शिष्य कसा असावा...? (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

आदर्श शिष्य होणं हे मोठं कठीण काम असतं. शिष्याला आपलं स्वत्त्व विसरून गुरुचरणी लीन व्हावं लागतं. आपलं आयुष्य गुरूंच्या चरणी समर्पित करावं लागतं. गुरूंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट शिष्याला शिरसावंद्य असावी लागते. गुरू सहजासहजी प्रसन्न होत नसतात. शिष्याला आपल्या वागणुकीनं, कृतीनं गुरूंना प्रसन्न करून घ्यावं लागतं. शिष्याच्या बारीकसारीक कृतींमधून गुरूंविषयी निष्ठा व्यक्त होत असते.

गुरू, गोविंद दोनों खडे...का के लागू पाय?
बलिहारी गुरू आप की, जिस ने गोविंद दिखाय।

शिष्याला गुरूंबद्दल किती निष्ठा व आदर असावा याचं वर्णन
संत कबीरांनी या दोह्यात केलेलं आहे. एकाच वेळी गुरू व परमेश्वर दोघंही समोर उभे ठाकले असता कुणाचे पाय धरावेत, असा प्रश्न शिष्याला पडला तेव्हा तो गुरूंच्या पायांवर प्रथम नतमस्तक झाला.
याबाबत त्याला विचारलं असता तो म्हणाला : ‘प्रथम मी गुरूंच्या पाया पडलो. कारण, त्यांचाच कृपेमुळे आज साक्षात्‌ परमेश्वराचं दर्शन मला घडलं.’
शिष्यानं या ठिकाणी देवापेक्षाही गुरूंचं स्थान श्रेष्ठ मानलं आहे. गुरूंना कायमच चांगला शिष्य घडवण्याची तळमळ असते. तशी पात्रता शिष्याकडे असल्यास गुरूंच्या मार्गदर्शनानुसार शिष्य हा गुणी कलाकार म्हणून नावारूपाला येत असतो. गुरू आणि शिक्षक यांच्यातला फरक आपण मागच्या एका लेखात पाहिला. असा फरक शिष्य आणि विद्यार्थी यांच्यातही असतो. शिक्षकांची फी दिली की विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हिशेब पूर्ण होतो; पण गुरू पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन दृष्टी देत असल्यानं गुरूंचे उपकार कुठल्याही मोबदल्यानं कधीच फेडता येत नाहीत.

शिष्य कसा असावा याबद्दल समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधा’त काही लक्षणं सांगितली आहेत.
शिष्य निर्मळ, सद्वर्तनी, अनुतापी व निष्ठावान, तसंच नेमस्त, साक्षेपी आणि परमदक्ष असावा, असं ते म्हणतात.
आदर्श शिष्य होणं हे मोठं कठीण काम असतं. शिष्याला आपलं स्वत्त्व विसरून गुरुचरणी लीन व्हावं लागतं. आपलं आयुष्य गुरूंच्या चरणी समर्पित करावं लागतं. गुरूंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट शिष्याला शिरसावंद्य असावी लागते. गुरू सहजासहजी प्रसन्न होत नसतात. शिष्याला आपल्या वागणुकीनं, कृतीनं गुरूंना प्रसन्न करून घ्यावं लागतं. शिष्याच्या बारीकसारीक कृतींमधून गुरूंविषयी निष्ठा व्यक्त होत असते.
गुरुनिष्ठेचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे ‘महाभारत’काळातला एकलव्य! द्रोणाचार्यांनी ज्या वेळी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला तेव्हा कुठलाही किंतु मनात न ठेवता एकलव्यानं आपला अंगठा ताबडतोब कापून गुरूंच्या चरणी अर्पण केला. अर्थात्‌, असे गुरू आणि शिष्य आता होणे नाही. उत्तम गायक होण्यासाठी शिष्यात काही गुण असावे लागतात. भगवंताकडून मिळालेला सच्चा सूर, तालाची समज व कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याशिवाय गायकीच्या वेगवेगळ्या अंगांचं आकलन होणं आणि श्रोत्यांसमोर कलेचं सादरीकरण करणं हे सोपं काम नाही.
गुरूंविषयीचं प्रेम, आदर व भाव या बाबी शिष्याच्या वागण्यातून गुरूंच्या सहज लक्षात येत असतात. गुरू-शिष्याचं हे नातं मोठं नाजूक असतं. अनेक वेळा या नात्यात गैरसमजही निर्माण व्हायची शक्यता असते. गुरूंची प्रतिष्ठा वाढेल, त्यांच्या लौकिकात भर पडेल असं शिष्याचं आचरण असावं लागतं. शिष्य जितका नम्र, निष्ठावान, प्रामाणिक, आज्ञाधारक, आचारसंपन्न असेल तितका तो आपल्या गुरूंच्या निकट पोहोचत असतो. शिष्याची पात्रता, योग्यता पाहूनच गुरू त्याला विद्या देत असतात. कारण, प्रत्येक धातूमधून दागिने घडवायचे नसतात!

शिष्याला अत्यंत हुशारीनं आणि डोळसपणे गुरूंकडून विद्याग्रहण करावं लागतं. गुरू काय शिकवत आहेत ते अतिशय दक्ष राहून पचवावं लागतं. शिष्याला स्वतःच्या मर्यादा, स्वतःची क्षमता माहीत असावी लागते. आपल्या क्षमतेनुसार आहे त्या परिस्थितीत काय चांगलं करता येईल हे समजावं लागतं. गुरू-शिष्याचं नातं प्रदीर्घ काळ टिकण्यासाठी गायकी, आवाजाचा पोत, शिष्याच्या क्षमता या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिकवलेलं ग्रहण करायला अवघड आहे, सोपं आहे की मर्यादेपलीकडचं आहे हे समजावं लागतं. त्यानुसार नक्की किती प्रगती होते याचं तारतम्य असावं लागतं. शिकलेली विद्या पचवता येत नसेल तर कुठं काय कमी पडत आहे हे समजण्याची बुद्धी असावी लागते. गुरूंवर श्रद्धा ठेवून ते सांगतील त्या मार्गावरून चालण्याचा संयम असावा लागतो. शिष्याला जसे योग्य गुरू लाभणं आवश्यक असतं, तसंच गुरूंना चांगला शिष्य मिळणं हादेखील नशिबाचा भाग असतो. उदाहरणार्थ : भीमसेन जोशी यांना गुरुभेटीचा ध्यास लहानपणीच लागला होता, गायनाच्या तळमळीपोटी त्यांनी स्वतःचं घर सोडलं आणि भारतभर हिंडून गुरूंचा शोध घेतला. त्यांच्या पूर्वपुण्याईनं त्यांना सवाई गंधर्व भेटले. त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडले आणि भीमसेन जोशी हे संगीतविश्वाचे सम्राट झाले. चांगला शिष्य गुरूंचं नाव सर्वदूर पोहोचवत असतो व गुरूंच्या नावलौकिकात त्यांच्या कारकिर्दीनंतरही भर टाकत असतो. भीमसेन जोशी हे याचं अत्यंत समर्पक उदाहरण आहेत.

गुरूंची गायकी, विचार, कल्पना चांगल्या शिष्याच्या माध्यमातून पुढं नेल्या जात असतात. घराण्याची गायकी आपल्या पश्चात टिकवून ठेवण्यासाठी असे शिष्य तयार करणं हे गुरूंच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. शिष्यानं आपल्याही पुढं जाऊन कीर्ती मिळवावी अशी प्रत्येक गुरूंची इच्छा असते. आपला शिष्य खूप चांगली प्रगती करत आहे व इतर लोक त्याचं कौतुक करत आहेत याचा गुरूंना नेहमीच अभिमान वाटतो. संगीतक्षेत्रात अशा गुरू-शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ : मोगूबाई कुर्डीकर आणि किशोरी आमोणकर, भास्करबुवा बखले आणि नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, पंडित मणिराम आणि जसराज, रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व आणि भीमसेन जोशी. गुरू-शिष्याचं नातं काळानुसार थोडंफार बदललं असलं तरी कलाजगतात अजूनही शिष्याच्या मनात गुरूंबद्दल अतीव प्रेम, आदर, निष्ठा दिसून येते.

पुढील लेखात आपण कलाकाराच्या आयुष्याचा आढावा घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com