एका लग्नाची सक्‍सेस-स्टोरी... (संदीप काळे)

संदीप काळे
रविवार, 31 मे 2020

उदय-सरिता यांच्या सक्सेस-स्टोरीचं वैशिष्ट्य म्हणजे, दोघांनी रूढी-परंपरांवर तर
विजय मिळवला होताच; पण
निसर्गावरही मिळवला होता.
जोडीदारापैकी एकाला हात नाही आणि दुसऱ्याला डोळे नाहीत, तरीही त्यांचं जगणं, त्यांचं सहजीवन किती सुंदर होतं...सुंदर आहे हे मला दिसलं.

उदय-सरिता यांच्या सक्सेस-स्टोरीचं वैशिष्ट्य म्हणजे, दोघांनी रूढी-परंपरांवर तर
विजय मिळवला होताच; पण
निसर्गावरही मिळवला होता.
जोडीदारापैकी एकाला हात नाही आणि दुसऱ्याला डोळे नाहीत, तरीही त्यांचं जगणं, त्यांचं सहजीवन किती सुंदर होतं...सुंदर आहे हे मला दिसलं.

माझा अत्यंत जवळचा
मित्र संतोष पाटील गंभीर आजारी होता. मिरजच्या भारती हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं. मी त्याला भेटायला गेलो होतो. गेली अनेक वर्षं आम्ही सोबत होतो आणि आता ही सोबत कायम राहील की नाही याची शाश्वती नव्हती. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. अत्यंत टापटीप आणि शिस्तप्रिय असा
एखादा दवाखाना ग्रामीण भागात असू शकतो, याचं आश्‍चर्य वाटलं.
ज्याला भेटायचं आहे त्या रुग्णाच्या नावाची, म्हणजेच
संतोषच्या नावाची, नोंद
रिसेप्शन काउंटरवरच्या नोंदवहीत केली आणि मला आत पाठवलं जाण्याची वाट पाहत बसलो. एक अंध कर्मचारी येणाऱ्या-जाणाऱ्यांची वहीत नोंद करून घेत त्यांचं हसून स्वागत करत होता. ऑपरेटरची
भूमिकाही तोच पार पाडत होता. इथलं रिसेप्शन काउंटर बघितल्यावर मला शहरी कॉर्पोरेट संस्कृतीतली काही दिखाऊ आणि माणुसकीरहित रिसेप्शन काउंटर्स आठवली.
मी थोड्या वेळानं त्या अंध
व्यक्तीला विचारलं : ‘‘दादा, अजून किती वेळ लागेल?’’
ती व्यक्ती म्हणाली : ‘‘मी सांगतो. दोन मिनिटं बसा.’’
त्या व्यक्तीनं खटखट आवाज करत दोन फोन लावले. मला आत जाण्याविषयी सांगायला एक महिला आतून आली व दुसरी एक महिला चहा-पाणी घेऊन आली. मी चहा घेत नाही म्हटल्यावर रिसेप्शन काउंटरवरची ती व्यक्ती मला म्हणाली : ‘‘दूध, लिंबू-सरबत...काही तरी घ्या ना दादा.’’
हा प्रेमळ आग्रह मला मोडवला नाही. हॉस्पिटलच्या वर्दळीतच
लिंबू-सरबत घेता घेता आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्या व्यक्तीच्या बोलण्यात इतका गोडवा आणि आत्मविश्वास होता की वाटत होतं, तासन्‌ तास गप्पा मारत राहावं! पण संतोषला आत भेटायला जाणंही तेवढंच महत्त्वाचं होतं.
गप्पांमध्ये खूप ओळखीपाळखी निघाल्या व आमचा विषय प्रा. डॉ. बाबुराव गुरवसरांवर येऊन थांबला. मी ज्या अंध व्यक्तीशी बोलत होतो त्या व्यक्तीचं नाव उदय माने. उदय यांचं लग्न गुरवसरांनीच लावून दिलं होतं.
मी उदय यांना म्हणालो : ‘‘थोडंसं थांबा. मी मित्राला भेटून येतो; मग आपण परत बोलू या.’’

मी संतोषकडे गेलो. त्याची तब्येत खूपच खालावलेली होती. चार-पाच तास त्याच्याबरोबर घालवले आणि तिथून निघालो.
बाहेर येऊन बघतो तर रिसेप्शन काउंटरवर आता दुसरंच कुणी येऊन बसलं होतं आणि एका कोपऱ्यात उदय माझी वाट पाहत बसले होते.
मी त्यांना म्हणालो : ‘‘अहो, अजून तुम्ही नाही गेलात?’’
ते म्हणाले : ‘‘तुम्ही म्हणाला होतात ना, मी आलोच. भेटू या, बोलू या! म्हणून तुमची वाट बघत बसलोय मी.’’
उदय यांचं काम संपून दोन-अडीच तास झाले होते तरी ते
बिचारे माझी वाट बघत ताटकळत बसले
होते. एखाद्या माणसाकडे ज्या गोष्टीची कमतरता असते त्याला त्या गोष्टीचं खूप अप्रूप असतं. आमचं खूप वेळ बोलणं झाल्यावर भावनिक
झालेले उदय माझ्या पाठीवर हात
फिरवत म्हणाले : ‘‘तुम्ही एवढा धीर देता, तुम्ही एवढं छान सांगता. तुमचे शब्द अगदी मनावर ठसतात. तुमच्या शब्दांप्रमाणेच तुमचा चेहराही मला माझ्या डोळ्यांनी पाहता येऊन माझ्या मनात, आठवणींत तो ठसला असता तर किती छान झालं असतं.’’
मी त्यांना म्हणालो : ‘‘अहो,
तुम्ही उलटं म्हणताय. उलट, तुमचंच बोलणं
माझ्या मनावर ठसतंय आणि तुम्ही माझ्या मनात! उदय (९४०४२८५८५०) यांचं
सगळं ऐकून घेतल्यावर माझ्या मनात विचार आला...या गुणी माणसाची दृष्टी या निर्दय निसर्गानं का हिरावून घेतली असावी? प्रभावीपणे बोलण्याची कला, चौफेर वाचन, वेगवेगळ्या क्षेत्रांमधली बारकाव्यांनिशी माहिती, बऱ्याच शैक्षणिक पदव्या-पदविका उदय यांच्याकडे आहेत.
मी निघतो म्हटल्यावर ते
म्हणाले : ‘‘माझं घर इथून जवळच आहे. घरी आलात तर बरं वाटेल.’’
गप्पा मारत मारत आम्ही उदय यांच्या घरी पोहोचलो. उदय यांच्या पत्नी सरिता पाटील (९४२३२५८८५०) बेडज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थिप्रिय शिक्षिका आहेत. त्यांना लेखनाचीही आवड आहे.
सरिता यांना एक हात नाही.
उदय-सरिता या दांपत्याला दोन मुली आहेत. कल्याणी आणि अवनी. निसर्गानं इथंही खेळ खेळलेला आहे. या दोन्ही मुलींमध्ये आई-वडिलाचे सर्व गुण ओतप्रोत आहेत. मात्र, वडिलांच्या
डोळ्यांमधली आनुवंशिकता कल्याणीच्याही डोळ्यांमध्ये उतरलेली आहे. ती ठीक होईल, यासाठी उदय-सरिता यांचे प्रयत्न सुरू
आहेत. थोडंबहुत यशही येत आहे.
उदय-सरिता यांचं
सगळं घर वेगवेगळ्या पारितोषिकांनी आणि पुस्तकांनी भरलेलं आहे. दोन्ही मुली अभ्यासात दंग होत्या. उदय-सरिता यांनी
वेगवेगळ्या चळवळींत जे योगदान दिलं आहे त्याविषयीची माहिती मला त्यांनी दिली.
आपल्या लग्नाविषयी बोलताना सरिता म्हणाल्या : ‘‘मला हात नाही, त्यामुळे माझं लग्न ठरण्याच्या वेळी अनेक ठिकाणी ‘डिमांड’ केल्या जायच्या. कुणी म्हणायचं, दोन एकर शेती द्या...कुणी म्हणायचं, नवऱ्यामुलाला नोकरी लावून द्या...तर कुणाची इच्छा होती घरजावई म्हणून राहण्याची. माझ्या वडिलांनी आणि मी विचार केला की
दोन-तीन डिग्र्या शिकूनही आणि आपल्याकडे सर्व काही असूनही, केवळ अपंगत्व आहे, या कारणामुळे मुलांकडच्यांच्या या ‘डिमांड’ पूर्ण करणं काही बरोबर नाही.
ज्या ज्या लोकांकडून अशा ‘डिमांड’ केल्या गेल्या, ज्यांची ज्यांची
बुद्धी अपंग आहे, अशा घरातल्या कुठल्याही मुलाशी लग्न करायचं नाही हा माझा निर्णय होता आणि
वडिलांचाही. एका कार्यक्रमादरम्यान उदय यांच्या शिक्षक असलेल्या वडिलांची भेट झाली. माझे विचार त्यांना
आवडले. उदय यांना मी जेव्हा भेटले तेव्हा ठरवून टाकलं की आपण या
माणसाचे डोळे बनून आयुष्यभर याला दृष्टी द्यायची. आम्हा दोघांची मैत्री जेव्हा फुलत गेली
तेव्हा उदय यांनीही ठरवून टाकलं की आपण सरिताचे हात बनायचं आणि आयुष्यभर तिची साथ सोडायची नाही.’’
उदय-सरिता यांनी त्यांच्या लग्नाची ‘सक्‍सेस-स्टोरी’ सांगितली. त्यांच्या लग्नाला पंधरा वर्षं उलटून गेली आहेत. दोघं
लग्नाच्या दिवशी जसे एका ताटात जेवले होते तसेच ते आजही एकाच ताटात जेवतात. सगळे व्यवहार सरिता करतात आणि कामं झाल्यावर उदय यांना समजतं की कामं केव्हाच मार्गी लागली आहेत. असा एकमेकांचा एकमेकांवर विश्वास!
* * *

‘बाबुराव गुरव’ नावाच्या एका ‘चळवळी’नं त्या भागात अशा
कितीतरी लग्नांच्या सक्‍सेस-स्टोरीज् घडवून आणलेल्या आहेत. सरिता यांच्यासारख्या कित्येक मुलींचं कन्यादान गुरवसरांनी केलं आहे; किंबहुना महाराष्ट्रात
समाजवादी चळवळी ज्या होत्या आणि आहेत, त्यांत
असे अनेक ‘गुरवसर’ एकीकडे वडील म्हणून कन्यादान करतात; तर
दुसरीकडे जाती, परंपरा, रूढी यांना खतपाणी घालणाऱ्या प्रथांना आळाही घालतात. गुरवसर या
वयातही हे काम करत आहेत.
सरिता म्हणाल्या : ‘‘मला पुढं
शिकू देणारा, नोकरी
करू देणारा नवरा हवा अशी माझी अट होती. तो काळा आहे की गोरा आहे की कुठल्या जातीचा आहे की व्यंग असलेला आहे याचा मी
कधीही विचार केला नाही.
इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि आपण जे काही ठरवलेलं असेल ते प्रत्यक्षात उतरवता येतंच.’’
मला वाटून गेलं की
गरीब शेतकऱ्याच्या या मुलीत इतका आत्मविश्वास कुठून आला असेल! सरिता यांच्या केवळ बोलण्यातच हा आत्मविश्वास आहे असं नाही, तर त्यांच्या लेखनात, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतही तो आहे. स्त्रियांची चळवळ, पुरोगामी चळवळ आदींशी एकरूप राहून
ते काम अजूनही प्रभावीपणे राबवलं जावं असा सरिता यांचा आग्रह आहे आणि त्यांच्या आग्रहाला
उदय यांची मोठी साथ-सोबत आहे. उदय हे नोकरीबरोबरच ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ या अंध-अपंगांशी संबंधित संस्थेचंही काम करतात. अंधांचं शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन आणि अंधत्वनिवारण करण्याचं काम या संस्थेमार्फत चालतं. या सगळ्या कामांत त्यांचा सहभाग असतो. ही माणसं किती आनंदानं जगतात आणि तेही दुसऱ्यांसाठी!
अवयवांसंदर्भात कमनशिबी असलेली ही माणसं मनानं आणि कामानं इतकी मोठी असतात की
त्यांच्या कामापुढं, त्यांच्या
सकारात्मक जीवनशैलीपुढं ‘सगळं काही ठीकठाक’ असणारी माणसं खुजी वाटू लागतात.
उदय-सरिता यांच्या लग्नाचे फोटो, त्यांनी वेगवेगळ्या पुरोगामी चळवळींमध्ये केलेल्या कामांचे फोटो, वेगवेगळ्या कार्यक्रमांत पारितोषिकं स्वीकारतानाचे फोटो पाहता पाहता तीन तास कसे गेले ते कळलंच नाही.
सरिता आतमध्ये गेल्या. आंब्याच्या फोडी त्यांनी
दोन प्लेटमध्ये आणल्या. एक प्लेट मला दिली
आणि दुसऱ्या प्लेटमधल्या फोडी दोघांनी एकत्र खाल्ल्या.
उदय यांनी हात पुढं केला की सरिता त्यांच्या हातावर आंब्याची फोड ठेवायच्या. उदय यांची फोड संपेपर्यंत सरिता आपलं खाणं संपवायच्या आणि पुन्हा त्यांच्या हातात दुसरी
फोड ठेवायच्या. आंब्याच्या फोडी खाणं हे एक उदाहरण झालं; पण त्यातूनच त्या दोघांचं अंडरस्टँडिंग किती नेमकं, अचूक आहे हे मला दिसून आलं. या प्रकारे लग्न झालेल्या बऱ्याच सक्‍सेस-स्टोरीज् माझ्या पाहण्यात होत्या; पण या
पद्धतीची सक्‍सेस-स्टोरी माझ्या पाहण्यात नव्हती.
उदय-सरिता यांच्या सक्सेस-स्टोरीचं वैशिष्ट्य म्हणजे, दोघांनी रूढी-परंपरांवर तर
विजय मिळवला होताच; पण
निसर्गावरही मिळवला होता.
जोडीदारापैकी एकाला हात नाही आणि दुसऱ्याला डोळे नाहीत, तरीही त्यांचं जगणं, त्यांचं सहजीवन किती सुंदर होतं...सुंदर आहे हे मला दिसलं.
काहीतरी चांगलं करत राहायचं ही भावना या जोडप्यात आहे आणि याच भावनेचा सुगंध
दोघांच्याही आयुष्यात भरून उरला आहे.
मी निघालो तेव्हा उदय-सरिता यांच्या दोन्ही
मुली माझ्याकडे पळत आल्या व मला त्यांनी वाकून नमस्कार केला. ‘मामा परत या...’असा
लडिवाळ आग्रह त्यांनी मला केला.
अगदी डोळस माणसासारखी झपझप पावलं टाकतं उदय मला गाडीपर्यंत सोडायला आले. सरिता आणि दोन्ही मुलीही सोबत होत्याच.
मी दोन्ही मुलींना गाडीतून एक
चक्कर मारली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन माझ्या रस्त्याला लागलो.
असे अनेक ‘उदय’ आणि ‘सरिता’ कुठल्याही अपेक्षा न ठेवता आपलं जीवन आनंदानं जगत असतील; पण काही ‘सरिता’आणि काही ‘उदय’ यांच्या वाट्याला सगळं काही असूनही समाधान मात्र नसतं. समाधान नसलेली अशी खूप जोडपी आहेत व त्याचं कारण एकच व ते म्हणजे,
माणसाकडे सगळं काही असेल आणि ते सहज मिळालेलं असेल तर त्याची किंमत नसते. जे कमावलेलं आहे, जे स्वकर्तृत्वातून, विचारांतून मिळवलेलं आहे ते उपभोगायलाही मजा येते. आपण हल्ली स्वकर्तृत्वानं काही करायला विसरलो आहोत काय? उदय-सरिता या सक्सेस-स्टोरीकडे बघून मला तरी तसंच वाटलं. मी निघालो...मोडणाऱ्या अनेक लग्नांच्या अनसक्सेसफुल स्टोरीज् मला वाटेत आठवत राहिल्या आणि त्यांची कारणंही मला पटापट दिसत होती. जीवन जगताना काही जोडपी अयशस्वी का होतात आणि काही इतकी यशस्वी का होतात, याचं कारण या जोडप्याच्या अवतीभवती
दडलेल होतं. तुम्हीही शोधा, म्हणजे सापडेल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write bhramnti live article