"मुलांशी संवाद महत्त्वाचा' (सावनी शेंडे-साठ्ये)

सावनी शेंडे-साठ्ये
रविवार, 31 मे 2020

जीवन प्रत्येकवेळी सारखं नसतं, तर जीवनात दुःखही असतं, अपयशही असतं. तेही पचवावं लागतं, हे मुलांना समजलं पाहिजे. या गोष्टी पालकांनी मुलांना सांगितल्या पाहिजेतच; पण स्वतःदेखील अवलंबल्या पाहिजेत. कारण मुलं सतत आपलं निरीक्षण करत असतात.

जीवन प्रत्येकवेळी सारखं नसतं, तर जीवनात दुःखही असतं, अपयशही असतं. तेही पचवावं लागतं, हे मुलांना समजलं पाहिजे. या गोष्टी पालकांनी मुलांना सांगितल्या पाहिजेतच; पण स्वतःदेखील अवलंबल्या पाहिजेत. कारण मुलं सतत आपलं निरीक्षण करत असतात. पालकांनी मुलांशी सतत संवाद ठेवला पाहिजे. कोणतीही गोष्ट मग ती खूप महत्त्वाची असो वा अगदी क्षुल्लक असो मुलांना ती सर्वप्रथम पालकांना सांगावीशी वाटली पाहिजे. इतकी त्यांना तुमची ओढ लागली पाहिजे. पालक आणि मुलं यांच्यातला संवाद मला सर्वांत महत्त्वाचा वाटतो.

 

माझ्या पालकांकडून मी असंख्य चांगल्या गोष्टी शिकले. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे माणूस म्हणून खूप चांगल्या रितीनं जगायला शिकले. माणूस म्हणून त्यांनी आम्हाला खूप समृद्ध केलं. गाण्याचा वारसा त्यांच्याकडूनच आला आहे, हे तर सगळ्यांना माहीतच आहे; पण त्याहीपलीकडे जाऊन एक चांगला कलाकार कसा असला पाहिजे हे त्यांनी शिकवलं. कलाकार म्हणून केवळ प्रसिद्धीच्या मागं न लागता समाजासाठी तुमचं काही देणं आहे आणि समाजाला आनंद देण्यासाठी तुम्हाला अपॉइंट केलं आहे, ही भावना त्यांनी मनात सुरुवातीपासूनच रुजवली. तीच भावना घेऊन मी आजही रंगमंचावर जाते. ही भावना मला खूप महत्त्वाची वाटते.

माझी आई सामाजिक कार्यकर्ती होती. बरीच वर्षं आईनं विशेष मुलांसाठी, गरीब आणि विकलांग मुलासाठी काम केलं. दारिद्रयरेषेच्या खाली असणाऱ्या मुलांसाठी काम करताना तिचा बराच वेळ त्यांच्यात गेलेला आहे. समाजात असेही लोक असतात, ज्यांच्यापेक्षा आपण कितीतरी नशीबवान आहोत आणि कितीतरी गोष्टी आपल्याला किती सहज मिळतात हे मला आईच्या कामामुळे समजलं. आई काम करायची ती संस्था समाजातल्या गरजूंसाठी मदत करायची. म्हणून समाजाच्या त्या बाजूची आम्हाला माहिती होती आणि आम्ही त्याबाबत लहानपणापासून जागरुक होतो. बरेचदा सुखवस्तू घरातली माणसं आपलंच दुःख कवटाळून बसतात; पण आजूबाजूला नजर टाकली, तर डोंगराएवढी दुःख असणारी माणसं असतात. त्यांच्यापुढे आपलं दुःख काहीच नसतं, अशा सगळ्या गोष्टी आईमुळे समजल्या. कारण बरेचदा मी आईबरोबर अशा लोकांना भेटायला जायचे. त्यातून समाजाची दुसरी वास्तव बाजू समजली आणि माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होता आलं.

मी खूप लहान होते तेव्हाचा प्रसंग आठवतोय. मला बार्बी डॉल हवी होती. "कामावरून येताना तू ती आण,' असं मी आईला सांगितलं होतं; पण येताना आई ती बाहुली आणायला विसरली. मी तिच्यावर त्यामुळे रागावले. माझी समजूत काढताना ती मला सांगू लागली, की "मी काही मुलींसाठी काम करायला गेले होते, त्यामुळे मला यायला उशीर झाला आणि घाईगडबडीत मी बाहुली आणायला विसरले.' हे सांगताना तिनं मला तिच्या फाइलमधल्या त्या मुलींचे फोटो दाखवले आणि त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगू लागली. ते बघून मला खूपच वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी आईनं न विसरता माझ्यासाठी बार्बी आणली; पण बाहुली बघून मी आईला म्हणाले ः ""आई, मला नको बाहुली. तू ही त्या फोटोतल्या मुलीला दे.'' आपल्याला काय नको आहे, हे तेव्हापासून मला समजू लागलं. समाजाकडे, जीवनाकडे आणि आपल्या गरजांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आईनं मला दिली.

बाबांना मी सुरवातीपासूनच दोन भूमिकांमध्ये बघत आले आहे. एक सुरांचा यज्ञ करणारा माणूस आणि दुसरी भूमिका म्हणजे अतिशय प्रेमळ वडील. दोन्ही भूमिका करताकरता त्यांची कसरत व्हायची. समोर गाणं शिकायला मुलगी बसली आहे, तेव्हा कठोर परिश्रम करून गुरू म्हणून तिच्याकडून कठीण रियाज करून घ्यायचा आणि ती भूमिका संपल्यावर पुन्हा वडिलांच्या भूमिकेत यायचं आणि एक वेगळं जग आम्हाला दाखवायचं. असं हे फार विलक्षण नातं मी बाबांकडून बघत आले आहे. बाबा त्यांचं क्‍लिनिक सांभाळून आजीकडे, वीणाताई सहस्त्रबुद्धे यांच्याकडे; तसंच इतरांचही गाणं ऐकायला आम्हाला नेत असत. त्यांनी केलेले हे संस्कार आमच्याबरोबर कायम राहातील.

आता मी आई झाल्यावर मला माझ्या पालकांनी शिकवलेल्या मूल्यांचं महत्त्व अधिक ठळकपणे जाणवतंय. आता समाज खूपच बदलला आहे; पण तरीही पालकांनी शिकवलेली काही मूलभूत मूल्यं मी माझ्या मुलांना म्हणजे राही आणि रिशानला नक्कीच शिकवते. काळानुसार आवश्‍यक बदल मी करते; पण मूळ तत्त्व मात्र आजही तेच आहे. विशेष म्हणजे ती मूल्यं मुलांनाही आवडतात. राही दहा वर्षाची आहे, तर रिशान पाच वर्षांचा आहे. रिशान लहान असला, तरी राहीला मात्र बऱ्यापैकी समजतं. ती नेहमीच मी सांगत असलेल्या माझ्या लहानपणीच्या गोष्टींचा आग्रह धरते.

पालकत्व अनुभवणं खूप विलक्षण असतं. मीच मुलांकडून बऱ्याच गोष्टी शिकत असते. पालकत्वाचा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. कोणी आयुष्यात तो चुकवू नये असं मी म्हणीन. मुलांबरोबर आपण आणि आपल्याबरोबर मुलं असे दोघंही बरोबरच वाढत असतात. काही वेळा आपलंच प्रतिबिंब मुलांमध्ये दिसतं, तर काही वेळा त्यांनी केलेली एखादी गोष्ट आपल्याला आश्‍चर्यचकित करते. आपल्याला हे का नाही सुचलं असही वाटतं. काही वेळा आपणच शिकवलेल्या गोष्टीतं छान फळही मिळतं. अशा वेगवेगळ्या सर्वच अनुभवांचा आनंद मिळत असतो.

एकदा राही सोशल मीडियावरच्या सेलिब्रिटी वगैरेंच्या पोस्ट बघून मला म्हणाली ः ""आई, मला फार छान वाटतं की तू सोशल मीडियावर तुझ्या पोस्ट जास्त टाकत नाहीस.'' मी म्हटलं ः ""का गं, तुला असं का वाटतं?'' त्यावर ती म्हणाली ः ""आई, आपण काही विशेष काम अथवा आणखी काही करत असलो, तर त्याच्याबद्दल लोकांनी दखल घेऊन लिहिलं पाहिजे. आपणच आपल्याबद्दल लिहिणं यात काय मजा आहे.'' मला तिच्या या बोलण्याचं मनापासून कौतुक वाटलं. एवढ्या लहान वयात ही समज बघून आनंदही वाटला. मी स्वतः माझ्या कार्यक्रमाबद्दल, "कार्यक्रम झाला' या व्यतिरिक्त फारसं काही लिहीत नाही. स्वतःच स्वतःबद्दल लिहिणं मला योग्य वाटत नाही. एकदा राही म्हणाली ः ""आपण माझा वाढदिवस अंधशाळेत साजरा करू या का?'' मुलांचे असे विचार बघून मनापासून छान वाटतं. राहीनं आतापर्यत कुठल्याच वाढदिवसाला कधीही एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला नाही. रिशानचंही असच आहे. मी सोबत असले म्हणजे बास! बाकी त्याला वस्तूंमध्ये फारसा इंटरेस्ट नाही. मला वाटतं मुलांची मानसिकता घडवण्यात घरातलं वातावरण, पालकांचे विचार या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आमच्या घरात होणाऱ्या चर्चा मुलं ऐकत असतात आणि त्यातून मुलांची विचारसरणी घडत असते. मी नेहमी मुलांना माझ्या लहानपणीच्या गोष्टी, इतर बोधकथा सांगत असते. आता लॉकडाऊनमध्ये रामायण, महाभारत योगायोगानं सुरू झालं. मी लहानपणीची आठवण म्हणून मुलांना त्याबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यातल्या गोष्टी आता खूप एन्जॉय केल्या आणि कदाचित त्यातली काही मूल्यंही त्यांनी घेतली असावीत. थोडक्‍यात आपण सांगितलेल्या गोष्टींचा मुलांवर खूप प्रभाव पडत असतो.
आई-वडिलांच्या इच्छांचा दबाव मुलांवर कधीच पडता कामा नये. तू हेच बन किंवा अमुकच कर याचं प्रेशर मुलांना देऊ नये. त्यांची आवड, इच्छा ओळखून त्यानुसार मुलांना हवे ते छंद किंवा करिअर निवडू द्यावेत. बरेचदा मुलांचा छंद वेगळा असतो आणि करिअर म्हणून त्यांना दुसरीच वाट निवडावीशी वाटते. अशा वेळी पालकांनी मुलांच्या मताचा स्वीकार केला पाहिजे. त्यांच्या मार्गाची निवड त्यांना करू द्यावी- आपण फक्त सोबत राहावं. लहानपणापासून मुलांच्या आवडीनिवडी जोपासाव्या, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं. त्याबरोबरच काही मूल्यंही त्यांच्यामध्ये रुजवावीत. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं घडण्यास मदत होते. प्रत्येक वेळी ब्रॅंडेड कपडे आणून, मॉल्समध्ये जाऊन खरेदी करण्याची सवय तुम्ही मुलांना लावणार असाल, तर पुढे त्यांनाच याचा त्रास होणार आहे. कारण अचानकपणे भविष्यात कधी लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली, तर अशा वेळी मुलांमध्ये अस्वस्थता खूप वाढते. जीवन प्रत्येकवेळी सारखं नसतं, तर जीवनात दुःखही असतं, अपयशही असतं. तेही पचवावं लागतं, हे मुलांना समजलं पाहिजे. या गोष्टी पालकांनी मुलांना सांगितल्या पाहिजेतच; पण स्वतःदेखील अवलंबल्या पाहिजेत. कारण मुलं सतत आपलं निरीक्षण करत असतात. पालकांनी मुलांशी सतत संवाद ठेवला पाहिजे. कोणतीही गोष्ट- मग ती खूप महत्त्वाची असो वा अगदी क्षुल्लक असो- मुलांना ती सर्वप्रथम पालकांना सांगावीशी वाटली पाहिजे. इतकी त्यांना तुमची ओढ लागली पाहिजे. पालक आणि मुलं यांच्यातला संवाद मला सर्वांत महत्त्वाचा वाटतो. यामध्ये मुलं विश्वास, आनंद या गोष्टी शेअर करायला शिकतात. मनात काही राहत नाही त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलतं. कधी कधी समोर बसवून मुलांना त्यांच्या चुका सांगाव्या लागतात, तर कधी कधी अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचं उदाहरण देऊन समज द्यावी लागते. तीदेखील खेळीमेळीच्या वातावरणातच द्यावी. मुलांना तुम्ही जेवढ्या प्रेमानं आणि विश्वासानं एखादी गोष्ट सांगाल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आणि विश्वास तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल.

एकदा मी एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि यायला मला उशीर झाला. मी घरी सासूबाईंना आणि मुलांना आधीच सांगितलं होतं, की मला उशीर होईल, तेव्हा तुम्ही वेळ झाली की जेवून झोपा. साडेअकरा-पावणेबाराला मी घरी आले आणि बघते तर मुलं जागीच होती. झोपला का नाहीत, असं विचारलं तर दोघं म्हणाली ः ""आई, आम्ही दुपारी छान झोपलो होतो, त्यामुळे झोप नाही आली.'' मी म्हटलं ः ""ठीक आहे, चला आता पटापट झोपा. उद्या शाळा आहे.'' त्यावेळी दोघं म्हणाली ः ""आई, तुला भूक लागली असेल ना?'' मी म्हणाले ः ""हो.'' कारण कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मी जेवण करून वा खाऊन जात नाही. मी डायनिंग टेबलवर जेवायला बसले, तर ही दोघं तिथं आली आणि अचानक त्यांना काय झालं माहीत नाही; पण रिशान मला म्हणाला ः ""तुझं तीन तासांचं गाणं झालं ना आई! मग तुझी पाठ दुखत असेल, थांब मी दाबून देतो.'' असं म्हणून तो माझी पाठ दाबू लागला. मी म्हणाले ः ""अरे, माझी काही पाठ वगैरे दुखत नाहीये'' एवढं बोलत नाही तर दुसरीकडे राही मला दहीभात भरवू लागली. संपूर्ण दहीभात तिनं मला भरवला. तोपर्यंत रिशान पाठ दाबत होता.
मला आई म्हणजे माझ्या सासूबाई म्हणाल्या ः ""अगं, मी त्यांना केव्हाची झोपायला सांगत आहे; पण ती ऐकतच नाहीयेत.'' मी घळाघळा रडत होते. डोळ्यांतलं पाणी थांबेचना! इतका तो हृदयस्पर्शी प्रसंग होता.

निरागस प्रेमाचा अद्‌भुत अनुभव मुलांनी मला दिला. हे निरागस प्रेम मी जपू शकतेय याचा मला जास्त आनंद होतोय. नाहीतर आजकाल बरेचदा मुलं छोट्याछोट्या भावना अनुभवत नाहीत आणि त्या व्यक्तही करू शकत नाहीत. ती एकदम मोठ्या माणसांसारखी वागू लागतात.
मी माझा गाण्याचा रियाज, कार्यक्रम हे सारं करू शकते- कारण माझे सासू-सासरे आणि नवरा निखिल यांचा मला खूप पाठिंबा आहे. मुलं समजूतदार आहेतच; पण माझे दौरे असतात तेव्हा घरच्यांच्या आधारामुळंच मी निर्धास्तपणे जाऊ शकते. बहुतेक वेळा वर्षातून एखाद-दुसराच परदेशातला दौरा मी स्वीकारते. तोही आठवडाभरात संपेल हे बघते. बाकी मग एक-दोन दिवसांचे दौरे असतात, ते सहज मॅनेज होतात. अर्थात प्रत्येक दौऱ्यावर जाताना मी मुलांना पूर्ण कल्पना देऊन जाते. का, कुठं आणि किती दिवसांसाठी जात आहे हे व्यवस्थित सांगते. राहीला सांगते- तू रिशानची व्यवस्थित काळजी घे आणि रिशानला सांगते- जे काही वाटत असेल ते माझ्याऐवजी राहीला सांग. शिवाय सासू-सासऱ्यांचा खूपच आधार आहे. काही वेळा असंही होतं, की मुलांपैकी एकाला ताप आहे; पण ठरलेला कार्यक्रम आपल्या वैयक्तिक अडचणीसाठी रद्द नाही करता येत. आपला ताण, काळजी रंगमंचाच्या खाली ठेवून रसिकांना सुरांचा निर्भेळ आनंद द्यावा लागतो. अशा परिस्थितीत मी निश्‍चिंतपणे गाऊ शकते- कारण घरी मुलांची काळजी घ्यायला माझे सासू-सासरे असतात.

रिशान आणि राही दोघांनाही गाणं ऐकायला प्रचंड आवडतं. राही हार्मोनियम आणि सिंथेसायझर वाजवते, रिशान गाणी गुणगुणत असतो; पण ती दोघं गाण्यात करिअर करतील असं मी नाही सांगू शकत. मी त्यांना गाणं शिकण्यासाठी बळजबरी कधीच नाही करणार. आमच्याकडे गाण्याबरोबर सासरी मेडिकलची पण परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी ती परंपरा चालवली, तरी मला खूप आनंद होईल. राही एकपाठी आहे. ती शाळेत टॉपर असते. तेव्हा ती डॉक्‍टर झाली, तरी मला आनंदच आहे. गाणं छंद म्हणून जोपास असं मी तिला खूप आधीच सांगून ठेवलंय. रिशान अजून खूपच लहान आहे. तेव्हा त्यांना काय करायचं ते तेच ठरवतील.

सध्याचा काळ गॅजेट्‌सचा आहे. त्यामुळे मुलांना त्याची माहिती असणं साहजिकच आहे. लहान मुलांच्या ऍनिमेटेड गोष्टी रिशान बघतो; पण त्याची वेळ ठरलेली असते. राही मात्र यूट्युबवरचे माहितीचे आणि उपयुक्त असे व्हिडिओ बघते. काही वेळा एखादं क्वीज सोडविण्यासाठी त्याची मदत घेते. नॅशनल जिऑग्राफी, डिस्कव्हरी चॅनेलवरचे काही व्हिडिओ ती बघते. तिला त्यात जास्त इंटरेस्ट आहे. ते बघायला मी परवानगी देते. अर्थात त्यातही वेळ ठरवून घे हे मी तिला सांगितलंय. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा करू नये, हा नियम ती पाळते. रिशानला सुदैवानं मोबाइलवर गेम वगैरे खेळणं फार आवडत नाही. तो टीव्हीवर कार्टून्सही बघत नाही. मात्र, अलीकडे इसापनीतीतल्या किंवा अन्य कथा अतिशय सुरेख पद्धतीनं ऍनिमेटेड स्टोरीजमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा मोह मोठ्यांनासुद्धा होतो. रिशान त्या बघतो. रिशान त्याच्या वयाच्या मानानं खूप छान मराठी बोलतो. त्याच्या बोलण्यात बरेचदा जड शब्दही येतात- ते ऐकायला मजेशीर आणि छानही वाटतं. मला वाटतं त्याचा मराठी शब्दकोश वाढण्यात या ऍनिमेटेड गोष्टींचा नक्कीच मोठा वाटा आहे. अर्थात त्याची वेळ, मर्यादा ठरवायलाच पाहिजे. ती मी ठरवली आहे. पण मुलांनी फक्त टीव्ही, मोबाइल यामध्ये अडकू नये, असं वाटत असेल तर त्यांना वेगवेगळ्या गोष्टींत गुंतवलं पाहिजे. हे करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. पेंटिंग, क्राफ्ट, बागकाम अशा बऱ्याच गोष्टी आहेत- ज्यामध्ये मुलांना गुंतवता येऊ शकतं. आमच्याकडे बागकामात मुलं तासन्‌तास रमतात. मी त्यांना सांगते, दुधी भोपळ्याचा वेल वाढवण्यासाठी बघा बरं काय करावं लागतं? मग ती दोघं यूट्युबवर बघतात आणि काय काय करायचं ते मला सांगतात. म्हणजे आपण खूप वेगवेगळ्या आणि चांगल्या गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊ शकतो. मुलांना त्या दिशेनं मात्र न्यावं लागतं.

पालकत्व हा एक विलक्षण अनुभव आहे. पालक म्हणून तुम्ही मुलांना केवळ शिकवत नाही, तर त्याच्याबरोबर स्वतःही समृद्ध होत असता. एक आयुष्य छान घडताना डोळ्यासमोर आपण बघत असतो. स्वतः पालक झाल्यानंतर आपल्या पालकांचं महत्त्व अधिक जास्त कळू लागतं. आपल्या पालकांची शिकवण समजून घेणं आणि पुढं ती मुलांकडे सोपवणं यात खूप आनंद आहे. हा आयुष्यातला अतिशय सुंदर टप्पा आहे. आपण मूल असताना काही मिस केलं असेल, तर मुलांबरोबर ते पुन्हा या टप्प्यावर जगायला मिळतं. त्यामुळे मी राहीला नेहमी म्हणते, की आज फक्त तुझाच वाढदिवस नाही, मीदेखील आई म्हणून आजच जन्मले आहे. मुलांबरोबर पालक म्हणून वाढण्यात वेगळाच आनंद असतो, तो मी पुरेपूर घेते.
(शब्दांकन ः मोना भावसार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sawani shende sathe write parents article