गेमिंगचा विळखा (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh
dr vaishali deshmukh

‘पबजी’ या गेममुळं मानसिक आघात झालेल्या एका तरुणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चर्चेत आहे. एका मुलानं या गेमसाठी वडिलांना संपवल्याचीही घटना नुकतीच घडली. ‘पबजी’ किंवा एकूणच तत्सम मोबाईल गेम्सचा विळखा तरुण आणि विशेषतः किशोरवयीन मुलांना बसत आहे. या मानसिक आजाराची लक्षणं कोणती, त्याच्यावर उपचार काय करायचे आणि मुख्य म्हणजे मुलांना या राक्षसाचा विळखा बसूच नये यासाठी पालकांनी काय करायचं, घरातलं वातावरण कसं हवं आदी गोष्टींबाबत चर्चा.

मुलं म्हटलं, की आठवतात खेळ! युनायटेड नेशन्सच्या बालहक्क समितीनं ‘खेळणं’ हा मुलांचा मूलभूत हक्क म्हणून मान्य केला आहे. त्याच्यामुळं शारीरिक वाढ, मानसिक विकास, वैचारिक विकास तर होतोच, शिवाय कल्पनाशक्तीचा विकास, भावनांची ओळख आणि नियमनही होतं. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यातही खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. कितीतरी सामाजिक कौशल्यांचा विकास खेळातूनच होतो. शिकलेल्या कौशल्यांचा प्रत्यक्षात वापर करण्याची संधी एरवी कुठं मिळणार मुलांना? शिक्षण घेत असताना खेळांचा वापर केला, तर ते शिक्षण अधिक आनंददायी, अधिक परिणामकारक आणि अधिक टिकाऊ होतं. मारिया मॉंटेसरी यांच्यापासून आजच्या आधुनिक शिक्षणतज्ज्ञांनी एकमुखानं मान्य केलेली गोष्ट म्हणजे अनुभवात्मक किंवा कृतिशील शिक्षण. दृष्टी, श्रवण, वास, चव आणि स्पर्श या पंचेद्रियांचा वापर करून घेतलेल्या अनुभवासारखा गुरू नाही. म्हणूनच म्हटलं जातं : ‘I hear, I forget; I see, I remember; I do, I understand!’ या खेळांचं स्वरूप काळानुसार थोडंफार बदलत गेलं, तरी त्याचा मूळ आराखडा तोच राहिला.
इलेक्ट्रॉनिक गेम्स मात्र सर्वस्वी वेगळं स्वरूप घेऊन आले आणि त्यांनी सगळंच चित्र पालटलं.

शालेय मुलांची सेशन्स घेताना एकदा त्यांना विचारलं, की तुमच्या वयाची अश्मयुगातली मुलं कोणते बरं खेळ खेळत असतील? उत्तर देतादेता त्यांच्या लक्षात आलं, की तेव्हा बॉल, बॅट अशी साधनं नसणार. मग त्यांना आठवायला लागले पारंपरिक खेळ- ज्यांना बहुधा कोणत्याही साधनांची फारशी गरज नसते. लपाछपी, लंगडी, कबड्डी, पकडापकडी असे कितीतरी खेळ आठवले. गेल्या कित्येक पिढ्या कमी-अधिक फरकानं असलेच खेळ खेळायच्या. साधारण सन १९७१-७२ च्या सुमारास इलेक्ट्रॉनिक गेम्सचा उदय झाला आणि विकसित देशांत मुलांची खेळाची पद्धत कायमची बदलली. जागतिकीकरणाच्या रेट्यात बघता बघता या गेम्सनी देशांच्या सीमा ओलांडल्या. इतक्या वेगानं, की भारत आणि इतर आशियाई देश पाश्चात्य देशांच्या वरचढ प्रमाणात ते खेळू लागले. मुलींपेक्षा मुलांमध्ये हे खेळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे; पण याला वयाचं बंधन नाही, असं दिसून आलंय.

वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून लोकांना खेळात व्यस्त ठेवणं हा मुख्य उद्देश असतो त्या कंपन्यांचा, तो व्यवसाय आहे त्यांचा. त्यासाठी मग त्या सतत या गेम्सच्या सुधारित आवृत्या काढत राहतात, तुम्हाला इतरांचे स्कोअर्स पाठवत राहतात, तुमच्या भावना चाळवतील अशा प्रकारे गेम्सची रचना करतात. यासाठी मानवी मनाचा सखोल अभ्यास केलेला असतो. आजकालचे नवीन गेम्स अतिशय गुंतागुंतीचे, खूप तपशीलवार असतात आणि अर्थातच त्यामुळे वेळखाऊ असतात. ते तुम्हाला त्यात देहभान विसरून पूर्णपणे गुंतवून ठेवतात. तो अनुभव आपल्या मेंदूतल्या बक्षीस-केंद्रावर थेट परिणाम करत असल्यामुळं, उत्तेजित करणारा आणि हवाहवासा असतो. मज्जापेशींमधून स्रवणाऱ्या डोपामिन नावाच्या रसायनाचा या संवेदनेमागं मोठा वाटा असतो. त्याच्या हव्यासापायी पुनःपुन्हा खेळत राहण्याचा मोह होतो. तसंच पुढं जात राहिलं, तर ही वाट थेट व्यसनाकडं नेणारी असते.

नवनवीन गेम्स बाजारात येण्याचा वेग इतका आहे, की आधीचे गेम्स पचनी पडण्याआधी जुन्या गेम्सची सुधारित आवृत्ती किंवा नवीन गेम्स आलेले असतात. त्यामुळं गेमिंगच्या परिणामांविषयी साग्रसंगीत माहिती आपण अजून गोळा करतोय. म्हणजे कुठल्या गेम्समुळं व्यसन लागण्याची शक्यता जास्त आहे, मुलांच्या वर्तणुकीवर त्यांचा नक्की काय परिणाम होतो, तो किती टिकतो वगैरे. काही गेम्स एकट्या खेळाडूनं ऑनलाइन किंवा ऑफलाईन खेळायचे असतात, तर इतर काही गेम्स अनेक खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी ऑनलाईन खेळत असतात. अनेक खेळाडू असलेले गेम्स कधीच पूर्ण असे होत नाहीत, त्यांना अंतबिंदू नसतो. शिवाय तुम्ही कधीही ऑनलाईन गेलात, तरी जगातलं कुणी न कुणी खेळत असतंच. आपण ऑनलाईन नसताना काय झालं असेल, आपल्यापेक्षा कुणी जास्त स्कोअर केलं असेल हे बघण्याची ओढ जबरदस्त असते. मुलं अक्षरशः घरी आल्याआल्या दप्तरं फेकून कॉम्प्युटरकडे धाव घेतात. परिणामी अशा प्रकारच्या गेम्सच्या आहारी जाण्याची शक्यता अधिक असते. शिवाय इथं मुलं आई-बाबांनी घालून दिलेल्या वेळा पाळण्यापेक्षाही त्या बाकीच्या भिडूंच्या वेळा पाळायला प्राधान्य देतात आणि पालकांना हतबल व्हायला होतं.

परिणाम घातक
खेळाचे पुढचे टप्पे पार करणं, त्याचे पॉइंट्स मिळवणं आणि इतर भिडू ऑनलाईन असतील तेव्हा खेळणं या गोष्टींमुळं मुलं खाण्यापिण्याची शुद्ध घालवून बसतात, झोपेची पर्वा करत नाहीत. त्यांना इतर कशात रस वाटेनासा होतो. वेगानं खेळता यावं म्हणून त्यांना लेटेस्ट, वेगवान कॉम्प्युटर हवासा वाटायला लागतो. असं बरेच दिवस, पुनःपुन्हा होत राहिलं, तर मुलं चक्क कुपोषणाची बळी ठरतात, एकतर लठ्ठपणा नाहीतर अशक्तपणा. त्यांच्यात संप्रेरकांचं असंतुलन होतं. इतरांशी प्रत्यक्ष संपर्क तुटल्यामुळे ती एकाकी, एकलकोंडी होतात. नैराश्यात बुडतात. चिडचिडी होतात. पाठोपाठ शैक्षणिक अधोगती येते. या टप्प्याला पोचल्यावर मात्र आई-बाबांना काहीतरी पाऊल उचलण्याची निकड वाटू लागते.

प्रश्न असा आहे, की गेम्स हे आजचं वास्तव आहे. आई-बाबांना कितीही अनाकलनीय वाटला, तरी त्यातून मिळणारा आनंद मुलांना हवाहवासा वाटणारा आहे. या गेम्समधून मुलं काही गोष्टी शिकतातही; समस्या सोडवायला शिकतात, निर्णय घ्यायला शिकतात, कल्पक विचार करायला शिकतात, हातांचा आणि नजरेचा समन्वय साधायला शिकतात. मर्यादित वापरानं हे शक्य असतं. गेम्स खेळणाऱ्या मुलांशी चर्चा केल्यावर आणखी एक गोष्ट लक्षात आली. आपापल्या घरात आणि परिघात राहून, हवी तेवढीच माहिती पुरवून, आपल्या सोयीनुसार मनोरंजन करून घेता येणं हा त्यांना गेमिंगचा मोठा फायदा वाटतो. इथं त्यांना आपली एक वेगळी, आभासी प्रतिमा तयार करता येते. त्यातला बिनचेहऱ्याचा मुक्तपणा हवासा वाटतो.
गाडं अडतं कुठं, तर ‘मर्यादित’ वापरावर. कुठल्याही स्क्रीनसमोर ‘फक्त पाच मिनिटांसाठी’ बसल्यावर किती वेळा आपण खरोखरच पाच मिनिटांत उठू शकतो? वरवर पाहता वाचन, चित्र काढणं आणि गेमिंग यात काही फरक नाही असं वाटतं; पण हे म्हणजे ‘पाणी आणि बिअर ही दोन्ही पेयंच तर आहेत, मग काय हरकत आहे एकाऐवजी दुसरं प्यायला’ असं म्हणण्यासारखं झालं. व्यसन लागणं, सवय हाताबाहेर जाणं, स्वत:वरचा ताबा जाणं हे इतर बाबतीत होत नाही. बऱ्याच गेम्समध्ये चॅटही करता येते. यातला धोका असा, की खोटी माहिती टाकली जाऊ शकते. आपण खरोखरंच अठरा वर्षांच्या कॉलेज तरुणाशी खेळतोय, गप्पा मारतोय की सदतीस वर्षांच्या विकृत माणसाशी, हे कळणं अवघड. काही वेळा जरुरीपेक्षा अधिक माहिती पुरवली जाते, आपला ठावठिकाणा, फोन नंबर दिले जातात आणि याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. क्लिनिकमध्ये आलेली एक आई आठवतेय. तिला तिच्या मुलाच्या स्क्रीन टाईमपेक्षाही या अनोळखी लोकांशी केल्या जाणाऱ्या चॅट्सची काळजी जास्त वाटत होती.

मगाशी आपण पंचेंद्रियांच्या वापराविषयी बोललो. या गेम्समध्ये यातली फक्त काही इंद्रियंच वापरली जातात हे उघड आहे. पारंपरिक खेळ मुलं स्वत: बनवू शकतात. ते खेळ रोजच्या वापरातल्या गोष्टींचा वापर करून किंवा काही साधनं न वापरताही खेळता येतात. त्यात शारीरिक हालचाल असते. व्हिडिओ गेम्स मात्र दूरच्या कुणीतरी बनवलेले असतात. मुलांचा सहभाग फक्त खेळण्यापुरता मर्यादित असतो. त्यात स्पर्श, वास, चव यांचा काहीही सहभाग नसतो.
गेम्स अतिशय वेगवान असतात, त्यातल्या प्रतिमा आकर्षक, चकचकीत असतात. त्यात सतत काहीतरी घडत असतं. अर्थात त्यांच्या वापरानं डोळे इतके दीपून जातात, की इतर सगळ्या गोष्टी त्यापुढं फिक्या वाटायला लागतात, मिळमिळीत, कंटाळवाण्या वाटतात. पुढचा गेम खेळायला कधी मिळतोय याची मुलं वाट पाहत राहतात. तो मधला वेळ म्हणजे कसाबसा काढायचा म्हणून काढला जातो. जिथं जिथं म्हणून त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला लागेल असे प्रसंग, म्हणजे बाहेर जाणं, इतर मुलांशी खेळणं हे टाळण्याकडे कल होतो. या व्हर्च्युअल जगातून कितीही शिकलं, तरी त्याचा वापर आपण शेवटी खऱ्या जगातच तर करणार आहोत. मात्र, लोकांशी संवाद करणं हेच ओझं वाटायला लागलं तर काय?

टोकाची प्रतिक्रिया कशामुळं?
कुठलीही गोष्ट करताना कधी एकदा गेम खेळायला मिळतोय याचाच विचार करत राहणं याचा अर्थ काय? मोबाईल दिला नाही, गेम खेळायला नकार दिला या कारणांसाठी एखाद्याला ‘संपवून’ टाकावसं वाटणं किंवा स्वत:चा जीव नकोसा वाटणं इतक्या टोकाच्या प्रतिक्रियेला काय म्हणायचं? वेळेचं बंधन पाळता न येणं, त्यापासून दूर राहिल्यानं जीव कासावीस होणं ही लक्षणं काय सांगतात? खेळायला आवडतं, की खेळायला लागतं? गेम्सच्या वेडापायी मित्र-मैत्रिणी दूर गेले, अभ्यासावर परिणाम झाला, तब्येत खराब झाली यावरून काय समजायचं? या सगळ्याचा अर्थ इतकाच होतो, की परिस्थिती हाताबाहेर जायला लागलीये, दैनंदिन वेळापत्रक कोलमडायला लागलंय, एकंदरीत आयुष्यावर गंभीर परिणाम होतायत. इलेक्ट्रॉनिक गेम्स जर आयुष्याच्या इतर महत्त्वाच्या वेळेवर अतिक्रमण करायला लागले, तो वेळ फस्त करत सुटले, तर ती धोक्याची घंटा असते.

वरवर पाहता हे गेम्स निरुपद्रवी वाटतात, सहजी उपलब्ध असतात, आजूबाजूचे सगळेच वापरत असतात आणि दिसताना त्यावर फार खर्चही करायला लागत नाही. त्यामुळं पालक म्हणून थोडी दोलायमान स्थिती होते. ‘जाऊ दे ना, अजून लहान आहे, त्याचे सगळे मित्र खेळतात, नाही म्हटलेलं चालतच नाही त्याला, केवढी लोळण घेतो, तो तरी दुसरं काय करणार मोकळ्या वेळात, काय असं आभाळ कोसळणार आहे...’ अशा प्रकारच्या विचारांनी ठाम निर्णय घेण्यात अडथळा येतो. बरं, केवळ विरोधासाठी विरोध करायचा असंही नाहीये. काही गोष्टी अशा असतात, की ज्या आपल्याला आवडत नसल्या, तरी आपल्या मुलांना आवडू शकतात हे स्वीकारून पुढं जायला हवं. कुठल्याही आव्हानाला प्रत्ययकारी तोंड द्यायचं असेल, तर आधी त्याचा फोलपणा, त्याचं उपद्रवमूल्य आपल्याला मनापासून पटायला हवं, आतपर्यंत भिडायला हवं. त्याचबरोबर त्याची अपरिहार्यता, त्याच्यापासून मिळणारे लाभ यांचीही सार्थ जाणीव हवी. तरच आपल्या वागण्या-बोलण्यात त्याचं प्रतिबिंब उमटेल. तरच मुलांना आपली तळमळ जाणवेल. तरच मुलं आपलं म्हणणं, आपला विरोध गंभीरपणे घेतील. नाहीतर ‘आजच्या मुलाचं बाळपण कोमेजून चाललंय, ती अकाली प्रौढ होतायत,’ असं आपण नुसतंच हळहळत राहू, परिस्थिती तशीच राहील. काही व्यावहारिक मुद्दे पाहूया.

प्रगती कायम आहे का?
आपलं मूल शाळेत-अभ्यासात आपली प्रगती राखून असेल, आपापलं दोस्तमंडळ जपून असेल आणि घरात पूर्वीसारखंच हसून-खेळून राहत असेल, तर बहुधा ते गेमिंगच्या कह्यात गेलं असण्याची शक्यता कमी आहे.
मन आणि शरीर यांचा असलेला घनिष्ट संबंध आपल्याला कानाआड करता येणार नाही. फक्त मनाला उद्दीपित करून शरीराला एका जागेवर जखडून ठेवणारे खेळ आपल्या मुलांसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी उपयुक्त असण्याची शक्यता कमी. त्यासाठी या घरातल्या, बैठ्या खेळांचा आणि मोकळ्या हवेतले शारीरिक खेळ, गटानं खेळले जाणारे मैदानी खेळ यांचा, समतोल साधायला हवा. मुक्त खेळाची संधी मुलांना देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यांचा हक्क आहे. त्यासाठी आपणच वेळ आणि जागा उपलब्ध करून द्यायला हवी. संध्याकाळच्या शिकवणीचा अट्टाहास सोडायला हवा. इंग्लिश-गणित या विषयांइतकीच, किंबहुना काकणभर अधिकच महत्त्वाची आहेत सामाजिक कौशल्यं. आणि त्यासाठी हाडामांसाच्या माणसांशी प्रत्यक्ष संबंध यायला हवा. मोकळ्या मैदानावर खेळायची संस्कृतीच आता नष्ट पावत चाललीये. तिचं पुनरुज्जीवन करायचं तर सामूहिक प्रयत्न करायला हवेत.
गेम्स खेळत असताना मुलं एका वेगळ्याच आभासी विश्वात असतात. त्यातून बाहेर यायला त्यांना थोडा अवधी द्यायला लागतो. एखादी स्थित्यंतराची कृती केली तर ते सोपं जातं. उदाहरणार्थ, छोटासा खेळ, थोड्या उड्या, बाहेर एखादी चक्कर, सरबत करून पिणे... आपलं शरीर, भोवताल यांचं भान यायला अशानं मदत होते.
कधी, किती वेळ आणि काय खेळायचं याचा मुलांबरोबर बसून विचार आणि त्याप्रमाणं वेळापत्रक. नियम न पाळल्यास होणाऱ्या परिणामांबाबत आधीच व्यवस्थित ठरावं. ऐन वेळी वाद घालून मनस्तापाशिवाय हाती काही लागत नाही. कारण मुलं गेम खेळत असताना वास्तवापासून खूप दूर असतात. त्यावेळी त्यांना कुठलाही युक्तिवाद कळत नाही किंवा तर्कशास्त्र पटत नाही. ठरवलेले परिणाम तडीस मात्र न्यायला हवेत. पण हो, परिणाम म्हणून पालकांनी स्वत:ला शिक्षा करून घ्यायची ठरवली, तर पश्चातापाची पाळी येते. एक बाबा एकदा मला तावातावानं म्हणाले, की माझ्या मुलामुळं माझा मोबाईल फुटला. कारण त्यांनी ‘गेम खेळणं बंद केलं नाहीस, तर मोबाईल फेकून देईन’ अशी धमकी दिली होती आणि ती प्रत्यक्षात आणली.
नियमांबाबत ठामपणा आणि सातत्य राखलं तर ते नियम करण्याचा उपयोग. धरसोड केली, आपापल्या सोयीनुसार नियम वाकवले तर मुलं गोंधळून जातात.

मुलांनी करायचं काय?
व्हिडिओ गेम्स खेळू नका असं सांगितलं; पण इतर काहीच पर्याय दिले नाहीत तर मुलांनी करायचं तरी काय? छोट्या सहली, पिकनिक्स, छंद, ट्रेकिंग, इतरांना मदत, घरातली कामं, कौटुंबिक कार्यक्रम हे काही पर्याय असू शकतात. थोडा वेळ काहीच न करता तंद्रीत बसायलाही हरकत नाही. अर्थात मुलं हे अगदी सहजपणे स्वीकारत नाहीत, त्यांना याची सवय लावायला लागते. वेळप्रसंगी आई-बाबांना वाईटपणा घ्यायला लागतो.
गेम्स खेळणं हे बक्षीस म्हणून न वापरता, दिवसभरातल्या अनेक गोष्टींपैकी करायची एक गोष्ट म्हणून वापरले, तर कदाचित ती इतकी उदात्त, अप्राप्य गोष्ट वाटणार नाही. ‘अमुक इतका अभ्यास केला तर गेम खेळायला मिळेल’, ‘शाळेत रोज वेळेवर पोचलास, तर इतका वेळ जास्त गेम खेळायला मिळेल,’ अशा तडजोडी हळूहळू अंगाशी यायला लागतात.

घरातल्या व्यक्तींचा एकमेकांबरोबर संवाद. यावर पुनःपुन्हा बोललं जातं- कारण संवाद फार महत्त्वाचा आहे आणि तरीही तो हरवत चाललाय. घरातल्या सदस्यांनी एकत्र बसून गप्पा मारणं हेही होत नाही. आपलं म्हणणं एकमेकांपर्यंत पोचत नाही. संवादाची जागा प्रश्न, शंका, सल्ले आणि सूचना यांनी घेतली, की तो नकोसा वाटायला लागतो आणि मुलं तो टाळायला लागतात. मग गेम्स असोत की इतर कुठले प्रसंग, त्यातून निष्फळ कडवटपणाशिवाय काही निष्पन्न होत नाही.
गेमिंगविषयी आपल्याला सगळं कळतं, असा दावा मी नक्कीच करणार नाही. मात्र, सगळी ‘कायनात’ आपल्या मुलांना गेम्स खेळायला उद्युक्त करायला टपून बसली आहे की काय, असं वाटावं असं वातावरण आहे खरं. आजच्या मुलांचं बाळपण आधीपेक्षा वेगळं असणार आहे हे सत्य स्वीकारणं, मुलाचं सामाजिकीकरण चालू राहण्याची खातरजमा करणं, या नवी आव्हानांना पूर्णपणे ‘डिलीट’ न करता काबूत ठेवणं आणि ती घातकतेकडे झुकत नाहीयेत ना याचं वेळोवेळी भान ठेवणं हे मात्र आपल्याला नक्की करता येऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com