थाट, राग व त्यांतली गाणी : भाग २ (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali
sayali

‘कल्याण,’ ‘मारवा,’ ‘पूर्वी,’ ‘तोडी,’ ‘भैरव’ या थाटांतल्या रागांवर आधारित कितीतरी भक्तिगीतं, चित्रपटगीतं, भावगीतं आढळतात. अशाच काही गीतांची उदाहरणं या भागात आपण पाहणार आहोत. मात्र, ही गीतं त्या त्या रागाच्या आधारावर बांधलेली असली तरी काही गीतांमध्ये थोडा रागबदल होऊ शकतो हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे.

मागच्या लेखात आपण पाच थाट व त्यांवरील काही गीतं बघितली. ही सर्व गीतं त्या त्या रागाच्या आधारावर बांधलेली असली तरी काही गीतांमध्ये थोडा रागबदल होऊ शकतो. याचं कारण असं की ही सर्व गीतं म्हणजे रागाच्या बंदिशी नव्हेत, त्यामुळे त्यांना रागाचे नियम लागू नसतात. रागातले पाच स्वर म्हणजे पाच रंग सोडून इतरही रंग वापरायची मुभा संगीतकारांना असते. ‘कुठल्याही रागाची चौकट नाही,’ अशीही अनेक गीतं असतात. संगीतकार एखाद्या चित्रकारासारखी कुठल्याही रंगाची मुक्त उधळण करू शकतात. या लेखात आपण पुढचे पाच थाट व त्यावर आधारित असलेली काही गीतं बघू.

कल्याण थाट : अतिशय प्रसन्न आणि मनाला आनंद देणारा हा थाट आहे. ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश...,’ ‘मी मज हरपून...’ ही कल्याण थाटातली काही गाणी. भूप राग हा याच थाटातला राग. यावरून एकाच थाटातून वेगवेगळी अभिव्यक्ती असलेले भिन्न राग कसे निर्माण होऊ शकतात याची थोडीशी कल्पना येईल. ‘माझे माहेर पंढरी...,’ ‘देहाची तिजोरी...,’ ‘माझे जीवन गाणे...’ ही सर्व भूप रागातली गीतं. शुद्ध कल्याण, शाम कल्याण, खेम कल्याण हे या थाटातले काही राग.
***

मारवा थाट : ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी...’ किंवा ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला...’ या गीतांतली जन्मजन्मांतरीची ओढ राग मारव्याच्या सुरांनीच सजलेली आहे.
‘सोहोनी’ हा रागसुद्धा राग मारव्यासारखाच आहे. ‘कट्यार काळजात घुसली’मधल्या ‘सुरत पिया की न छिन बिसराये...’ या बहारदार नाट्यगीताचा मुखडा ‘सोहोनी’मध्येच बांधण्यात आलेला आहे. ‘मारवा’ आणि ‘सोहोनी’तल्या सर्व गीतांच्या शब्दरचनेत एक साम्य आढळतं व ते म्हणजे त्या सर्व रचना विरहाची, एकटेपणाची भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.
थाट मारव्यापासूनच तयार झालेला आणखी एक अतिशय लोकप्रिय व नितांतसुंदर राग म्हणजे राग ललत! ‘विनायका हो सिद्धगणेशा...’ हे ‘ललत’मधलं एक भक्तिगीत.
‘ललत’च्या स्वरसौंदर्यानं नटलेली अजून एक रचना म्हणजे ‘इक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल’ हे सिनेगीत. ‘ललत’ या एकाच रागात विविध भाव व्यक्त करणाऱ्या संगीतरचना स्वरबद्ध केल्या गेल्या आहेत हे त्या रागाचं व पर्यायानं शास्त्रीय संगीताचं खऱ्या अर्थानं शक्तिस्थान आहे. थाट मारव्यापासून तयार झालेल्या आणखी एका रागाचा इथं उल्लेख केल्याशिवाय थाट मारव्याचं विवेचन पूर्ण होऊ शकत नाही आणि तो राग म्हणजे
‘पूरिया कल्याण’! हा राग जरी ‘पूरिया’ आणि ‘कल्याण’ यांच्या संयोगानं तयार झाला असला तरीही शास्त्रीय संगीताच्या नियमानुसार त्याचा समावेश थाट मारव्याच्या अंतर्गत केला जातो. भारतीय सिनेसंगीतकारांनी या रागाचा अतिशय लालित्यपूर्ण पद्धतीनं उपयोग करून अनेक गीतांना अगदी अवीट गोडीच्या चाली दिल्या आहेत. ‘सांज ये गोकुळी...’, ‘मुरलीधर श्याम हे नंदलाला...’, ‘क्षणभर उघड नयन देवा...’ ही त्याची उदाहरणं.
***

पूर्वी थाट : ‘राग पूर्वी’ हा पूर्वी थाटातला एक अतिशय भावगर्भ आणि हृदयस्पर्शी राग आहे. याचं अतिशय बोलकं उदाहरण म्हणजे, ‘दयाघना, का तुटले चिमणे घरटे...’ हे गीत! हे गीत जर संध्याकाळच्या सुमारास ऐकलं तर ते अधिक परिणामकारक वाटतं. याचं कारण असं की ‘पूर्वी’ हा संध्यासमयीचा राग आहे आणि कुठलाही राग किंवा त्यावर आधारित गीत जर, त्या रागाच्या गायन-वादनाचा जो समय शास्त्रानं ठरवून दिलेला आहे, त्या वेळेस ऐकल्यास, तो राग किंवा ते गीत जास्त प्रभावी वाटतं.
‘पूरिया धनाश्री’ हा ‘थाट पूर्वी’ वर आधारित असलेला आणखी एक लोकप्रिय राग आहे. या रागानं भावगीतांच्या दुनियेला दिलेली एक अजरामर भेट म्हणजे ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे...’ याच रागावर आधारित एक प्रसिद्ध सिनेगीत म्हणजे ‘हाय रामा, ये क्या हुआ...’!
‘थाट पूर्वी’ वर आधारित आणखी एक बहारदार राग म्हणजे ‘बसंत.’ नावाप्रमाणेच वसंत ऋतूमध्ये गायला जाणारा हा राग आहे. ‘बसंत’वरच आधारित एक चित्रपटगीत म्हणजे ‘काहे छेड छेड मोहे...’ ‘थाट पूर्वी’वर आधारित आणखी दोन राग म्हणजे ‘श्री' आणि ‘परज'. आपल्याला हे राग बहुधा शास्त्रीय संगीताच्या मैफलीतून किंवा रेडिओवरील कार्यक्रमातूनच ऐकायला मिळतील.
* * *

तोडी थाट : प्रसिद्ध नाट्यगीत ‘सोहम् हर डमरू बाजे...’ हे तोडी रागातलं, तसंच ‘अगा करुणाकरा...’ ही रचनाही.
‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन...’ तसंच संत मीराबाईचं प्रसिद्ध भजन ‘साँवरो...’ ही सर्व भक्तिगीतं म्हणजे ‘तोडी’चीच रूपं.
* * *

भैरव थाट : भैरव रागाचं सगळ्यात प्रसिद्ध भावंड म्हणजे, राग ‘अहीर भैरव’. अनेक मैफलीतून हा राग आपण ऐकत असतो. ‘मोहे भूल गये साँवरिया...,’ ‘जय शंकरा गंगाधरा...,’ ‘अलबेला सजन आयो री...’ही सर्व गीतं ‘अहीर भैरव’ वरच आधारित आहेत.
‘बैरागी भैरव’ हा ‘भैरव’ थाटातूनच तयार झालेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण राग. नावाप्रमाणेच वैराग्याची भावना ओतप्रोत भरलेला असा हा राग आहे. ‘ओंकार स्वरूपा...,’ ‘पैल तो गे काऊ कोकताहे...’ ‘गर्द सभोती रान सजणी...’ ही सर्व बैरागी भैरवचीच रूपं. ‘शिवमतभैरव’, ‘नटभैरव’ हे भैरव थाटातून निर्माण झालेले आणखी काही राग. रागदारीच्या मैफलीतून हे राग नेहमी सादर होत असतात.
यापुढच्या लेखात आपण गायकांचे गातानाचे ‘भाव आणि मुद्रा’ या विषयावर माहिती घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com