महत्त्व साथ-संगतकारांचं (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali
sayali

मैफलीत साथ करत असणाऱ्या वादककलाकारांना ‘संगतकार’ किंवा ‘साथीदार’ असं म्हणतात. वरकरणी पाहता दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच असला तरी सांगीतिक भाषेत ते वेगळे मानले जातात. साथीदार केवळ मुख्य गायकाचं अनुसरण करत असतात, तर संगतकार हे गायकाचे सांगीतिक विचार फुलवत असतात, त्यांच्या विचारांवर प्रतिक्रिया देत असतात. त्यांच्यात सांगीतिक विचारांची देवाण-घेवाण असते.

मैफलीत आवश्यक असणाऱ्या वाद्यांचा आढावा आपण मागच्या एका लेखात घेतला; पण मैफलीत चांगल्या वाद्यांइतकंच महत्त्वाचं स्थान असतं ते वाद्यं हातोटीनं वाजवणाऱ्या वादककलाकारांचं. मैफल रंगते ते त्यांच्या एकत्रित मिलाफानं. मैफल देशात असो किंवा विदेशात, प्रत्येक वादक आपली वाद्यं बरोबर नेत असतात. गायक त्याबाबतीत नशीबवानच म्हणायला हवेत. कारण, म्हणाल तिथं त्यांना आपला आवाज विनासायास घेऊन जाता येतो! पण वादककलाकारांना मात्र गायकाच्या पट्टीनुसार त्या त्या स्वराचा तबला किंवा त्यांच्या सोईचं हार्मोनिअम वागवत फिरावं लागतं. आजकाल ज्येष्ठ कलाकारांच्या पुढं-मागं त्यांचे शिष्य त्यांच्या वाद्यांची ने-आण करताना दिसतात. विद्यार्थिदशेत मात्र प्रत्येकानं आपलं वाद्य स्वतःच उचलावं असा गुरूंचा अट्टहास असतो. स्वतःचं वाद्य उचलण्याचा याबाबतीतला एका गुरूंचा किस्सा फारच समर्पक आहे. हार्मोनिअम शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीबाबतचा. ती इतकं जड वाद्य स्वतः उचलू शकत नाही म्हणून गुरूंनी तिला हार्मोनिअम उचलण्याच्या बाबतीत सूट द्यावी अशी विनंती करायला एक पालक क्लासमध्ये गेले. त्यांचं म्हणणं गुरूंनी शांतपणे ऐकून घेतलं, स्मित केलं आणि सौम्यपणे म्हणाले: ‘तिला हार्मोनिअम उचलता येऊ शकत नसेल तर तिनं बासरी शिकलेली बरी.’ पालकांना योग्य तो संदेश मिळाला आणि त्या दिवसानंतर विद्यार्थिनी कुरकुर न करता आपलं वाद्य स्वतः उचलू लागली.

वादकांचं एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे, आपल्या वाद्यांची योग्य ती निगा राखणं व त्यांची डागडुजी करणं. व्यावसायिक वादकांकडे अनेक हार्मोनिअम किंवा अनेक तबले असतात. बदलत्या हवामानापासून त्या प्रत्येक वाद्याचा बचाव करणं, सतत रियाजात ठेवून वाद्य ‘बोलतं’ ठेवणं अशा अनेक गोष्टी वादकांना नियमित कराव्या लागतात. चांगल्या वादकाचा अजून एक गुण म्हणजे वाजवण्यापूर्वी वाद्याचं ट्यूनिंग म्हणजेच वाद्य सुरात लावण्याचं कौशल्य. स्वरपेटी, तानपुरा किंवा हार्मोनिअमच्या सुरावर तबला स्वरात लावला जातो आणि मगच मैफलीत गायनाला प्रारंभ होतो. बऱ्याच वेळा वातानुकूलित हॉलमुळे वाद्याच्या स्वरावर परिणाम होत असतो, तिथं वादकाची कसोटी लागते.

आजकाल तर गाणं केवळ श्रवणीयच नव्हे, तर प्रेक्षणीयही असावं लागतं! म्हणूनच ध्वनिसंयोजनाबरोबरच प्रकाशयोजना आणि मंचावरची सजावटही तितकीच महत्त्वाची ठरते. मैफलीचा पाया संगतकार तयार करत असतात. हार्मोनिअममधून मिळणाऱ्या पहिल्या षड्जापासून ते तालाच्या शेवटच्या मात्रेपर्यंत दोन्ही वादक खंबीर आणि आश्वासक साथ देत असतात म्हणूनच मैफलीत संगतकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्य कलाकाराइतकेच साथीदारही तयारीचे आणि श्रेष्ठ असतात. सर्वसामान्यपणे गायकाच्या मागं स्वरसाथीला तानपुऱ्यावर शिष्य, डाव्या हाताला हार्मोनिअमवादक आणि उजव्या हाताला तबलजी असतात. क्वचित वेळी हार्मोनिअमऐवजी सारंगीही असते.

मैफलीत साथ करत असणाऱ्या वादककलाकारांना ‘संगतकार’ किंवा ‘साथीदार’ असं म्हणतात. वरकरणी पाहता दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच असला तरी सांगीतिक भाषेत ते वेगळे मानले जातात. साथीदार केवळ मुख्य गायकाचं अनुसरण करत असतात, तर संगतकार हे गायकाचे सांगीतिक विचार फुलवत असतात, त्यांच्या विचारांवर प्रतिक्रिया देत असतात. त्यांच्यात सांगीतिक विचारांची देवाण-घेवाण असते. प्रसंगी, गायक अडखळला तर संगतकार पुढं वाट दाखवत असतात. त्यांची साथ मुख्य कलाकाराच्या गायकीला पोषक असते. गायकाचा एखादा भावलेला, रुचलेला विचारप्रवाह संगतकारांच्या पुनरावृत्तीमुळे श्रोत्यांपर्यंत अधिक सुलभतेने पोचतो. अर्थात्, तिथं गायकाची प्रत्येक जागा आपल्या वाद्यातून हुबेहूब काढत स्वतःच्या तयारीचं प्रदर्शन करणं हा उद्देश असतोच असं नाही. वादनाची संधी मिळाल्यावर किती वाजवायचं आणि कुठं थांबायचं हे कळणंही तितकंच महत्त्वाचं असतं, तसंच गायकानंही आपल्या संगतकारांना योग्य तो वाव देणं आणि आपलंच वर्चस्व न गाजवता त्यांच्या बरोबरीनं कला पेश करणं आवश्यक असतं. कधी तरी गायक आपल्या संगतकारांना संधी न देता एकटेच शेवटपर्यंत गात राहतात; पण साऊंडच्या दृष्टीनं गाता गळा आणि वाद्य हा बदल श्रोत्यांना सुखद वाटत असतो. हार्मोनिअमच्या साथीमुळे, गायकाच्या सलग ऐकू येणाऱ्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर हार्मोनिअमचा आवाज चांगलाच वाटतो.

एखाद्या गायकाबरोबरचे वादक हे बऱ्याच वेळा ठराविकच असतात. त्या ठराविक संगतकारांबरोबर त्यांचे आविष्कार अधिक खुलतात, असा गायकाबरोबरच रसिकांचाही अनुभव असतो. याचं कारण असं की त्यांच्यामधली सांगीतिक देवाण-घेवाण एकमेकांच्या परिचयाची असते. कुठल्या क्षणी कशी साथ हवी हे सरावानं माहीत असतं, कुठं केवळ षड्जाचा भरणा, कुठं अनुसरण आणि कुठं संगत आणि कुठं कॉर्ड्‌स वाजवायच्या याची सरावानं समज असते आणि म्हणूनच एकमेकांच्या साथीनं ते उत्तम कलाविष्कार सादर करू शकतात. गायक आणि संगतकार यांचं नातं मैत्रीचं असावं लागतं. नोकरीसाठी ज्या ठिकाणी आठ तास घालवायचे असतात तिकडचं वातावरण उत्तम असेल तर काम खेळीमेळीनं; पण दर्जेदार होतं. रंगमंचाचंही तसंच असतं. मैत्रीत आपण एकमेकांच्या गुणांची कदर करतो, एकमेकांना समजून घेतो, चूक-भूल सावरून घेतो, अडचणीत आधार देतो, अगदी तसंच रंगमंचावरही घडतं. अर्थात्, हे नातं केवळ रंगमंचापुरतं मर्यादित नसतं. व्यावहारिक जीवनातही ते तसंच असतं आणि ते तसं असेल तरच सांगीतिक सुसंवाद घडतो. असं असलं तरीसुद्धा कुठल्याही नवीन कलाकाराबरोबर ऐनवेळी उत्तम गाता-वाजवता येईल इतके हे कलाकार तयारीचे असतात हे मात्र नक्की.

काही कलाकार अंतर्मुख होऊन डोळे मिटून, विचारांमध्ये तल्लीन होऊन गात असतात. संगतकारांशी कोणत्याही प्रकारचा संवाद ते साधत नाहीत. याउलट, काही कलाकार संगतकारांना दाद देत-घेत, श्रोत्यांची दाद स्वीकारत खेळीमेळीच्या वातावरणात कला सादर करत असतात. श्रोत्यांना मात्र हीच मैफल जास्त जिवंत आणि आपलीशी वाटते. मैफलीत साथीदारांचा मोलाचा सहभाग असल्यामुळेच इलेक्ट्रॉनिक वाद्यं आजपर्यंत त्यांची जागा घेऊ शकली नाहीत.

पुढच्या लेखात आपण भारतीय संगीताच्या थाटपद्धतीचा आढावा घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com