांगितलं जातं.
हा प्रश्न आता हळूहळू कदाचित भावनिक पातळीवर जाईल आणि त्यातून आत्तापुरता विचार करून काहीतरी मार्ग काढला जाईल. काही धडे कमी केले जातील, काही भाग परीक्षेसाठी वगळला जाईल़; पण हे सगळंच तात्पुरतं असेल.

आपल्यासमोर एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे- जिचा आपण विचार केला नव्हता वा ज्या परिस्थितीत कसं वागावं याची आपली काही तयारी नव्हती, यामुळे तात्पुरता उपाय शोधणं हे तातडीची निकड भागवण्यासाठी आवश्यक असेल; पण त्याच्या भविष्यातल्या परिणामांचा विचार करायला हवा. मात्र, त्याहीपेक्षा अशा वेळी दूरदृष्टीनं विचार करण्याची एक संधी आपोआपच आपल्याला मिळते आहे आणि ती घालवता कामा नये.
या प्रश्नाचा दूरगामी विचार करायला हवा.

अभ्यासक्रम कमी का करायचा ?
आपण अभ्यासक्रम कमी करायचा विचार करतोय याचं कारण शिकण्याची आपण शिकवण्याशी आणि प्रामुख्यानं शाळेशी घातलेली सांगड; आणि ती तोडण्याची हिंमत आपल्याला होत नाही. मुलं केवळ शाळेत शिकत नाहीत, ती भोवतालात आणि समाजात वावरताना शिकतात, हे तत्त्व म्हणून आपल्याला मान्य असतं, मात्र ते स्वीकारण्याची, अंगीकारण्याची आणि आचरणात आणण्याची आपली तयारी नसते.
याच्या कारणांमध्ये जर आपण गेलो, तर प्रामुख्यानं आपली परीक्षा पद्धती हे त्यातलं सर्वांत महत्त्वाचं कारण ठरतं. कारण ती अजूनही बहुतांशी पाठ्यपुस्तक-केंद्रित आहे. कितीही नाही म्हटलं, तरी प्रश्नाची विशिष्ट भाषेतली विशिष्ट पद्धतीची उत्तरं, म्हणजेच मॉडेल आन्सर पेपर, हे परीक्षांचं वैशिष्ट्य. त्या आधारे विद्यार्थ्यांच्या उत्तरातलं चूक–बरोबर ठरवणं सोपं जातं. त्यामुळे तपासण्यास सोपी याच प्रकारची रचना परीक्षेमध्ये होते. मुलं प्रत्यक्ष वास्तवात जगताना जो अनुभव घेतात, तो त्यांनी परीक्षेत मांडला तर तो तपासायचा कसा, कोणत्या कसोट्यांवर, ही आपली पंचाईत आहे. बरं, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा मग त्यात डावं-उजवं कसं करणार? त्यातही विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रामुख्यानं अंतिम परीक्षेशी जी सांगड आपण घालून ठेवलेली आहे, त्यानं सध्याचे परीक्षा गोधळ निर्माण झाले आहेत. अर्थात तो वेगळा विषय आहे.
ही पद्धत बदलायचा आपण प्रयत्न करतोय, नाही असं नाही; पण तरीही त्याचा वेग अतिशय कमी आहे. इथं आपली धरसोड वृत्तीही आडवी येते आणि त्यामुळेच आपण आहोत तिथंच राहतो.

अभ्यास वर्ष
आपण वर्ष आणि अभ्यासक्रम अशी सांगड घातलेली आहे आणि ती महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच ठिकाणी आहे. पाचवीचं वर्षं पाचवीचा अभ्यास, सहावीचं वर्ष सहावीचा अभ्यास या प्रकारे वर्ष संपलं म्हणजे तो अभ्यास संपला अशी ही सार्वत्रिक धारणा आहे. तेवढ्या वर्षभराच्या काळात तेवढा अभ्यासक्रम पूर्ण करायचा, वर्षाच्या शेवटी त्यावर आधारित परीक्षा द्यायची, उत्तीर्ण व्हायचं अशी ही रचना आहे. वरकरणी ही रचना सोयीची आहे; पण त्यातून काही सोयीस्कर अर्थही निघतात. म्हणजे माझं पाचवीचं वर्ष संपलं याचा अर्थ माझा पाचवीचा अभ्यासक्रम संपला. इथं विद्यार्थ्याला किती येतं आणि किती येत नाही याला फार महत्त्व नसतं, ते परीक्षेपुरतं मोजलं जातं आणि पुढच्या वर्षी पुढचा अभ्यास सुरू होतो. यात विद्यार्थ्यांनी किती नीटपणे अभ्यासक्रम पूर्ण केला, जो पूर्ण झाला नाही त्याचं काय यापेक्षा शिक्षकांचा शिकवून झाला की नाही हाच मुख्य मुद्दा असतो. त्यामुळे बहुतांश वेळा परीक्षेत पास होण्यासाठी जेवढं हवं तेवढं करायचं अशीच मानसिकता असते. ही रचना आपल्या मनात इतकी घट्ट बसली आहे, की या पद्धतीमध्ये एखादा विद्यार्थी अभ्यासक्रम वेगानं पूर्ण करत असेल, तर त्याला पुढचा अभ्यासक्रम घेण्याची पण सोय नाही आणि एखादा सावकाश पुढे जात असेल, तर त्याच्या गतीनं जाण्याचीही सोय नाही. इयत्तांची रचना ही सोय आहे; पण तीच रचना महत्त्वाची होऊन जाते आणि त्यामुळे नवे प्रश्न निर्माण होतात.
महाविद्यालयात तर खरंच विद्यार्थ्याना सहामाही, वर्ष आणि अभ्यासक्रम यात बांधून ठेवायला हवं का? जे घटनेच्या दृष्टीनं सज्ञान आहेत त्यांना शिकण्याचं स्वातंत्र्य द्यायला काय हरकत आहे? जो काही अभ्यासक्रम ठरवला असेल तो एकूण एवढ्या कालावधीत पूर्ण करायचा त्यासाठी ही ही विशिष्ट संसाधनं उपलब्ध आहेत (व्यक्तीसहित), हे स्पष्ट करायचं; झालेल्या अभ्यासाच्या नोंदी कशा ठेवायच्या हे शिकवलं आणि शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं तर काय हरकत आहे? मात्र, तसं होत नाही. आपण अतिसूक्ष्म व्यवस्थापनाच्या (मायक्रो मॅनेजमेंटच्या) मागे लागतो आणि ते आपल्यालाच त्रासदायक होऊन बसतं.

अभ्यासक्रमाची आडवी रचनाही महत्त्वाची
वय आणि आकलनक्षमता याचा संबंध आहे; पण तो अगदी 1+1=2 असा निश्चित ठरलेला नाही. अनुभवांच्या व्याप्तीनुसार तो बदलतो. मुलांना एखाद्या घटकाच्या आकलनात काठीण्य पातळीला जाताना अडचणी येऊ शकतात; पण समांतर पातळीवर एखादा घटक विविध प्रकारे समजून घेता येतो आणि समांतर पातळीवर अनुभव जेवढे जास्त, जितके विविधांगी तितकं मुलांना वरच्या कठीण पातळीवर जाणं सोपं जातं, अनेकदा न शिकवताच ती पुढे जातात हा अनुभव आहे. त्यामुळे अभ्यासक्रम आलेखाच्या उभ्या अक्षावर किती आहे इतकाच त्याचा आडव्या अक्षावर विस्तार किती झाला आहे आणि कसा झाला आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे. जर तो आडव्या अक्षावर विस्तारायचा असेल, तर विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगाशी अधिकाधिक जोडून घेता आलं पाहिजे. अशा संधी विद्यार्थ्यांच्या भोवताली उपलब्ध असतात त्या वापरण्याची सोय निर्माण करावी लागेल, त्यासाठी पालकांना सामावून घ्यावं लागेल शाळेशी जोडावं लागेल आणि इथं शिक्षक महत्वाची भूमिका निभावू शकतात.
गेल्या काही वर्षांत अभ्यासक्रम अधिकाधिक व्यावहारिक पातळीवर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते योग्यच आहे; पण पुरेसं नाही. याचं कारण अभ्यासक्रमांमध्ये व्यवहार आला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात वावरतानाचे मुलांचे अनुभव शिक्षणात महत्त्वाचे ठरले पाहिजेत हे अजून होत नाही.
केवळ शालेय पातळीवरच नाही, तर महाविद्यालयीन पातळीवरदेखील हेच झालेलं आहे. तिथंही प्रत्यक्ष व्यवहार आणि सामाजिक वा प्रयोगशाळेत प्रयोगांती सिद्ध झालेले शास्त्रीय सिद्धांत यांची एकत्रित जोड दिली, तर अतिशय प्रभावीपणे विद्यार्थ्यांचं शिक्षण होऊ शकेल.

पालकांना सामावून घेण्यातली ताकद
लेखाच्या सुरुवातीला जे उदाहरण घेतलं, ते पुरेसं बोलकं आहे. म्हणजे पुस्तक आणि व्यवहार यांची सांगड आपल्याला घालता आली, व्यवहारात म्हणजे प्रत्यक्षात काय घडतं याचं स्पष्टीकरण सोप्या भाषेत पाठयपुस्तकातून मिळालं, तर या दोन्हीची छान वीण घातली जाईल. यातून मुलं आणि पालक म्हणजे पर्यायानं समाज या दोहोंचा फायदा होईल. आज पालकांची भूमिका प्रामुख्यानं शाळेचा गृहपाठ पूर्ण करण्याची जबाबदारी घेणं, प्रकल्प पूर्ण करून देणं, शाळेत पालकसभांना हजर राहणं, त्यावेळी सांगतील त्या सूचनांचे पालन करणं, मागे पडणार्‍या मुलांचा घरी अभ्यास घेणं वा त्यांच्यासाठी चांगली शिकवणी शोधणं, मूल जर मागं पडत असेल तर त्याबद्दलच्या तक्रारी ऐकणं एवढ्यापुरतीच मर्यादित आहे. मात्र, त्यांचा शिक्षणात सक्रिय सहभाग फारच कमी आहे. कारण आपण नेमकं काय करायचं आणि कसं करायचं ते त्यांना काळात नाही आणि वरच्या उदाहरणातल्या पालकांसारखे ते बाहेर फेकले जातात. त्यांना न्यूनगंड येतो. त्यामुळे या भूमिकेच्या पलीकडे जाऊन पालक मुलांसोबत जे सहज करू शकतात, त्यांच्या दैनंदिन जगण्यात ते जे अनुभवतात ते आपल्याला अभ्यासक्रमाचा भाग करावं लागेल. म्हणजे शाळा, पालक आणि मुलं अशी तीपेडी वीण आपल्याला नव्यानं घालावी लागेल. तात्त्विक भाग आणि त्याचं व्यावहारिक रूप अशी ही जोड असेल आणि इथं शिक्षक आणि पालक एकविचारानं काम करतील.

यासाठी एका बाबीचा आपल्याला मूलभूतपणे विचार करावा लागेल. आपल्याकडे परंपरेनं चालत आलेलं काही ज्ञान आहे आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे संक्रमित केलं जातं. हे परंपरागत ज्ञान आणि शहाणपण फार महत्त्वाचं आहे. हे ज्ञान जगण्याविषयी आहे आणि ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या भोवतालाचे आपण घटक आहोत त्या भोवतालाविषयी आहे. हे त्या मातीतलं ज्ञान आहे. आज पुस्तकी शिक्षणामुळे ते बाजूला पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पुस्तकातलं शिक्षण, त्यातल्या संकल्पना या महत्त्वाच्या आहेतच; पण त्या शास्त्रशुद्ध ज्ञानाला जेव्हा आपण पारंपरिक शहाणपण जोडून घेतो तेव्हा एकत्रितपणे पुढे जायला मदत होते. याचा फायदा असा होईल, की पारंपरिक शहाणपण सोबत घेऊन वाढलेला जो मोठा पालक वर्ग आहे तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल. परंपरागत ज्ञानात ज्या त्रुटी असतील त्या दूर करायलाही मदत होईल.

आज आदिवासी भागाचा विचार केला, तर त्या लोकांकडे जंगल, झाडं, ओषधं यांचं खूप ज्ञान आहे आणि तेवढीच चित्र, नृत्य अशा कलांच्या बाबतीतही ती समृद्ध आहे. आता आधुनिक शिक्षण तिथं घेऊन जाताना या दोहोंचा मेळ घालण्याचं काम करावं लागेल. असा प्रयत्न पूर्वी पूर्वी ग्राममंगलसारख्या संस्थांनी केला होता. नृत्य-संगीतात पारंगत असणार्‍या आदिवासी मुला-मुलींना भारतीय शास्त्रीय संगीताचेही धडे दिले आणि त्या मुलांनी ते सहजपणे आत्मसात केलं. खेळांमध्ये ही मुलं प्रावीण्य दाखवू शकली.
या सर्वच वर्गांकडे परंपरागत कौशल्य आहेत. खूप कष्टपूर्वक ती त्यांनी मिळवली आहेत. त्यांचं लोकसाहित्य अतिशय समृद्ध आहे. हे सर्व मुलांच्या शिक्षणाचा भाग बनावं याच्याबद्दल बरंच विचारमंथन झालेलं आहे; पण थेट शिक्षणामध्ये आणण्याचे पर्याय शोधून काढावे लागतील. नाहीतर शिक्षण म्हणजे पुस्तकातला अभ्यास इतकाच मर्यादित समज होऊन राहील.

होतं कसं, की आजही अगदी ग्रामीण भागातल्या पालकांनासुद्धा त्यांचं परंपरागत ज्ञान हे दुय्यम दर्जाचं आणि पुस्तकी शिक्षण हे प्रथम दर्जाचं वाटतं आणि आपल्या मुलांनी पुस्तकी ज्ञान मिळवावं, असा त्यांचा आग्रह असतो. आपणच कुठल्याशा करणांनी त्यांचा हा समज करून दिलेला आहे. ही दरी शिक्षणानंच मिटवावी लागेल. यामुळे अभ्यासक्रम कमी करणं यापेक्षा त्याची या प्रकारे व्याप्ती वाढवण्यावर आपल्याला भर द्यायला हवा.
यासाठी आपल्याला नवा विचार करावा लागेल. म्हणजे कोंबून पाठ्यपुस्तकात भरण्यापेक्षा अभ्यासक्रम ही बाह्य चौकट केली आणि त्यात शिकण्याचं स्वातंत्र्य असेल, तर परिसरानुसार लवचिकता आणता येईल. याचा फायदा विभागवार होईल. एकच पाठ्यपुस्तक आणि त्यात सगळं भरणं यापेक्षा विभागवार योग्य अशी रचना त्या त्या भागातले लोक करतील. यातून स्थानिक लोकांचा सहभाग वाढेल. विकेंद्रीकरणातून अधिक समृद्धी येईल. बंधनापेक्षा स्वातंत्र्यानं माणूस अधिक खुलतो, हे स्वतंत्र भारतातल्या नागरिकांना नक्कीच माहिती आहे. आपल्याला अभ्यासक्रम आखणाऱ्या संस्था, सरकार, शाळा, शिक्षक, पालक आणि अर्थातच विद्यार्थी या सगळ्याचं एकत्रीकरण करून सगळ्यांनी पुढे जाण्यासाठी ही चांगली संधी आहे.

loading image