वेदनेचा हुंकार (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

मला आधी अनेक वेळा सांगितलेली कहाणी पुन्हा अगदी थोडक्‍यात सांगत सुमनबाई म्हणाल्या : ‘‘दु:ख कुणाला तरी सांगितल्यावर कमी होतं, म्हणून ते तुम्हाला सांगावं असं वाटलं. एकदा प्रत्यक्ष भेटीतही सगळी हकीकत सांगावी अन् हलकं व्हावं अशी इच्छा होती. हाच एक उद्देश तुम्हाला घरी बोलावण्यामागं होता. बाकी काही नाही.’’

त्या दिवशी पुण्यात होतो. सकाळची अकराची वेळ असेल. माझा फोन वाजला. नंबर ओळखीचा वाटला.
‘‘कोण बोलतंय?’’ मी विचारलं
‘‘मी सुमन आदाटे (८४२१७३२८०४) बोलतेय.’’ माझ्या डोक्‍यात लख्ख प्रकाश पडला. आठवड्यातून किमान चार-पाच वेळा या सुमनबाई मला त्यांची कैफियत सांगायला फोन करत असतात. मी त्यांना म्हणालो : ‘‘बोला.’’
त्या म्हणाल्या : ‘‘दादा, तुम्ही कित्येक दिवसांपासून म्हणताय, ‘तुम्हाला भेटायला तासगावला येतो’; पण तुम्ही काही येत नाही.’’
‘‘हां...यायचं आहे हो; पण येणं होत नाही,’’ असं म्हणत मी सुमनबाईंचा फोन ठेवला. दोन दिवसांनंतर सांगलीला जायचंच होतं. त्या दिवशी सांगलीतलं काम आटोपलं आणि मी तासगावच्या दिशेनं निघालो. आर. आर. पाटील अर्थात आबा असताना दोन-तीन वेळा मी तासगावला गेलो होतो.
येत असल्याची पूर्वकल्पना मी सुमनबाईंना दिली होती. तासगावमधली सोमवार पेठ आणि सोमवार पेठेमधलं वडगावे सर यांचं घर आणि त्या छोट्याशा घरात राहणाऱ्या सुमनबाई आणि त्यांचे पती वसंतराव आदाटे.
दारावर टकटक केली. आतून कसला तरी आवाज येत होता. सुमनबाईंनीच दरवाजा उघडला.
‘‘कोण? संदीप ना?’’ त्यांनी विचारलं.
‘‘हो,’’ मी म्हणालो.
प्रसन्न मुद्रेनं त्यांनी माझं स्वागत केलं.
दार उघडलं जाण्यापूर्वी जो आवाज येत होता तो शिलाई मशिनचा असल्याचं आत गेल्यावर कळलं. गंजून गेलेल्या त्या जुनाट मशिनमधून जणू दारिद्य्राचाच आवाज येत होता.
मला बसण्यासाठी सुमनबाईंनी रिकामी पिशवी अंथरली.

एका कोपऱ्यात छोट्याशा खाटेवर बसलेले सुमनबाईंचे पती वसंतराव यांची मला त्यांनी ओळख करून दिली. ते तिथं का झोपून आहेत, याची कहाणी मी सुमनबाईंकडून फोनवरून अनेक वेळा ऐकली होती. छोट्याशा घरात नजर फिरवली. काहीही नव्हतं. शाहूमहाराज आणि महात्मा फुले यांचे फोटो तेवढे भिंतीवर होते. सुमनबाई पाणी देत मला म्हणाल्या : ‘‘तुम्ही घरी आलात यावर माझा विश्वास बसत नाही. मी गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणींना दोन-चार दिवसांपासून सांगत होते, माझा भाऊ संदीप येणार आहे.’’
‘‘तो कशाला येईल इथं?’’ असं म्हणत सर्व जणींनी माझी चेष्टा केली. आज मी त्या सगळ्या मैत्रिणींना बोलावलं आहे तुम्हाला भेटायला.’’
पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीत दोऱ्यानं व्यवस्थित बांधून
ठेवलेला एक गठ्ठा सुमनबाईंनी माझ्या हाती दिला. मी तो उलगडला. ‘भ्रमंती LIVE’मधले सर्व लेख होते ते!
दुपारची वेळ होती. ऊन्ह खूप तापत होतं. मी जिथं बसलो होतो तिथली जमीनही धगधगल्यासारखी जाणवत होती. घरात पंखा अर्थातच नव्हता व बाहेरची हवा यावी अशीही घराची रचना नव्हती.
सुमनबाई आतमधून बाहेर आल्या. त्यांच्या हातात खिचडीचं ताट होतं. सोबत कैरीचं लोणचं आणि पापडही. ज्वारीचे भाजलेले पापड खाताना, आबांच्या घरी जेवलो होतो त्याची आठवण झाली. जेवता जेवता मी घामाच्या धारा पुसत होतो.
ते पाहून सुमनबाई म्हणाल्या : ‘‘दुपारी फारच उकडतं, दादा.’’
त्या मला पदरानं वारा घालू लागल्या. मी संकोचून गेलो आणि ‘नको’ म्हणालो. जेवण आटोपलं. सुमनबाई माझ्या शेजारी येऊन बसल्या. नियतीनं जो खेळ सुमनबाईंशी खेळला होता त्याविषयी त्यांनी मला फोनवर अनेकदा सांगितलं होतं. आज प्रत्यक्ष भेटीतही त्या पुन्हा सगळं सांगतील हे मला माहीत होतं.
खाटेच्या खाली असलेलं एक पोतं त्यांनी बाहेर काढलं. पोत्यातली एकेक वस्तू दाखवत आपल्या मुलाच्या आठवणी त्या सांगू लागल्या. मुलाच्या फोटोंचे अल्बम, वर्तमानपत्रांची कात्रणं, जिंकलेल्या ट्रॉफीज्, प्रमाणपत्रं हे सगळं त्यांनी जपून ठेवलं होतं. मुलासंदर्भातल्या जपून ठेवलेल्या वस्तू मला दाखवताना सुमनबाईंच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. ते पाहून नकळत मलाही माझ्या आईची आठवण येत होती. सुमनबाईंप्रमाणेच माझ्या आईनंसुद्धा माझं पहिलीपासूनचं प्रमाणपत्र, वर्तमानपत्रांमधली कात्रणं अजून जपून ठेवली आहेत.

सोनं-नाणं जपून ठेवावं त्या पद्धतीनं सुमनबाईंनी
आपल्या लेकराची प्रत्येक वस्तू जपून ठेवली होती. सुमनबाईंच्या घरात सोनं-नाणं असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचं खरं सोनं होतं ते म्हणजे राजेंद्र नावाचा त्यांचा मुलगा. पंधरा वर्षांपूर्वी
राजेंद्र घर सोडून निघून गेला आहे. त्या वेळी तो २३ वर्षांचा होता. आदाटे दांपत्यानं आता सत्तरी पार केलेली आहे.
साहजिकच हात-पाय थकलेत; पण त्याहूनही अधिक हे दांपत्य थकलंय ते मुलाची वाट पाहून पाहून!
सुमनबाई पुन्हा आतमध्ये गेल्या. रडण्याचा आवाज आला. राजेंद्रचा फोटो हातात घेऊन त्या रडत होत्या.
‘‘रडू नका,’’ मी समजावण्याचा प्रयत्न केला.
मोडलेल्या काठीचा आधार घेत घेत वसंतराव बायकोची समजूत काढायला आत गेले. नवऱ्याला बिलगून सुमनबाई रडू लागल्या. त्या छोट्याशा घरात बसल्या जागेवरूनच मला सर्व काही दिसत होतं.
वसंतरावांनी अखेर कशीबशी सुमनबाईंची समजूत काढली व त्यांना माझ्या शेजारी आणून बसवलं.
वसंतराव सांगू लागले : ‘‘दिवसभरातून एक-दोनदा तरी ती असं रडते. मी एकीकडे आजारानं थकलो आहे आणि दुसरीकडे तिची समजूत काढूनही थकलो आहे.’’
सुमनबाई आता जरा सावरल्या होत्या. विषय बदलत त्या म्हणाल्या : ‘‘मी तुमचं हे वाचलं, मी तुमचं ते वाचलं...’’
एका कोपऱ्यात असलेल्या पुस्तकांच्या छोट्याशा गठ्ठ्यातून त्यांनी एक पुस्तक काढलं आणि माझ्या हातात दिलं.
‘‘हे पुस्तक मी तुम्हाला द्यायला घेतलं होतं. परत द्यायला विसरून जाईन,’’ सुमनबाई म्हणाल्या.
ते शाहूमहाराजांचं चरित्र होतं. दहावी शिकलेल्या सुमनबाईंना वाचनाची आवड होती.
मला आधी अनेक वेळा सांगितलेली कहाणी पुन्हा अगदी थोडक्‍यात सांगत त्या म्हणाल्या : ‘‘दु:ख कुणाला तरी सांगितल्यावर कमी होतं, म्हणून ते तुम्हाला सांगावं असं वाटलं. एकदा प्रत्यक्ष भेटीतही सगळी हकीकत सांगावी अन् हलकं व्हावं अशी इच्छा होती. हाच एक उद्देश तुम्हाला घरी बोलावण्यामागं होता, दादा. बाकी काही नाही.’’
माझेही डोळे पाणावत होते. मी कसाबसा स्वतःला सावरत होतो व त्यांनाही सावरू पाहत होतो.
आपला मुलगा आज ना उद्या परत येईल, या आशेनं दोघंही डोळ्यांत प्राण आणून त्याची वाट पाहत असतात...
वसंतराव हे एसटीत मेकॅनिक होते. सेवा पूर्ण होण्याअगोदरच त्यांच्या वडिलांनी त्यांना आपला व्यवसाय बघायला सांगितला, त्यामुळे वसंतरावांना निवृत्तिवेतन मिळत नाही. वडिलांचा व्यवसाय म्हणजे काय? मेलेल्या जनावरांचं कातडं काढायचं आणि ते कातडं मिठाच्या पाण्यात धुऊन विकण्यासाठी मिरजेला पाठवायचं. सुमनबाईंनी कित्येक वर्षं कातडं धुण्याचं हे काम केलं आहे. सन १९८० मध्ये सुमनबाईंचे सासरे गेले आणि हा व्यवसायही कायमस्वरूपी बंद पडला.

सुमनबाई म्हणाल्या : ‘‘माझ्या सासऱ्यानं खूप कमावून ठेवलं. आमच्या वाट्याला जे काही आलं होतं ते आम्ही राजेंद्रचा शोध घेण्यासाठी विकून टाकलं. चार एकर शेती, घर, सर्व त्यामध्ये आलं.’’
मी मध्येच विचारलं : ‘‘...पण राजेंद्र असा गेलाच कसा?’’
सुमनबाई म्हणाल्या : ‘‘एसएफआय,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा वेगवेगळ्या संघटनांचं काम तो करायचा. पुण्यातल्या एका कार्यकर्त्या मुलीच्या प्रेमात पडला. त्याचा प्रेमभंग झाला. तेव्हापासून तो मनानं खचला. अनेक वेळा तो कुठं तरी जाण्यासाठी रेल्वेगाडीनं निघायचा आणि भलतीकडेच जायचा. त्यामुळे त्याच्या वडिलांनी वेगवेगळ्या रेल्वेमार्गांवर त्याचा भारतभर शोध घेतला. ज्या दिवशी तो घरातून कायमचा गेला, त्या रात्री मला त्याच्या जाण्याची कुणकुण लागली होती. मुलगा कितीही मोठा झाला तरीही त्याच्या मनात काय चाललंय, हे त्याच्या आईला कळत असतं. त्या रात्री तोही झोपला नाही आणि मीही झोपले नाही. रोज माझ्या मांडीवर डोकं टेकवलं की तो लगेच झोपायचा. त्या रात्री त्यानं माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला झोप काही लागत नव्हती. सकाळी रोजच्याप्रमाणे व्यायामाला गेला. थंडीचे दिवस होते. आल्यावर तो गरम पाण्यानं आंघोळ करेल म्हणून मी अंगणात पाणी तापवत बसले होते...पण, राजेंद्रचा व्यायाम काही अजूनही झाला नाही... व तो काही अजून घरी आला नाही! पंधरा वर्षं उलटून गेलीत त्या गोष्टीला.’’
सुमनबाईंनी अश्रू पुन्हा अनावर झाले.
तशातच वसंतरावांनाही अपघात झाला. त्या अपघातामुळे त्यांनी जे अंथरूण धरलं ते धरलंच. राजेंद्रचे वेगवेगळे फोटो...त्यानं सांगली ते दिल्ली हे अंतर कापलं त्याची ‘लिम्का बुक ऑफ
वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालेली नोंद...मी सगळं
बारकाईनं पाहिलं.
आम्हा तिघांचं बोलणं सुरू असताना दारावर टकटक झाली. सुमनबाईंच्या मैत्रिणी आल्या होत्या. सुमनबाईंनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली.
त्यांच्याशी काही गप्पा झाल्या.
सुमनबाईंच्या मैत्रिणींनी ते छोटंसं घर सगळं भरून गेलं. थोडा वेळ का होईना सुमनबाई त्यांच्यात रमल्या होत्या. एरवी, कधीही घरी न येणाऱ्या त्यांच्या मैत्रिणी ‘आज कुणी पाहुणा येणार आहे’ म्हणून त्यांच्या घरी आल्या होत्या. वसंतरावांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. मी मात्र, राजेंद्र कुठं असेल, या विचारात बुडालो होतो.
सूर्य मावळतीला निघाला होता...मलाही पुढच्या प्रवासाचे वेध लागले होते.
शिलाई मशिनचं चाक फिरतंय म्हणून सुमनबाईंनी तव्यावर टाकलेली भाकरी गोल होतेय! दहा-पंधरा वर्षांनंतर या चाकाची गती जेव्हा थांबेल तेव्हा सुमनबाईंचं आणि वसंतरावांचं काय होईल हा प्रश्न माझ्या मनात घर करून होता. या दांपत्याला सर्व स्तरांतून मदत होणं गरजेचं आहे असं मला वाटलं व डॉ. बाबुराव गुरव यांच्याशी या विषयावर मी बोललो.  

मी दोघांचा निरोप घेतला. सुमनबाई मला गाडीपर्यंत सोडायला आल्या. मी सुमनबाईंसाठी काही नेलेलं होतं, ते मी गाडीत बसताना त्यांच्या हातात ठेवलं.
‘‘ही ओवाळणी आहे तुम्हाला माझी,’’ असं मी म्हणालो.
माझा हात हातात घेऊन सुमनबाई म्हणाल्या : ‘‘इतक्या दूरवरून तुम्ही मला भेटायला आलात... राजेंद्र घरी परत येईल तेव्हाही त्याला भेटायला नक्की या. तुम्ही त्याचा फोटो पाहिला आहे. रस्त्यात कुठं तो तुम्हाला दिसला तर त्याला समजून सांगा. म्हणावं, ‘तुझी आई घरी वाट पाहते रे...' त्याला द्या लवकर पाठवून.’’

मी ‘‘हो’’ म्हणत गाडीचा दरवाजा लावला आणि निघालो. माझी गाडी रस्त्याला लागली हे खरं होतं; पण त्या दोन म्हाताऱ्या आई-वडिलांच्या आयुष्याची गाडी या वयात कुणाच्या आधाराशिवाय पुढं जाईल अन् कशी? हा प्रश्न मनात आल्यावाचून राहिला नाही. मोबाईल वाजला. माधवी फुके हिचा फोन होता. तब्बल अठरा वर्षांनंतर मला तिचा फोन आला होता. मला एकदम सुखद धक्का बसला. जसा मला माधवीच्या फोननं सुखद धक्का बसला तसा सुखद धक्का घरी परतून राजेंद्र त्याच्या आईला देईल का? पोटचा गोळाच जेव्हा गायब होतो, तेव्हा सुमनबाईंसारख्या कित्येक आई रोज जगत कमी असतील आणि रडत जास्त असतील! ज्या गोळ्याला पोटात वाढवलं, तो गोळा आता आपल्या उतारवयात एकदाही नजरेला पडत नाही यापेक्षा अजून वाईट काय असू शकतं? मग तो आपल्या आईपासून गायब झालेला राजेंद्र असेल किंवा अन्य कोणतीही मुलं असतील. अशा प्रत्येक मुलाला एकदा डोळे भरून पाहण्याची आस प्रत्येक आईला नक्कीच असेल. अशा कितीतरी ‘सुमनबाई’ आपल्या मुलाची वाट बघत बसल्या असतील. हो ना..?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com