मिले बेसूर मेरा तुम्हारा…? (रवि आमले)

रवि आमले ravi.amale@esakal.com
Sunday, 18 October 2020

समाजातील सज्जनशक्ती मौनात गेली, की अतिरेकी प्रवृत्तींचे बेसूर टिपेला पोचतात. मग प्रेमासारख्या उदात्त भावनेलाही गैरहेतू चिकटविले जातात. लोकांच्या मनात भयाचं, द्वेषाचं रोपण करणं सुरू होतं. समाजाचं तालिबानीकरण करण्याच्या प्रयत्नांचाच तो एक भाग. एक साधी जाहिरात आक्षेपार्ह ठरविली जाते ते त्यातूनच…

समाजातील सज्जनशक्ती मौनात गेली, की अतिरेकी प्रवृत्तींचे बेसूर टिपेला पोचतात. मग प्रेमासारख्या उदात्त भावनेलाही गैरहेतू चिकटविले जातात. लोकांच्या मनात भयाचं, द्वेषाचं रोपण करणं सुरू होतं. समाजाचं तालिबानीकरण करण्याच्या प्रयत्नांचाच तो एक भाग. एक साधी जाहिरात आक्षेपार्ह ठरविली जाते ते त्यातूनच…

जाहिराती आपल्यातलं ग्राहकत्व जागवतात. जाहिराती आकांक्षांना पंख देतात. प्रत्येकाच्या मनात त्याचं त्याचं आभाळ असतं. जाहिराती ते कवेत घेण्याची आस जागवतात. जाहिराती छान मनोरंजन करतात. पूर्वी दूरदर्शनच्या एकल वाहिनी काळात मूळ कार्यक्रमांपेक्षा मध्ये-मध्ये येणाऱ्या जाहिरातीच गोड वाटायच्या. आज त्या साऱ्या जुन्या जाहिराती आपल्या स्मरणरंजनात ‘अॅड’ झाल्या आहेत. त्यातलीच एक जाहिरात होती - मिले सूर मेरा तुम्हारा. जाहिरातगुरू पीयूष पांडे यांचं ते गीत. अशोक पत्की यांचं संगीत. तिची संकल्पना होती जयदीप समर्थ यांची. नूतन आणि तनुजा यांचे ते बंधू. तेव्हा एका जाहिरात कंपनीचे क्रिएटिव्ह हेड होते ते. १९८८च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान राजीव गांधी यांचं भाषण संपलं आणि दूरदर्शनच्या पडद्यावर ती झळकली. ३२ वर्षं झाली तिला, पण आजही ती अनेकांच्या स्मृतींत ताजी आहे… पण स्मृतींतच. मधल्या काळात कधी तरी तिचं निधन झालं, ते समजलंच नाही अनेकांना. परवा तनिष्क या आभूषणांच्या कंपनीला त्यांची एक जाहिरात मागं घ्यावी लागली, तेव्हा जाणवलं, की ‘मिले सूर मेरा तुम्हारा’मधले सूर केव्हाच कालवश झाले आहेत. सारंच बेसूर झालं आहे.
एक जाहिरात मागं घेतली जाणं, ही म्हटलं तर साधीच गोष्ट. सरसरून प्रतिक्रिया द्यावी अशा अनेक गोष्टी अवतीभोवती घडत असताना एका जाहिरातीबद्दल एवढं हळवं होण्याची काही गरज नाही. पण किंचित विचार करता लक्षात येतं, की ते केवळ जाहिरातीचं मागं घेणं नाही. ते समाजाचं मागं जाणं आहे. या मागं जाण्याला अंत नसतो. तेव्हा हे जे चाललं आहे, ते वेळीच समजून घेणं आवश्यक ठरतं. मात्र, त्याकरिता आपले सारे वैचारिक आणि पक्षीय चष्मे बाजूला ठेवावे लागतील. या चष्म्यांमुळं दृष्टी एकारते, माणूस रंगांधळा होतो.

अशा गढूळलेल्या नजरांनाच ती तनिष्कची जाहिरात आक्षेपार्ह वाटत आहे. मुस्लिम सासू मोठ्या प्रेमानं आपल्या हिंदू सुनेचं डोहाळे-जेवण घालते अशी ती जाहिरात. धार्मिक एकतेचा, पारंपरिक सहिष्णुतेचा गौरव करणारी. पण काही मूठभरांचं म्हणणं असं, की तिच्यातून लव्ह जिहाद म्हणजे प्रेमाच्या धर्मयुद्धाचा प्रचार होतो. आता मोदी सरकारच्या गृहमंत्रालयानुसार असा कोणताही प्रकार आपल्या कायद्यांत नाही, तसं कुठंही काही घडलेलं नाही; पण काही अतिरेकी विचारबळींच्या मते लव्ह जिहाद असतोच. ही मोठी विकृत संकल्पना आहे. दोन समुदायांतील, धर्मांतील, जातींतील भयभावनेचा, एकमेकांवर सत्ता गाजविण्याच्या प्रवृत्तीचा एक आविष्कार म्हणजे लव्ह जिहाद. त्यात आणखी एक भावना असते. ती म्हणजे, स्त्रीवरील मालकी हक्काची, तिला वस्तू समजण्याची. आपल्या समुदायातील आपली मालमत्ता असलेली स्त्री दुसऱ्या समुदायात जाते. कधी बळजबरीनं, तर कधी प्रेमाचं वा विवाहाचं आमिष दाखवून ते आपली स्त्री लाटतात. आपला वंश खराब करतात. त्यांची लोकसंख्या वाढवतात. लव्ह जिहादच्या आशयात या सगळ्या भयगोष्टी येत असतात. ते म्हणजे वाईट, क्रूर, पापी, चिरडून टाकण्याच्या लायकीचे असं इतरांचं राक्षसीकरण, अ-मानवीकरण हे पुन्हा त्यात अध्याहृत असतंच. या संकल्पनेला पद्धतशीर केलं हिटलरनं.

हिटलरच्या ‘माईन काम्फ’मध्ये ‘रेस अँड पीपल’ नावाचं प्रकरण आहे. ज्यू लोकांनी जर्मनांचा वंशविच्छेद करण्याचं कारस्थान रचलं आहे. त्यातलेच काही ज्यू राष्ट्रीयतेचा उद्‌घोष करीत आहेत. त्याकरिता ते काय करतात याचं वर्णन करताना या प्रकरणात हिटलर सांगतो, की ‘हे काळ्या केसांचे ज्यू तरुण साध्याभोळ्या जर्मन मुलींवर तासन् तास नजर ठेवून बसलेले असतात. सैतानासारखं निरखत असतात त्यांना. त्यांच्यावर पाळत ठेवतात.’ कशासाठी, तर ‘त्यांना आपल्या आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं रक्त नासवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या माणसांच्या काळजापासून तोडण्यासाठी…’ या अशा लोकांपासून आपला वंश आणि राष्ट्र वाचवायचं असेल, तर पहिल्यांदा त्यांचं, म्हणजे ज्यूंचं शिरकाण केलं पाहिजे, असं हिटलर सांगत होता. जर्मनांना वंशश्रेष्ठत्वाची अफू चारून बधिर करीत होता. हा आहे लव्ह जिहादचा अर्थ. पण तो मुळातच चुकीचा आहे. अन्य जाती, धर्म, समुदाय यांच्याबद्दल द्वेषाची, भीतीची, संतापाची भावना निर्माण करून आपलं सत्ताकारण रेटण्यात ज्यांना रस असतो, अशा अतिरेकी मंडळींनी रचलेलं हे कुभांड असतं. पुरुषप्रधान समाजात बाईबद्दल मालकी हक्काची, योनिशुचितेची, पावित्र्याची भावना तुडुंब असते. ‘आपली’ बाई ‘त्यांनी' पळवली असं म्हटलं की माणसं घेणं-देणं नसलं तरी पेटतात. याचाच फायदा ही मंडळी उठवतात आणि अशा संकल्पनांना पाठिंबा मिळवतात. या संकल्पनेत देश आणि कालपरत्वे समुदायांची नावं तेवढी बदलतात. प्रश्न असा आहे, की हे आपल्या मनातील ‘मिले सूर मेरा तुम्हारा’च्या चालीत बसतं का?

आता असा सवाल आला, की मग ‘व्हिक्टिम कार्ड’ पुढं येतं. अशा जाहिरातींत नेहमी हिंदू मुलीच का दाखवता? मुस्लिम तरुणी लग्न करून हिंदू घरात आली असं का नाही दाखवत? आणि आपल्याला हा सवाल रास्तच वाटतो. अशा वेळी त्यांना असं वाटत नाही, की उलट यात आपल्या संतप्रणीत सहिष्णुतेचा गौरवच आहे. त्यांना हेही आठवत नाही, की दोनच वर्षांपूर्वी ‘क्लोज अप’च्या ‘फ्री टू लव्ह’ या मोहिमेंतर्गत एक अगदी तशीच जाहिरात दाखविण्यात आली होती. ‘युनिलिव्हर’नं या मोहिमेविषयीची श्वेतपत्रिका तेव्हा प्रसिद्ध केली होती. मोहिमेपूर्वी त्यांनी ब्राझील, फिलिपिन्स आणि भारतात सर्वेक्षण केलं होतं. त्यातून दिसलं, की या देशांतील दहा पैकी नऊ तरुण-तरुणींना असं जग हवं आहे, की जिथं आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर राहण्याचं स्वातंत्र्य असेल. हा विचार त्या जाहिरातीमागं होता. पण मग कुणालाही कुणावरही प्रेम करण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर मग द्वेषाचं काय होणार? त्या जाहिरातीविरोधातही तेव्हा गदारोळ झाला, ती मागं घ्यावी लागली. तेव्हा मुळात मुद्दा असं वा तसं दाखविण्याचा नसतोच. मुद्दा असतो भयाचं मायाजाल भंगता कामा नये हा. त्यासाठीचं आजचं निमित्त होतं तनिष्कच्या जाहिरातीचं, एवढंच.

या जाहिरातीविरोधात समाजमाध्यमांतून टीका करण्यात आली. त्या आभूषणांच्या ब्रँडवर बहिष्काराच्या धमक्या देण्यात आल्या. बाजारप्रणीत व्यवस्थेत आर्थिक नुकसानीची शक्यता सहसा शरणागतीच्या मार्गावर नेते. तेच इथं घडलं. हे समाजातील एकोपा नाहीसा करू पाहणाऱ्या शक्तींचं प्राबल्य वाढल्याचं दुश्चिन्ह आहे. या शक्ती सगळ्याच धर्मांत आहेत. अतिरेकी विचार ही काही कोण्या एका धर्माची वा जातीची मिरासदारी नाही. बाईवरील मालकी हक्काचा प्रश्न येतो, तेव्हा तर साऱ्यांचेच दृष्टिकोन समान असतात. तिहेरी तलाकच्या वादात ते दिसलंच. विशेष म्हणजे, त्या वेळीही काही लोक असं म्हणत होते, की पाहा, ‘ते’ किती कडवे असतात ते. थोडक्यात काय, तर ‘आपण’ही ‘त्यांच्या’सारखंच बनलं पाहिजे.

ही तालिबानी बनण्याची स्पर्धा सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. पण क्रांती जशी आपलीच मुलं खाते, त्याप्रमाणेच तालिबानी प्रवृत्तीही अखेर आपल्याच धर्मबांधवांकडं वळते. कवी राहत इंदौरी यांनी तसा इशारा मागंच दिला होता, की एकदा आग लागली की अनेक घरं त्यात येतील. ‘यहां पे सिर्फ हमारा मकान थोडी है.’ आपल्या सगळ्यांचीच घरं त्या आगीच्या ज्वालांत येतील. आपल्या मुला-मुलींनी कोणावर प्रेम करायचं, कोणती वसनं घालायची, काय शिकायचं आणि कसं वागायचं, हे गल्लीतल्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आपल्याला चालेल असं काही वाटत नाही; पण तालिबानींची सत्ता अफगाणिस्तानात आली तेव्हा तसंच घडलं होतं. ते अन्यत्र घडणार नाही असं नाही. यापासून राष्ट्राला, समाजाला आणि आपल्या घराला दूर ठेवायचं असेल, तर सज्जनशक्तीला बळ द्यावं लागेल. आपल्याला बोलावं लागेल. गप्प राहणं म्हणजे अतिरेकी प्रवृत्तींच्या - मग ती हिंदूंतील असो वा मुस्लिमांतील - कृतीला ‘सँक्शन’ देणं, त्यांच्या बेसूर गाण्याला साथ देणं…. अखेर ' मिले बेसूर तुम्हारा हमारा’ ही तर काही आपली परंपरा नाही. ती आहे ‘प्रेम संवादा’ची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang ravi amale write entertainment advertising article