तत्त्वं, मूल्यांची लढाई..! (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

आयुष्यभर या दोन्ही माणसांनी फक्त तत्त्वं, मूल्य बाळगणाऱ्या पत्रकारितेची लढाई लढली. आयुष्याच्या शेवटी या दोघांकडं काही नाही; पण या माणसांची आणि त्यांच्याकडून घडलेल्या मुलांची बौद्धिक श्रीमंती मोजण्यासाठी अनेकांना काही जन्म घ्यावे लागतील. कित्येकांना घडवलं, कित्येकांचे संसार लावून दिले; पण स्वतःच्या संसाराची मात्र कधी काळजी घेतली नाही.

मराठवाड्याच्या भूमीत पाय ठेवला की माझ्या अंगात दहा हत्तींचं बळ आपोआप संचारतं. आपला भाग, आपली माणसं, असं समीकरण जेव्हा समोर येतं, तेव्हा अख्खा दिवस एका क्षणासारखा जातो. त्यात जर नांदेड-लातूर असलं, तर विचारूच नका. त्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी ठरल्याप्रमाणे लातूरमध्ये पोहोचलो. बारापर्यंत भेटीगाठी आटोपल्या. शहरात प्रवास करत असताना, ‘एसएमएस’नी खचाखच भरलेला मोबाईल पाहत होतो. त्या एसएमएसमध्ये लातूरच्याच पत्रकार असलेल्या एका मित्राचा मेसेज आला होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, ‘ दादा, लग्न झाल्यावर आता वीस वर्षं होऊन गेली. आता कुठंतरी छोटंसं घर घ्यावं, असा विचार करतोय. आपल्या समविचारी मित्रांना थोडी थोडी मदत मागतोय, तुम्ही पाच हजार रुपयांची मदत केली, तर बरं होईल.’ मी ज्या पत्रकार मित्राचा एसएमएस वाचत होतो, त्यांचं नाव शिवाजी कांबळे (८४५९७८९९४४). शिवाजी आणि मी समविचारी मित्र. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छात्रभारती, राष्ट्रसेवा दल आणि लातूरमध्ये ‘जय महाराष्ट्र न्यूज’ चॅनेलच्या माध्यमातून खूप वर्षांनी पुन्हा झालेली गाढ मैत्री. कितीतरी आपलेपणाचे दुवे आमच्या मैत्रीमध्ये होते, आहेत. म्हणूनच अगदी हक्कानं, शिवाजीनं माझ्याकडं पैसे मागितले होते. प्रश्न फक्त पैसे कामाला लागत असतील इथपर्यंत मर्यादित नव्हता, तर पैसे मागण्यासारखी वेळ का आली हा होता; प्रश्न अजून, शिवाजी यांना स्वतःचं घर का नाही, असा होता. अनेक वेळा असं होतं, आपण आपल्या खूप जवळच्या माणसांच्या अडचणीवर, समस्यांमध्ये खूप खोलवर जात नाही, त्यामुळं तिथं आपल्याला काही दिसत नाही. डोक्‍यात विचारचक्र सुरू झालं होतं. मी त्या दिवशी अनयासासे लातूरमध्ये होतो. चला, शिवाजीशी बोलावं, असा विचार मनात आला आणि शिवाजीला फोन लावला. "घरी आहे, या," म्हणत शिवाजीनं आपल्या घराचा पत्ता मला पाठवला. लातूरच्या कळंब रोड भागामध्ये शिवाजीचं घर. आम्ही एकाला पत्ता विचारला, तर चार माणसं पत्रकारसाहेब आहेत म्हणून, शिवाजीच्या घरापर्यंत आम्हाला घेऊन गेली. शिवाजीचं घर म्हणजे काय? नुसत्या विटा एकमेकांवर रचल्यात. त्याच विटांना आतमधून मातीनं सारवलं, वरतून लोखंडी पत्रे टाकलेत. शिवाजी कांबळे, अनुराधा कांबळे वहिनी, त्यांचा मुलगा अनार्य, मुलगी कादंबरी सगळेच जण मी येणार म्हणून वाट बघत बसले होते. घरात पाय ठेवल्या- ठेवल्या मेथीच्या भाजीचा भूक चाळवली जाईल असा मस्त वास आला, मी वहिनीला थेट विचारलं, "वहिनी, मेथीची भाजी केली ना आज?" वहिनी म्हणाल्या, "हो. करा जेवण." मी म्हणालो, "सकाळी अकरा वाजता रामेश्वर धुमाळ यांच्याकडं जेवण झालं."
वहिनी म्हणाल्या, ‘‘पण अर्धी भाकरी आणि मेथीच्या भाजीची टेस्ट घ्यायला काय हरकत आहे?"

शिवाजी लगेच म्हणाले, "पुण्यातल्या लोकांसारखं विचारतेस काय? वाढ ना जेवायला."
वहिनींनी मला जेवायला वाढेपर्यंत माझं आणि शिवाजीचं बोलणं सुरू झालं होतं, शिवाजीच्या पत्रकारितेतला आत्तापर्यंतचा सर्व प्रवास मला माहीत होता; पण शिवाजीच्या आयुष्यात अर्थशास्त्राचा कुठंही संबंध नाही, हे मात्र मला माहिती नव्हतं. घरात बसलो तर भांडी, अन्य पसारा कमी आणि पुस्तकं जास्त दिसत होती. शिवाजीच्या नावानं छापून आलेल्या बातम्यांच्या कात्रणांच्या फायलीच्या फायली एका कोपऱ्यात थप्पी लावून ठेवल्या होत्या. शिवाजीची मुलगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं आत्मचरित्र वाचण्यात दंग झाली होती. मी काहीतरी नव्यानं बोलेन, याची मुलगा वाट पाहत होता. ते छोटंसं घर, लातूरमध्ये असूनसुद्धा मुंबईच्या कुठल्या तरी छोट्या गल्लीत जाऊन बसलो की काय, असं मला वाटत होतं.
‘‘काय करतोयस सध्या?" मी सहज प्रश्न विचारला. शिवाजीनं सांगितलं, "शहरात एक छोटासा पेपर निघतो, तिथं काम करतो." वहिनी मध्येच म्हणाल्या,"अहो, तुमच्यासारखं मुंबईला घेऊन जा यांना. चार पैसे तरी मिळतील. अहो, आपलं आयुष्य गेलं, आता लेकरांची काळजी वाटू लागलीय." शिवाजी वहिनीकडं बघत म्हणाला, "अगं झालं का तुझं सुरू?"
वहिनी बिचाऱ्या शांत बसल्या. शिवाजी म्हणाला, "अनुराधा म्हणते, ते खरं आहे; पण करणार तरी काय? छोट्या शहरामध्ये छोटं दैनिक, त्यांचं काम किती आणि धंदा किती? आपल्याला ते जे पैसे देतात, ते ठीक आहे म्हणून आपण दिवस काढायचे. पत्रकारिता सोडून पैशासाठी काहीतरी करायचा प्रयत्न केला, तरी ते आपण करू शकणार नाही. प्रश्न तत्त्वांचा आहे, पैशांचा नाही. किती त्रास झाला तरी चालेल; पण तत्त्वं, मूल्यं शाबूत राहिली पाहिजेत."
मी म्हणालो, "लॉकडाउनच्या काळामध्ये तुम्हाला पगार मिळाला का?"

शिवाजी म्हणाले, "एक नया पैसा नाही. अहो, आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कसं? ते सर्व दिवस खाण्यासाठी वांदे. मी थेट आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. त्यांना सांगितलं, मला राशनचं धान्य द्या, मला लागेल. जिल्हाधिकारी हसले आणि म्हणाले, 'तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहात, एवढं मोठं तुमचं नाव आहे आणि राशनचं धान्य काय मागता?' मी म्हणालो, 'तुमचा मोठेपणा नको सर. तुम्हाला शक्‍य असेल, तर मला धान्य द्या.' त्यांना विनंती केल्यामुळं त्यांनी मला राशन दिलं, त्यामुळं कशीबशी पाच महिने त्या धान्यावर चूल पेटली. अनेक पाहुण्यांनी आणि मित्रांनीही कोरोनाच्या काळात मदत केली." कांबळे वहिनी मध्येच म्हणाल्या, "अहो खाण्या-पिण्याच्या मदतीचं ठीक आहे, पुढच्या आठवड्यात मुलाच्या प्रवेशासाठी तीन हजार रुपये मिळाले नाहीत, तर त्याचा प्रवेश होणार नाही, याची मला चिंता वाटू लागली आहे. माझ्या पोरांनी रात्रंदिवस अभ्यास केलाय." मी कांबळे वहिनींना म्हणालो, "होईल वहिनी, सर्व काही ठीक होईल. थोड्याशा पैशांसाठी कधी काही थांबतं का?"

कांबळे वहिनींनी अनेक उदाहरणं सांगून, हजार आणि दोन हजार रुपयांसाठी काय काय संधी गेल्यात, याचा तपशील माझ्यासमोर ठेवला. ते सगळं ऐकून मीही थक्क झालो.
ताटामध्ये भाकरी आणि मेथीची भाजी... सोनं खाल्ल्यासारखं लागत होतं. वाटत होतं, वहिनींनी आग्रह करून, अजून अर्धी भाकर वाढावी; पण समोरच्या दुरडीत पाहिलं, तर दोनच भाकऱ्या दिसत होत्या. माणसं अजून जेवायची शिल्लक असतील का, याचा मी विचार करत होतो.
"आई-बाबा काय करतात, कसे आहेत?" मी थोडा गरिबीवरचा विषय बाजूला सारण्याचा प्रयत्न करत, इतर विषय काढण्याचा प्रयत्न करीत होतो; पण अजून विषय पुन्हा तिथंच गरिबीच्या शेजारीच घुटमळत होता. शिवाजी म्हणाला, "आई-बाबा गावाकडं भोगावला असतात. आई मोलमजुरी करते आणि बाबा घरीच असतात. आईला खूप वेळा सांगितलं, नको काम करू, नको काम करू, तरी ती माझं ऐकत नाही."

आमचा शिवाजी पत्रकारितेत उच्चशिक्षित, पत्रकारितेच्या मूल्यांची जडणघडण बसवता बसवता शिवाजीला, एका ग्रुपमध्ये अधिक दिवस टिकता आलं नाही. खरंतर केवळ एका शिवाजीचा हा प्रॉब्लेम नव्हता, तर पत्रकारितेची तत्त्वं, मूल्यं म्हणून जोपासना करणाऱ्या त्या प्रत्येक शिवाजीचा हा प्रॉब्लेम होता, असं मला वाटत होतं.
माझ्या डोळ्यांसमोर प्रश्न - प्रतिप्रश्नांची मालिका सुरू झाली होती. या संपूर्ण संवादात मी शिवाजीचा एकेरी उल्लेख केलाय पण त्यांचं पत्रकारितेतलं स्थान खूप वरचं आहे. त्याचा आदरार्थी उल्लेख केला नाही त्याचा कारण माझा तो जुना मित्र आहे. मित्राला आपण कुठं अहोजाहो करतो. आमचं बोलणं सुरू असताना मध्येच म्हणालो, "तुझा एसएमएस मी आज सकाळी पाहिला. कदाचित रात्री खूप उशिरा पाठवलेला दिसतो." शिवाजी म्हणाले, "हो आपल्या जवळच्या सात-आठ मित्रांना मी तो एसएमएस पाठवला होता. विचार करतोय, हे घर उभं करताना, ज्या विटा उधारीवर आणल्या होत्या, त्या विटांचे तरी किमान पैसे द्यावेत." मी म्हणालो, "तु पत्रकारिता करत करत, बाकी काही व्यवसाय का केला नाही?" शिवाजी म्हणाला, "रोजच्या कामातून मान वर करायला वेळ नसतो. बाकी काम कधी करणार? एक-दोन पुस्तकांचा विचार केला होता; पण पुस्तकांमधून पैसा मिळत नाही, असं पुढं आल्यावर तिकडं जाण्याची हिंमतही केली नाही." शिवाजी सगळं प्रामाणिकपणे सांगत होता आणि मी ऐकत होतो.
लातूरला येण्यापूर्वी मी औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला शिकत असताना प्रा. जयदेव डोळे सर आणि प्रा. सुरेश पुरी सर यांच्यामुळं ज्या मोठ्या पत्रकारांचा खूप जवळून संबंध आला, त्यांत विद्याभाऊ सदावर्ते आणि शांतारामबापू जोशी ही दोन मोठी पत्रकारितेतील नावं होती. या दोघांची कुटुंबं मी खूप जवळून पाहिली. त्यांचं स्वतःचं, दहा बाय दहाचं घर मोठ्या मुश्‍किलीने होतं. आहे त्या घराची आर्थिक घडी कमालीची विस्कळीत झालेली होती, ती सुधारूच शकत नव्हती. कारण पहिल्यापासून ती व्यवस्थित राहावी, यासाठी प्रयत्न केले गेले नव्हते. खूप मोठं नाव, समाजामध्ये प्रचंड मान; पण आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली, की विचारू नका. पत्रकारितेला ज्यांनी तत्त्वं, मूल्यांची लढाई म्हणून स्वीकारलं, त्या सर्वांचे हेच हाल आहेत. ज्यांनी पत्रकारितेचा धंदा बनवला त्यांच्याविषयी आपण काय बोलावं?

दरवर्षी कमीत कमी एक हजार मुलं पत्रकारितेमध्ये येत असतील. त्या एक हजार मुलांचं भवितव्य काय असेल, याचा विचार करत, मी शांत बसलो होतो. त्या एक हजार मुलांचा आणि शिवाजीचा चेहरा मला सारखाच भासत होता.
विद्याभाऊ सदावर्ते आणि शांतारामबापू जोशी यांच्या फॅमिलीची चौकशी केली. या दोन्ही फॅमिली माझ्या खूप जवळच्या आहेत. सांजवार्तामध्ये असताना विद्याभाऊंच्या घरी तर सलग दोन वर्षं माझं येणं-जाणं होतं. आयुष्यभर या दोन्ही माणसांनी फक्त तत्त्वं, मूल्य बाळगणाऱ्या पत्रकारितेची लढाई लढली. आयुष्याच्या शेवटी या दोघांकडं काही नाही; पण या माणसांची आणि त्यांच्याकडून घडलेल्या मुलांची बौद्धिक श्रीमंती मोजण्यासाठी अनेकांना काही जन्म घ्यावे लागतील. कित्येकांना घडवलं, कित्येकांचे संसार लावून दिले; पण स्वतःच्या संसाराची मात्र कधी काळजी घेतली नाही. विद्याभाऊ आज आपल्यात नाहीत. शांतारामबापू आहेत, ते खूप थकले आहेत. शांतारामबापू जोशी यांची मुलगी स्वाती टेंभीकर मला सांगत होत्या, "बाबांनी जी माणसं कमावली, ती आमच्या सात पिढ्यांना पुरतील, इतकी आहेत." तर, विद्याभाऊ सदावर्ते यांचा मुलगा अभिजित सदावर्ते मला सांगत होता, "बाबांची जी वैचारिक परंपरा आणि पत्रकारितेची चाकोरी अनेकांना घालून दिली आहे. त्यांचं गुणगाण करणारे शेकडो जण आज पावलोपावली मला भेटतात, तेव्हा आपल्या वडिलांची किती श्रीमंती होती, हे लक्षात येतं." भाऊंचा मुलगा आणि बापूंची मुलगी यांनी मला चुकूनही म्हटलं नाही, की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीही केलं नाही.

मी शिवाजीच्या घरी काहीतरी विचारात आहे, हे लक्षात आल्यावर, शिवाजीनं मला जोरदार आवाज दिला. ते म्हणाले, "कुठं गायब झालात?" मी भानावर येत, हसलो आणि 'आता निघावं लागेल,' असं शिवाजी आणि वहिनीकडं बघत म्हणालो. घरामध्ये असलेले फुले-शाहू-आंबेडकरांचे फोटो पाहून माझ्या मनात विचार येत होता, 'ज्या महात्म्यांनी बहुजनांसाठी अवघं आयुष्य वेचलं, ती बहुजनांची लेकरं उच्चशिक्षित होऊनही, किती वाईट अवस्थेत आहेत. पत्रकारितेसारख्या क्षेत्रात तर बहुजनांच्या मुलांचे पाय अजूनच रुतले आहेत. कधी थांबणार आहे हा यातनादायी प्रवास?' मी मनातच विचार करत होतो. 'काळाप्रमाणे यांनी पावलं टाकली नाहीत म्हणून त्यांच्यावर ही परिस्थिती आली असेल का?' शिवाजी मला म्हणाले, "माझ्या गरिबीला जास्त मनावर घेऊ नका. आयुष्यात आर्थिक नाही तर सामाजिक जबाबदारीचं भान घेऊन आपण जगलं पाहिजे. हे तुम्हाला काय आणि मला काय सेवादल, छात्रभारतीनं शिकवलं आहे." शिवाजी एकदम तत्त्वानं चालणारं व्यक्तिमत्त्व. म्हणूनच त्यांची डाळ कुठल्याही मोठ्या वर्तमानपत्रामध्ये खूप वर्षं शिजलीच नाही. मी निघताना, शिवाजीची मुलगी कादंबरीला विचारलं, "बेटा, तुला काय व्हायचंय?" कादंबरी म्हणाली, "मला डॉक्‍टर व्हायचंय."
मी म्हणालो, "काळजी करू नकोस. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होणार."
मी निघालो आणि जाताना त्या विटांच्या घरावर पुन्हा एकदा नजर टाकली. हीच नजर पुन्हा शिवाजी यांच्या चेहऱ्यावर गेली. शिवाजी जसा वीस वर्षांपूर्वी प्रसन्न होता, तसंच आजही अगदी प्रसन्न आहे. काळजीनं वहिनींची तब्येत मात्र जरा खराब झाल्याचं जाणवत होतं.

मला शेवटचं बाय-बाय करताना शिवाजीनं आवर्जून सांगितलं, "माझी एकच इच्छा आहे. पोरांनी मला कधी, माझा बाप काहीच कामाचा नव्हता, असं मी जिवंत असेपर्यंत तरी किमान म्हणू नये. किमान त्यांना उभं करण्याची ताकद तरी आपल्याला मिळावी. बाकी समाज आपल्याला उभा करायचा आहे; पण ज्या दिवशी पोरं म्हणतील, माझा बाप नालायक आहे, त्या दिवशी आपली पत्रकारिता संपेल मित्रा." शिवाजीच्या बोलण्यामध्ये खूप मोठा अर्थ दडला होता. मी तिथून निघालो; पण मनात विचारचक्र वेगानं घोंघावत होतं. मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. लातूर सोडताना मी एक निश्‍चय केला, आपण आपल्याच पीडित असलेल्या पत्रकारितेतील बांधवांसाठी काही तरी पाऊल उचललं पाहिजे. त्यानंतर मी तब्बल पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये फिरत होतो आणि विषय एकच होता, 'तत्त्वं, मूल्यं जोपासणारे पत्रकार आणि त्यांची एकूण परिस्थिती.' मी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जात होतो, तिथं जाऊन वीस-पंचवीस पत्रकारांशी संवाद साधत होतो. तिथंसुद्धा मला नव्वद टक्केपेक्षा जास्त शिवाजी भेटत होते. ज्या शिवाजींना स्वतःचं घर नाही, ज्या शिवाजींना आपली मुलं शिकली पाहिजेत, असं वाटतं; पण ते मुलांना शिकवू शकत नाही. ज्या शिवाजींना वाटतं, आपण आजारी पडलो, तर आपला इलाज चांगल्या ठिकाणी व्हायला पाहिजे; पण होऊ शकत नाही. ज्या शिवाजींना वाटतं, आपल्या म्हातारपणी आपल्याकडं चार पैशांची पुंजी असली पाहिजे; पण तसं होत नाही. असे शिवाजी आपल्या राज्यात एक-दोन नाही, तर तब्बल साडेचार हजार आहेत. ज्यांना स्वतःचं काहीही स्वप्न पूर्ण करता आलं नाही. त्यांना एकच काळजी आहे, समाजातल्या उपेक्षित घटकांना न्याय देण्याची. मी अशा अनेक शिवाजींच्या झालेल्या तगमगीचा अभ्यास करून आपण वेगळं काहीतरी निर्माण केलं पाहिजे, हा ध्यास मनाशी बाळगून काम करावं, असा चंग बांधला. गेल्या पंधरा दिवसांपासून या अस्वस्थतेमधून बाहेर येत नाही. तत्त्वं, मूल्यांच्या लढाईत पत्रकार समाजाला उभं करत असतो; पण स्वतः मात्र आपल्या संसाराला उभं करू शकत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com