कलंदर स्वप्ननायक (दिलीप ठाकूर)

dilip thakur
dilip thakur

ऋषी कपूर यांनी रोमॅटिसिझमला एक नवा आयाम चित्रपटसृष्टीला दिला आणि त्याच वेळी अभिनयाचेही वेगवेगळे र्कीतिमान तयार केले. कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात चरित्र भूमिकांचीही नस सापडलेल्या या गुणी, प्रतिभावंत कलाकारानं धक्कादायक एक्‍झिट घेतली. त्याच्या कारकिर्दीवर हा झोत.

"कर्ज' या चित्रपटातल्या "दर्दे दिल दर्दे जिगर.... ' या गाण्याचं पहिल्या दिवसाचं शूटिंग संपलं तेव्हाचा किस्सा. संध्याकाळी पॅकअप झाल्यावर ऋषी कपूरनं दिग्दर्शक सुभाष घईला सांगितलं, की या गाण्याच्या शूटिंगसाठी एका नृत्यदिग्दर्शकाचे आयोजन कर. म्हणजे मलाही गाणं नीट साकारता येईल. यावर सुभाष घईनं त्याला सांगितलं ः ""आपण हे गाणं आपल्या पद्धतीनं चित्रीत करू, आणि त्याचा रिझल्ट नीट आला नाही, तर पुन्हा नव्यानं शूटिंग करू.'' ऋषी कपूरनं हे ऐकलं. पाच-सहा दिवसांत या गाण्याचं शूटिंग झालं आणि मग या गाण्याचं एडिटिंग करून ऋषी कपूरला ते दाखवण्यात आलं असता, तो सुभाष घईंच्या टेकिंगनं इम्प्रेस झाला आणि हे गाणं त्यानं तसंच ठेवायला सांगितलं....

..."राम लखन'च्या लोणावळा इथल्या शूटिंग कव्हरेजसाठी मुंबईतल्या आम्हा काही सिनेपत्रकारांना शूटिंगचा आंखो देखा हाल कव्हर करण्यास नेलं असता खुद्द सुभाष घईनंच ही गोष्ट सांगितली.
ऋषी कपूरच्या धक्कादायक निधनाचं वृत्त ऐकताच अशा अनेक गोष्टी आठवल्या. या आठवणीत एक वेगळी गोष्टही आहे. ऋषी कपूर आपल्या गाण्याच्या रुपेरी पडद्यावरच्या सादरीकरणात विशेष रस घ्यायचा. आता ही गोष्ट कपूर खानदानाची यशस्वी परंपराच तर आहे. राज, शम्मी आणि शशी या कपूरबंधूंची खणखणीत कारकीर्द अशाच लोकप्रिय गीत-संगीत यांनी बहरलीय. पारंपरिक लोकप्रिय मनोरंजन मसालेदार चित्रपटाचं ते सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. राज कपूर तर ऋषी अर्थात चिंटू कपूरचा पिता. अभिनयाच्या गुणांसह निर्माता, दिग्दर्शक, संकलक, संगीतशौकिन आणि स्टुडिओमालक अशा अनेक भूमिका एकाच व्यक्तिमत्त्वात असलेला अष्टपैलू "शोमन'. त्याच्याच महाचर्चित "मेरा नाम जोकर'मध्ये शालेय वयातला राज कपूर साकारत ऋषी कपूरच्या रुपेरी पडद्यावरच्या वाटचालीला सुरुवात झाली. बरं ही व्यक्तिरेखा आपल्या शिक्षिकेकडे (सिमी गरेवाल) आकर्षित झालेल्या विद्यार्थ्यांची! ऋषी कपूरमधला रोमॅंटिक नायक खरं तर तिथंच रुजला आणि मग आपल्या पित्याच्याच दिग्दर्शनातल्या "बॉबी'मध्ये तो जास्त कलरफुल झाला. अर्थात भाव खाऊन गेली डिंपल कपाडिया! तीच तर "बॉबी' होती ना? मुंबईतील मेट्रो थिएटरमध्ये चित्रपटाचा प्रीमियर रंगला तेव्हा डिंपल सौ. राजेश खन्ना झाली होती आणि ऋषी कपूरची पुढची वाटचाल सुरू झाली होती.

ऋषी कपूर रुपेरी पडद्यावर आला, तेव्हा राजेश खन्नाची क्रेझ ओसरत होती आणि अमिताभ बच्चनच्या ऍन्ग्री यंग मॅनची लाट उसळली होती. नेमकं सांगायचं, तर प्रकाश मेहरा दिग्दर्शित "जंजीर'च्या खणखणीत यशानं त्याची चुणूक दाखवली. मग यश चोप्रा दिग्दर्शित "दिवार' आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले' या चित्रपटांनी हिंदी चित्रपटाला वेगळ्या वळणावर नेलं. सूडनायक अथवा ऍक्‍शन हिरो आणि मल्टिस्टारकास्ट चित्रपट यांचं युग संचारलं. ऋषी कपूरची पर्सनॅलिटी चॉकलेटी हिरोची; पण तो मल्टिस्टारकास्ट चित्रपटात भूमिका साकारू शकत होता. अमिताभ बच्चननं त्याला तसा सल्ला दिल्याचं तेव्हा खूप चर्चेत राहिलं. ऋषी कपूरचे काका शशी कपूर यांनीही नेमक्‍या त्याच वेळी मल्टिस्टारकास्ट चित्रपटात भूमिका साकारत आपलं करिअर विस्तारलं. यश चोप्रा दिग्दर्शित "कभी कभी', मनमोहन देसाई दिग्दर्शित "अमर अकबर ऍन्थनी' या चित्रपटांच्या खणखणीत यशामुळे ऋषी कपूरला व्यावसायिक स्थिरता आली. मोठा भाऊ रणधीर कपूरला नेमकं तेच सातत्य ठेवता आलं नाही. कालांतरानं धाकटा भाऊ राजीव कपूरही लवकरच अपयशी ठरला; पण ऋषी कपूर दिग्दर्शक, नायिका आणि प्रेक्षक यांच्या पिढ्या ओलांडूनही आपली वाटचाल कायम ठेवण्यात यशस्वी ठरला. राज खोसला (दो प्रेमी) ते राजकुमार संतोषी (दामिनी), रवी टंडन (खेल खेल मे), हरमेश मल्होत्रा (नगिना), रमेश सिप्पी (सागर) ते राज कंवर (दिवाना) अशा अनेक शैलींच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यानं भूमिका साकारत आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली. अगदी शफी इनामदार दिग्दर्शित "हम दोनो'मध्ये नाना पाटेकरसमोर उभा ठाकला. आपले काका शशी कपूर यांच्या दिग्दर्शनातल्या "अजूबा' या फॅन्टसी चित्रपटात भूमिका साकारली. हे सगळं होत असताना सतत नवतारका आपल्या चित्रपटाची नायिका असावी याचंही त्यानं भान ठेवलं. एकेकाळी त्याचे काका शम्मी कपूर यांचं तेच वैशिष्ट्य होतं. डिंपल कपाडिया (बॉबी), शोमा आनंद (बारुद), सोनम (विजय), विनिता (जनम जनम), झेबा बख्तियार (हिना) ही काही उदाहरणं देता येतील. पुढील पिढीतल्या नायिकांसोबत भूमिका साकारत त्यानं स्वतःला तरुणही ठेवलं. मनीषा कोईराला (अनमोल), दिव्या भारती (दिवाना), जुही चावला (बोल राधा बोल) ही काही उदाहरणं. "खेल खेल मे'च्या वेळी दिग्दर्शक रवी टंडन यांची अगदी लहान असलेली मुलगी रविना वयात आल्यावर "साजन की बाहो मे'मध्ये त्याचीच नायिका झाली. पद्मिनी कोल्हापुरे (प्रेम रोग), परवीन बाबी (रंगिला रतन), रेखा (आझाद देश के गुलाम), वर्षा उसगावकर (हनिमून), अश्विनी भावे (हिना), ऊर्मिला मातोंडकर (श्रीमान आशिक) अशा अनेक अभिनेत्रींचा तो नायक झाला. पित्याच्या दिग्दर्शनात "बॉबी', "प्रेमरोग' अशा दोन, तर मोठा भाऊ रणधीर कपूर दिग्दर्शित "हिना' या चित्रपटांबरोबरच त्यानं धाकटा भाऊ राजीव कपूरच्या दिग्दर्शनातल्या "प्रेमग्रंथ' (माधुरी दीक्षित) या चित्रपटातही भूमिका साकारलीय. मग तो स्वतःही दिग्दर्शक झाला आणि "आ अब लौट चले'चंही (राजेश खन्ना, अक्षय खन्ना, ऐश्वर्या राय) दिग्दर्शन त्यानं केलं. मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना हा चित्रपट मिनर्व्हा थिएटरमध्ये पब्लिकसोबतच दाखवण्यात आला असता आपल्या पुतण्याच्या चित्रपटाला कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतोय, हे पाहायला खुद्द शशी कपूर आल्याचं आठवतंय. ऋषी कपूरनं दिग्दर्शित केलेला हा एकमेव चित्रपट होय आणि आर. के. फिल्मचाही हा शेवटचा चित्रपट ठरला.

ऋषी कपूरच्या अनेक वैशिष्ट्यांतली काही सांगायला हवीतच. त्याच्या नीतूसिंगसोबतच्या लग्नाच्या वेळी आशीर्वाद द्यायला सुनील दत्त आणि नर्गिसजी आल्या होत्या. नर्गिसजी राज कपूर यांच्या हुकमी नायिका आणि आर. के. स्टुडिओत त्यांना विशेष स्थान होतं; पण सुनील दत्तसोबत लग्न केल्यावर त्यांनी अभिनयसंन्यास घेतला. मात्र, त्या या लग्नाला आल्याचं छायाचित्र त्यावेळी विशेष लक्षवेधक ठरलं. विजय कोंडके दिग्दर्शित "माहेरची साडी' या सुपरहिट चित्रपटाचा हिंदीत "साजन का घर' या नावानं रिमेक आला, त्यात ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

ऋषी कपूर मैत्रीला जागणारा. जितेंद्र, राकेश रोशन आणि ऋषी कपूर यांच्या दोस्तीचे अनेक किस्से आहेत. राकेश रोशन निर्मित "आपके दिवाने' या चित्रपटात ऋषी कपूर पाहुणा कलाकार आहे. हे तिघं अनेकदा तरी शनिवार रविवारी जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र येऊन एन्जॉय करीत. अर्थात आता ती गोष्ट थांबलीय.....

राज कपूरनं सन 1948मध्ये चेंबूर इथं उभारलेला आर. के. स्टुडिओ कालांतरानं चालवणं अवघड होतं. एकदा तर त्याच्या एका बाजूला आगही लागली. त्यानंतर तिथं काही रिऍलिटी शोंचं शूटिंग होई; पण एवढ्या मोठ्या स्टुडिओचा मेन्टेनन्स अवघड गोष्ट होती. अखेर एके दिवशी ऋषी कपूरनं म्हटलं ः "जड अंतःकरणानं आम्ही कपूर कुटुंबीयांनी निर्णय घेतला, की आर. के. स्टुडिओची विक्री करायची..'

आज आर. के. स्टुडिओचं फक्त गेट त्या स्टुडिओची ओळख देतंय; पण संपूर्ण स्टुडिओ पाडलाय. तिथून जाताना यापुढे राज कपूरप्रमाणंच ऋषी कपूरचीही आठवण येईलच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com