
आपण परंपरेचं पालन करतो; परंतु आता त्यात नवता डोकावत आहे. नवतेलाही परंपरा चिकटली नाही तर ती उठून दिसणार नाही. अर्थात नवीन म्हणून केलेली गोष्ट आधी मांडली गेली आहे आहे का याचाही अभ्यास हवाच...
संगीतात कधीही मूल्यात्मक बदल होत नसतात. आपण परंपरेचं पालन करतो; परंतु आता त्यात नवता डोकावत आहे. नवतेलाही परंपरा चिकटली नाही तर ती उठून दिसणार नाही. अर्थात नवीन म्हणून केलेली गोष्ट आधी मांडली गेली आहे आहे का याचाही अभ्यास हवाच...
संगीतक्षेत्रात नवनिर्मिती का होते, कशी होते व तिचा जनमानसाकडून स्वीकार कसा होतो याचा ढोबळ आढावा गेल्या लेखात घेतला. काळानुरूप जसे प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतात तसे ते संगीतक्षेत्रातही कायम होत आले आहेत. आज पारंपरिक चौकटीत राहूनही नव्या रागांची निर्मिती होत आहे, नवीन बंदिशी बांधल्या जात आहेत, त्यांत वेगळा स्वरविचार, लयांग आणि वेगवेगळे काव्यविषय दिसतात. मात्र, ही नवनिर्मिती मोठ्या प्रमाणात श्रोत्यांपुढं मांडण्याची संधी मिळतेच असं नाही. श्रोत्यांना काय आवडेल, काय पसंत पडेल, काय सादर केल्यानं दाद मिळेल हे ध्यानात ठेवून मैफलीची रूपरेषा ठरते. या कारणामुळं नवनिर्मिती फार लोकांपर्यंत पोचत नाही. हे नवोन्मेष मांडण्यासाठी योग्य अशी व्यासपीठं उपलब्ध नाहीत. शिवाय, बरेचसे कलाकारही नवनिर्मितीवर कष्ट घेऊन ती श्रोत्यांपुढं मांडण्यापेक्षा पूर्वसुरींची नक्कल करून चटकन प्रसिद्धी मिळवण्याची धडपड करताना दिसतात. बरेचसे ज्येष्ठ कलाकारही आपला तोच तो ‘हमखास यशस्वी’ फॉर्म्युला उगाळून टाळ्या मिळवण्यात गुंतलेले दिसतात. अशा परिस्थितीत नव्याचं स्वागत होऊन ते रुजणार कसं? आज रसिकांच्या मनात मुरलेलं संगीत एकेकाळी नवीन होतं. त्याचं स्वागत झालं, कौतुक झालं म्हणूनच आज ते रुजलं आहे. त्याला ‘पारंपरिक’ म्हणून मानाचं स्थान आहे. याशिवाय, तेच तेच ऐकून श्रोत्यांची अभिरुची वाढणार कशी? मैफलीत नवीन काही तरी ऐकवणं ही जबाबदारी जशी कलाकाराची आहे तसंच नवीन काही तरी ऐकून घ्यायची जबाबदारी श्रोत्यांचीदेखील आहे. कालिदासानं १५०० वर्षांपूर्वी श्लोकात लिहून ठेवलं आहे : ‘‘जे जुनं आहे ते सदासर्वकाळ चांगलंच आहे; पण त्यात नवीन काही असू नये ही कल्पनाच मुळात चुकीची आहे.’’
आधुनिक विज्ञानामुळं जग जवळ आलं आहे. कला-संस्कृती, आचार-विचार यांची देवाण-घेवाण सहजसुलभ झाली आहे. संगीतक्षेत्रही याला अपवाद राहिलं नाही. नवीन पिढी पाश्चात्य संगीताच्या प्रभावात असूनही कित्येक तरुण कलाकार रागसंगीताच्या क्षेत्राकडं वळत आहेत. गेल्या शतकातल्या कलाकारांपेक्षा वेगळा श्रवणसंस्कार तरुण पिढीवर झालेला आहे. मग हे नव्या पिढीतले कलाकार पाश्चिमात्य संगीताच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक चौकटीच्या पलीकडं जाण्याचा प्रयत्न करतील किंवा पारंपरिक संगीताकडं एका वेगळ्या दृष्टीनं बघतील तर नवल काय! जुनेच राग, बंदिशी आणि शैली त्यांनी अनुसरली तरी त्यांचा घाट, आशय आणि प्रस्तुतीतली ऊर्जा नवी असेल. पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते : ‘‘संगीताचं जग सात स्वरांनी तयार होतं...जोपर्यंत आठवा स्वर निर्माण होत नाही तोवर नवीन असं काहीच घडू शकत नाही. म्हणूनच पूर्वीच्या लोकांनी जे करून ठेवलं आहे त्याचीच आजच्या संदर्भात नव्यानं मांडणी करणं एवढंच आपल्या हातात असतं.’’
आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘फ्यूजन’सारख्या माध्यमातून कलाकार नवीन संगीतप्रकार, नवीन वाद्यं, नवीन सादरीकरणपद्धती चोखाळत आहेत. ‘फ्यूजन म्हणजे गोंधळ, नुसत्या ऱ्हिदमचा अतिरेक किंवा कलाकृतीचा खालावलेला दर्जा’ असा पूर्वग्रह मनात ठेवून कुठलीही कलाकृती ऐकल्यास ती पसंतीस उतरणं अवघडच असतं. फ्यूजनच्या कारणानं का असेना; पण नवीन पिढी जर रागसंगीताकडं आकृष्ट होत असेल तर त्यात गैर असं काहीच नाही. रागसंगीताच्या जोडीला पाश्चात्य संस्कृतीतली वाद्यं, संकल्पना यांचा मेळ घालून नवीन संगीत निर्मिलं जात आहे. ते बदल चांगले आहेत का? यशस्वी होतील का? यासाठी आधी ते ऐकणं गरजेचं आहे. हे प्रयोग आज नवे आहेत, त्यात पक्केपणा, अनुभवसिद्धता नाही हे खरं; पण जर प्रयत्न प्रामाणिक असेल तर त्याला जुन्या कलाकारांनीही स्वच्छ मनानं सामोरं जायला हवं, केवळ नाकं मुरडून चालणार नाही. तरुण कलाकारांनी केलेले प्रयत्न हे बुजुर्ग कलाकारांच्या पाठबळानं झाले तर त्यातून नवीन; पण दर्जेदार निर्मिती होऊ शकते हेही ध्यानात ठेवायला हवं. कुठलीही नवीन गोष्ट पुनरावृत्तीनं, सवयीनं आवडत जाते. ती तेवढ्या वेळा आधी अनुभवायला तर हवी. शब्द आणि चाल नसलेली गाणीसुद्धा कानावर पडून आवडूही लागतात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नव्या युगाची नांदी गाणारी ही नवता म्हणजे एखादी बेलगाम किंवा स्वैर प्रतिभा नसते. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा अनाठायी हट्टही नसतो. तसा आभास क्वचित प्रसंगी निर्माण होऊ शकतो; परंतु ती असते अंत:प्रेरणा. मानवाच्या स्वभावाप्रमाणे त्याच्या प्रवृत्तीतून नावीन्याच्या तहानेपोटी नवनिर्मिती होत असते. ती शतकानुशतकं सुरूच आहे व मनुष्य पृथ्वीतलावर असेपर्यंत ती अखंडपणे सुरूच राहील. संगीतात कधीही मूल्यात्मक बदल होत नसतात. आपण परंपरेचं पालन करतो; परंतु आता त्यात नवता डोकावत आहे. नवतेलाही परंपरा चिकटली नाही तर ती उठून दिसणार नाही. अर्थात नवीन म्हणून केलेली गोष्ट आधी मांडली गेली आहे आहे का याचाही अभ्यास हवाच. विख्यात संगीतज्ञ डॉ. अशोक दा. रानडे यांचं विधान आवर्जून विचार करण्यासारखं आहे, ते म्हणत असत : ‘‘भारतीय संगीतपरंपरा इतकी व्यापक, बहुरंगी आणि समृद्ध आहे की कुणी ‘मी अमुक एक गोष्ट नवी केली’ असं म्हणणंदेखील धाडसाचं ठरेल...ती गोष्ट तुमच्या आधी कुणीतरी केलेली असेल आणि कदाचित अधिक चांगल्या रीतीनं केलेली असू शकेल. नवं काही करायचं असेल तर त्यासाठी आधी परंपरेचा अभ्यास नीटच करायला हवा!’’
नवीन काहीही करण्यासाठी कलाकारात सृजनशीलता असावी लागते. तीविषयी पुढच्या लेखात...