सार्वकालिक सर्वश्रेष्ठ! (प्रसाद नामजोशी)

प्रसाद नामजोशी prasadnamjoshi@gmail.com
Sunday, 10 May 2020

जागतिक कीर्तीचे प्रतिभावान चित्रकर्मी सत्यजित राय यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालं. फक्त भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या अनेक चित्रकर्मींवर ज्यांचा प्रभाव अजूनही आहे असा हा बहुपैलू प्रतिभावंत. अनेक वर्षं उलटूनही सत्यजित राय यांच्या कलाकृती महत्त्वाच्या ठरतात. या अवलियाच्या कलाकृतींच्या सार्वकालिकतेवर त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक नजर.

जागतिक कीर्तीचे प्रतिभावान चित्रकर्मी सत्यजित राय यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालं. फक्त भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या अनेक चित्रकर्मींवर ज्यांचा प्रभाव अजूनही आहे असा हा बहुपैलू प्रतिभावंत. अनेक वर्षं उलटूनही सत्यजित राय यांच्या कलाकृती महत्त्वाच्या ठरतात. या अवलियाच्या कलाकृतींच्या सार्वकालिकतेवर त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक नजर.

"ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर्स'नं सन 1992मध्ये मानद ऑस्कर पुरस्कार सत्यजित राय यांना दिला. एखाद्या भारतीयाला भारतीय चित्रपटांमधल्या कामगिरीसाठी ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. दुर्दैवानं आजही ती एकमेव आहे. चित्रपट कलेवर असणारं त्यांचं असामान्य प्रभुत्व, मानवतावादी प्रगल्भ दृष्टिकोन आणि त्यामुळे त्यांच्या कार्याचा जगभरातल्या चित्रपटनिर्मात्यांवर आणि प्रेक्षकांवर असणारा अमीट प्रभाव यांच्यासाठी हा पुरस्कार आहे, असा गौरव तो देताना अकादमीनं केला. अकादमीनं केलेला हा गौरव म्हणजे केवळ उथळ शब्द नव्हते, तर जगभरातले अनेक चित्रपटदिग्दर्शक सत्यजित राय यांचं त्यांच्यावरचं ऋण मान्य करताना दिसतात.
स्वतः सत्यजित राय यांच्यावरही जगभरातल्या अनेकांचा प्रभाव पडलेला होता! कुठल्याही कलेला परिपूर्ण होण्यासाठी हे असं प्रभावाचं संक्रमण आवश्‍यक असतं. एखादा कलाकार कसा घडतो हे बघणं आणि त्या कलाकारानं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे इतरांना कशी प्रेरणा दिली हे जाणून घेणं त्या कलेला अधिकाधिक प्रगल्भपणे समजून घेण्यासाठी आवश्‍यक आहे. सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या या पैलूकडे बघणं हा एक रसपूर्ण अनुभव ठरावा.

सत्यजित राय यांना कलेचा वारसा मिळाला तो त्यांचे आजोबा उपेन्द्रकिशोर राय यांच्याकडून. कोलकत्याच्या प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली होती. ते चित्रकार होते आणि त्यांनी स्वतःचा छापखानाही चालू केला होता. "संदेश' नावाचं एक मुलांसाठीचं बंगाली मासिकही त्यांनी प्रसिद्ध करायला सुरुवात केली. ब्राह्मो समाजी असलेल्या उपेंद्रकिशोर यांचे सुकुमार हे चिरंजीव. सत्यजित राय यांचे वडील. तेसुद्धा चित्रकार आणि रेखाटनकार होते. चित्रकलेचा वारसा सत्यजित राय यांना घरातूनच मिळाला. पुढे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती विद्यापीठात म्हणजे शांतीनिकेतनमध्ये राय यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं आणि व्यावसायिक जाहिरात संस्थेत काम करायला सुरुवात केली. शांतीनिकेतनमध्ये असताना चित्रकार नंदलाल बोस आणि बिनोदबिहारी मुखर्जी यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. "पथेर पांचाली' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात एखाद्या चित्रकारानं कॅनव्हास रंगवावा अशा फ्रेम्स रसिकांना दिसल्या त्याचं कारण म्हणजे त्यांच्यावर असलेले हे चित्रकलेचे संस्कार असावेत. बंगाली साहित्य, चित्रकला आणि वंगसंगीत याचबरोबर याच काळात पाश्‍चात्य संगीताचे संस्कारही त्यांच्या कानांवर होत होते. "ज्या वेळी जवळजवळ प्रत्येक बंगाली नवयुवक कविता लिहिण्यात मग्न होता त्यावेळी मी युरोपियन शास्त्रीय संगीत ऐकण्यात गुंगलेलो असे' असं त्यांनीच म्हणून ठेवलेलं आहे. मोझार्ट आणि बिथोवेन यांच्या संगीताचा सखोल परिणाम दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांच्या जडणघडणीत झालेला आहे.

आपले आजोबा आणि वडील यांचा वारसा आणि शांतीनिकेतनमधल्या चित्रकारांचा प्रभाव घेऊन जाहिरात संस्थेत काम करत असताना सिग्नेट प्रेसमध्ये पुस्तकांची मुखपृष्ठं तयार करायचं काम त्यांनी केलं. त्यांनी केलेल्या मुखपृष्ठांमध्ये प्रसिद्ध बंगाली कवी जिबनानंद दास यांचं "बनालता सेन' आणि "रूपसी बांग्ला', बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांचं "चन्देर पहर', जिम कार्बेट यांचं "मॅनइटर्स ऑफ कुमाऊ', जवाहरलाल नेहरू यांचं "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकांचा समावेश आहे. मुखपृष्ठकार म्हणून या पुस्तकांवर काम करताना त्यांचं वाचन आणि मनन त्यांनी केलं असणार आणि त्यांचा प्रभाव राय यांच्या मनावर निश्‍चितच पडला असणार. बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या "पथेर पांचाली' या गाजलेल्या कादंबरीची मुलांसाठी चित्ररूप आवृत्ती साकारण्याचं कामही राय यांनी त्या काळात केलं. "आम अन्तीर भेपू' या नावानं आलेल्या त्या मुलांसाठीच्या कादंबरीमुळे आपल्या पहिल्या चित्रपटासाठीची बीजं त्यांच्या मनात त्याच वेळी रोवली गेली होती.

बंगाली चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक चिदानंद दासगुप्ता यांच्यासमवेत 1947 मध्ये राय यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. जगभरातले अनेक चित्रपट यानिमित्तानं त्यांना बघता आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कलकत्त्यात अनेक अमेरिकन सैनिक राहत होते. त्यांच्याबरोबर मैत्री करून अमेरिकेतल्या चित्रपटांची वित्तंबातमी मिळवणं त्यांना शक्‍य झालं. अमेरिकेच्या रॉयल एअर फोर्सचा एक कर्मचारी नॉर्मन क्‍लेअर याच्या मदतीने हॉलिवूडच्या कलाक्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी त्यांना कळू लागल्या.

याच्याच पुढच्या काळात आणखी एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली. ज्वॉं रेन्वा हा फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक आपल्या "द रिव्हर' या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी कलकत्त्यात आला. ते वर्ष होतं 1949. या चित्रपटासाठी चित्रीकरणस्थळं दाखवायला राय यांनी रेन्वा यांना मदत केली. "पथेर पांचाली' या कादंबरीवर चित्रपट करण्याची आपली इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. रेन्वा यांनी त्यांना त्यासाठी उत्तेजनही दिलं. हॉलिवूडच्या शैलीपासून दूर राहण्याचा कानमंत्रही त्यांनी राय यांना दिला! आपल्या चित्रपटात खूप काही दाखवायच्या भानगडीत पडू नका; पण जे दाखवाल ते सत्य आणि परिणामकारक असलं पाहिजे हा रेन्वा यांचा सल्ला त्यांनी आयुष्यभर पाळला असं त्यांच्या सर्व चित्रपटांचा अभ्यास केला असता रसिकांच्या लक्षात येईल.
पुढच्याच वर्षी डी. जे. केमर या ज्या ब्रिटिश जाहिरात कंपनीमध्ये त्यांनी काम केलं होतं त्यांनी राय यांना लंडनमध्ये आपल्या मुख्यालयात काम करण्यासाठी पाठवलं. या सहा महिन्याच्या काळात त्यांनी जवळजवळ शंभर चित्रपट बघितले. त्यापैकी त्यांच्या मनावर सगळ्यांत जास्त परिणाम करून जाणारा चित्रपट होता व्हिटोरियो डी सिका यांचा "बायसिकल थीव्ज'!

"बायसिकल थीव्ज' हा चित्रपट बघून चित्रपटगृहातून बाहेर पडतानाच चित्रपट दिग्दर्शक होण्याचा आपला निश्‍चय पक्का झाला होता, असं नंतर राय यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. रेन्वा आणि डी सिका यांच्याबरोबरच जॉन फोर्ड, बिली वाइल्डर, अर्न्स लुबिच आणि फ्रॅंक काप्रा यांच्या शैलीचा अभ्यास त्यांनी केला होता. अकिरा कुरोसावा, इंगमार बर्गमन आणि आल्फ्रेड हिचकॉक या समकालीनांच्या शैलीलाही त्यांची दाद गेलेली होती.
सिनेमाच्या तांत्रिक अंगाविषयी फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक फ्रांस्वा त्रुफॉं आणि जॉं लुक गोदार यांचं ऋण राय मान्य करतात. "लाईट अँड साऊंड' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गोदारनं आपल्याला फेड्‌स आणि डीझॉल्व्स टाळण्याचं धैर्य दिलं आणि त्रुफॉंनं फ्रीज-फ्रेम्स वापरण्याचं, असं म्हटलं आहे.

1978मध्ये बर्लिन चित्रपट महोत्सवात सत्यजित राय यांचा "थ्री ऑल टाईम मास्टर्स ऑफ दि सिनेमा' असा गौरव केला होता, त्यांच्याबरोबर इतर दोघे होते चार्ली चाप्लीन आणि इंगमार बर्गमन! ऑक्‍सफर्ड विद्यापीठानं त्याच वर्षी त्यांना मानद डॉक्‍टरेट दिली. व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोच्च गोल्डन लायन पुरस्कार, बर्लिन चित्रपट महोत्सवात सर्वोच्च गोल्डन बेअर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी दोनदा सिल्व्हर बेअर, एकूण 32 राष्ट्रीय आणि असंख्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, भारतरत्न आणि मृत्युपूर्वी चोवीस दिवस त्यांना मानद ऑस्करही मिळालं. "सत्यजित राय यांची तुलना आयसेन्स्तीन, चार्ली चाप्लीन, अकिरा कुरोसावा, इंगमार बर्गमन आणि मायकेलऐन्जेलो अंतोनिओनी यांच्याशी मी करेन. जागतिक चित्रपटसृष्टीतल्या सार्वकालिक सर्वश्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांपैकी ते एक होते,' असं लिंडसे अंडरसन या ब्रिटीश चित्रपटदिग्दर्शक आणि समीक्षकानं म्हटलं आहे.

एखाद्या दिग्दर्शकाचं सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होण्यासाठी त्यांचा आपल्यावरचा प्रभाव मान्य करणारी समकालीन किंवा पुढची पिढी हवी. सत्यजित राय यांचा प्रभाव मान्य करणाऱ्या या पिढीत आहेत एकूण वीस वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता मार्टिन सोर्सेसी, मास्टर ऑफ कॅन्डीड फोटोग्राफी म्हणवला जाणारा हेन्‍री कार्टियर बेसन, श्रेष्ठ जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा, इन्सेप्शन आणि डंकर्कचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान, "द ग्रान्ड बुडापेस्ट हॉटेल'चा दिग्दर्शक वेस अँडरसन- यानं आपला पाचवा चित्रपट "द दार्जीलिंग लिमिटेड' सत्यजित राय यांना अर्पण केला आहे, "स्टार वॉर्स'चे जनक जॉर्ज लुकास, "ऑन द वॉटरफ्रंट' आणि द स्ट्रीटकार नेम्ड डिझायरचे दिग्दर्शक इलिया कझान, "गॉडफादर'कार फ्रान्सिस फोर्ड कपोला, अभिनेता दिग्दर्शक कानू रीव्ह्ज, अभिनेत्री आन्द्रे हेपबर्न, इराणचे दिग्दर्शक माजिद माजिदी आणि "गांधी'चे दिग्दर्शक रिचर्ड ऍटनबरो! अर्थात ही यादी सहज आठवणाऱ्या लोकांची आहे. बहुसंख्य भारतीय-आशियायी चित्रपट दिग्दर्शक आपल्यावरचं सत्यजित राय यांचं ऋण मान्यच करतील.
यापैकी ख्रिस्तोफर नोलानच्या मते "पथेर पांचाली' हा जगातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. सोर्सेसीच्या मते राय, बर्गमन, कुरोसावा आणि फेलिनी हे चार सार्वकालिक श्रेष्ठ! स्टीव्हन स्पीलबर्गच्या "ई.टी.' या चित्रपटाची बीजं राय यांच्या "एलियन'या चित्रपटाच्या पटकथेवर आधारित आहे ही जोरदार मांडणी सोर्सेसीचीच! राय जर हॉलिवूडमध्ये असते तर त्यांनी आमचं जगणं मुश्‍कील केलं असतं असं इलिया कझान यांनी म्हटलं आहे. "सत्यजित राय यांचे चित्रपट बघितले नाहीत असं म्हणणं म्हणजे चंद्र किंवा सूर्य न बघता जगणं आहे' असं कुरोसावा म्हणतो.

आपल्या आजूबाजूच्या परिसरातली साहित्य-संगीत-कला राय यांनी सहजपणे स्वीकारली, आपले हात सहज पोचू शकत नाहीत तिथं ते आवर्जून गेले आणि आपल्या जाणिवांच्या कक्षा विस्तारल्या, आपल्यावर असलेलं जागतिक चित्रपटांचं ऋण त्यांनी मान्य केलं आणि आपल्या कलाकृती पुढच्या पिढीला पाथेय म्हणून त्यांनी ठेवल्या. एखाद्या कलाकाराचं सार्वकालिक श्रेष्ठत्व सिद्ध होण्यासाठी आणखी काय हवं?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang prasad namjoshi write satyajit ray article