कंगना, अर्णब आणि आपण... (शीतल पवार)

शीतल पवार shital.pawar@esakal.com
Sunday, 25 October 2020

सवयीचा अतिरेक घातकच; मग ती सवय चांगली असो की वाईट. एखादी सवय जगण्याचा अविभाज्य भाग बनून आपल्यावर कधी स्वार झाली, आपला ताबा तिनं कधी घेतला, हेही कळत नाही. मग हीच सवय आपल्या आवडी-निवडींवर हुकमत गाजवते, मतांना बरी-वाईट दिशा देते, एखाद्या खासगी बाबीला आपल्याही नकळत वेगळंच वळण देते.

सवयीचा अतिरेक घातकच; मग ती सवय चांगली असो की वाईट. एखादी सवय जगण्याचा अविभाज्य भाग बनून आपल्यावर कधी स्वार झाली, आपला ताबा तिनं कधी घेतला, हेही कळत नाही. मग हीच सवय आपल्या आवडी-निवडींवर हुकमत गाजवते, मतांना बरी-वाईट दिशा देते, एखाद्या खासगी बाबीला आपल्याही नकळत वेगळंच वळण देते. आपल्याला एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करायचं नसूनही मत व्यक्त करायला लावते... प्रवाहात ओढून नेते... समाजमाध्यमं ही आपली अशीच एक सवय तर बनत नाही ना? ती आपल्याही नकळत आपला वापर बाहुलं म्हणून तर करत नाहीत ना? आपण मूळचे जसं नाही आहोत, तसं तर ती आपल्याला वागायला भाग पाडत नाहीत ना?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून अनेक आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. कोरोनासारख्या प्रश्नाचं गांभीर्य अचानक मागं पडून भलतेच विषय चर्चेला येत आहेत, त्यामुळं माध्यमांवरही खूप टीका सुरू आहे. कंगना राणावत, अर्णब गोस्वामी हे कुण्या एका पक्षाचा किंवा विचारसरणीचा अजेंडा पुढं रेटत आहेत, असं वरकरणी तरी दिसत आहे. त्यामुळं या दोघांच्या समर्थनार्थ, तसंच विरोधातही अनेक प्रकारची मतं समाजमाध्यमांवर व्यक्त केली जात आहेत. आता प्रश्न असा पडतो, की कंगना- अर्णब यांच्यासारख्यांना डिजिटल माध्यमांवर इतकी व्हायरॅलिटी मिळते कुठून?
***

सर्वसामान्यांना व्यक्त होता यावं यासाठी समाजमाध्यमांनी एक स्वतंत्र मंच उपलब्ध करून दिला. या मंचावर व्यक्त होणं, त्यावरून माहिती मिळवणं, ती माहिती प्रसृत करणं हे आता कोट्यवधी लोकांच्या अंगवळणी पडलं आहे. आपल्या याच सवयीतून कळत-नकळत कंगना- अर्णब जन्माला येत आहेत. त्यांना भस्मासुर म्हणावं असा मोह होतोय !
***

फेसबुकसारख्या कंपन्या नेमकं काय करतात?
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर टीका झाली. भारतात उजव्या विचारसरणीच्या नेत्याची विशिष्ट धर्माच्या विरोधात द्वेष पसरवणारी पोस्ट न हटवून सत्ताधारी विचारसरणीला झुकतं माप दिल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला. राजकीय पक्षांना झुकतं माप देताना फक्त पोस्ट हटवणं किंवा पोस्ट दाखवणं इतकीच भूमिका फेसबुक पार पाडतंय, असा समज यातून होत असेल तर ते चूक आहे. फेसबुकची राजकीय भूमिका खूप व्यापक आणि व्यावहारिक आहे. फेसबुक हा तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार आपल्या नकळत आपल्या मतांवर अधिराज्य गाजवत आहे. आपली समज (Perception) तो ठरवत आहे, आपल्या मतांना (Opinion) तो आकार देत आहे.
***
Perception चा खेळ
फेसबुकसारखी माध्यमं फक्त analytics वर नव्हे, तर user च्या behaviour आणि sentiments वर सर्वाधिक काम करतात. आपल्या आवडी-निवडींनुसार जाहिराती दाखवणं ही या व्यवसायाची केवळ एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे, आपल्या भाव-भावनांचं सतत मूल्यमापन करून आपली मतं अजमावणं आणि त्या मतांवर प्रभाव टाकणं. त्याचा परिणाम आपल्या आर्थिक व्यवहाराइतकाच आपल्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यावरही नकळत होत आहे. सतत एकच एक गोष्ट कानावर पडत राहिली, की तेच सत्य आहे असं वाटायला लागतं. ही स्वाभाविक मानवी भावना आहे. गोबेल्स आठवतोय ना? त्यानं दृश्य आणि गोष्टी सांगण्याच्या तंत्राचा प्रभावी वापर करून साडेचार फुटी हिटलरची अविश्वसनीय अशी उंच प्रतिमा निर्माण केली होती...! याच मानवी भावनेचा फायदा घेत समाजमाध्यमं आणि त्यामागचं तंत्रज्ञान आपल्यासमोर एक चित्र उभं करत नेत आहेत. हे चित्र निर्माण करण्यासाठी गोबेल्सच्या हाती नव्हता, इतका प्रचंड डेटा आज तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिला आहे. डेटा म्हणजे माहिती. ती कुठल्याही प्रकारची असू शकते. एखादी व्यक्ती मोबाईलवर किती वाजताचा अलार्म लावते, हादेखील डेटा झाला. जितका जास्त डेटा, तितकं अचूक विश्‍लेषण. फेसबुककडं किंवा गुगलकडं असलेला डेटा आपल्या कल्पनेच्या मोजमापापेक्षा कितीतरी अवाढव्य आहे. या डेटातून व्यक्तींच्या आवडी-निवडी, सवयी, कल, मानसिकता या साऱ्या साऱ्या गोष्टींचं आकलन या खासगी कंपन्यांना होतं. त्यातून त्यांना हवा तो कल (ट्रेंड) त्यांना निर्माण करता येतो. याचं कारण, अधिक संख्येनं चर्चा होत असलेल्या विषयांना तंत्रज्ञान प्राधान्य देतं आणि अधिक संख्येनं काय द्यायचं याची पुरेशी माहिती फक्त या कंपन्यांनाच आहे. एखादी गोष्ट अधिक संख्येनं करायची आणि ती सत्य वाटेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवत राहायची, अशी रचना निर्माण झाली आहे. यातून धोका हाच, की त्यांनी निर्माण केलेला आभासही आपल्याला सत्य वाटू लागतो.
***
समाजमाध्यमांवर आधारित माध्यमांचं गणित
समाजमाध्यमांच्या झपाट्यानं झालेल्या वाढीनंतर बहुसंख्य पारंपरिक माध्यमांची गणितं ही समाजमाध्यमांवर येणाऱ्या पोस्ट, ट्रेंड यांच्यावर आधारित बनली. डिजिटल क्रमवारीच्या स्पर्धेतले key words, tags, SEO, trends इत्यादी ही त्यामागची प्रमुख कारणं. समाजमाध्यमांच्या व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तर यात गैर काही नाही. हे एक शास्त्र आहे; पण पारंपरिक माध्यमांकडं असलेल्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत गुगल आणि फेसबुकचं तंत्रज्ञान आणि अल्गोरिदम हे इतके विकसित आहेत की पारंपरिक माध्यमं त्यांच्याशी स्पर्धा करण्यात तोकडी पडतात. भारतीय माध्यमं आपल्या ग्राहकाशी जोडलं जाण्यासाठी आणि त्यावर आधारित व्यावसायिक गणितांसाठी गुगल किंवा फेसबुक यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळं यातून बाहेर येण्याऐवजी सगळीच माध्यमं या गर्तेत अडकत चालली आहेत. म्हणजे फेसबुक, गुगल जे दाखवतील, तेच पारंपरिक माध्यमंही फॉलो करत आहेत.
***
कंगना आणि अर्णब!
कंगना किंवा अर्णब यांच्यासारखे लोक या सर्व सिस्टिममध्ये विखाराचे वाहक बनतात. कंगनासारखी व्यक्ती सर्वसामान्यांच्या जगात अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे आणि समाजमाध्यमांच्या जगातलं ते एक verified account ही आहे. या व्यक्तींना समाजमाध्यमांवर influential असंही म्हटलं जातं. अशा लोकांकडून एखादा मुद्दा लावून धरला जातो व त्या मुद्द्यावर एक विशिष्ट तांत्रिक आर्मी काम करून तो मुद्दा अधिक संख्येनं पसरवते. परिणामी, तो मुद्दा ट्रेंडमध्ये येतो. ट्रेंड आला, की अर्णबसारखे लोक तो मुद्दा पारंपरिक माध्यमांमधून वाजवायला घेतात व पुढचे ट्रेंड सुरू करतात. मग हळूहळू या बाजूचे आणि त्या बाजूचे असे सगळेच त्या विषयांवर बोलू लागतात. तंत्रज्ञानाच्या पटलावर शब्दांची संख्या वाढत जाते आणि परिणामी भावनांची तीव्रताही. यातून येणारी भावना कोणत्याही प्रकारची असू शकते, अगदी नकारात्मकसुद्धा. तंत्रज्ञानाचा वापर करून ही भावना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते आणि तयार होतं एक असं चित्र, जे वास्तव असतंच असं नाही; किंबहुना अवास्तवच अधिक असतं. आणि हळूहळू आपल्याला तेच चित्र सत्य वाटायला लागतं. कारण, त्याला बहुसंख्येचं पाठबळ लाभलेलं असतं आणि समाजमाध्यमांपासून ते टीव्हीच्या माध्यमांपर्यंत सगळीकडून ते आपल्यावर आदळायला लागतं. या चित्राचं आपण समर्थन केलं तरी संख्या वाढते आणि विरोध केला तरीही ते संख्येनं वाढत राहतं. अगदी तुमच्या फेसबुकच्या न्यूजफीडमध्ये ते सरकून पुढं गेलं तरी ही संख्यात्मक वाढ होतेच...

***
व्यवहारासाठी तडजोड
म्हणजे, या कंपन्यांना त्यांच्या व्यावहारिक गणितासाठी करावी लागणारी तडजोड ही तुमच्या-माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा मुद्दा बनून जाते. सुशांतसिंहची आत्महत्या ही तर विलक्षण दुःखद घटना आहेच; पण त्या घटनेशिवायही बेरोजगारीमुळं होणाऱ्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या गंभीर आहेत. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून होणारी आत्महत्या हृदयाला चरे पाडून जाते. मात्र, या आत्महत्यांबद्दल बोलणं व्यावहारिक असतंच असं नाही. ते गैरसोईचं असेल तर त्यावर कंगना (इथं फक्त उदाहरणादाखल कंगनाचं नाव घेतलं आहे) बोलणार नाही... आणि कंगना बोलणार नाही, तर मग अर्णब तो मुद्दा हातात घेणार नाही... आणि अर्णब जर तो मुद्दा हातात घेणार नाही, तर आर्मी काम करणार नाही... आणि आर्मी जर काम करणार नाही, तर मग संख्यात्मकदृष्ट्या त्या विषयाला महत्त्व राहणार नाही... आणि संख्यात्मक महत्त्व राहणार नाही, तर मग तो मुद्दा ट्रेंडमध्ये कसा येणार...?
***
हा चक्रव्यूह आहे...
मग या आत्महत्या आणि असे शेकडो विषय, जे लोकांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित आहेत, रोजच्या आयुष्याशी संबंधित आहेत, ते ट्रेंडमध्ये येत नाहीत. तुमच्या-माझ्यासमोर ते सतत स्क्रीनवर उभे राहत नाहीत. परिणामी, हे मूलभूत विषयच आभासी ठरतात आणि आभासी जगानं ठरवलेला विषय मुद्दा बनतो आणि तुमच्या-माझ्यासमोर ठामपणे उभा राहतो...! हा चक्रव्यूह आहे. आत्ताशी, म्हणजे गेल्या पाच-सात वर्षांत आपण या चक्रव्यूहात शिरलो आहोत. आत्ताशी कुठं चक्रव्यूहात शिरल्याची जाणीव आपल्याला व्हायला लागली आहे. बाहेर कसं पडायचं हे कळायला अजून वेळच लागणार आहे. तोपर्यंत, किमान आपण चक्रव्यूहात आहोत आणि चक्रव्यूह धोक्‍याचाच असतो, इतकं समजलं तरी पुरेसं आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang shital pawar write kangana ranaut arnab goswami and social article