पूर्वीची शागिर्दी (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

गुरू शिष्यावर प्रसन्न असल्यास, त्याची कुवत बघून, त्याला घराण्याची उत्तम तालीम देत. घराण्यातल्या उत्तमोत्तम बंदिशी शिष्याकडून घोटून घेत. अनेक प्रकारचे पलटे आणि अलंकारांचा रियाज करून घेत. रियाजाव्यतिरिक्त संगीतावर चर्चा-चिंतन-मनन केलं जाई. बुजुर्गांचा इतिहास, त्यांचे मौलिक विचार या सर्व गोष्टी शिष्याला सांगितल्या जात.

सध्या गल्लोगल्ली ‘संगीत क्लास’च्या पाट्या दिसून येतात. केवळ आवड किंवा हौस म्हणून, वेळ चांगला जातो म्हणून, क्लास जवळ आहे म्हणून किंवा चॅनलच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रसिद्धीला भुलूनसुद्धा गाण्याचा क्लास लावणारे विद्यार्थी दिसतात; पण पूर्वीच्या काळी संगीत शिकणं इतकं सोपं नव्हतं. आवड असूनही अनेकांना संगीत शिकता यायचं नाही. कारण, शिक्षणाचा मार्ग इतका सुकर नव्हता. मनापासून आवड, कष्ट, खूप अभ्यास आणि मेहनत करायची तयारी असेल असाच विद्यार्थी संगीत शिकत असे.

शिष्याला योग्य गुरू मिळणं आणि गुरूंना चांगला शिष्य लाभणं हा नशिबाचाच भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. असे गुरू भेटणं आणि त्यांनी शिकवायला संमती देणं हा शिष्याच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा असायचा. त्यापुढची अनेक वर्षं गुरू सांगतील तशी कामं करत विद्याग्रहण करण्यात सरत. त्या काळी गवयांची शागिर्दी करून गाणं शिकणं एवढं सोपं नव्हतं म्हणून अनेक जणं ही वाट अर्ध्यात सोडून देत.

एकदा का शिष्य गुरुगृही आला की पहिले अनेक दिवस गुरुगृही घरकामं करण्यात जात. यात गुरू सांगतील ते करणं, स्वयंपाकघरात मदत करणं, बाजारहाट सांभाळणं, गुरूंची सेवा करणं वगैरे कामं त्याला नेमून दिली जात. ही कामं करत असताना गुरू इतर शिष्यांना शिकवतील तेवढंच संगीत कानावर पडत असे. प्रत्यक्ष समोर बसून गाणं शिकवलं नाही तरी गुरू व इतर शिष्यांचं गाणं ऐकून शिष्याचा कान नकळत तयार होत असे. शिवाय, शिष्य नक्की टिकून राहून शिकतोय की पळून जातोय याचीही ती परीक्षा असे. या परीक्षेत शिष्य उत्तीर्ण झाला की गुरू गाणं शिकवायला सुुरुवात करत. एखादा शुभ दिवस बघून गुरू शिष्याला गंडा बांधत. विद्याग्रहण सुरू करायच्या आधी शिष्याची दिनचर्या ठरवून दिली जात असे. पहाटे गुरूंच्या आधी उठणं...प्रातर्विधी व स्नान उरकून बैठकीची तयारी करणं...गालिचा, बस्कर टाकणं...तंबोरा पुसून, मिळवून खर्जसाधना सुरू करणं...इत्यादी. गुरू आल्यावर त्यांचा आशीर्वाद घेऊन मग गुरूंच्या मर्जीप्रमाणे तालीम सुरू होत असे. गुरू शिकवत असताना तंबोरा छेडण्याचं काम शिष्याचंच असे. अशी तालीम माध्यान्हीपर्यंत चाले आणि मग परत संध्याकाळी सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालत असे. मधल्या वेळेत शिकलेल्या गोष्टींचा रियाज करणं, पाठांतर करणं वगैरेंची जबाबदारी शिष्यावर असे.

गुरू शिष्यावर प्रसन्न असल्यास, त्याची कुवत बघून, त्याला घराण्याची उत्तम तालीम देत. घराण्यातल्या उत्तमोत्तम बंदिशी शिष्याकडून घोटून घेत. अनेक प्रकारचे पलटे आणि अलंकारांचा रियाज करून घेत. रियाजाव्यतिरिक्त संगीतावर चर्चा-चिंतन-मनन केलं जाई. बुजुर्गांचा इतिहास, त्यांचे मौलिक विचार या सर्व गोष्टी शिष्याला सांगितल्या जात. प्रत्येक टप्प्यावर गुरूंची शिकवायची पद्धतही वेगवेगळी असे. आधी स्वतः गाऊन जसंच्या तसं शिष्याला गायला सांगितलं जाई. एका ठराविक टप्प्यापर्यंत शिष्याची तयारी झाली की त्याला स्वतःच्या प्रतिभेनं गायला प्रेरित केलं जाई. कधी फक्त बोलआलाप आणि तानांचा रियाज करून घेतला जाई, तर कधी बंदिशी आणि सरगम घोकून घेतली जाई. कारण, त्या काळी शिष्यांना लिहून घेण्याची मुभा नसे. अनेक वेळा गुरू हे शिष्यांकडून ख्यालाचे अस्थायी अंतरे तालाच्या मात्रेप्रमाणे बसवून घेत असत. घराण्याच्या शिस्तीप्रमाणे त्यांत तसूभरही फरक झालेला त्यांना चालत नसे.

या गुरुपरंपरेमुळे, गुरुमुखातून आलेली गायकी शुद्ध स्वरूपात शिष्याकडे पोहोचे. गुरु शास्त्र जाणणारे असतील तर रागाचे वादी-संवादी, पकड, वर्ज्य स्वर, चलन, जवळचे राग वगैरे या सगळ्याबद्दल माहिती देत. याउलट काही गुरू महिनोन् महिने रागाचं नावही न सांगता रागचलन शिकवत असत. ‘एक राग वर्ष-दोन वर्षं पिसून काढला की इतर राग गळ्यावर लवकर चढतात,’ असा गुरूंचा ठाम विश्वास असे. याच कारणानं एकाच रागाची तालीम अनेक वर्षं चाले. रागाचं नाव विचारण्याचीही शिष्याची हिंमत होत नसे. कारण, शंका विचारणं किंवा एखादी माहिती विचारणं यातून गुरूंचा उपमर्द होतो असा त्या काळी समज असे. लक्षपूर्वक श्रवणातून शिष्य तयार होत असे. त्यामुळे बुद्धी, ग्रहणशक्ती, पाठांतर, चिकाटी या गोष्टींना खूप महत्त्व असे. हे सर्व शिकलेलं पक्कं व्हावं या हेतूनं अनेक शिष्य गुरुबंधूंना शिकवत व शिकवलेलं त्यांच्याकडून घोकून घेत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, रामकृष्ण वझेबुवा यांच्यासारखे पूर्वीचे अनेक गवई अशाच तालमीतून तयार झालेले गवई आहेत. गुरूबरोबर गुरुमातेला प्रसन्न ठेवण्याचंही महत्त्वाचं काम शिष्याला करावं लागे. गुरुमाता शिष्यांची पोटच्या पोरासारखी काळजी घेत असत.

अशी तालीम देऊन, दिवसभर रियाज करून, तावून-सुलाखून आधीचा शिष्य तयार झाला की ही सर्व कामं नवीन शिष्याकडे जात. मग आधीच्या शिष्याला चिंतन व मनन करण्यासाठी अधिक वेळ मिळे. शिष्य थोडा तयार झाला, स्वतःच्या बळावर चार पावलं टाकायचा आत्मविश्वास त्याला आला की गुरू एखाद्या मैफलीत त्याला तानपुऱ्यावर बसवत. मध्येच गायची संधी देत. त्यात काही शिष्य घाबरून चुका करत, तर काही गायची संधी मिळाली की तिचा लाभ घेत आपल्या हुशारीची चुणूक दाखवून गुरूंची व श्रोत्यांची वाहवा मिळवत. एकदा मैफलीत गायची भीड चेपली की शिष्याचा आत्मविश्वास वाढे व तो अजून हिरीरीनं गाऊ लागे. अनेक वेळा गुरू व शिष्य यांचा आवाज इतका एकसारखा येई की नक्की गुरू गात आहेत की शिष्य या संभ्रमात श्रोते पडत. अशा अनेक मैफलींत गाऊन शिष्याला अनुभव मिळे व त्याची दृष्टी अधिक व्यापक व व्यावहारिक होई.

श्रवण-मनन-चिंतन व पुरेसा रियाज झाला की गुरूंच्या परवानगीनं शिष्य बाहेर स्वतंत्र मैफल करायला लागत असत. मैफलीतून मिळालेलं मानधन गुरुदक्षिणेच्या स्वरूपात गुरुचरणी अर्पण होत असे. शिष्य स्वतंत्र गायक म्हणून प्रस्थापित झाला की गुरुगृही राहण्याचा काळ लौकिकार्थानं संपुष्टात येत असे. गुरुगृही राहणं प्रत्यक्षात संपलं तरी गुरू आयुष्यभर शिष्याला गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करत असत व किमान वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर या गुरू-शिष्यांची भेट होत असे.

पुढच्या लेखात आपण ‘गुरू-शिष्य परंपरेची सद्यस्थिती’ याविषयी जाणून घेऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com