संगीतातली सौंदर्यस्थळं : भाग ३ (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

सरगम, ताना, लय, तिहाई, चमत्कृती, सवाल-जबाब, रसनिष्पत्ती, स्वरसाथ...ही शास्त्रीय संगीतातली आणखी काही सौंदर्यस्थळं आहेत. या भागात त्यांचं मर्म जाणून घेऊ या...

शास्त्रीय संगीताची मैफल ऐकताना अनेक टप्प्यांवर सौंदर्यानुभूती येत असते. त्यापैकी काही
सौंदर्यस्थळं आपण मागच्या दोन लेखांत पाहिली. आज त्यापुढची काही सौंदर्यस्थळं बघू. या सर्व सौंदर्यस्थळांचा अभ्यास केला नाही म्हणून ती सौंदर्ये जाणवत नाहीत असं नाही; पण अभ्यास असेल तर त्यांचा आनंद डोळसपणे घेता येतो हे मात्र नक्की.

सरगम : स्वरनाम ( सा, रे, ग, म, प, ध, नी) घेऊन गायन केल्यास त्याला ‘सरगम’ असं संबोधलं जातं. चमत्कृतिपूर्ण सरगम किंवा अत्यंत जलद गतीत सरगम गायल्यास सौंदर्यानुभूती येते. अशी सरगम गायला अत्यंत कुशाग्र बुद्धी आणि जलद उच्चारणाचं कौशल्य महत्त्वाचं असतं, जे रसिकांना आकर्षून घेतं.

ताना : अत्यंत जलद गतीत स्वर म्हणणं म्हणजे ‘ताना.’ साधारणपणे बंदिशीच्या उत्तरार्धात ताना गायल्या जातात. गमकयुक्त ताना, दाणेदार ताना, एका श्वासात मोठ्या पल्लेदार ताना अशा अनेक प्रकारच्या ताना श्रोत्यांच्या पसंतीला पडतात. त्यामागची चमत्कृती आणि तयारी श्रोत्यांना आकृष्ट करते. संपूर्ण मैफलीत तानांचं प्रमाण मोजकंच असलं तरी थोड्या अवधीत श्रोत्यांना सौंदर्यानुभूती येते.

लय : रागगायन सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत प्रस्तुतीकरणाची लय वाढत असते. संथ आलापांची लय पुढं वाढत जाते, बोल-आलाप, सरगम, ताना आदी म्हणत लय वाढत असते. विलंबित लयीत प्रस्तुतीकरण झालं की मध्य किंवा द्रुत लयीतली बंदिश सुरू होते. यात तर लयीचा खूप फरक असतो. या सर्व वेगवेगळ्या लयींमध्ये सौंदर्य जाणवतं. कमी लयीत स्थैर्य आणि शांतता दिसते, मध्य लयीत तालाशी खेळत गायलेले बोलआलाप आणि सरगम यांमधून लयीचा वेगळा पैलू जाणवतो आणि द्रुत लयीत चंचलता दिसते. वाढलेल्या लयीच्या बरोबरीनं गाणं सुरू असताना ऐकणाऱ्याचीही उत्तेजना वाढते. या सर्व वेगवेगळ्या लयींमधून वेगवेगळे भाव निर्माण होतात आणि सौंदर्यनिर्मिती होते.

तिहाई : बंदिशीतला मुखडा किंवा तबलावादनातला एखादा तुकडा तीन वेळा वाजवून सम घेण्याच्या क्रियेला ‘तिहाई’ असं म्हटलं जातं. मग तबल्यावर एखादा तुकडा तीन वेळा वाजवून सम घेणं असेल किंवा संवादिनीवर किंवा गायकानं बंदिशीचा मुखडा तीन वेळा वाजवून सम घेणं असेल, तिहाईमुळे सौंदर्यनिर्मिती होते. कलाकाराचं तालावरचं आणि लयीवरचं प्रभुत्व त्यातून दिसून येतं. लय विलंबित असो वा द्रुत, तिहाई हा प्रकार श्रोत्यांच्या पसंतीला नेहमीच उतरताना दिसतो.

चमत्कृती : आवाजाच्या किंवा वाद्यवादनाच्या तयारीतून चमत्कृती निर्माण केल्यास सौंदर्यानुभूती होते. भारदस्त किंवा अत्यंत बारीक लावलेला आवाज, गमकेचा वापर, पल्लेदार ताना, खूप वेळ टिकवून ठेवलेला स्वर, वेगवेगळ्या सप्तकांत घेतलेले स्वर, वाद्यातून काढलेले वेगवेगळे आवाज, वाद्य छेडण्याची वेगळी पद्धत वगैरेंमुळे चमत्कृती निर्माण होते. अशा सादरीकरणातून रसिकांना एखादा विशेष पैलू उलगडून दाखवण्याचा हेतू असतो. त्याला ‘गिमिक’ असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा श्रोत्यांची ‘वाहवा’ मिळवण्यासाठी अशा चमत्कृती निर्माण केल्या जातात. याच कारणामुळे बुजुर्ग कलाकार अशा चमत्कृतीला फारसं श्रेय देत नाहीत.

सवाल-जबाब : सादरीकरणात, विशेषतः वाद्यवादनात, कधी तरी ‘सवाल-जबाब’सारखे प्रकार दिसून येतात. एका कलाकारानं आपल्या गळ्यातून अथवा वाद्यातून एक स्वरवाक्य काढलं की त्याला साजेसं स्वरवाक्य दुसऱ्या कलाकारानं पाठोपाठ ऐकवायचं...या सवाल-जबाबात ही स्वरवाक्यं छोटी करत, अनेक आवर्तनांनंतर शेवटी एकत्र येत समेचा परमोच्च बिंदू गाठला जातो. त्यादरम्यान दोन कलाकारांनी एकत्र घेतलेले विराम, त्यांची विचारांची
देवाण-घेवाण, त्यांची प्रतिभा, ट्यूनिंग, त्यांच्यातली खेळीमेळीची चुरस आणि नजरेच्या माध्यमातून एकमेकांना दिलेला प्रतिसाद या सर्वांमुळे अशा सवाल-जबाबाला रसिकांची विशेष पसंती मिळते.

रसनिष्पत्ती : रागगायनातून रसनिष्पत्ती होत असते हे आपण मागच्या एका लेखात पाहिलं. एखादा राग ऐकून शांत वाटतं, तर एखाद्या रागानं अस्वस्थ वाटतं, एखादा राग प्रसन्न वातावरण निर्माण करतो, तर एखादा राग ऐकून उत्तेजना निर्माण होते. अशा प्रकारची रसनिष्पत्ती हे सौंदर्याचंच लक्षण आहे. भावना कुठलीही असली तरी मैफल ऐकून मन प्रसन्न होतं, शांत वाटतं आणि थोड्या वेळासाठी का असेना, सर्व वेदनांचा आणि दुःखाचा विसर पडतो.

स्वरसाथ : मुख्य गायकाच्या मागं बसून तानपुरा छेडत गायकाच्या स्वरात स्वर मिसळणं या क्रियेला स्वरसाथ करणं असं म्हणतात. साधारणपणे मुख्य कलाकाराचे शिष्य अशी स्वरसाथ करत असतात. एखादं आवर्तन भरणं, गायकाबरोबर मुखडा म्हणणं किंवा स्वर लांबवणं अशा प्रकारची ही स्वरसाथ असते. गायकाच्या मागं अशा एखाद्या शिष्यानं छान षड्ज सुरात मिसळला किंवा आकर्षकरीत्या सम घेतली की सौंदर्यानुभूती होते व श्रोत्यांकडून शिष्याला प्रोत्साहनपर टाळ्या हमखास मिळालेल्या दिसतात. मुख्य गायकाच्या सतत ऐकू येणाऱ्या आवाजानंतर शिष्याच्या आवाजामुळे, गायनातला एकसुरीपणा निघून जातो म्हणून अशी साथ मैफलीचं सौंदर्य वाढवते. शिवाय, गायनाची परंपरा पुढच्या पिढीत योग्यरीत्या पोहोचते आहे याचं कौतुकही श्रोत्यांना वाटतं.

आणखीही काही सौंदर्यस्थळांचा आढावा पुढच्या लेखात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com