शब्दांत सोहळे... प्रकाशाचे! (प्रवीण दवणे)

pravin davane
pravin davane

सणांच्या मुळाशी कृतज्ञतेची ही आदिम प्रेरणा असावी. बुद्धिपूजा आणि शक्तिपूजा! जगणं सुरंगी करण्याची ही निमित्तं शतका-शतकांपूर्वीची आहेत. ती नितळता आज पुन्हा शोधायला हवी; एका अर्थानं गंगेनं पुन्हा गंगोत्रीकडं जायला हवं. उत्सवाचं केवळ कर्मकांड झालं, की उरतात ते केवळ देखावे! टरफल्यांच्या सजावटीपेक्षा आशयाचा दाणा आस्वादणं हाच खरा बाह्य उत्सवाचा आंतरिक हेतू आहे. म्हणूनच भावनेला तर्काची जोड हवी. गणेशाचं रूप ध्यानपूर्वक अभ्यासलं, तर याची उकल होऊ शकेल. विज्ञानाचे ज्ञानयोगीच असलेले सर्व संत हीच प्रतीकं उकलत आपल्याला काही सांगण्याचा आकांत मांडतात.

मातीला लागती आकाश - डोहळे
शब्दांत सोहळे, प्रकाशाचे।।

कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ओळी सहज स्मराव्यात, असं प्रकाशयुग आता सृष्टीच्या द्वाराशी प्रगटण्यास उत्सुक आहे. उत्सवाच्या पावलांनी पुन्हा एका मुरगळलेली मनं श्रींच्या आगमनाची तोरणं सजवू लागली आहेत. कुठं अजूनही शुष्कता, तर कुठं मुसळधार क्रूद्धता झेलून मोडलेली आयुष्यं शिल्लक चैतन्याला एकवटून नव्या आज्ञेचा दिवा घेऊन उभी राहू लागली आहेत; यातच ‘मनास मातीचे ताजेपण’ हे मृण्मयीचं सृष्टीचक्र सामावलं आहे.

उत्सवाचे दिवस पुन्हा एकदा परतावेत हेच साकडे विघ्नहर्त्याला घालतच घना-मनात टाळ मृदंग वाजू लागले आहेत. यातूनच पुन्हा मनांना आणि मनगटांना उभारी येणार आहे. उत्सवाची योजनाच मुळी वेदनेला संवेदनेनं समजून घेऊन फुंकर घालण्यासाठी असते. माणसानं खूप नंतर लिहिलेलं वाक्‍य - ‘शो मस्ट गो ऑन’ हे चैतन्याच्या ॐकार बिंदूनं केव्हाच अनुसरलेलं असतं. म्हणून तर संचिताचे कृष्णसोहळे स्वीकारून मानव्य सत्‌ चित्‌ आनंदाच्या रामप्रहराकडे निघालेलं दिसतं. उत्सव हे त्या संकल्पाचंच प्रतीक आहे.

विश्‍वाच्या पाठीवर कोठेही पाहा. चराचरात उत्सवाचे रूपरंग विविध पद्धतीनं साजरे होतात. त्यातून परंपरा ‘नव्याने पेरते व्हा!’ हाच संकेत देत असते. स्वसंवेद्य असलेल्या आत्मरूप गणेशाचं आगमन हेच सांगत येतं. ‘श्री गणेशाय नमः।’ हा केवळ उच्चारण्याचा मंत्र नाही, तर ‘नव्यानं जीवन उभारण्याचा, स्वप्न साकारण्याचा आरंभ करू’ हे स्वतःलाही सांगण्याचं समुपदेशन आहे. अशा क्षणी मनं एकत्र येतात, ती शुभसंकल्पांनीच; त्यातल्या सुगंधलहरी अवघ्या सृष्टीला ऊर्जा देतात. अहंभावाचा धूप जाळून, सुलीन मनानं चैतन्याला शरण जा, हे सांगत येणाऱ्या, संतांना स्फुरलेल्या आरत्या हा तर संवेदनांचाच महोत्सव आहे. आपण केवळ त्या ‘उपचार’ म्हणून म्हणत असू, तर - त्यानंतर गोडाचा प्रसाद मिळेल; पण आपण या आरत्यांतला शब्द न् शब्द आतल्या रस-रूप-गंधानं जाणून घेतला, दर अंतर्यामी अमृताचा पाझर फुटेल.
ज्याची जितकी ओंजळ तितकंच त्याला मिळतं. परंतु ‘करूनि सद्‌भावाची अंजुळी’ उभे राहिलो, तर अवकाश हाती येतं; नक्षत्रांनी ओथंबलेलं. ‘उत्सव म्हणजे केवळ एक दिवसाची सुटी’ इतकंच मानलं, तर आनंदही सुटीएवढाच होतो; पण त्या निमित्तानं पुन्हा विरत चाललेली नाती जोडू, पुन्हा - होऊन गेलेल्या ‘स्वाभाविक’ रागा-लोभांच्या पलीकडे जाऊन - मनं चार पावलांनी जवळ आणू - त्यासाठी मिळालेला हा अवधी आहे, असं मानलं तर नव्या अनामिक सोबतीनं मनाला अननुभूत आधार मिळतो.
विशेषतः गणेशाचा उत्सव हा आता केवळ मनोरंजनाचा उत्सव होत आहे. चार घटका करमणूक, सुमार नाच-गाणी, ध्वनिमुद्रित संगीतावरचं हलक्‍या दर्जाचं थिरकणं एवढंच मर्यादित स्वरूप झालं आहे. वसाहतीनं मागितलेली वर्गणी कार्यकर्त्यांना दिली, की आपण फार मोठं कर्तव्य बजावलं असा आनंद हाही थिटाच आहे. ज्येष्ठांचं समजूतदार मार्गदर्शन अलिप्त होत आहे, म्हणूनच उत्सवाचा हेतूही क्षीण होताना दिसत आहे. उथळ हातांमध्ये आणि अभिरुचीसंपन्नतेचं भान हरवलेल्या मानसिकतेत उत्सवाचं व्यासपीठ गेलं आहे. ज्या कारणानं आणि ज्या विचारवंतांच्या स्फुरणातून हे सार्वजनिक उत्सव सुरू झाले, ते हेतूच जर बाद झाले, तर उरतं ते केवळ मखर - आत ‘उद्दिष्टांचा श्रीगणेश’ तर हवाच ना!

‘वर्तमाना’त जगा हे सांगतच सण येतात. आजचं सुख कालचा वेदनेनं उदासवाणं करण्यापेक्षा - ‘नव्या जिण्याचा स्पर्शा’साठी सामोरं जाण्याचे बळ सण देतात. कालची निबीड मध्यरात्र आणि उद्याचा कांचनी उषःकाल यांना जोडणारं झुंजूमंजू म्हणजे हे सण! परंतु हे जाणिवेनं आकाळलं तरच त्याचा निनाद रोमारोमांतून अंकुरेल. म्हणून हे सोहळे साजरे करताना केवळ बेभान होऊन चालणार नाही. एका संवेदनशील भानही असायला हवं. जसं गोविंदाच्या रूपात ढोलताशावर लय, तालाशी मैत्री करताना, गळाभेटीतून एकमेकाला गुंफताना ‘एकात्मतेचा दहीकाला’ हंडीतून साधायचा आहे, हे भान हवं, ते नसेल तर तो नुसताच प्रयोग होईल, त्याचं रूपांतर सुयोगात होणार नाही. म्हणूनच सण आणि क्षण यांचं अद्वैत व्हायला हवं. केवळ एक बाह्य बदल एवढंच या उत्सवाचं प्रयोजन नाही. कालच्या स्वतःत परिवर्तन करून भविष्याकडे निघणं आवश्‍यक आहे. म्हणूनच पेरणीतले काबाडकष्ट आणि सुगीचा तेजोमय दसरा यामध्ये गणेशपूजा आहे. बुद्धिपूजा आणि विजयोत्सव यांच्या वाटेवर नवरात्र उत्सवातून शक्तीपूजा आहे. जगताना युक्ती आणि शक्ती यांचाही मेळ आवश्‍यक म्हणूनच विघ्नहर्त्या विद्यापतीच्या अधिष्ठानानंतर आपण - करुणेचा विस्तार करणाऱ्या अनाथांची नाथ झालेल्या दुर्गापूजेकडे निघतो.

कल्पक आणि प्रज्ञावंत समाजऋषींनी समाजाच्या एकंदर समजाचा सुवर्णबिंदू जाणून किती कौशल्यानं सणांची रचना केली आहे, हे पाहिलं तर त्यातलं कुठल्याही कागदावर न उमटवता येणारं महाकाव्य ध्यानात येतं. हे सण केवळ अंदाजे, योगायोगानं रेखलेले नाहीत. सरावानं आणि अतिपरिचयामुळे ते आपण गुळगुळीत करून टाकत आहोत, तो भाग आपल्या अतिव्यग्र आणि यंत्रमग्न दिनचर्येचा आहे. परंतु, मुळात प्रत्येक उत्सवाला एक ऋतू-पैलू आहे. समग्र समाजाला त्या त्या भौगोलिकतेचं न्यारं परिमाण आहे. या सत्याचा दिव्य साक्षात्कार झाला, की आपले वैज्ञानिक पूर्वज किती समष्टीरूप करुणाकर होते याची प्रचिती येते.

सणांची निर्मिीती नेमकी कुठल्या ‘क्षणी’ झाली याची निश्‍चित नोंद शोधता येणार नाही. जशी अमुक एका नदीच्या उगमाचा एक विशिष्ट क्षण, एक तारीख सांगता येणार नाही. संचिताच्या गर्भात काय, कसं दाटून येतं आणि ते कोणत्या अनाम आवेगानं कसं प्रगटतं हे एक उत्कट आणि मधुर गूढ आहे. त्या गूढतेच्या डोहात डोकावणं हेच गवसण्याहून सुंदर आहे. सणांच्या निर्मितीचा क्षण हा असाच अनादी - अनंतात कुठंतरी असेलही. पाषाणातूनही पहिलं तृणपातं केव्हा आलं, नि त्या तृणातून पहिलं फूल केव्हा प्रगटलं हे सांगण्याइतकं ते अवघड; पण एक मात्र नक्की - त्याहीवेळी उत्क्रांतीचा पहिल्या सुबुद्ध टप्प्यावर ती मानव होऊ पहाणाऱ्या पशूची आंतरिक गरज होती. जगण्यासाठीच्या कठोर तपश्‍चर्येनंतर मनाच्या चेहऱ्याला स्मितरेषांची स्वप्नं पडू लागली असतील, नि त्या भरात तो आदिमानव हर्षभरानं नाचला असेल, अत्यानंदानं चित्कारला असेल. कुणाच्या तरी कृपेनं हा क्षण लाभला आहे - जे आपल्या शक्ती पलीकडलं आहे - ते आता आपल्या हातून कुणीतरी घडवून घेत आहे. हा ‘साक्षात्कार’ त्याला झाला असेल; आणि कृतज्ञतेचा संस्कार मेंदू आणि हृदयाच्या प्रीतिसंगमातून झंकारला असेल, त्यातून ‘देव’ या संकल्पनेचा जन्म असेल का?
सणांच्या मुळाशी कृतज्ञतेची ही आदिम प्रेरणा असावी. बुद्धिपूजा आणि शक्तिपूजा! जगणं सुरंगी करण्याची ही निमित्तं शतका-शतकांपूर्वीची आहेत. ती नितळता आज पुन्हा शोधायला हवी; एका अर्थानं गंगेनं पुन्हा गंगोत्रीकडं जायला हवं. उत्सवाचं केवळ कर्मकांड झालं, की उरतात ते केवळ देखावे! टरफल्यांच्या सजावटीपेक्षा आशयाचा दाणा आस्वादणं हाच खरा बाह्य उत्सवाचा आंतरिक हेतू आहे. म्हणूनच भावनेला तर्काची जोड हवी. गणेशाचं रूप ध्यानपूर्वक अभ्यासलं, तर याची उकल होऊ शकेल. विज्ञानाचे ज्ञानयोगीच असलेले सर्व संत हीच प्रतीकं उकलत आपल्याला काही सांगण्याचा आकांत मांडतात. मात्र, ढोलताशाचा गजरात त्यांच्या सांगण्याचा मुरलीरव केव्हा मागं पडतो ते कळतही नाही.
तरी तर्कु तोचि परशु।
नीतिभेदु अंकुशु।
वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे

यातून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी श्रीगणेशरूपाची जी मधुर मीमांसा केली आहे, ती निदान जाणून घ्यायला तरी काय हरकत आहे? गणेशाच्या हातातील परशू हा तर्कशास्त्राचा, अंकुश न्यायशास्त्राचा आणि रसपूर्ण रुचकर ‘मोदकु’ कुठला... तर वेदान्ताचा! सणांच्या सोबतीनं आनंदोत्सव साजरा करताना एक ‘क्षण’ तरी आपण इतके अंतर्मुख होणार आहोत का? बौद्धिक - मानसिक संदर्भानुसार हे जाणणं वेगवेगळं असेल, हे मान्य आहे. परंतु, ज्ञानाच्या प्रवासाला तरी निघणं शक्‍य आहे. नाहीतर जमवलेल्या वाद्यांतून गोंगाट निर्माण होईल; द्रष्ट्या पूर्वजांना अपेक्षित असलेला ‘सूर’ काही प्रगटणार नाही. आपले उत्सव हे अंतर्यात्रेला सूर देणारे निमित्त होऊ शकतात.
श्रीगणेशाच्या मंगल चरणानं संवेदनांचा हा बुद्धी उत्सव, कष्टाचं सार्थक करणाऱ्या, येणाऱ्या काही दिवसांत धरित्री सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणाऱ्या कृषिवलांच्या श्रमपूजेचा दसरा आणि त्यानंतर तेजोमय नादब्रह्म जागवणारा दीपोत्सव! जणू तीन कडव्यांचं हे सृष्टीचं महाकाव्यच!
ते जगण्यासाठी निमंत्रण देणारे हे क्षण म्हणजेच हे सण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com