आई तुझी आठवण येते...! (संदीप काळे)

संदीप काळे sandip.kale@esakal.com
रविवार, 1 सप्टेंबर 2019

आईला काय आवडायचं, ती कशी हळवी होती आणि जणू देवाचंच रूप कशी होती हे कविताताई मला तन्मयतेनं सांगत होत्या. मुली आईविषयी किती हळव्या असतात आणि त्याच हळव्या मुलीची आई जर आता हयात नसेल तर जुन्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर होऊन त्या किती भावुक होतात हे मी प्रत्यक्ष पाहत होतो...

आईला काय आवडायचं, ती कशी हळवी होती आणि जणू देवाचंच रूप कशी होती हे कविताताई मला तन्मयतेनं सांगत होत्या. मुली आईविषयी किती हळव्या असतात आणि त्याच हळव्या मुलीची आई जर आता हयात नसेल तर जुन्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर होऊन त्या किती भावुक होतात हे मी प्रत्यक्ष पाहत होतो...

बुलडाण्याची सकाळ माझ्यासाठी वेगळी होती. कारण, गेले तीन दिवस मी पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाच्या वातावरणात घालवले होते आणि इकडं विदर्भात बुलडाण्यात पाऊस एकदम गायबच होता. ऑफिसची कामं आटोपली, पिठलं-भाकरी मिळेल अशा छोट्याशा हॉटेलात मी आणि माझे सहकारी जेवायला गेलो. दोन घास पोटात गेले नसतील तोच मला एक फोन आला.

‘‘नमस्कार. मी खामगावहून कविता रमेश आटोळे (संपर्क :९४०३४७५८५६) बोलतेय. तुमचं ‘मु. पो. आई’ नावाचं पुस्तक मला पद्मजा वासुदेव या मुंबईतल्या लेखिका मैत्रिणीनं पाठवलं. पुस्तक वाचून मला खूप आनंद झाला...’’
कविताताईंच्या यांच्या स्वरातला आनंद लपत नव्हता.
मी ‘धन्यवाद’ म्हणालो आणि त्यानंतरही कविताताईंचं बोलणं सुरू होतंच. आई हा विषय आपल्या किती आवडीचा आहे आणि त्यावर आपण किती वेगवेगळ्या पद्धतीनं काम केलंय, करतोय याचे अनेक दाखले त्यांनी मला फोनवरून बोलताना दिले.
त्या बोलत होत्या आणि मी ऐकत होतो.
‘‘सहा महिन्यांत ‘मु. पो. आई’च्या तेरा आवृत्त्या निघाल्या ही कमालच आहे ना? तुमच्या आईचा आशीर्वाद...बाकी काय?’’ असं म्हणत एकदाचं त्यांनी त्यांचं बोलणं थांबवलं. कविताताईंनी मला जे काही सांगितलं ते सगळं हट के होतं, वेगळं होतं.
मी म्हणालो : ‘‘तुमचं गाव कोणतं? तुम्ही राहता कुठं?’’
त्या म्हणाल्या : ‘‘मी मूळची कुरणगाडा इथली; पण सध्या खामगावला स्थायिक आहे.’’
मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद दिले आणि फोन ठेवून दिला.
माझं जेवण सुरू होतं; पण कविताताईंनी सांगितलेले ते सगळे विषय डोक्‍यात घुमू लागले. ऑफिसचं काम आटोपलं होतं. उरलेलं काम फोनच्या माध्यमातून मार्गी लागणार होतं. कविताताईंना परत फोन केला आणि म्हणालो :‘‘ताई, मी येतोय बरं का खामगावला तुम्हाला भेटायला.’’

‘मी थेट घरी येतोय’ असा माझा निरोप फोनवरच्या बोलण्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच ऐकून कविताताईंना धक्का बसणं साहजिकच होतं. बुलडाण्याहून निघाल्यावर खामगावपर्यंत ‘आई’ या विषयासंदर्भातल्या अनेक आठवणी माझ्या मनात येत होत्या. प्रत्येकाच्या आयुष्यात आईबाबतचा एक कप्पा असतो आणि तो कप्पा
कधी लेखनाच्या, तर कधी संवादाच्या माध्यमातून समोर येतो तेव्हा माणूस हळवा बनतो. ‘मु. पो. आई’ या पुस्तकाच्या माध्यमातून मी अनेक मुलांचं आणि त्यांच्या आईचं हळवेपण अनुभवलं होतं. आज ज्या कविताताईंकडं मी निघालो होतो त्या अशाच एका आईच्या वेगळ्या विश्वात मला घेऊन जाणार होत्या. कविताताई यांच्याशी काय बोलावं, त्यांच्याशी कुठल्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करावी याचा आराखडा माझ्या मनात तयार होत होता. कविताताईंनी दिलेल्या पत्त्यावर मी पोचलो. खुशालीच्या गप्पा झाल्यावर मी मुख्य विषयाकडं वळलो आणि विषयाच्या अनुषंगानं कविताताईंना बोलतं केलं.
‘आई’ या विषयावर एकीकडं त्या भरभरून बोलत होत्या; तर दुसरीकडं अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. त्यांची सगळी कथा ऐकल्यावर मीही भाववश झालो. कविताताईंना आठ भाऊ आणि एक बहीण. ११ वर्षांपूर्वी कविताताईंची आई गेली.
आईच्या आठवणींनी हळव्या झालेल्या कविताताईंनी आईवरच्या कवितांची १४ पुस्तकं काढली. कवितांच्या माध्यमातून त्यांनी आईविषयीच्या सगळ्या आठवणी जागवल्या आहेत. त्यांची ती सगळी पुस्तकं माझ्यासमोर होती. प्रत्येक कवितेच्या शब्दामधून त्यांचं आणि त्यांच्या आईचं असलेलं नातं डोळ्यांसमोर येत होतं.
आई हाक अशी
देवही आळवती
आईची प्रतिमा अशी
पंढरीच्या पांडुरंगासारखी

किंवा
आई आई म्हणत रडत बसते मी
तिला चितेवर जळताना पाहिले मी
चंद्र-तारेही उदासले तेव्हा
फुले-कळ्याही कोमजल्या तेव्हा

अशा भावनिक कविता कागदावर उतरवून त्या कविता महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम कविताताईंनी केलं आहे.
कविताताई म्हणाल्या :‘‘माझी आई पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्त होती. ती पंढरीला आपलं माहेर समजायची. माझ्या नवऱ्यानं आणलेलं पंढरपुरातलं जांभळ्या रंगाचं शेवटचं लुगडं तिनं शेवटपर्यंत आपल्या उश्याला ठेवलं होतं. त्याच लुगड्यावर आम्ही तिला निरोप दिला. ‘आईच्या चितेला मी अग्नी द्यावा अशी माझी इच्छा आहे,’ अशी विनंती मी माझ्या भावांकडं केली होती आणि तसं करण्याचा अधिकार भावानंही मला दिला. आईच्या चपलाही मी भक्तिभावानं जपून ठेवल्या आहेत.’’

आईला काय आवडायचं, ती कशी हळवी होती आणि जणू देवाचंच रूप कशी होती हे कविताताई मला तन्मयतेनं सांगत होत्या. मुली आईविषयी किती हळव्या असतात आणि त्याच हळव्या मुलीची आई जर आता हयात नसेल तर जुन्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर होऊन त्या किती भावुक होतात हे मी प्रत्यक्ष पाहत होतो.
‘‘आई गेली हे जेव्हा कळतं त्या क्षणी आपलाही जीव गेलेला असतो! नऊ महिने आपण ज्या गर्भात वाढतो त्या गर्भाची, त्या शरीराची घट्ट नाळ आपल्या मनाशी जोडलेली असते म्हणूनच आई आपल्या शरीराचा दुसरा भाग असते...’’ असं खूप काही अंतर्मुख होऊन कविताताई बोलत होत्या.
आपण जेवढं कमावतो त्यातून दरवर्षी चार लोकांना तरी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन जायचं आणि त्या माध्यमातून आपल्या आईची आठवणी जागवायच्या हा नित्यक्रम कविताताईंनी जपला आहे. आईच्या पुण्यतिथीला गरजूंच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, स्त्री-भ्रूणहत्येसंदर्भात जागरूकतेचे कार्यक्रम, ‘लेक शिकवा’ आदी मोहिमांच्या माध्यमातून त्यांनी आईच्या आठवणी जागत्या ठेवल्या आहेत...
कविताताईंच्या आई वत्सला शेळके यादेखील कवयित्री होत्या. त्या भजनं उत्तम म्हणायच्या. भोणगाव हे वत्सलाबाईंचं गाव. घरचा सांस्कृतिक ठेवा वत्सलाबाईंकडं आला आणि त्याच वत्सलाबाईंचा ठेवा कविताताईंकडं आला आणि मग ती कविता फुलत गेली. कवितांचा वेलू मांडवावर दूरपर्यंत पोचला.

कविताताईंनी आपली सर्व पुस्तकं माझ्यासमोर ठेवली. प्रत्येक कवितेत वेगवेगळे विषय असल्याचं मला जाणवलं. प्रेम, विरह, दु:ख, आईपण, बाईपण असे अनेक विषय होते त्या कवितांमध्ये.
वात्सल्यसिंधू आईविषयी भावनिक असणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आयडॉलच वाटल्या कविताताई!
आपल्या आईला तुच्छ मानणाऱ्या, आईची पर्वा न करणाऱ्या; किंबहुना आई नको असलेल्या प्रत्येक मुलीची - आणि मुलांचीही - या कविताताईंशी भेट व्हावी असं मला वाटून गेलं.
आपल्या शरीराचा एक तुकडा बाहेर काढून दुसरं शरीर निर्माण करणाऱ्या त्या आईला कविताताईंनी जिवंतपणीही सतत आनंदी ठेवलं. त्या आता हयात नसतानाही दोघींच्यातलं प्रेम कमी झालेलं नाही! आई चांगली किंवा वाईट नसते, ती शेवटी फक्त आईच असते, तुम्ही तिला कुठल्या चष्म्यामधून पाहता तो चष्मा महत्त्वाचा असतो, असं कविताताईंच्या सगळ्या प्रवासावरून मला दिसत होतं.

कविताताईंना दोन मुलं. थोरला वरुणराज. हा बीएस्सी, बायोटेक करून प्राध्यापक झालाय; तर दुसरा चक्रवर्ती. तो बीई करून इंजिनिअर झालाय. म्हणजे वत्सलाबाई आपल्या आईवर काव्य करायच्या, नंतर कविताताई आपल्या आईवर दीर्घ काव्य लिहितात; तसंच काहीसं या दोन्ही मुलांचंदेखील आहे असं मला वाटलं. वात्सल्याचा हा वेलू वाढ म्हटल्यानं वाढलेला नाही, तो रक्तातूनही आलेला नाही; तर तो संस्कारांतून आलाय, शिकवणुकीतून आलाय म्हणून या घरात पिढ्यान्‌ पिढ्यांपासून आई आणि मुलं यांच्यातलं नातं दृढ झालेलं आहे.

आईशी नातं घट्ट नसल्यामुळे घडणाऱ्या मन हेलावून टाकणाऱ्या अनेक कथा, घटना महानगरांमध्ये आपल्याला दिसतात. वाटतं, आई आणि मुलं यांच्यातल्या नात्याला जागतिकीकरणाच्या रेट्यानं नजर लावलीय. स्वत:ला प्रोफेशनल म्हणवून घेणारा ‘तो’ प्रत्येक माणूस आज आईसाठी काय करतो हा प्रश्न उपस्थित केला तर प्रामाणिकपणे उत्तर देणाऱ्याचं उत्तरही धक्कादायक येईल.

कविताताई आपल्या सासूबाई शांताबाई आटोळे यांच्याविषयी म्हणाल्या : ‘‘आई जवळ नसल्याची उणीव मला माझ्या सासूबाईंनी कधी भासू दिली नाही. आमच्यातलं सासू-सुनेचं नातं लेक-मुलीचं कधी झालं हे मला कळलंच नाही. आमच्या नातेवाइकांमधल्या कुठल्याही मुलीनं कधी सासू आणि आई यांच्यात फरक केला नाही. कदाचित त्यामुळेच आमच्यातलं आई-मुलीचं असलेलं प्रेम अबाधित असेल.’’
‘आई’चे वेगवेगळे पैलू उलगडणाऱ्या खूप कविता आपल्याला
दशमी आणि एकादशी या दोन दिवशी सुचतात असं कविताताईंनी सांगितलं! हे दोन्ही दिवस त्यांच्यासाठी खूप भावनिकतेचे आहेत. याचं कारण पंढरपुरात असणाऱ्या विठ्ठलाच्या श्रद्धेभोवती फिरणारं आहे.

कविताताईंच्या घरी तीन तास कसे गेले हे कळलंच नाही. कविताताईंना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला. हार घातलेला वत्सलाबाईंचा फोटो अधिकच हसरा होऊन माझ्याकडं पाहत होता. कदाचित त्या फोटोलाही कविताताईंविषयी काहीतरी सांगायचं असावं...कुणास ठाऊक! त्या फोटोसमोर मी नतमस्तक झालो आणि परतीच्या रस्त्याला लागलो. परतीच्या सगळ्या प्रवासात मला कविताताई, आईवरच्या त्यांच्या कविता, आईविषयी त्यांनी सांगितलेल्या आठवणी हे सगळं आठवत राहिलं. त्या प्रभावीपणे व्यक्त झाल्या.

आपल्या आईवरच्या कवितांची तब्बल १४ पुस्तकं त्यांनी काढली. आणखी चार पुस्तकं होतील एवढं आईविषयीचं त्यांचं साहित्य अजून तयार आहे.
कविता यांचा आईविषयीचा हळवा कप्पा यानिमित्तानं लोकांसमोर आला. आईचं वात्सल्य, आईचं आपल्या मुलांवर असलेलं प्रेम आणि मग वयाच्या प्रत्येक वळणावर तिनं मुलांसाठी छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी पावलोपावली दिलेलं बलिदान हे सगळं जवळपास प्रत्येकानंच अनुभवलेलं असतं. काही जण या प्रेमाला मुकतातही. ज्यांना आईचं प्रेम मिळत नाही त्यांच्यासाठी कुठली ना कुठली व्यक्ती आई बनून पुढं येतेच. त्यातूनही आईची माया सातत्यानं अनुभवता येते.

आपल्या आईच्या पश्चातही तिच्यासाठी कविताताईंनी सुरू ठेवलेलं काम इतर अनेक ‘कवितां’साठी, त्यांच्या आईसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे. कविताताईंच्या या कामातून आईपण आणि बाईपण अनेक कवितांना मिळो...त्यांची आईविषयीची कर्तव्ये, प्रेमभावना फुलत राहो. जेष्ठ कवी फ. मुं. शिंदे सरांची ‘आई’ ही कविता मला दहावीला होती. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी मनात खोलवर उतरतात आणि विचार करायला भाग पडतात...
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीचा ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी...सरतही नाही, उरतही नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write mother bhramti Live article