रियाज (सायली पानसे-शेल्लीकेरी)

सायली पानसे-शेल्लीकेरी
रविवार, 5 जुलै 2020

कलाकाराचा रियाज प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो. ज्या वेळी शारीरिक रियाजाची गरज संपते, त्या वेळी मानसिक रियाज सुरू होतो. या अवस्थेत वाद्य काढून प्रत्यक्ष बसायची गरज नसते. कारण, अंतर्मनात रियाज आणि विचार सुरूच असतात. रियाजाची परमोच्च समाधीच ती!

कलाकाराचा रियाज प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो. ज्या वेळी शारीरिक रियाजाची गरज संपते, त्या वेळी मानसिक रियाज सुरू होतो. या अवस्थेत वाद्य काढून प्रत्यक्ष बसायची गरज नसते. कारण, अंतर्मनात रियाज आणि विचार सुरूच असतात. रियाजाची परमोच्च समाधीच ती!

कलाकारांच्या आयुष्यातली एक अविभाज्य गोष्ट म्हणजे रियाज होय. ‘रियाज केला तरच कलाकार घडतो, रियाज म्हणजे कलाकाराचा श्वास, रियाजाचं सातत्य’ वगैरे गोष्टी सतत बोलल्या जातात. विद्यार्थिदशेत त्याचं महत्त्व पटवून द्यायला तसं करावंही लागतं; पण रियाज हा मारून-मुटकून, जबरदस्तीनं करायची गोष्टच नाही. अर्थात्, त्याची गोडी लागेपर्यंत सुरुवातीच्या काळात ते करावं लागतं; पण एकदा त्यातून आनंद मिळायला लागला की आपोआप त्यात मन रमायला लागतं. रियाज म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या गोष्टीतलं सातत्य. मग ते रोजच्या व्यायामातलं असेल, अभ्यासातलं असेल किंवा एखाद्या खेळातलं असेल. नियमितपणाला प्रत्येक क्षेत्रात महत्त्व आहेच. एखादी गोष्ट वारंवार केली की तीत सुधारणा होत राहते हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानंच घेतला असेल. रियाज म्हणजेही तेच. एक प्रकारची शिस्तच.

‘रियाज म्हणजे काही नोकरी नाही की ठरल्यावेळी तानपुरा काढून बसायला, रियाज हवा तेव्हा सोईनं करता येतो,’ असा लोकांचा गैरसमज असतो; पण नोकरीपेक्षाही चिकाटीनं आणि नियमितपणे करता येतो त्यालाच रियाज म्हणतात खरं तर!
रियाजात भक्तिभावाचा खूप मोठा वाटा असतो. भारतीय संगीतात हा एक फार मोठा, प्रगल्भ विचारांचा ठेवा आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून संगीताच्या माध्यमातून आराधना करणं ही भावना खूप महत्त्वाची असते; मग ती ‘जागो मोहन प्यारे’ या पारंपरिक बंदिशीतून निर्माण होत असेल किंवा ‘मेरो अल्ला मेहरबान’ या बंदिशीतून. ‘भक्तिभाव’ हा भारतीय संगीताचा आत्माच आहे.

पूर्वीच्या काळी रियाजासाठी गवयांनी संपूर्ण आयुष्ये ओवाळून टाकलेली आहेत. अनेक बुजुर्ग गवयांनी १६-१८ तास रियाज केलेले आहेत. एखादी मेणबत्ती पेटवून ती संपेपर्यंत रियाज करणं, १०८ वेळा एकेक पलटा घोटणं, दिवसभर एकच बंदिश म्हणणं, घड्याळ्याच्या काट्याकडे बघत रियाज करणं अशा अनेक गोष्टी कायमच गुरूंकडून ऐकायला मिळतात. आजच्या धकाधकीच्या काळात पूर्वीच्या गवयांसारखा रियाज करणं ही एक अशक्यप्राय गोष्ट वाटते. याला अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात.
पूर्वीसारखा १६-१८ तास रियाज करण्यासाठीची शारीरिक ताकद आताच्या गवयांमध्ये नाही. तेवढी जिद्द व चिकाटी तर कमी पडतेच; पण त्याव्यतिरिक्त आताची दिनचर्या, आहार, व्यायाम यांसारख्या अनेक गोष्टी आज बदललेल्या दिसतात.
‘सोशल मीडिया’मुळे आता ‘अटेन्शन स्पॅन’ही कमी झालेला दिसतो. पूर्वीसारखी एकाग्रता मिळवणं आता तितकसं सोपं राहिलेलं नाही. पूर्वीच्या काळी गुरुगृही १०-१२ वर्षं राहून विद्या घेतली जात असे; पण आता इतर व्यवधानांमुळे ते शक्य नाही. शिक्षण, पोटापाण्यासाठी काम किंवा इतर कुठले उद्योग करत संगीतासाठी संपूर्ण वेळ देणं आता अवघड झालं आहे.

‘सोशल मीडिया’, दूरचित्रवाणी किंवा इतर प्रसिद्धिमाध्यमांमधून आताच्या काळात झटपट यश मिळवण्याची वृत्ती वाढली आहे. प्रसिद्धी मिळणं आता सहजसुलभ झालं आहे, त्यामुळे फार काळ अभ्यास करत प्रसिद्धीपासून दूर राहणं नवीन पिढीसाठी एक आव्हानच असल्यासारखं आहे.

हे सर्व असलं तरी कलाकाराच्या आयुष्यात रियाजाला पर्याय नाही. रियाज वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ज्यापासून सुरवात होते तो म्हणजे ‘विद्याभ्यास’. गुरू सांगतील तसं शिकणं व शिकलेलं घोटणं हा एकच रियाज त्यात अभिप्रेत असतो. त्यात विद्यार्थ्यानं फार विचार करणं किंवा शिकलेल्या गोष्टीत बदल करणं अपेक्षित नसतं; किंबहुना सर्वसामान्यपणे विद्यार्थ्यांमध्ये बदल करायची कुवतही नसते. हा विद्याभ्यास कधी संपत नाही. कुठल्याही वयाचा आणि दर्जाचा कलाकार हा कायम विद्यार्थिदशेत असतोच.
ही विद्या अंगात भिनण्यासाठी तंत्राचा अभ्यास आणि रियाज करावा लागतो. तंत्र अवगत करणं ही एक शारीरिक क्रिया आहे. उदाहरणार्थ : एकच तान अनेक वेळा घोटणं, एकच पलटा अनेक वेळा वाजवणं. अनेक तास एकच गोष्ट करून तीत एक प्रकारची सहजता येते, जी इतर कशानंही साधता येऊ शकत नाही. तंत्र अवगत करण्यासाठी तपस्या, सातत्य, एकाग्रता, समर्पण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात.
विद्यार्थ्यानं एक ठराविक उंची गाठली की रियाजाचे वेगवेगळे पैलू उलगडायला लागतात.

विद्यार्थ्याची समज वाढते, तसंच वाचन, इतर कलाकारांचं गायन-वादन ऐकणं, त्यावर विचार करणं, चर्चा करणं, चिंतन-मनन या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होतो. ‘सीखा, देख्या और परख्या’ अशा या पायऱ्या असतात, म्हणजेच शिकणं, बघणं, ऐकणं व पारखणं. येत असलेल्या गोष्टी पक्क्या करणं आणि राहिलेल्या गोष्टींचा ध्यास घेत त्या पूर्ण करणं. हा रियाज विद्यार्थ्याला कायमच पुढची पायरी गाठायला मदत करत असतो.
या सर्व गोष्टींना प्रेरणा देते ती म्हणजे कला. ही प्रत्येकाच्या अंगी असतेच असं नाही. विद्या, शास्त्र आणि तंत्र एकवेळ बुद्धीनं अवगत करता येतं; पण कला अंगी असावी लागते. ती शिकवता येत नाही. कला म्हणजे अंत:प्रेरणा किंवा स्फूर्ती.
अखंड रियाजाचा एक प्रकार म्हणजे ‘चिल्ला.’ एकाच ठिकाणी सतत चाळीस दिवस राहून केवळ एकच विषय घेऊन त्याचा अभ्यास करणं म्हणजे ‘चिल्ला.’ पूर्वी अनेक लोकांनी असा चिल्ला केलेला आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या रियाजामागं त्यांची आवड, इच्छा, निष्ठा, वेळ, ताकद, समर्पण अशा अनेक गोष्टी होत्या. याच कारणामुळे त्यांनी गाठलेली उंची ही फार दूर असल्याचं आज प्रत्येक कलाकाराला जाणवतं! हा रियाज करताना स्वतःला विसरून जाण्याची पातळी येते आणि ती आली की त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

याव्यतिरिक्त एक रियाज असतो तो म्हणजे नवीन करून बघण्याचा. हे करताना धडपडण्याची शक्यता असते. सतत नवीन करण्याच्या प्रयत्नातच नवीन वाट सापडते, म्हणून हा रियाज खूप महत्त्वाचा असतो. एक रियाज असतो सादरीकरणाचा. मैफल कशी असावी, कुठले राग अधिक खुलवता येतात, कुठले राग एकत्र चांगले वाटतात याचा तो अभ्यास असतो. विद्यार्थ्यांना शिकवणं हाही एक रियाजच. त्यातून अनेक गोष्टी नव्यानं उलगडतात, विचारांमधून नवीन गोष्टी सुचतात, प्रगल्भता येते.
कलाकाराचा रियाज प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो. ज्या वेळी शारीरिक रियाजाची गरज संपते, त्या वेळी मानसिक रियाज सुरू होतो. या अवस्थेत वाद्य काढून प्रत्यक्ष बसायची गरज नसते. कारण, अंतर्मनात रियाज आणि विचार सुरूच असतात. रियाजाची परमोच्च समाधीच ती!

आपल्या आयुष्यात संगीताचं किती महत्त्वाचं स्थान आहे, त्याचा आढावा आपण पुढच्या लेखात घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sayali panse write gandhar article