गुरुकुल ते विद्यालय (सायली पानसे-शेल्लीकेरी)

सायली पानसे-शेल्लीकेरी
Sunday, 13 September 2020

संगीतविद्यालयं आणि त्यांतली विद्यार्थिसंख्या वाढत गेली आणि त्यामुळं उत्कृष्ट कलाकार घडवण्याच्या दृष्टीनं अध्यापन व अध्ययन या दोहोंवर मर्यादा आल्या. संगीताचा प्रसार मात्र घरोघरी झाला; पण ‘तानसेन’ निर्माण होण्याऐवजी ‘कानसेन’ जास्त निर्माण होऊ लागले.

संगीतातले बदल (भाग १)
संगीतविद्यालयं आणि त्यांतली विद्यार्थिसंख्या वाढत गेली आणि त्यामुळं उत्कृष्ट कलाकार घडवण्याच्या दृष्टीनं अध्यापन व अध्ययन या दोहोंवर मर्यादा आल्या. संगीताचा प्रसार मात्र घरोघरी झाला; पण ‘तानसेन’ निर्माण होण्याऐवजी ‘कानसेन’ जास्त निर्माण होऊ लागले. या काळात झालेला मोठा परिणाम असाही म्हणता येईल, की ठराविक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी प्राप्त होऊ लागली. या पद्धतीमुळे पदवी आणि सांगीतिक तपश्चर्या यांचा गुणात्मक संबंध राहिला नाही. अनेक पदवीधर गायक व्यवसाय म्हणून विद्यादानाचं काम करू लागले. केवळ पुस्तकी ज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर मर्यादा आल्या.

संगीतकलेला प्रदीर्घ साधनेची जोड मिळाली की ठराविक गायनशैली काळाच्या ओघात टिकून राहते आणि मग ती गायकी मूळ कलाकाराच्या घराण्याची म्हणून ओळखली जाते. त्यातून घराणेदार गायकीच्या शिस्तशीर परंपरा तयार होतात. प्रत्येक घराण्याची शैली व पारंपरिक शिस्त घराण्यांच्या गुरूंकडून शिष्याला मिळत असते. त्या त्या घराण्याच्या परंपरेनं चालत येणाऱ्या सौंदर्यतत्त्वांना धक्का पोहोचू न देता त्यांत स्वत:ची अशी भर घालणारे शिष्य लाभले की त्या घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढं सुरू राहते. हे ज्ञान आणि गुरू-शिष्यांमधला महत्त्वाचा दुवा म्हणजे आपली गुरू-शिष्य परंपरा.

गुरुकुलपद्धती : भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे, मग क्षेत्र कोणतंही असो. प्राचीन काळी भारतात केवळ संगीताचंच नव्हे, तर सर्व प्रकारचं शिक्षण गुरुकुलपद्धतीनंच आश्रमात होत असे. गुरूंच्या सहवासात अष्टौप्रहर राहिल्यानं त्यांच्या आचार-विचारांचे संस्कार शिष्यांवर होत असत. त्यातून गुरू-शिष्यांमध्ये एक अतूट नातं तयार होत असे. परंपरेचा प्रवास योग्य पद्धतीनंच व्हावा यासाठी विद्यादान हे सत्पात्रीच केलं जावं याबाबत गुरू आग्रही असायचे. त्यामुळे शिष्यालाही संयम, चिकाटी व गुरुसेवा यांद्वारे स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागे.
काळाच्या ओघात आश्रमपद्धती मागं पडली; पण शहरांमध्ये गुरुगृही राहून शिक्षण घेण्याची प्रथा मात्र सुरू राहिली. संस्थानिक आपल्या आवडत्या गवयाला त्याच्या शिष्यांसह उदाराश्रय देत व त्यांच्या चरितार्थाची काळजी घेत असत. संगीतशिक्षणाच्या दृष्टीनं ही एक चांगली व्यवस्था होती. कारण, अखंड संगीतश्रवणानं होणारे संस्कार शिष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे असत. गुरूला काही शिकवण्याची इच्छा व्हावी आणि शिष्यानं ते ग्रहण करण्यासाठी तत्पर असावं ही एक आदर्शच स्थिती म्हणावी लागेल. तंबोरा जुळवणं, आवाज लावणं,
स्वर-ताल समजून घेणं, रागांची ओळख होणं आणि ते मांडण्याची क्षमता मिळवणं हा प्रवास सोपा नाही आणि नुसत्या पुस्तकांच्या वाचनानं साध्य होणाराही नाही. त्यासाठी गुरूचं सततचं लक्ष ही अत्यावश्यक गोष्ट आहे. राजाश्रयामुळे कलाकाराला आपल्या कलेचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहता येई. परंपरागत गायकी समृद्ध होण्यासाठी आणि ती परंपरा जतन करण्यासाठी आवश्यक ते स्थैर्य या व्यवस्थेमुळे मिळत असे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गुरुकुलपद्धतीही मागं पडली. गुरुगृही राहून संगीतशिक्षण मिळवण्याची पद्धत बंद झाली. तरीही दिवसातला काही काळ गुरूंबरोबर घालवून गुरूंच्या प्रत्यक्ष देखरेखीत तालीम घेणं शक्य होत होतं. शिक्षणपद्धती जरी बदलली तरी उत्कृष्ट कलाकार निर्माण झाले.

गुरुकुलपद्धतीकडून विद्यालयपद्धतीकडे वाटचाल : ब्रिटिश राजवटीत त्यांची विचारसरणी, शिक्षणपद्धती यांचा प्रभाव संगीतक्षेत्रावरही पडला आणि तेही शालेय शिक्षणपद्धतीच्या चौकटीत बसवण्याचे प्रयत्न सुरू झाले. शालेय पद्धतीनं एकाच वेळी, एकाच शिक्षकाच्या हाताखाली अनेक विद्यार्थी एकदम शिक्षण घेऊ लागले. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी ‘गांधर्व महाविद्यालया’ची स्थापना केली, तर विष्णू नारायण भातखंडे यांनी ‘माधव संगीत विद्यालय’ आणि ‘मॉरिस कॉलेज ऑफ म्युझिक’ सुरू केलं. या संस्थांना फार उच्च दर्जाचे कलाकार शिक्षक म्हणून लाभले होते व त्यांच्या मार्गदर्शनात अनेक गुणी विद्यार्थी घडले; पण पुढं पुढं ही विद्यालयं आणि त्यांतली विद्यार्थिसंख्या वाढली आणि त्यामुळं उत्कृष्ट कलाकार घडवण्याच्या दृष्टीनं अध्यापन व अध्ययन या दोहोंवर मर्यादा आल्या. संगीताचा प्रसार मात्र घरोघरी झाला; पण ‘तानसेन’ निर्माण होण्याऐवजी ‘कानसेन’ जास्त निर्माण होऊ लागले. या काळात झालेला मोठा परिणाम असाही म्हणता येईल, की ठराविक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी प्राप्त होऊ लागली. या पद्धतीमुळे पदवी आणि सांगीतिक तपश्चर्या यांचा गुणात्मक संबंध राहिला नाही. अनेक पदवीधर गायक व्यवसाय म्हणून विद्यादानाचं काम करू लागले. केवळ पुस्तकी ज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर मर्यादा आल्या.
वैज्ञानिक प्रगतीबरोबर या क्षेत्रात शिरलेल्या तांत्रिक बाबींमुळे, उदाहरणार्थ : मायक्रोफोन, लाउडस्पीकर, रेडिओ, टेपरेकॉर्डर, टीव्ही आदी सोईंमुळे आवाज लावण्याची पद्धत, शिकण्या-शिकवण्याची पद्धत, तंत्र यामुळं अनेक प्रकारचे बदल कलाकारांना सादरीकरणात करावे लागले.

संगीतात अनेक शाखा निर्माण झाल्या. उदाहरणार्थ : सिनेसंगीत, नाट्यसंगीत, गझल, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत, ठुमरी. गायकांनी विशिष्ट शैलींचा अभ्यास केला व त्यांत प्रावीण्य मिळवलं. या सर्व शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अनेक कलाकार निर्माण झाले. सिनेसंगीतानं तर भारतीय संगीताची पताका थोडक्या कालावधीतच जगभरात फडकवली.
संगीत ऐकण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. छोटेखानी मैफल, जाणते श्रोते, सुंदर सादरीकरण, कलाकार आणि श्रोते यांच्यातला उत्स्फूर्त सुसंवाद, उत्कृष्ट कलात्मक गायन-वादनाला तत्क्षणी मिळालेली श्रोत्यांच्या पसंतीची पावती...या साऱ्या गोष्टी मात्र आता आठवणीमध्येच राहिल्या आहेत.

डिजिटल-युगात संगीत शिकण्या-शिकवण्याच्या व ऐकण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांचा आढावा पुढच्या लेखात घेऊ या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sayali panse write gandhar article