संगीतातली सौंदर्यस्थळं : भाग २ (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali
sayali

वाद्यांचं ट्यूनिंग, सम, बढत, सप्तक, मिंड, खटका, मुरकी, गमक, ठहराव, आवाजाचे वेगवेगळे लगाव...ही सगळी शास्त्रीय संगीतातली सौंदर्यस्थळं आहेत, त्यांच्याविषयी...

आवाज, सुरेलपणा, लय-ताल, विराम आणि बंदिश या सौंदर्यस्थळांचा विचार मागच्या लेखात आपण केला. याव्यतिरिक्त मैफलीत असे अनेक क्षण येतात जिथं श्रोत्यांना सौंदर्यानुभूती येते. संगीतातले राग, स्वर किंवा ताल यांची मूलभूत माहिती जरी नसली तरी श्रोते अशा अनुभवांमधून कलाकृतीचा आनंद घेऊ शकतात.
आजच्या लेखात अशाच काही सौंदर्यस्थळांचा आढावा घेऊ या.

वाद्यांचं ट्यूनिंग : कार्यक्रमापूर्वी तानपुरा व साथीची इतर वाद्यं एका स्वरात मिळवणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब असते. एखादं वाद्य सुरात मिळवताना ऐकणं हा अत्यंत रोमांचकारी अनुभव असतो. ते वाद्य सुरात लागण्याची प्रक्रिया, ते थोडं कमी किंवा जास्त स्वरात बोलत असताना होणारी चलबिचल आणि ते सुरात लागल्यावरचा आनंद हा अनुभव प्रत्येकानं घेण्यासारखा असतो. ते वाद्य सुरात लागल्यावर कलाकाराची प्रसन्न, विजयी मुद्राही बघण्यासारखी असते. मैफल सुरू होण्यापूर्वीचा हा अनुभव आणि पुढच्या सादरीकरणातील उत्सुकता हे सर्वच सौंदर्यपूर्ण असतं, म्हणूनच क्वचित कधीतरी वाद्याच्या ट्यूनिंगसाठी थोडा वेळ गेला तरी श्रोते शांतपणे तो अनुभव घेत असताना दिसतात. याउलट, अशी सौंदर्यानुभूती कधी न घेतलेल्या श्रोत्यांची चुळबुळ सुरू होते किंवा टाळ्या वाजवून नापसंती दर्शवताना ते दिसतात. वाद्य जुळवताना श्रोते किती शांत आहेत यावरून कलाकाराला त्यांची समज लक्षात येते.

सम : प्रत्येक आवर्तनाचा परमोच्च क्षण म्हणजे सम. या समेच्या मात्रेवर श्रोते दाद देताना दिसतात. संपूर्ण आवर्तन भरून झाल्यावर तबलजी, संवादिनीवादक आणि गायक या मात्रेवर एकत्र येतात आणि सौंदर्यानुभूतीचा आनंद स्वतः घेत श्रोत्यांना देतात. कलाकार संथ आलापी करत असो, लयीशी खेळत, बोल-आलापी करत असो किंवा द्रुत लयीत दाणेदार ताना घेत असो, कुठल्याही प्रकारात समेचा आनंद मिळतोच. मोठमोठ्या महोत्सवांमध्ये कलाकारांसमवेतच समोरचे हजारो श्रोतेही हात उंच करून माना डोलावत ही सौंदर्यानुभूती घेताना दिसतात.

बढत : एखादा कलाकार राग कसा खुलवतो हे संगीत समजणाऱ्याला आणि थोड्याफार प्रमाणात काही न समजता ऐकणाऱ्यालाही आनंद देऊन जातं. रागाची बढत, कलाकाराला त्या रागाचं दिसलेलं सौंदर्य, ते मांडायची पद्धत हे सर्व सुखद असतं. कधी स्वरांमधून तर कधी शब्दांमधून, कधी सरगम, तर कधी तानांमधून राग उलगडला जातो. रागाचा एकेक पैलू उलगडत रागाचं साक्षात स्वरूप अनुभवणं अत्यंत सुखद असतं. संगीत कळणाऱ्याला तर आनंद मिळतोच; पण न कळणाऱ्यालाही त्यातलं प्रवाहीपण जाणवतं व सौंदर्यानुभूती येते. याच कारणामुळे विलंबित लयीत गायन सुरू असताना समाधी लावून बसलेले श्रोते द्रुत बंदिश सुरू झाल्यावर हातानं ताल धरताना दिसतात.

सप्तक : मध्यसप्तकापासून गायन सुरू झाल तरी आपल्या तयारीनुसार कलाकार मंद्र, मध्य आणि तारसप्तकात लीलया फिरत असतात. काही गायककलाकार तर अतिमंद्र आणि अतितारसप्तकासही स्पर्श करून येतात. गायकानं मंद्र किंवा तारसप्तकात स्वर लांबवून ठेवला किंवा स्वराला नुसता स्पर्श जरी केला तरी श्रोत्यांची वाहवा किंवा टाळ्या मिळाल्याचं दिसून येतं. असं इतर सप्तकात गाणं हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं; परंतु काही गायक वाहवा मिळवण्याच्या हेतूनं जबरदस्तीनं या स्वरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असा आवाज चिरकलेला किंवा अनैसर्गिक ऐकू येतो. अशा वेळी मात्र सौंदर्यानुभूती येत नाही.

मिंड, खटका, मुरकी, गमक : एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर घसरत जाणं याला ‘मिंड’ असं म्हटलं जातं. भारतीय शास्त्रीय संगीत ही मिंडयुक्त आणि आसयुक्त गायकी आहे. प्रत्येक स्वर हा मिंडेतून लावला जातो. याव्यतिरिक्त खटका, मुरकी, गमक यांसारख्या प्रकारांचाही वापर केला जातो. मिंडयुक्त गायकी ही अतिशय गोड वाटते. मिंडेनं ऐकणाऱ्याच्या मनात अत्यंत तरल भावना निर्माण होतात आणि म्हणूनच ती ऐकताना सौंदर्याचा अनुभव येतो. गमकेमुळे गायनाला धीरगंभीर स्वरूप प्राप्त होतं, शिवाय गोलाईही निर्माण होते. गमकेशिवाय शास्त्रीय संगीत अपूर्ण आहे. गाताना क्वचित वापरले जाणाऱ्या खटका, मुरकी या बाबीही गायनाचं सौंदर्य निश्चितच वाढवतात. उपशास्त्रीय संगीतात त्यांचा विशेष वापर दिसतो. त्यांच्या वापरामुळे कलाकृती अधिक आकर्षक आणि रंजक होते.

ठहराव : कलाकार स्वरांच्या वेगवेगळ्या आकृत्या तयार करत रागस्वरूप उभं करतो. या आकृत्या कलाकाराची प्रतिभा आणि तयारी दर्शवतात. त्यातून रागस्वरूप उलगडतं. स्वराकृतीतून तर आनंद मिळतोच; पण नुसत्या एका स्वरावर केलेला ठहरावही मनाला भावतो. स्वर बराच वेळ लांबवला की श्रोत्यांना आनंद झाल्याचं त्यांच्या टाळ्यांमधून दिसून येतं. त्यातून तो लांबवलेला स्वर जर का षड्ज असेल तर मग श्रोत्यांमध्ये विशेष प्रसन्नता दिसते. गायकाच्या दमसासाची तयारी या ठहरावामधून दिसून येते.

आवाजातलं मॉड्युलेशन : गायक संपूर्ण मैफलीत आवाजाचे वेगवेगळे लगाव वापरत असतात. कधी आवाज बारीक असतो तर कधी जाड, कधी थोडा सानुनासिक असतो तर कधी खुला, कधी गोलाकार असतो तर कधी भारदस्त. संगीतातले वेगवेगळे अलंकार अशा आवाजातल्या बदलांमुळे अधिक सौंदर्यपूर्ण वाटतात. उदाहरणार्थ : दाणेदार तानांसाठी हलका आवाज वापरला जातो, एखादा खटका किंवा बारीकशी मुरकी घ्यायला हलका आणि बारीक आवाज वापरला जातो, सुरात मिसळलेला षड्ज कधी खुला, तर कधी बारीक लावला जातो. कधी अनुस्वाराच्या साह्यानं सानुनासिक आवाज वापरला जातो. या प्रकारचे आवाजातले भेद सौंदर्य निर्माण करतात व गायन अधिक परिणामकारक करतात.
आणखी सौंदर्यस्थळांचा आढावा पुढच्या लेखात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com