esakal | संधीचं सोनं करा! (रश्‍मी भामरे)
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi bhamre

कोरोनामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीचा आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. अनेकांचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडून गेलं आहे. या परिस्थितीत काय करायचं, गुंतवणुकीचं काय करायचं, निर्णय कसे घ्यायचे, भविष्यात आर्थिक व्यवस्थापनासाठी कोणता मंत्र लक्षात ठेवायचा आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

संधीचं सोनं करा! (रश्‍मी भामरे)

sakal_logo
By
रश्‍मी भामरे rashmilind२००९@gmail.com

कोरोनामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीचा आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. अनेकांचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडून गेलं आहे. या परिस्थितीत काय करायचं, गुंतवणुकीचं काय करायचं, निर्णय कसे घ्यायचे, भविष्यात आर्थिक व्यवस्थापनासाठी कोणता मंत्र लक्षात ठेवायचा आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आलं आणि संपूर्ण जनजीवन ठप्प झालं. लॉकडाऊनच्या काळात आता काही प्रमाणात शिथिलता आणली गेली असली, तरी नोकऱ्या, व्यवसाय, कारखाने आणि पर्यायानं संपूर्ण आर्थिक घडामोडींवर झालेला विपरीत परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल. वैयक्तिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक पातळीवर पैशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. परिणामी, आपल्या आर्थिक नियोजनावर काय परिणाम होईल, या काळजीत सर्वजण आहेत.

कोरोना : आपत्ती की इष्टापत्ती?
कोरोनामुळे उद्‌भवलेली परिस्थिती ही सर्वांसाठी सारखीच न ठरता नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक किंवा प्रत्येक व्यक्तिगणिक ती वेगळी असणार आहे. व्यावसायिकाकडे येणारा पैशाचा स्रोतच खंडित झाला असेल, तर त्याला नवी गुंतवणूक थांबवावी लागणार आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पैशांची रोखता कायम राहील, याकडे लक्ष देणं आवश्‍यक आहे. उद्योजकांपुढे वेगळी आव्हानं असतील. कारखान्यांत फारसं उत्पादन होत नसताना कामगारांचे पगार आणि उत्पादनासाठी भांडवल असं दुहेरी आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. नोकरदारांसमोर तर आणखी वेगळीच आव्हानं असतील. नोकरीची सुरक्षितता किंवा वेतनकपातीसारख्या समस्येला कसं सामोरं जायचं, याची काळजी घेत असतानाच आहे ते उत्पन्न अतिशय काटेकोरपणे वापरणं आणि त्यानुसार पुढचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टी त्याला कराव्या लागतील.
जेव्हा अशी परिस्थिती उद्‌भवते, तेव्हा अनवधानानं गुंतवणूक व्यवस्थपनातल्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून वरवरच्या गोष्टी केल्या जातात किंवा सांगितल्या जातात. परंतु आपत्तीच्या काळात अशा गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. अशी परिस्थिती आपत्ती न ठरता तिचं इष्टापत्तीत रूपांतर व्हावं, यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे; जेणेकरून कठीण परिस्थितीत या गोष्टी तुमच्यासमोर देवदूताप्रमाणे धावून येतील, हे पाहिलं पाहिजे.

१) आपत्कालीन निधी :
आपत्कालीन निधी ही एक अतिशय मूलभूत अशी गोष्ट आहे. आयुष्य हे अनेक अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं. विशेषतः आर्थिक पातळीवर ते खूपच अनिश्‍चित स्वरूपाचं असतं. नोकरी गमावण्याची वेळ, एखादी आरोग्यविषयक समस्या किंवा इतर अचानक उद्‌भवणाऱ्या समस्येमुळे आर्थिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. मात्र, अशा परिस्थितीत देखील किराणा, भाडे, वीज-टेलिफोन बिल, ईएमआय, मुलांच्या शाळा-कॉलेजची फी, इन्श्‍युरन्स प्रीमियम यांसारख्या गोष्टी टाळता न येण्यासारख्या असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आर्थिक पातळीवर सामना करण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आपत्कालीन निधी. हा निधी नेमका किती असावा याबद्दल तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असतील. साधारणतः कोणत्याही आर्थिक उत्पन्नाविना पुढील बारा ते अठरा महिन्यांच्या खर्चाची तजवीज होईल इतका तो असला पाहिजे. खूप अनिश्‍चित उत्पन्न असेल, तर ३६ महिन्यांच्या खर्चाची तजवीज होईल इतका आपत्कालीन निधी असला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हा निधी कधीही वापरता यायला पाहिजे. त्यामुळे साधारणतः २५ टक्के फंड बॅंकेच्या बचत खात्यात ठेवला पाहिजे, तर ७५ टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकांतल्या मुदत ठेवी किंवा ओव्हरनाईट फंडात गुंतवणं चांगलं!

२) पुरेसं विमा संरक्षण :
तुम्ही आयुर्विमा किंवा आरोग्य विमा घेतला नसेल, तर तो लगेच घेणं अत्यंत आवश्‍यक आहे. टर्म इन्शुरन्स हा सर्वांत स्वस्त मिळणारा विमा आहे. कारण याचा हप्ता खूप कमी असतो. कुटुंबातल्या कमावत्या सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या इतर सदस्यांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा मार्ग म्हणजे टर्म इन्शुरन्स. आपल्यावर आर्थिकदृष्टया अवलंबून असलेल्यांना आपल्या पश्‍चात आर्थिक पातळीवर संघर्ष करावा लागू नये म्हणून प्रत्येकानं आयुर्विमा घेणं अत्यावश्‍यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विमा. तुम्ही नोकरदार आहात की व्यावसायिक किंवा तुम्हाला कंपनीनं मेडिक्‍लेम दिला आहे किंवा नाही, याचा फारसा विचार करू नका. कारण कंपनीची नोकरीच सुरक्षित नसेल, तर कंपनीनं दिलेला ‘मेडिक्‍लेम’देखील नोकरी गेल्यानंतर कामी येणार नाही. आताच्या अनिश्‍चिततेच्या काळात काहींच्या पगारात कपात होत आहे, कोणाची नोकरी जाईल आणि कोणाची राहील, हे निश्‍चित नाही. त्यामुळे अनिश्‍चिततेच्या जीवनात संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे आरोग्य विमा असणं ही काळाची गरज आहे. उपचारांदरम्यान येणाऱ्या वाढत्या खर्चाचा विचार करता तुमच्या कुटुंबासाठी कमीतकमी तीन लाख रुपयांचा विमा असणं आवश्‍यक आहे. अर्थातच व्यक्तिपरत्वे ही गरज वेगळी असू शकते.

३) अल्पकालीन उद्दिष्टं :
प्रत्येक कुटुंबाची अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टं असतात. त्यात कौटुंबिक सहली, ड्रीम कार विकत घेणं आदींचा समावेश असतो; पण सध्याचा काळ लक्षात घेऊन या सर्व गोष्टी पुढे ढकला. कारण तुम्हाला मूलभूत गरजांसाठी पैसे लागण्याची शक्‍यता जास्त आहे. म्हणून हौसमौजेच्या गोष्टी किमान दोन वर्षं पुढे ढकला. गरज मूलभूत असेल, तर साधारणतः अशा आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी तीन वर्षांची गुंतवणूक करण्यात येते. या प्रकारात केली जाणारी गुंतवणूक कमीत कमी जोखमीची असणं गरजेचं आहे. त्यामुळे या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल, याचा विचार न करता गुंतवणुकीची सुरक्षितता महत्त्वाची आहे. ओव्हरनाईट फंड, राष्ट्रीयीकृत बॅंकेतली मुदत ठेव हे गुंतवणुकीचे चांगले पर्याय ठरू शकतात. वरील अटी पूर्ण झाल्या असतील आणि तुमच्याकडे अद्याप बचत खातं किंवा ‘एफडी’मध्ये किंवा इतर कोणत्याही डेट वा हायब्रिड फंडांमध्ये रक्कम शिल्लक राहिली असेल, तरच तुम्ही पुढच्या टप्प्यावर जा.

४) मध्यमकालीन किंवा दीर्घकालीन उद्दिष्टं :
मध्यकालीन उद्दिष्टं म्हणजे ज्यांची मुदत तीन ते दहा वर्षांची असते. मुलांचे शिक्षण यांसारखी उद्दिष्टं मध्यमकालीन असू शकतात. दीर्घकालीन उद्दिष्टं म्हणजे ज्यांची मुदत १० ते १५ वर्षांची असते. रिटायरमेंट फंड, मुलांची लग्नं यांसारखी उद्दिष्टं दीर्घकालीन असू शकतात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या प्रकारची उद्दिष्टं साधण्यासाठी इक्विटी, डेट पर्याय निवडणंच योग्य. जेवढी उद्दिष्टं दीर्घकालीन तेवढा इक्विटीचा भाग वाढवणं आवश्‍यक आहे. कारण इक्विटी हा दीर्घकालीन आणि डेट हा मध्यकालीन उद्दिष्टांसाठी योग्य गुंतवणूकपर्याय आहे.
इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना तुमचा खूप चांगला रिसर्च करणं आवश्‍यक आहे. अपूर्ण ज्ञानानं केलेली गुंतवणूक ही बऱ्याच वेळेला तोट्याची ठरते. तुम्हाला स्वतःला हा अभ्यास करणं शक्‍य नसेल, तर म्युच्युअल फंडा हा तुमच्यासाठी चांगला मार्ग आहे. कारण म्युच्युअल फंडात एक अभ्यासू रिसर्च टीम तुमच्या गुंतवणुकीचं व्यवस्थापन करत असल्यानं ही गुंतवणूक तुलनेनं सुरळीत आणि चांगला परतावा देणारी ठरते. सध्या शेअर बाजारात झालेली घसरण ही कोरोनाच्या चिंतेनं झाली आहे. नजीकच्या काळात यात नक्कीच सुधारणा होईल, त्यामुळे शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या मार्गानं गुंतवणूक करण्यासाठी ही निश्‍चितच चांगली वेळ आहे.

५) अनुभवी गुंतवणूक सल्लागाराची मदत :
आताच्या परिस्थितीत अनुभवी सल्लागाराकडून सल्ला घेणं आवश्‍यक आहे. गुंतवणूक सल्लागार हा त्रयस्थ भूमिकेतून तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल योग्य तो सल्ला देऊ शकतो. फक्त गुंतवणूकयोजना विकणाऱ्याला आणि बॅंकेकडून येणाऱ्या फोनला प्रतिसाद देऊन तोच आपला योग्य गुंतवणूक सल्ला समजण्याची चूक करू नका.

या गोष्टी लक्षात ठेवा
गुंतवणूक करताना पुढे नमूद केलेल्या बाबींची काळजी घेतल्यास गुंतवणूक फायदेशीर तर ठरेलच; पण नुकसानीची शक्‍यताही टळेल :
- सध्या शेअर बाजारात घसरण झालेली आहे. ज्यांनी गेल्या गेल्या चार-पाच वर्षांत शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे, त्यांच्या गुंतवणुकीच्या मूल्यात कमीत कमी तीस ते चाळीस टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट आली आहे. मात्र, ही घट प्रत्यक्ष स्वरूपातली नसून, आभासी स्वरूपातली आहे. घाबरून जाऊन तुम्ही खरोखरच शेअरविक्री केली, तर त्याचा प्रत्यक्ष स्वरूपात फटका बसू शकतो. दुसरीकडे आहे त्या परिस्थितीत शेअरविक्री करून भांडवल वसूल करण्यावर आणि शेअर बाजार आणखी खाली आल्यावर गुंतवणूक करण्याचे सल्ले देणारे तुम्हाला अनेकजण भेटतील. मात्र, आपण सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे, कोणीही शेअर बाजाराची खालची पातळी किंवा वरची पातळी सांगू शकत नाही. त्यामुळे या स्थितीत गुंतवणूक काढून न घेता ती कायम ठेवणं अधिक गरजेचं आहे.
- म्युच्युअल फंडातली एसआयपी सुरू ठेवा. सध्याच्या परिस्थितीतून जास्तीतजास्त फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूक सुरू ठेवण्याची गरज आहे. आपत्कालीन निधीची तरतूद करून तुमच्याकडे अतिरिक्त निधी असेल तर ‘एसआयपी’ची रक्कम वाढवा.
- बाजारातली घसरण ही संधी असते. अशी संधी पुनःपुन्हा येत नाही. त्यामुळे मूलभूत गोष्टींसाठी गुंतवणूक करून झाली असेल (पुरेसे विमा संरक्षण, आपत्कालीन निधी) आणि तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम शिल्लक असेल, तर इक्विटीमध्ये टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करायला हवी. ‘एसआयपी’ची रक्कम वाढवणं हा सर्वांत सोपा आणि उत्तम पर्याय आहे.
- सद्यःस्थितीत इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर्समधील गुंतवणूक अविचारीपणे काढू नका.
- सध्याचा काळ हा तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचं संतुलन करण्यासाठी योग्य काळ आहे.
- अतिआत्मविश्वास बाळगू नका. एकरकमी पैसे गुंतवू नका. सध्याची परिस्थिती कधी आटोक्‍यात येईल, याची कोणालाच खात्री नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत राहा. संयम ठेवा.
- मोठी खरेदी टाळा. रोख पैसे स्वत:कडे राखून ठेवा. उसने किंवा नवे कर्ज घेऊ नका.
- शक्‍य असेल तर ‘ईएमआय’ भरत राहा, जेणेकरून एकदम ‘ईएमआय ’ भरण्याची आणि थकवलेल्या ‘ईएमआय’वर अतिरिक्त व्याज भरण्याची वेळ येणार नाही.
- तुलनेनं कमी व्याजदर असलेली गृहकर्जासारखी कर्जं एकदम फेडून टाकू नका.
- क्रेडिट कार्डावर कर्जं काढू नका. कारण त्यात डिफॉल्ट झाल्यास या कंपन्या इतर शुल्कासहित मोठा दंड आकारू शकतात.
- शेवटचं, परंतु सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करा. शारीरिक, मानसिकदृष्ट्या सदृढ राहण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. नोकरी, व्यवसायात टिकून राहण्यासाठी नवी कौशल्यं आत्मसात करा.

(लेखिका प्रमाणित गुंतवणूक सल्लागार आहे.)