मैफलीचे घटक (सायली पानसे-शेल्लीकेरी)

सायली पानसे-शेल्लीकेरी
रविवार, 31 मे 2020

कलाकार, साथसंगतकार, श्रोते, संयोजक, रंगमंचव्यवस्था करणारी मंडळी असे विविध घटक मैफलीसाठी आवश्यक असतात. मैफलीच्या केंद्रस्थानी कलाकार असला तरी हे अन्य घटकही मैफल यशस्वी होण्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरतात. याच सगळ्या घटकांविषयी...

कलाकार, साथसंगतकार, श्रोते, संयोजक, रंगमंचव्यवस्था करणारी मंडळी असे विविध घटक मैफलीसाठी आवश्यक असतात. मैफलीच्या केंद्रस्थानी कलाकार असला तरी हे अन्य घटकही मैफल यशस्वी होण्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरतात. याच सगळ्या घटकांविषयी...

एक मैफल यशस्वी होण्यासाठी कलाकारांच्या सादरीकरणाव्यतिरिक्त अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या सर्व गोष्टी नीटनेटक्या व्हाव्यात यासाठी एका कुशल संयोजकाची आवश्यकता असते. याशिवाय आणखी कोणकोणते घटक मैफलीच्या यशस्वितेसाठी आवश्यक असतात अशा सर्व घटकांचा विचार आपण या लेखात करू.

संयोजक : कार्यक्रम लहान असो किंवा मोठा, औपचारिक असो वा अनौपचारिक, गायककलाकार व्यावसायिक असो किंवा नवोदित...प्रत्येक कार्यक्रमाचं लहान-मोठ्या प्रमाणात नियोजन करावं लागतं. सर्वप्रथम कलाकारांची निवड, त्यांच्या सोईनुसार कार्यक्रमाची तारीख ठरवणं, बिदागी आणि सहवादक ठरवणं इत्यादी. कधी तरी मुख्य कलाकार स्वतःच सहवादक निश्चित करतात. कार्यक्रमाला प्रायोजक शोधणं ही एक मोठी जबाबदारी असते. त्यानंतर कार्यक्रमाचं स्थान, साउंड सिस्टिम, कार्यक्रमाला तिकीट असल्यास त्याचे दर निश्चित करणं, ती छापून घेणं. एखादा फोटोग्राफर/व्हिडिओग्राफर नेमणं, प्रसिद्धिमाध्यमांतून कार्यक्रमाला प्रसिद्धी देणं इत्यादी. आजकाल सोशल मीडियामुळे ही सर्व कामं सुलभ झाली आहेत. कलाकार परगावहून येणार असल्यास त्यांची प्रवासाची, निवासाची सोय करणं, आवश्यकता असल्यास सरकारी परवानग्या मिळवणं अशी अनेक कामं संयोजकाकडे असतात. मोठे कलाकार शहरात आले की त्यांना भेटायला अनेक परिचित येत असतात. त्यांत शिष्य, हितचिंतक, रसिक, नातेवाईक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सहवादक असे अनेक जण असतात. कलाकारांना विचारून ठराविक लोकांची भेट आयोजित करणं आणि ती वेळेत आवरणं हे संयोजकाला पाहावं लागतं. कारण, कार्यक्रमापूर्वी कलाकारांची पुरेशी विश्रांती होणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. सहकलाकारांना वेळ देऊन रिहर्सल होणंही महत्त्वाचं असतं. रिहर्सल संपवून कलाकारांना कार्यक्रमाच्या स्थळी वेळेत नेण्याचं काम, कार्यक्रमानंतर ठरल्या वेळेनुसार कलाकारांची परतीची व्यवस्था करणं ही सर्व कामं संयोजकाकडेच असतात.

संगीतमहोत्सवांत एवढ्या सगळ्या व्यवस्था एकानं सांभाळणं अवघड होऊन बसतं, म्हणून आजकाल व्यावसायिक संयोजकांना खूप मागणी असते. कार्यक्रमाचं संयोजन करणं हा एक महत्त्वाचा स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. यालाच आपण ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ या नावानं ओळखतो.

रंगमंचव्यवस्था : कार्यक्रमात कलाकार आपली कला सादर करून रसिकांना आनंद प्रदान करत असतात. अशा आनंदाच्या प्रसंगी कलाकार व श्रोते या दोघांच्या चित्तवृत्ती प्रसन्न असाव्या लागतात. यासाठी रंगमंचाची व सभागृहाची व्यवस्था उत्तम असणं महत्त्वाचं ठरतं, म्हणूनच सभागृह निवडताना उत्तम व्यवस्था असलेलं व श्रोत्यांच्या दृष्टीनं सोईचं असं सभागृह निश्चित केलं जातं. सभागृह ठरवताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. एक म्हणजे, सभागृह किती मोठं पाहिजे याचा अंदाज घेणं. हा अंदाज चुकून ते लहान पडल्यास आसनव्यवस्था अपुरी पडते व सभागृह खूपच मोठं असल्यास ते रिकामं दिसून कलाकाराचा अपेक्षाभंग होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तम साउंड सिस्टिम निवडणं. सभागृहात प्रतिध्वनी येत असल्यास कार्यक्रमाचा दर्जा खालावतो.

आजकाल रंगमंचाच्या दृश्य स्वरूपालाही खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. कार्यक्रमासाठी रंगमंच उत्तमरीत्या सजवला जातो. अत्यंत कमी प्रकाशामुळे उदास वातावरण निर्माण होतं म्हणून प्रकाशयोजनेचा समर्पक विचार केला जातो.
कलाकारांच्या व संगतकारांच्या बसण्यासाठीची आसनव्यवस्था लक्षात घ्यावी लागते. कलाकारांना मऊ गादी लागते व याउलट तबल्यासाठी ती सोईची पडत नाही.

कलाकार : कार्यक्रमात मुख्य भूमिका ही कलाकाराची असते. रंगमंचावर स्थानापन्न झाल्यापासून मैफलीच्या अंतिम क्षणापर्यंत कलाकार केंद्रस्थानी असतो. सभागृहात असलेल्या प्रत्येकाचे डोळे आणि कान केवळ कलाकाराकडे लागून राहिलेले असतात. कलाकारांचा पोशाख, त्यांची बॉडी लँग्वेज, हातवारे, हावभाव, सहवादकांबरोबरचा त्यांचा संवाद या सर्व गोष्टींकडे श्रोत्यांचं बारीक लक्ष असतं, म्हणूनच कलाकार म्हणून वावरताना त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आपण कितीही मोठे असलो तरी त्याआधी एक सुसंस्कृत नागरिक आहोत याची जाण प्रत्येक कलाकारानं ठेवणं आवश्यक असतं. हीन अभिरुची किंवा रंगमंचावरील असभ्य वर्तन श्रोत्यांच्या चर्चेचा विषय ठरू शकतं. कार्यक्रम उशिरा सुरू झाला तरी श्रोते नाराजी व्यक्त करतात. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, योग्य हावभाव, आणि साधनेचा उच्च स्तर या तीन गोष्टींमुळे कलाकार आपल्या श्रोत्यांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. थोडक्यात, रसिकांच्या दृष्टीनं कलाकाराची प्रतिमा आदर्श ठेवण्यासाठी कलाकाराला कायम प्रयत्नशील असावं लागतं.

साथसंगतकार : गायनाची किंवा वादनाची मैफल रंगण्याचं श्रेय मुख्य कलाकाराबरोबर संगतकारांचं असतं याबद्दलची सविस्तर माहिती आपण मागच्या एका लेखात घेतली आहे.

श्रोते : कला सादर करत असताना प्रत्येक कलाकाराला गरज असते ती दाद देणाऱ्या श्रोत्यांची. समोर श्रोते असल्याशिवाय कलाकाराला आपल्या कलाप्रदर्शनाचा संपूर्ण आनंद मिळत नाही आणि जाणकार श्रोत्यांकडून दाद आली की कलाकाराचाही उत्साह द्विगुणित होतो. श्रोते आणि सहवादक यांच्याकडून देवाण-घेवाण झाली की मैफल अधिक रंगते हा अनुभव प्रत्येकानंच घेतला असेल. कार्यक्रम सफल होण्यामागं श्रोत्यांचा खूप मोठा सहभाग असतो. जाणकार श्रोत्यांच्या अभावी कलाकाराच्या उत्साहावर पाणी पडतं आणि कार्यक्रमाची रंगत कमी होते. एखाद्या कार्यक्रमात वेगवेगळ्या अभिरुचीचे रसिक येत असतात. श्रोत्यांची कलेबाबत आणि कलाकाराबाबत काही जबाबदारी असते. कलाकार जे काही सादर करेल ते शांतपणे ऐकणं आणि त्याचं रसग्रहण करणं महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ : सादरीकरण सुरू असताना कुण्या श्रोत्याचा फोन वाजल्यास कलाकाराचा रसभंग होतो.

कार्यक्रमाच्या मध्यंतरात कलाकारांना सहवादकांशी चर्चा करायची असते. उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या अभिरुचीप्रमाणे पुढच्या सादरीकरणात बदल करायचा असतो. अशा वेळी श्रोते येऊन भेटल्यास कलाकारांना अडचणीचं होतं, याची जाण श्रोत्यांनी ठेवायला हवी.

यापुढच्या लेखात आपण प्रत्यक्ष मैफलीत नेमकं काय घडतं हे जाणून घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sayali panse write gandhar article