...पण जे नवं तेही हवं! (सायली पानसे-शेल्लीकेरी)

सायली पानसे-शेल्लीकेरी
Sunday, 20 September 2020

रागपद्धती हे पारंपरिक भारतीय संगीताचं सदैव वाढत जाणारं असामान्य वैभव असलं तरी आजच्या या आभासी रसिकतेच्या काळात ते स्वरूप कायमच टिकेल का असा प्रश्न पडतो. आणखी शंभर वर्षांत या गायकीचं स्वरूप किती तरी बदलेल. काळाच्या ओघात काय बदल होतील हे सांगणं मात्र अशक्य आहे.

संगीतातले बदल : भाग २
रागपद्धती हे पारंपरिक भारतीय संगीताचं सदैव वाढत जाणारं असामान्य वैभव असलं तरी आजच्या या आभासी रसिकतेच्या काळात ते स्वरूप कायमच टिकेल का असा प्रश्न पडतो. आणखी शंभर वर्षांत या गायकीचं स्वरूप किती तरी बदलेल. काळाच्या ओघात काय बदल होतील हे सांगणं मात्र अशक्य आहे.

गुरुकुलपद्धतीपासून ते विद्यालयीन पद्धतीपर्यंतचे बदल मागच्या लेखात पाहिले. त्यानंतरचे बदल या लेखात पाहू या...
ऑनलाईन पद्धती : आश्रमशिक्षण, गुरुकुल, खासगी शिकवण्या, विद्यालय असा प्रवास करत करत आता संगणकयुगात ‘ऑनलाईन संगीतशिक्षण’ ही नवीनच पद्धत निर्माण झाली आहे. एकूणच कलेकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, उपलब्ध संधी, तंत्रज्ञान आणि त्याबरोबरच सतत बदलतं वेगवान आयुष्य यामुळे गुरुकुलपद्धती आज मागं पडली आहे. राहणीमानाचा वाढता खर्च आणि जीवघेणी स्पर्धा यांमुळे गुरुजनांनाही आयुष्याचा काही काळ स्वत:ची सांगीतिक कारकीर्द घडवण्यासाठी आणि भविष्याची आर्थिक तरतूद करण्यासाठी द्यावा लागतो. त्यामुळे काही थोड्या निवडक शिष्यांवर लक्ष केंद्रित करणं ही गोष्टही अवघड होऊन बसली आहे. इंटरनेटमुळे ज्ञानाच्या प्रचंड भांडाराची किल्लीच घरबसल्या प्रत्येकाच्या हाती आली आहे. गुरू-शिष्यसहवासातून होत जाणारं परंपरांचं संस्करण आणि संक्रमण ऑनलाईन शिक्षणात अवघड आहे. गुरूंकडून एकेक सूर ऐकता यावा, शिकता यावा म्हणून घरा-दाराचा त्याग करून जिवाचं रान करणारे, त्यासाठी पडतील ते कष्ट उपसणारे भीमसेन जोशी यांच्यासारखे अनेक प्रतिभावंत कलाकार या ऑनलाईन पद्धतीतून निर्माण होतील की नाही हे सांगता येणं अवघड आहे. मात्र, देश-विदेशांच्या भौगोलिक मर्यादा ओलांडून आणि सांस्कृतिक अंतरावर मात करून, ज्ञान देण्या-घेण्यासाठी आजच्या गतिमान युगानं हा एक चांगला तोडगा काढला आहे एवढं मात्र नक्की.

संगीत ऐकण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला आहे. खूप मोठा श्रोतृवृंद - जवळजवळ हजारोंच्या संख्येनं असलेला, जिथं दर्दींपेक्षा गर्दीचंच प्राबल्य जास्त असतं - अशा श्रोत्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी असल्यानं नव्वद टक्के कलाकार हे ‘लोकांना काय आवडेल’ असाच विचार करतात. तिथं परंपरेची श्रीमंती, अनवट रागाविष्कार, मांडणीतलं आव्हानं पेलत उभं केलेलं रागाचं अमूर्त चित्र या गोष्टींचा विचार फार कमी कलाकार करताना दिसतात. असं सांगीतिक सौंदर्य सादर करण्यापेक्षा तास-दोन तासांच्या मैफलीत केवळ लोकरंजन करून बिदागी पदरात पाडून घ्यावी असा विचार करणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी आहे. क्लास अपीलपेक्षा मास अपील असलेल्या अशा प्रकारच्या मैफलीत कलाकार-श्रोते यांच्यातला सुसंवाद हा करमणूकप्रधान व्यावसायिकतेकडे अधिक झुकलेला दिसतो. विज्ञान-तंत्रज्ञानानं आपल्याला आता
याही पुढच्या पायरीवर पोहोचवलं आहे. कलाकारानं आपलं गाणं रेकॉर्ड करावं, इंटरनेटवर टाकावं आणि श्रोत्यांनी आपापल्या सवडीनुसार ते ऐकून ‘हिट्स’ व ‘लाईक्स’ देऊन आपली पसंती-नापसंती नोंदवावी इथवर परिस्थिती बदलली आहे.

रागपद्धती हे पारंपरिक भारतीय संगीताचं सदैव वाढत जाणारं असामान्य वैभव असलं तरी आजच्या या आभासी रसिकतेच्या काळात ते स्वरूप कायमच टिकेल का असा प्रश्न पडतो. आणखी शंभर वर्षांत या गायकीचं स्वरूप किती तरी बदलेल. काळाच्या ओघात काय बदल होतील हे सांगणं मात्र अशक्य आहे. पूर्वी पाच दिवस चालणारे क्रिकेटसामने आता एका दिवसावर आलेले आहेत, तसंच रात्र रात्र चालणाऱ्या मैफली आता मर्यादित वेळेत आटोपत्या घ्याव्या लागत आहेत. अशा वेळी उत्स्फूर्त कल्पनाविस्ताराला मोठा वाव असलेला, सादरीकरणासाठी जास्त वेळेची आवश्यकता असणारा आजचा ख्याल पुढं, कोण जाणे, कुठल्यातरी वेगळ्याच रूपात आपल्यासमोर असेल! प्रगत तंत्रज्ञान हा भूत-वर्तमान-भविष्य या तिन्ही काळांना जोडणारा दुवा झाला आहे. भूतकाळात संगीताच्या क्षेत्रात होऊन गेलेल्या दिग्गजांचं कार्य आज वेगवेगळ्या माध्यमांतून आपण ऐकू शकतो, पाहू शकतो आणि पुढच्या पिढीला दाखवू शकतो. तसंच आजच्या कलाकारांची निर्मितीही याच तंत्रज्ञानामुळे, परंपरेच्या भविष्यातल्या वाढीला पूरक ठरणार आहे. हळूहळू विस्तारत चाललेल्या या वृक्षानं आता पृथ्वीवरील अनेक मर्यादा पार करत जगभरातलं संगीत जवळ आणलं आहे. इतकंच नव्हे तर, त्याच्या काही शाखा तर अंतरिक्षातही पोहोचल्या आहेत! (अंतरिक्षातल्या एका ग्रहाला जसराज यांचं नाव बहाल करण्यात आलं आहे).

सुगम संगीतातही असेच बदल दिसून येतात. पूर्वीची गीतं त्यांच्या चालींमुळे ऐकायला रसभरित वाटायची. पूर्वीच्या काळी चपखल शब्दरचना, नेमक्या उपमा, नेमके अलंकार आदींचा वापर करून गीतांमध्ये जीव ओतायचा प्रयत्न गीतकार-संगीतकार करत असत. शब्द-सूर-ताल-लय या त्यातल्या बाबी चित्तवेधक आणि भावजागृती करणाऱ्या असायच्या. त्या गीतांच्या तुलनेत - आताच्या गीतांमध्ये जरी वेगळेपणा असला तरी - जुन्या गाण्यांची जागा आजची गीतं घेऊ शकत नाहीत. याचं कारण असं की, तरुण मंडळी कशी थिरकतील याचा विचार सध्याच्या गाण्यांत अधिक केला जातो. आधी गाण्याची चाल; मग त्यानंतर शब्दरचना या प्रकारामुळे सध्याची गाणी - जरी तरुणांना आवडत असली तरी - काळाच्या कसोटीवर टिकत नाहीत. त्यांची प्रसिद्धी/लोकप्रियता मर्यादित काळ राहते. आजकाल जमाना ठेक्याचा आहे, त्यामुळे शब्दरचनेच्या दृष्टिकोनातून गीतं क्वचितच ऐकली जातात. तरुण पिढी जुनी गाणी नवीन थाटात सजवून गाताना व ऐकताना सर्रास दिसते. आजच्या अनेक चित्रपटांमध्ये आणि वेगवेगळ्या अल्बम्समध्ये जुन्याच गाण्यांचे शब्द घालून किंवा संगीत जुळवून गाणी तयार केली जातात. कारण, आज अर्थपूर्ण गाणी फारच कमी प्रमाणात लिहिली जातात.

जुन्या गाण्यांची जादू कायम राहील यावर दुमत असू शकत नाही; पण काळानुरूप श्रोत्यांचीही आवड-निवड बदलली आहे. सतत बदलणारं तंत्रज्ञान, वाढलेली स्पर्धा, पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव आजच्या गाण्यांवर दिसतोय हे खरं आहे. त्यातही जे चांगलं आहे तेच स्वीकारलं जात आहे. त्यामुळेच एखाद्या रॅप गाण्यावर थिरकणारी तरुणाई ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या गाण्यांनाही तितकीच दाद देताना दिसते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. काळानुरूप कोणत्याही गोष्टीत बदल हा होतोच आणि तो स्वीकारण्यावाचून पर्याय नसतो. याला संगीत कसं बरं अपवाद ठरेल? आजच्या काळातल्या संगीतातले सूर तीव्र झाले आहेत, वाद्यवृंदाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे व त्यातून गायकाचा आवाज शोधून काढणं कठीण जरी झालं असलं तरी हेच संगीत आजच्या तरुण पिढीला अधिक भावतंय ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही. ‘जुनं ते सोनं’ असलं तरी ‘नवं तेही हवं’च! नव्या दमाचे संगीतकार नवनवीन प्रयोग करून संगीतात आवश्यक ते बदल करताना दिसत आहेत. कुणाला कोणत्या प्रकारचं संगीत आवडावं, हा ज्याचा त्याचा विषय आहे; पण खरं पाहिल्यास जे अंतर्मनाला स्पर्श करतं, शब्दांमुळे मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडतं तेच खरं संगीत होय.
मनाला हळुवार स्पर्श करणारं सुगम संगीत असो किंवा परंपरेचं घराणेदार संगीत असो, ते ऐकायला श्रोत्यांचे कान तयार असावे लागतात.

अशा रसिक-श्रोतृवर्गाबद्दलचं विवेचन पुढच्या लेखात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sayali panse write gandhar article