पातळी सोडायला नको (प्रा. रवी पवार)

प्रा. रवी पवार ravi.creativepart@gmail.com
Sunday, 21 June 2020

अनेक भारतीय वेब सिरीज लोकप्रिय होत असल्या तरी, कामविषयक दृश्यं आणि हिंसाचार हाच त्यांचा आता ‘यूएसपी’ बनत चालल्याचं दिसत आहे. कारण नसताना समाविष्ट केली जाणारी ही दृश्यं कशासाठी? त्यातून नक्की काय संदेश दिला जातो, समाजाला कोणती दिशा दिली जाते? विशेषतः किशोरवयीन, तरुण मुलं या वेब सिरीजकडे जास्त आकर्षित होत असताना या गोष्टीचा विचार नक्कीच करायला हवा.

अनेक भारतीय वेब सिरीज लोकप्रिय होत असल्या तरी, कामविषयक दृश्यं आणि हिंसाचार हाच त्यांचा आता ‘यूएसपी’ बनत चालल्याचं दिसत आहे. कारण नसताना समाविष्ट केली जाणारी ही दृश्यं कशासाठी? त्यातून नक्की काय संदेश दिला जातो, समाजाला कोणती दिशा दिली जाते? विशेषतः किशोरवयीन, तरुण मुलं या वेब सिरीजकडे जास्त आकर्षित होत असताना या गोष्टीचा विचार नक्कीच करायला हवा.

मला जाणवलेलं भारतीय मानसिकतेचं एक वैशिष्ट्य म्हणजे कॉपी करण्यात आपण खूप तरबेज असतो. भारतीय इतिहासात जे काय ओरिजनल तयार झालं असेल तेच आपल्यासाठी माईलस्टोन असतं. त्याच्या पुढे जाण्याची अनेकांकडे हिंमत आणि धमक नसते. त्या उलट पाश्चात्य प्रगत देशांत मूळ गोष्ट आपल्या आधी शोधली जाते, वापरली जाते, हिट होते... मग आपण ती गोष्ट वा तंत्र आयतं घेऊन त्याला भारतीय चेहरा देऊन प्रस्तुत करतो. यात इन्स्पायर होणं हा भाग खरं तर प्रामुख्यानं दिसला पाहिजे; पण तसं खूपच अपवादानं दिसून येतं. तर मुद्दा आहे भारतीय वेब सिरीज. एक काळ होता जेव्हा भारतीय प्रेक्षक आपले कामविषयक उत्सुकता पूर्ण करण्यासाठी अत्यंत टुकार भयपट (रामसे आणि तत्सम टाईप) पाहात असायचा, किंवा बस स्टॅंडवर छुप्या रीतीनं मिळणारी खास पुस्तकं वाचायचा. तेव्हाच्या शाळा, कॉलेज आणि होस्टेलमध्ये तर ही पुस्तकं मिळवण्यावरून हाणामारीही झाल्या आहेत. (आजचे प्रौढ जे नव्वदच्या दशकात तरुण होते, त्यांना हे आठवत असेलच) त्या काळात केलेल्या चुकांची फळं शारीरिक आणि मानसिक पातळीवर बरेच प्रौढ आज भोगत असतील. अल्पवयातली उत्सुकता आणि तारुण्यातल्या गमतीतून अनेक मानसिक विकृती जन्माला आल्याची अनेक उदाहरणं समाजात आहेत. गेल्या काही दशकांत बौद्धिक सकसता तपासणारे प्रेक्षक वगळता इतरांच्या उड्या ‘मेरा नाम जोकर’पासून ते ‘राम तेरी गंगा मैली’, ‘जाँबाज’ ते ‘फायर’पर्यंत का पडल्या हे कळून येईल. किंवा आजही अशा प्रकारच्या या उड्या मारणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी असली तरीही, हे पेव आपल्या घरापर्यंत आलेलं नव्हतं. पिटातल्या चार रांगापुरतं हे मर्यादित होतं; पण आता वेब सिरीजमुळे या प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. आपल्या बेडरूमपासून सुरू होऊन लिव्हिंगरूम व्हाया मुलाच्या रूमपर्यंत प्रेक्षक तयार झाले आहेत. एवढंच कशाला? प्रत्येकाच्या हातात या कंटेंटचा कंट्रोल आलाय. कोणीही, कधीही, काहीही पाहू शकतोय. नो नियम.. नो सेन्सॉरशिप..

मॉडर्न आणि आधुनिकतेच्या नावाखाली सगळं माफ. न्यू जनरेशनची (टीन एजर्सनाही यंग जनरेशनमध्येच धरलंय त्यांनी) डिमांड आहे, या एका ब्रीद वाक्यावर OTT platform चा जन्म भारतात झालाय. बहुतेक सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कोणत्याही सेन्सॉरची कात्री न लावता कंटेंट रिलीज केला जातो. त्यामध्ये सेक्स, शिव्या आणि क्राइमचा बिनदिक्कत धुमाकूळ चालू आहे. काही वेब सिरीज नक्कीच चांगल्या आहेत. शुद्ध, सकस मनोरंजन आणि अनुभव देणाऱ्या आहेत; पण काहींमध्ये कंटेंट चांगला असला तरीही शिव्या, सेक्स किंवा हिंसांवर केलेलं अतिडिटेलिंग आपल्या मेंदूला बधिर करतं. उदाहरणार्थ, ‘समांतर’ वेब सिरीज बघा. कथा, दिग्दर्शन उत्तम असलं, तरीही सतीश राजवाडे यांच्यासारख्या दिग्दर्शकालाही राहवलं नाही. चुंबन दृश्याचा डोस दिलाच शेवटी. मराठीला या गोष्टीची गरज आहे, असं मला तरी वाटत नाही आणि कथेची गरज असली, तरीही ते दृश्य कलात्मकतेनं सादर करता येऊ शकत. इथं उत्तान आणि भडकपणामुळे प्रेक्षक वाढतील ही अपेक्षा असली, तर ती नक्कीच फोल आहे!
यापेक्षाही भयानक प्रकार हिंदीमध्ये आहे. अनेक मराठी कलाकार हिंदीमध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. पैसा मिळतोय. काम मिळतंय. चांगली गोष्ट आहे. तरीही ते करत असलेली कामुक दृश्यं आणि कथा यांची सांगड घातली, तर त्यातला टुकार फुटकळपणा अधोरेखित होतो.

हिंदीनं तर गृहीतच धरलाय. अत्युच्च टोक गाठलंय. कथा, दिग्दर्शन, लोकेशन, टेकिंग, अभिनय, सगळंच सिनेमापेक्षाही सुंदर असलं, तरीही कुणीही कलाकार शिव्या देत असतात. अनेक शब्द तर परवलीचे शब्द झालेत. यावर कहर म्हणजे सेक्स आणि क्राइम दृश्यं आहेत हो. किती डिटेलिंग असावं? विचार करा आणि आठवा. ‘मिर्झापूर’मधले सगळे सेक्स सीन, आवाज, हिंसा, ड्रग्ज, दारू, सिगारेट आणि डायलॉग. क्लोजअपमध्ये गळा चिरून, अगदी पोटातली रक्तबंबाळ आतडी बाहेर येताना दाखवलं आहे. ‘पाताळलोक’मधला हातोडा त्यागी आठवा. मेंदूचा भुगा करून सडा टाकलाय चक्क.. पुन्हा त्याचा एक्स्ट्रीम क्लोजअप आठवा... ‘एक थी बेगम’, ‘फोर मोर शॉट्स प्लीज’, ‘मेड इन हेव्हन’, ‘मस्तराम’... (ही काही उदाहरणं आहेत, अजून खूप नावं आहेत.) सेक्स आणि खून कसा आणि किती प्रकारे करावा? किती वेळ करावा? त्यात किती विकृती असावी? किती बीभत्सता असावी?... याचं यथार्थ प्रात्यक्षिकच दिलं जातं. तेही प्रत्येक भागात.

आता तुम्ही म्हणाल यंग जनरेशनला हे आवडतं म्हणून हे माध्यम हिट आहे. अगदी बरोबर आहे. उत्तानता आणि उत्तेजकता नैसर्गिक तर आहेच की! पण त्यातही एक सौंदर्य असू नये का? कलात्मकता असू नये का? या भूमीला ‘खजुराहो’ आणि ‘कामसूत्र’सारख्या कलाकृतींची पार्श्वभूमी आहे. ज्यात एक व्यापकता आणि सौंदर्यदृष्टी सामावलेली आहे. कामप्रधानता हेच जर कलेचे निकष आणि आवड बनली असेल तर तरुणाची अशी मानसिकता का तयार झाली असावी, याचा विचार कोण करणार? आधीच उंबऱ्याच्या बाहेर जास्त काळ राहणारी तरुणाई. त्यात अधिक मोकळेपणा आलेलाच आहे. सोबतच राजकारण, धार्मिक तेढ आणि पॉर्न आणि उग्र मानसिकतेनं सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं विष समाजात आधीच पसरलंय. त्यात अजून या वेब सिरीजमधल्या आक्षेपार्ह गोष्टींची भर पडत आहे. या सिरीजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांना किमान काही तरी मर्यादा नको का? तरुणाईवर तरणाऱ्या या देशाचा सांस्कृतिक पाया मजबूत राहू शकेल का? इतकं सोप्पं, इतकं सहज आहे का हे सगळं?
मनोरंजन जसं महत्त्वाचं आहे, तसा शृंगार रसही महत्त्वाचा; पण किती आणि आणि कोणत्या वयात, याचं मापदंड ठरवणंही सुदृढ सामाजिक मानसिकतेसाठी गरजेचं आहे. ही चूक सिरीज पाहणाऱ्यांची, कलाकारांची आहे की मेकर्सची? या प्रश्नाची उकल करताना हे ठामपणे सांगता येतं, की भारतीय मेकर्सना खरंच वेब सिरीज म्हणजे नक्की काय प्रकार असतो, हे कळलंच नाहीये (असं मला तरी वाटतंय.) जी गोष्ट दोन-तीन तासांत दाखवणं शक्य नाही किंवा आवाका खूप मोठा असेल किंवा चित्रपटात जे सहज दाखवता येणार नाही किंवा चाकोरीबाहरेचं; पण उत्तम असं काही दाखवायचं आहे म्हणून या वेब सिरीजचा जन्म पाश्चात्य देशांत झाला. पाश्चात्य देशांतल्या प्रेक्षकांची सामाजिक स्थिती, मानसिकता, समज, गरज, मनोरंजनाची पातळी, दृश्य पचन करण्याची क्षमता नक्कीच वेगळी आहे. त्यांच्यासोबत भारतीय प्रेक्षकांना बसवून चालेल का? सरसकट कॉपी-पेस्ट करून नाही चालणार. आपल्या इथली ग्रामीण ते शहरी भागांमधली किमान वय बारा-पंधरापासूनची मुलं मोबाईल वापरत आहेत. तो आपोआप आणि बळजबरीनं या वेब सिरीजचा प्रेक्षक बनत चालला आहे. कारण, त्याच्यासमोर हे सिरीज मेकर्स कोणत्याही कात्रीशिवाय हा वाईट कंटेंट टाकत आहेत आणि जे टाकलं जातं ते पहिलंच जातं. आणि पाहिलेलं करून पाहण्याची मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीचा आविष्कार आपण कोणत्याही कॉलनी, गल्लीमध्ये सहज पाहू शकतो.
अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर किशोरवयीन मुलांना नको त्या वयात, घाणेरड्या आणि चुकीच्या पद्धतीनं सेक्स आणि हिंसेचं ज्ञान मिळत आहे. हस्तमैथुन, लैंगिकता, समलैंगिकता, अनैतिक संबंध, हिंसा, क्रूरता, ड्रग्ज, बीभत्सता, जातीय तेढ यांवर आधारित अत्यंत स्वैर दृश्यरचना आणि संवादांची डिश त्याच्यासमोर ठेवली जात आहे. सिरीज मेकर्सना सिनेमॅटिक लिबर्टी किंवा कलात्मक अभिव्यक्तीचा अर्थ कळत नसेल का? की वाटेल ते दाखवणं म्हणजेच सिनेमॅटिक लिबर्टी असा अर्थ त्यांनी घेतलाय? खरं तर या क्षेत्रातल्या प्रत्येकाला अभिव्यक्ती नीट कळते. फक्त पैशांसाठी अल्पवयीन आणि तरुणांचा बळी देऊन ते पुढे जात आहेत. आक्षेप या व्यवसायावर नाही, त्या दृश्यावरही नाहीये; पण गरज नसताना दृश्यं दाखवणं किंवा त्याच्या चुकीच्या वापरावर नक्कीच आहे.

हजारो वर्षांपासून माणूस ते सगळं करत आला आहे जे आज आपण पाहत आहोत. कोणाला सांगायची गरज नाही. सर्वांना सगळं माहीत असतं, किंवा योग्य वेळेला सगळं कळून जातं. हा निसर्गाचा नियमच आहे. कमी वयात किंवा गरज नसताना या गोष्टी मुलांच्या समोर सतत येत राहिल्या, तर मुलं गैरसमजुतीमधून पॉझिटिव्ह गोष्टी न घेता, निगेटिव्ह गोष्टी सर्वांत आधी आत्मसात करतात, हाही मानसिकतेचा नियम आहे आणि एकदा निगेटिव्ह गोष्ट मनात आणि शरीरात भिनली, तर नंतर कितीही पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करा.. निगेटिव्हिटी आयुष्यभर पिच्छा सोडत नाही.

म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मला सिनेमॅटिक लिबर्टी किंवा कलात्मक अभिव्यक्तीची जपणूक करून एका मर्यादेपर्यंत कात्री नक्कीच हवी. नाहीतर तुम्ही मला बिनधास्त म्हणू शकता, की मी मॉडर्न नाही- कारण मला वेब सिरीज या माध्यमाची ताकद कळत नाही... पण तुम्हाला या माध्यमाची ताकद कळली असेल, तर तुम्ही एकदा विचार नक्कीच करा. आपल्या भावी पिढीला आपण कोणत्या दिशेला नेतोय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang prof ravi pawar write navi khidaki article