डोळ्यांदेखत जन्मलेला कटकारस्थान सिद्धांत (सम्राट फडणीस)

सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com
Sunday, 25 October 2020

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज नवी कलाटणी मिळत आहे. कलाकाराचा मृत्यू, मृत्यूला खुनाचा संशय चिकटवणं, खुनाला राजकारणाशी जोडणं, राजकारणातून महाराष्ट्रातल्या सत्तेला लक्ष्य करणं, लक्ष्य करण्यासाठी कलाकारांची आणि मीडियाची 'मदत' घेणं हे अभूतपूर्व रसायन कमालीच्या वेगानं जुळवून आणलं जात आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज नवी कलाटणी मिळत आहे. कलाकाराचा मृत्यू, मृत्यूला खुनाचा संशय चिकटवणं, खुनाला राजकारणाशी जोडणं, राजकारणातून महाराष्ट्रातल्या सत्तेला लक्ष्य करणं, लक्ष्य करण्यासाठी कलाकारांची आणि मीडियाची 'मदत' घेणं हे अभूतपूर्व रसायन कमालीच्या वेगानं जुळवून आणलं जात आहे. हा प्रयोग भविष्यातल्या नव्या प्रयोगांची नांदी ठरणारा; म्हणूनच स्वतंत्रपणे नोंद घेण्यासारखा. अशा प्रयोगांतून जन्माला घातलेल्या कटकारस्थान सिद्धांतांचा फायदा कोणाला आणि तोटा कुणाच्या पदरी, याचं भान नागरिक म्हणून आपल्याला असावं लागेल; अन्यथा, मूक प्रेक्षक/सोशल मीडिया वापरकर्ता इतकीच आपली भूमिका संकुचित होईल.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण म्हणजे अपमाहिती (misinformation) आणि कटकारस्थान सिद्धांत (conspiracy theory) जन्माला घालण्याचा सूत्रबद्ध प्रयत्न दिसतो आहे. याच्या मुळाशी जाण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली; पण घोषणा अमलात येईलच, याची खात्री नाही. यापूर्वी मोबाईल फोन टॅपिंग प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची घोषणा त्यांनी जानेवारीत केली होती. इस्राईली कंपनीच्या साह्यानं महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सऍप टॅप/हॅक केल्याचा आरोप तेव्हा झाला होता. त्या प्रकरणाचं काय झालंय, कळायला मार्ग नाही. त्यामुळं, नवी घोषणा चमकदार असली, तरी प्रत्यक्षात येईलच, याबद्दल शंका वाटते.

वावटळीचा चेहरा : कंगना
सुशांतसिंह प्रकरणाच्या वावटळीचा चेहरा आहे कंगना राणावत. @KanganaTeam या ट्‌विटर हँडलवरून सारी 'मोहीम' चालवली जात आहे. ट्‌विटर हँडल आहे ऑक्‍टोबर २०१५ पासूनचं. आतापर्यंत १८ हजारांवर ट्‌विट्स या हँडलवरून केल्याची नोंद मिळते. सुशांतचा मृत्यू १४ जूनचा. या दिवशी दुपारी ३.४६ वाजता कंगना यांच्या नावे असलेलं ट्‌विट आहे : Sad and shocking beyond words.. such an incredible talent, gone too soon. Prayers and wishes to loved ones of #SushantSinghRajput Om Shanti. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १५ जूनला @KanganaTeam नं सुशांतच्या मृत्यूला वळण दिलं. ते वळण बॉलिवूड इंडस्ट्रीची उणीदुणी काढणारं. सुशांतच्या मृत्यूला इंडस्ट्री कारणीभूत असल्याचा आरोप कंगना यांनी व्हिडिओतून केला. त्या दिवशीचं ट्‌विट होतं : #KanganaRanaut exposes the propaganda by industry arnd #SushantSinghRajput's tragic death &how the narrative is spun to hide how their actions pushed #Sushant to the edge.Why it s imp to give talent their due &when celebs struggle with personal issues media to practice restraint

योगायोग की धूळफेक?
भारत-चीन सीमेवर १६ जूनला चकमक झाली. त्यात २० भारतीय जवान हुतात्मा झाले. याच दिवशी कंगना यांचा आदल्या दिवशीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. @KanganaTeam या हँडलवरून त्या आधी म्हणजे १० जून आणि १७ जूनला भारत-चीन स्टँडऑफबद्दलचं ट्‌विट आहे. १७ जूनला हुतात्मा जवानांना श्रद्धांजलीही आहे. मात्र, १५ जूनचा व्हिडिओ १६ जूनपासून व्हायरल व्हायला सुरुवात झाली. पाठोपाठ १९ जूनला कंगना यांचा सुशांतसिंह राजपूतबद्दलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला. वीस भारतीय जवानांचं विस्मरण व्हावं, इतकं वादळ सुशांतच्या मृत्यूवरून उठवायला सुरुवात झाली, ते आठवडाभर चाललं. २७ जूनला @KanganaTeam नं कंगना यांचा चीनवर टीका करणारा व्हिडिओ आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनच्या ५९ ऍप्सवर भारतानं बंदी घातली. १६ जून ते ३० जूनअखेर सोशल मीडियात चीनवरची चर्चा तत्काळ कमी होत गेली, असं गुगल सर्च कीवर्डस्‌ सांगतात. त्याउलट कंगना यांनी निर्माण केलेलं नेपोटिझमचं वारं सोशल मीडियात आणि मुख्य मीडियातही सुरू झालं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अवघ्या दुसऱ्यांदा भारत-चीन सीमेवर रक्त सांडलं गेलं होतं... आणि गुगलनं १ जुलैला सांगितलं, की भारतीयांनी जूनमध्ये गुगलवर सर्वाधिक शोध सुशांतसिंह राजपूतचा घेतला. गुगल दर महिन्याला असे अहवाल जाहीर करत असल्याची नोंद नाही. दर वर्षी गुगल त्या त्या वर्षातल्या सर्वाधिक सर्चबद्दल अहवाल प्रकाशित करतं. नेमका याच काळात अहवाल हा योगायोग समजावा की धूळफेक?

'विश्वासार्ह' ट्‌विट
महाराष्ट्रात जुलैमध्ये @KanganaTeam ट्‌विटर हँडलवरून रिया चक्रवर्ती, महेश भट, अलिया भट, दीपिका पदुकोण यांच्याविरोधात वातावरण पेटवलं गेलं. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मार्टफोनवरून अलिया भटला फॉलो केलं गेलंय, असं ट्‌विट अवघे ४१ फॉलोअर्स असलेल्या अभिषेक राजपूत नावाच्या व्यक्तीनं केलं आणि ते रिट्‌विट करतानाच कंगना यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. अभिषेक राजपूतचं ट्‌विटर हँडल जून २०२० मध्ये सुरू झाल्याची नोंद आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २८ जुलैपासून कंगना यांनी मुंबई पोलिसांवर आरोप सुरू केले. बरोबर त्याआधी दोन दिवस, २६ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत मीडियातून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचं सरकार पाडायचा प्रयत्न करूनच पाहा, असं आव्हान या मुलाखतीत उद्धव यांनी दिलं. २९ जुलैपासून कंगना यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी लावून धरायला सुरुवात केली. त्यासाठी अभिषेक राजपूत नावाच्या नवख्या अकाउंटनं केलेलं ट्‌विट कंगनानं प्रसिद्धीच्या वावटळीत सोडून दिलं. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालताहेत, असं सुशांतच्या कुटुंबाचं म्हणणं असल्याचं कंगना यांनी जाहीर केलं. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं सोशल मीडिया अकाउंट कोणीतरी भलतंच वापरतं आहे, त्याचा मोबाईल कुणातरी भलत्याच माणसाकडं आहे इतका गंभीर आरोप करणारी व्यक्ती किमान विश्वासनीय असली पाहिजे, हा साधा निकष न पाळण्याची कोणती घाई @KanganaTeam या हँडलवरून ट्‌विट करताना कंगना यांना झाली असावी? नेपोटिझम ते अमली पदार्थ इथूनच अर्णब गोस्वामी यांची एंट्री या साऱ्या प्रकरणामध्ये सुरू झाली. जून आणि जुलैमध्ये रिपब्लिक टीव्ही (इंग्रजी) आणि रिपब्लिक भारत (हिंदी) या वृत्तवाहिन्यांचा आशय प्रामुख्यानं भारत-चीन, उत्तर प्रदेशातलं विकाससिंह एन्काउंटर याभोवती होता. त्या आधी पालघरमध्ये जमावाकडून झालेल्या साधूंच्या हत्या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अर्णब यांनी ओढलं होतं. तो फंडा सुशांतसिंह प्रकरणातही वापरला गेला. रिपब्लिक टीव्ही इंग्रजीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. हिंदीमध्ये आज तक वृत्तवाहिनी पहिल्या क्रमांकावर होती. टीव्हीच्या प्रेक्षकसंख्येची आकडेवारी (टीआरपी) दर आठवड्याला घोषित होते. ३० व्या आठवड्यापर्यंत म्हणजे जुलैअखेरपर्यंत आज तक आणि टीव्ही ९ भारतवर्ष या वृत्तवाहिन्यांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा होती आणि इंडिया टीव्ही तिसऱ्या क्रमांकाची वृत्तवाहिनी होती. ऑगस्टमध्ये या साऱ्या प्रकरणाला कंगना राणावत यांनी अमली पदार्थांच्या व्यवहाराशी जोडलं. नेपोटिझमनं झालेली सुरुवात आता अमली पदार्थांच्या व्यवहारापाशी आली. हाच मुद्दा अर्णब यांनी लावून धरला.

रिया चक्रवर्तीचीच मागणी
तेरा ऑगस्टला @KanganaTeam या हँडलवरून सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी झाली. ते ट्‌विट होतं : Mumbai police wants to rush the probe, Sanjay Raut saying they are almost done with the investigation, we deserve to know the truth #CBIForSSR. हे ट्‌विट @republic या वृत्तवाहिनीसह सुशांतची बहिणी श्वेतासिंह कीर्ती (@shwetasinghkirt) आणि मॉडेल अंकिता लोखंडे (@anky१९१२) यांना टॅग केलं गेलं. सीबीआय चौकशीची मागणी रिपब्लिकन भारतनं अक्षरशः राष्ट्रीय प्रश्नाहून अधिक नेटानं लावून धरली आणि सर्वोच्च न्यायालयानं १९ ऑगस्टला तसा आदेशही दिला. मुंबई पोलिसांनी सुशांतसिंहच्या मृत्यूचा एफआयआर दाखल केला नव्हता. पाटणा पोलिसांनी सुशांतच्या वडिलांची तक्रार नोंदवून एफआयआर दाखल केला होता. अशा परिस्थितीत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी एकतर मुंबई पोलिस करू देत किंवा सीबीआयकडं द्या, अशी मागणी केली होती. रिया चक्रवर्तीवर सुरुवातीपासून या प्रकरणाच्या संशयाची सुई कंगना राणावत यांनी रोखलेली होती. रिया चक्रवर्तीनं ज्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, ती आपलीच मागणी असल्याचं @KanganaTeam या हँडलवरून भासवलं गेलं. त्याला अर्णब यांनी साथ दिली. रिया चक्रवर्तीलाही सीबाआय चौकशी हवीच होती आणि तिची मागणी सुप्रिम कोर्टात मान्य झाली, या मुद्द्याची कुठंच नोंद दिसत नाही. #CBIForSSR या हॅशटॅग कॅम्पेनसाठी कंगना राणावत आणि रिपब्लिक टीव्ही यांनी घेतलेल्या जाहीर पुढाकारातही त्याची दखल नाही. टीव्ही-टीआरपी आणि मोहिमा वृत्तवाहिन्यांच्या रँकिंगच्या ३१ व्या आठवड्याचे म्हणत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रिपब्लिकन भारत थेट दुसऱ्या क्रमांकाची वृत्तवाहिनी बनली आणि ३३ व्या आठवड्यात रिपब्लिक भारत पहिल्या क्रमांकाची वृत्तवाहिनी झाली. हाच काळ सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल कटकारस्थान सिद्धांत जन्माला घालणारा आहे. कलाकाराचा मृत्यू, मृत्यूला खुनाचा संशय जोडणं, खुनाला राजकारणाशी जोडणं, राजकारणातून महाराष्ट्रातल्या सत्तेला लक्ष्य करणं, लक्ष्य करण्यासाठी कलाकारांची आणि मीडियाची 'मदत' हे अभूतपूर्व रसायन ऑगस्टमध्ये कमालीच्या वेगानं जुळवलं गेलं. भारताचं ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्‍ट : जीडीपी) २३ टक्‍क्‍यांहून अधिक घसरल्याचं वृत्त ३१ ऑगस्टला आलं. भारताची अर्थव्यवस्था हा जगाच्यादृष्टीनं महत्त्वाचा विषय. बरोबर दुसऱ्या दिवशी कंगना यांनी मुंबई पोलिसांवर ट्‌विटर हल्ला सुरू केला. मुंबई पोलिस उचकवत असल्याचं ट्‌विट त्यांनी एक सप्टेंबरला केलं. कंगना यांच्या नावे रस्त्यावर चित्रं काढल्याच्या ट्‌विटला मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी लाइक केल्याचा आरोप कंगना यांनी केला. मुंबई पोलिसांनी त्याच क्षणी इन्कार केला; मात्र वाद आता पेटला (की पेटवला?) होता. भारताच्या जीडीपीवर चर्चा होण्याऐवजी कंगना विरुद्ध मुंबई पोलिस असा संघर्ष मध्यवर्ती आशय बनला. हाच विषय टीआरपीच्या वाढीशीही संबंधित होताच. रिपब्लिकनं तर #IndiaForKangana ट्‌विटर कॅम्पेन चालवलं.

यशस्वी 'प्रयोग'
भारताचा जीडीपी, चीनची घुसखोरी, भारतातली बेरोजगारी हे विषय चर्चेत येऊच नयेत, यासाठी पुरेशी बांधबंदिस्ती झाली. सप्टेंबरमध्ये कंगना राणावत यांच्याभोवतीच बहुतांश आशय राहिला. कंगना यांनी मुंबई पोलिसांवर आरोप करणं, मुंबईला पाकिस्तान म्हणणं, मुंबई महापालिकेनं कंगना यांचं कार्यालय अनधिकृत ठरवून पाडणं, खासदार संजय राऊत यांनी कंगना यांना हरामखोर म्हणणं हा प्रकार महिनाभर चालला. या काळात देशात कोरोनाचे रुग्ण पन्नास लाखांवर पोहोचले. मृत्यू एक लाखावर गेले. बेरोजगारीचे आकडे फुगत राहिले. या साऱ्या काळात लाभार्थी फक्त दोन राहिले : कंगना राणावत आणि रिपब्लिक टीव्ही. पहिल्याला प्रसिद्धी आणि दुसऱ्याला टीआरपी मिळाला. या दोन्हींचा आशय बिहार निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा बनवला गेला. भारताच्या संसदीय इतिहासात निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापविण्यासाठी मुद्दे उकरून काढण्याचे, त्यांना वळण देण्याचे प्रयोग यापूर्वीही झाले. नवा प्रयोग भविष्यातल्या प्रयोगांची नांदी ठरणारा आहे; म्हणूनच स्वतंत्रपणे नोंद घेण्यासारखा. सेलिब्रिटी, सोशल मीडिया, पारंपरिक मीडिया आणि राजकारण यांची सरमिसळ करायची आणि कट-कारस्थान सिद्धांत जन्माला घालून मूलभूत मुद्द्यांपासून समाजाला भरकटवायचं, असा हा नवा प्रयोग आहे. याचा फायदा कोणाला आणि तोटा कुणाच्या पदरी, याचं भान नागरिक म्हणून आपल्याला असावं लागणार आहे. अन्यथा, मूक प्रेक्षक/सोशल मीडिया वापरकर्ता इतकीच आपली भूमिका मर्यादित होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang samrat phadnis write sushant singh rajput and media and politics article