गुरू-शिष्यपरंपरा (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

गुरू चालायला शिकवतात, दृष्टी देतात, जीवनाकडे हळुवार वृत्तीनं पाहायला शिकवतात; पण ‘अमुकच पाहा,’ ‘तमक्याच मार्गानं जा’ असा आग्रह ते धरत नाहीत. ते सुरांचे रंग देतात, लयीचे कुंचले देतात; पण ‘अमुकच चित्र काढ’ असं सांगत नाहीत. स्वतःच शिकवलेल्या विद्येकडे एका वेगळ्या नजरेनं पाहण्याची दृष्टी ते देतात. ही दृष्टीसुद्धा कुठल्या शिष्याला किती द्यायची, हे शिष्याची कुवत बघून, गुरू ठरवत असतात!

भारतीय कलांमध्ये गुरू-शिष्यपरंपरा किंवा गुरुमुखी विद्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वर, लय, ताल यांसारख्या प्राथमिक गोष्टींपासून गायकी, घराण्याच्या तत्त्वांपर्यंत सगळ्या गोष्टी गुरूंकडून शिकायला मिळत. पूर्वीच्या काळातील गुरू-शिष्यपरंपरेत विद्यार्थी हा वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच गुरुगृही शिक्षणासाठी जात असे. फक्त संगीतच नव्हे तर शास्त्र, कला व विद्या अशा सर्व पातळ्यांवर त्या वेळचे गुरू विद्यार्थ्याला तयार करत असत. ‘गुरू हेच आपलं सर्वस्व व ते दाखवतील त्या दिशेनंच आपल्याला वाटचाल करायची आहे,’ हे बालमनावर बिंबवलं जात असे. उत्तम आणि जाणकार गुरू हे शिष्याची तालीमही उत्तमरीत्या करून घेत असत. गुरूंजवळ बसून विद्याग्रहण करून स्वत:च्या सांगीतिक विचारांनी अभ्यास आणि रियाज वाढवणं हे गुरू-शिष्यपरंपरेत महत्त्‍वाचं असे. कलेच्या क्षेत्रात समर्पणवृत्तीनं साधना केल्यानंतरच यश मिळतं हे जरी खरं असलं तरी केवळ लौकिकार्थानं यशासाठी अथवा धनप्राप्तीसाठी या क्षेत्रात कुणी येत नसतं. कलाकारांच्या दृष्टीनं आत्मानंद ही भावना महत्त्वाची असते. ‘गुरुगृही राहून गुरूंच्या सहवासात गुरुमुखातून गाण्याची तालीम घेणं’ इतका मर्यादित अर्थ गुरुकुलपद्धतीचा नक्कीच नाही. गुरूंचा सहवास, निर्णयक्षमता, समाजातील एक व्यक्ती म्हणून असलेलं त्यांचं स्थान, गुरूंचे आचार-विचार या सर्व बाबींचा प्रभाव शिष्यावर असतो.

रियाजातील बारकावे हे गुरूंबरोबरच्या बैठकीतून कळतात. एकनिष्ठपणे, सातत्यानं गुरूंसमोर बसून एकच अलंकार म्हणणं किंवा एकच धून वारंवार वाजवणं व तिचा बारकाईनं अभ्यास करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. शास्त्रीय संगीत हे साधायचं असतं आणि ते साधनेतून साधतं; परंतु त्यासाठी रियाजाची आवश्यकता असते. गुरूंकडे गाण्याची तालीम घेत असताना गुरूंचं बोट धरून शिष्यही हळूहळू गाऊ लागतो. संगीताकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते, ती नजर गुरूंकडून शिकावी लागते, गायकी शिकावी लागते; परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करावी लागते. उदाहरणार्थ : यमन राग कसा आहे, त्याचं चलन कसं आहे हे गुरू शिकवतात. रागाच्या सगळ्या खाणाखुणा, बारकावे, हमरस्ते व पाऊलवाटा सगळं काही ते दाखवत असतात. थोडक्यात, सांगायचं तर, यमन रागाचं दर्शन ते घडवतात; परंतु एकदा गुरूंकडून या सगळ्याची रीतसर तालीम घेतली की मग मात्र शिष्याला त्या वाटेवरून एकट्यालाच जावं लागतं. गुरूंकडून मिळालेल्या तालमीमुळं, गाण्याच्या सततच्या चिंतन-मननामुळं, केलेल्या रियाजामुळं गुरूंनी दाखवलेल्या वाटेवरून शिष्य जाऊ लागतो. मात्र, त्याचबरोबर त्याच वाटेवर राहून स्वत:ची अशी एक वेगळी अभिव्यक्ती शिष्य निर्माण करू लागतो, स्वत:चे विचार मांडू लागतो, स्वत:चं गाणं गाऊ लागतो!
एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूंनी दिलेल्या तालमीबरोबरच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून, त्यातल्या चांगल्या गोष्टी घेत असतो, वेचत-टिपत असतो. आपल्या गुरूंची गायकी तर तो शिकत असतोच; परंतु आपल्या गुरूंसमान असणाऱ्या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थळं तो टिपत असतो आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला गवई तयार होतो.

गुरू चालायला शिकवतात, दृष्टी देतात, जीवनाकडे हळुवार वृत्तीनं पाहायला शिकवतात; पण ‘अमुकच पाहा,’ ‘तमक्याच मार्गानं जा’ असा आग्रह धरत नाहीत. ते सुरांचे रंग देतात, लयीचे कुंचले देतात; पण ‘अमुकच चित्र काढ’ असं सांगत नाहीत. स्वतःच शिकवलेल्या विद्येकडे एका वेगळ्या नजरेनं पाहण्याची दृष्टी देतात. ही दृष्टीसुद्धा कुठल्या शिष्याला किती द्यायची, हे शिष्याची कुवत बघून, गुरू ठरवत असतात!
स्वत:च्या गाण्याची अभिव्यक्ती करत असताना शिष्याच्या गायकीत अनेक गायकांच्या छटा दिसतात. त्यांत मुख्यत्वे गुरूंची गायकी, त्याच्या घराण्याच्या गायकी, घराण्यातील पूर्वजांची गायकी शिष्याच्या विचारांमधून दिसते.

याशिवाय आपल्या गुरूंसमान असणाऱ्या इतर दिग्गजांची - ज्यांचा आदर्श त्यानं ठेवलेला असतो व अनेक गोष्टी त्यांच्याकडून नकळतपणे आत्मसात केलेल्या असतात - सावली त्याच्या गायकीत दिसून येते. ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ती असते. ही नक्कल मात्र नक्की नसते. ‘गाण्यातली बहुश्रुतता’ असं याला म्हणता येईल. कुठल्याही उत्तम गवयाकडे अशी बहुश्रुतता असेल तर त्याचं गाणं हे अधिकाधिक समृद्ध होत जातं. अनेक मोठमोठ्या गायकांवर इतर गायकांचा इतका प्रभाव असतो की त्यांनाही अशा गायकांचं गाणं लोकांना उलगडून दाखवावंसं वाटतं. म्हणूनच मग, ‘मला उमजलेले बालगंधर्व’ किंवा ‘मला उमजलेले कुमार’ किंवा ‘मला उमजलेले वसंतराव’, असे कार्यक्रम लोकांसमोर प्रस्तुत होतात. मात्र, असे कार्यक्रम प्रस्तुत करणारे कलाकार हे त्या मोठ्या कलाकारांची नक्कल करत नसतात तर त्यांचे विचार, त्यांची गायकी, त्यांना दिसलेली सौंदर्यस्थळं इतरांना उलगडून दाखवायचा प्रयत्न करत असतात. कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकानं, ‘हे अमक्याचं बरं का!’,‘हे तमक्याचं बरं का!’ असं सांगत गाऊन दाखवताना दिसतात.

आधुनिक काळात मात्र गुरू-शिष्यपरंपरेत अनेक बदल झालेले दिसतात. काळानुसार सामाजिक-आर्थिक बदल होत गेले आहेत. पूर्वीच्या काळातल्या गुरू-शिष्यपरंपरेत व आधुनिक काळातल्या गुरू-शिष्यपरंपरेत मोठा बदल होण्याचं कारण म्हणजे, आताच्या काळात संगीतावर उदरनिर्वाह होईल की नाही अशी साशंकता मनात असल्यामुळे, त्या कलेकडे छंद म्हणून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. ‘संगीत गुरुकुला’चं रूपांतर ‘संगीत क्लास’मध्ये झालं. एकेकाळी चोवीस तास गुरूच्या सहवासात राहणारा विद्यार्थी आठवड्यातून फक्त दोनदा गुरूसमोर बसून विद्यार्जन करू लागला. एकदा दिल्या जाणाऱ्या ‘गुरुदक्षिणे’चं स्वरूप हे ‘मंथली फी’मध्ये परिवर्तित झालं. ‘पैसे दिले की संगीत शिकता येतं,’ ही समजूत रूढ होऊ लागली. ‘तणाव घालवण्यासाठी संगीत,’ असा प्रचार होऊ लागला. संगीताच्या पाच-सात परीक्षा झाल्या की ते विद्यार्थी स्वतः ‘गुरू’ होऊ लागले. शाळाशाळांमधून संगीत शिकवलं जाऊ लागलं. भारतीय अभिजात संगीताचा वारसा पुढं नेऊ पाहणाऱ्या प्रामाणिक साधकांच्या, गुरूंच्या व कलाकारांच्या संख्येपेक्षा पोटभरू/व्यावसायिक गुरूंचं व कलाकारांचं प्रमाण जास्त झालं आहे कटू सत्य होय, म्हणूनच संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी गुरू-शिष्य परंपरेचं जतन आणि जोपासना करणं अतिशय महत्त्‍वाचं आहे. त्याचं महत्त्व लक्षात घेऊन ज्येष्ठ व अनुभवी गायक-कलाकारांनी सादरीकरणाबरोबरच ही परंपराही जपत-जोपासत शिष्य घडवणं गरजेचं आहे.

पूर्वीची गुरू-शिष्यपरंपरा कशी होती याबद्दल पुढच्या लेखात आपण अधिक जाणून घेऊ या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com