esakal | शाळेची गोष्ट (श्रीकांत निंबवीकर)
sakal

बोलून बातमी शोधा

shrikant nimbwikar

श्रीनाथ पाच-सहा वर्षांनी गावाकडं येत होता. नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडल्यानंतर घरी येणंसुद्धा त्याला सारखं सारखं जमत नव्हतं. तेही यायचं तर काहीतरी कारणानं. लग्न-कार्य, आजारपण, नाहीतर त्याच्याच ऑफिसचं काम. त्या गडबडीत गावाकडं चक्कर मारणं होतच नसे.

शाळेची गोष्ट (श्रीकांत निंबवीकर)

sakal_logo
By
श्रीकांत निंबवीकर

श्रीनाथ पाच-सहा वर्षांनी गावाकडं येत होता. नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडल्यानंतर घरी येणंसुद्धा त्याला सारखं सारखं जमत नव्हतं. तेही यायचं तर काहीतरी कारणानं. लग्न-कार्य, आजारपण, नाहीतर त्याच्याच ऑफिसचं काम. त्या गडबडीत गावाकडं चक्कर मारणं होतच नसे.

श्रीनाथ एसटी बसच्या खिडकीतून बाहेर बघत होता. आता बस डोंगराच्या माथ्यावर आली होती आणि त्यामुळे आसमंताचं विहंगम दृश्‍य दिसत होतं.
""ते बघा भैराबाचं देऊळ. शिखर कसं रंगवलेलं दिसतंय, बघा.''
त्याच्या शेजारी बसलेले त्याचे बाबाही उत्सुकतेनं पाहत होते.
""या सकाळच्या उन्हात काय मस्त दिसतंय नाही बाहेर?'' श्रीनाथ अनिमिष नेत्रांनी तो देखावा पाहत राहिला. दगड-धोंड्यांच्या कच्च्या रस्त्यावरून एसटी बस हळूहळू चालली होती. बसच्या जवळपास सर्व भागांचा खडखडाट चालला होता. बाजूचे पत्रे, मोडकी बाकडी, काचा तुटलेल्या खिडक्‍या, रॅक, रॅकवरचं सामान सर्वांचा खडखडाट सुरू होता. त्यातच प्रवाशांच्या गप्पा, कुणाच्या जवळच्या ट्रान्झिस्टरवरची गाणी, शाळेच्या पोरांची भांडाभांडी यांचा कोरस होताच, तरीपण बाहेरचं दृश्‍य अतिशय मनोहारी होतं. क्षितिजावरच्या उन्हात तळपणाऱ्या टेकड्यांनी परिसर वेढलेला होता. या डोंगराच्या पायथ्यापासूनच गाव वसलेलं होतं. लहान-मोठी कौलारू घरं, देवळांचे कळस, गावातले आणि भोवतालचे जाण्या-येण्याचे रस्ते, शेतात जायच्या गाडीवाटा, पायवाटा असं सगळं दिसत होतं. शेतांचे पट्टे दिसत होते. कुठं हिरवंगार...कुठं ओसाड...कुठं नांगरलेली मोकळी जमीन. दूर अंतरावर पसरलेला निळ्याशार पाण्याचा तलाव, त्याच्या पलीकडे रेल्वेलाईन, रेल्वे स्टेशनची इमारत. सगळं काही अगदी चित्रातल्यासारखं दिसत होतं.
अगदी छान, प्रसन्न!

श्रीनाथ पाच-सहा वर्षांनी गावाकडं येत होता. नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडल्यानंतर घरी येणंसुद्धा सारखं सारखं जमत नव्हतं. तेही यायचं तर काहीतरी कारणानं. लग्न-कार्य, आजारपण, नाहीतर त्याच्याच ऑफिसचं काम. त्या गडबडीत गावाकडं चक्कर मारणं होतच नसे. गाव, शेती, वाडा, शाळा असे सारे विषय तसे फोनवरच्या गप्पांमधून, पत्रांमधून नेहमी निघायचे; पण प्रत्यक्ष बघणं वेगळंच असतं. तो
पूर्वी आला होता तेव्हा वाडा पावसानं पडायला लागला होता. तो तसाच्या तसाच शाळेसाठी द्यायचा, असं बाबांना पटवून देऊनच तो परत गेला होता. मधल्या काळात काय काय झालं ते त्याला बाबा सांगत असत; पण त्याला प्रत्यक्षच बघायचं होतं. कारण, आजकाल बाबाही फारसे उत्साही नसायचे.
""बाबा, आता शाळेची इमारत बांधून झाली असेल ना? '' त्यानं विचारलं.
""आता ते प्रत्यक्षच बघ ना!'' बाबा म्हणाले.
""आपल्या वाड्याची जी सामग्री होती, म्हणजे घडीव दगड, दारा-खिडक्‍यांच्या चौकटी, खांब, तुळया, माती-विटा सगळं वापरून शाळा बांधणार होते ना?
""तेच बघ आता!'' बाबा पुन्हा शांतपणे म्हणाले.
""काय काय केलंय त्यांनी? त्या वेळी अगदी हेडमास्तर, सरपंच सगळ्यांनी सांगितलं होतं आपल्याला. आठवतंय ना?''
""अरे नाथा, आपली सगळी सामग्री तर दिलीच आपण; पण बाजूच्या पाच-सहा जणांनीही त्यांची घरं दिली शाळेसाठी. अर्थात ती घरं लहान लहान होती, सामान-सामग्री फारशी नव्हती. कुडाच्याच भिंती आणि माळवदं; पण जागा दिली होती ना!''
""बाबा, म्हणूनच मला बघायचंय, काय काय आणि कसं कसं केलंय ते''
तेवढ्यात गाव आलं. येणाऱ्यांच्या स्वागतासाठी वेशीवर नवीन कमान केलेली दिसत होती. बस कमानीपाशीच थांबली. गावात आत न येता इथूनच पुढच्या ठिकाणी ती जाणार होती. वाटेतल्या वस्त्यांवरून आलेली शाळेची मुलं आधी ढकलाढकली करत खाली उतरली. त्यामागोमाग बाकीचेही एकेक करत उतरले. बाबांना ओळखून काही जणांनी "राम राम, काका' म्हणत नमस्कार केले. बाबांनीही उलट "राम राम ' घातला.
""काका, लई दिसांनी दिसताय जनू?'' कुणीतरी विचारलं.
""होय ना. तब्येतीमुळं नाही जमलं बऱ्याच दिवसांत. हा आमचा लेक आलाय, त्याला दाखवायला आणलंय,'' बाबांनी उत्तर दिलं.
बोलत बोलत सगळे गावात शिरले.
आत शिरतानाच मारुतीचं, शंकराचं, भैरवनाथाचं, विठोबाचं अशी देवळं लागतात. या देवळांची नवीन बांधकामं सुरू असल्याचं दिसत होतं. मुख्य देऊळ पूर्ण बांधलेलं दिसत होतं. त्यावर उंचच उंच पितळेचा कळस चढवलेला दिसत होता. हाच कळस चकाकताना मघाशी श्रीनाथला दिसला होता. बाकीच्या देवळांची कामं सुरू होती. कुठं देवळाच्या भिंती, कुठं जोती, ओवऱ्यांसाठी दगडी काम, कुठं बाजूच्या संरक्षक भिंती असं दिसत होतं. दगड-विटा, वाळू, माती, डबर यांचे ढिगारे पडलेले होते.
""या वर्षीच्या यात्रेच्या वेळी त्या कळसाची पूजा आणि उद्‌घाटन व्हायचंय,'' एकानं माहिती दिली.

""तसं सगळं तयार आहे; पण आमदारसाहेब म्हणतात की मंत्रीसाहेबांना घेऊन येणार आहे.'' दुसरा म्हणाला..
""आता त्या साहेबांना वेळ मिळायला हवा ना?'' तिसऱ्यानं नेमका मुद्दा मांडला.
त्या लोकांना मागं टाकून श्रीनाथ व त्याचे बाबा पुढं निघाले.
""ही काय नवीन भानगड आहे बाबा?'' श्रीनाथनं विचारलं.
""हे गावाकडचं राजकारण आहे आणि अर्थकारणपण असतं इथं,'' बाबा म्हणाले.
""मला काही समजलं नाही.''
""मागच्या जत्रेला ना, या कळसासाठी लिलाव झाला. जशी बोली लागली तसे पैसे आणि तेवढी कळसाची उंची. आतल्या मूर्तीसुद्धा राजस्थानातून आणायच्या असं चाललंय.''
""मग त्या 'जागृत' जुन्या मूर्ती?''
""त्या मूर्ती जाणार आहेत तळघरात! त्या या नव्या सजावटीला शोभायला पाहिजेत ना!''
असंच बोलत बोलत श्रीनाथ, त्याचे बाबा आणि तीन-चार गावकरी पूर्वीच्या वाड्यापाशी आले. आता वाडा फारसा शिल्लक राहिला नव्हता. सगळा परिसर बऱ्यापैकी साफ झालेला होता.
""मला वाटलं होतं की शाळा आपल्या वाड्याच्या जोत्यावर, नाहीतर निदान जागेवर तरी बांधली असेल; पण ती तर पार दुसऱ्या टोकाला बांधलीय मैदानाच्या!'' श्रीनाथनं विचारलं.
बाबा म्हणाले : ""अरे, मीपण सांगितलं, इथंच बांधा म्हणून; पण शाळा चालवणारी संस्था आहे ना त्यांच्या आर्किटेक्‍टनी ती पलीकडची जागा पसंत केली.''
""काका, आम्ही लोकांनीपण सांगितलं होतं; पण त्यांनी ऐकलं नाही,'' एक गावकरी म्हणाला.
""अहो, मालकाचं ऐकलं नाही, तिथं आपल्यासारख्यांचं कोण ऐकणार?'' दुसऱ्यानं निरीक्षण नोंदवलं.
पूर्वीच्या भव्य वाड्याची नामोनिशाणीही आता राहिली नव्हती. डाव्या बाजूच्या कडेला पूर्वीच्या जोत्याचे थोडेफार दगड दिसत होते तेवढेच.
""सगळं साफ केलं बघा काका त्यांनी,'' पहिल्या गावकऱ्यानं माहिती दिली.
""मोठाले घडीव दगड आधी बाजूला केले. दारं, खिडक्‍या, खांब, तुळया, छत, सगळे लाकडी ओंडके बाजूला केले आणि नंतर तर खणती लावून खालची पांढरी मातीसुद्धा खणून नेली. सहा महिने ट्रकची ये-जा सुरू होती.''
""मातीचा काय उपयोग?'' श्रीनाथनं विचारलं.
""दादा, ही पांढरी माती म्हणजे खेडेगावातलं सिमेंट आहे बघा. या मातीचेच भेंडे पाडले जातात. भेंडे म्हणजे मोठ्या विटा. भिंती बांधण्यासाठी त्या भेंड्यांचा वापर केला जातो.''
""तुमच्या वाड्याच्या भेंड्यांच्या मातीवर तालुक्‍यात सात-आठ तरी घरं बांधली गेली असतील.''

""बाबा, तुम्हाला माहीत आहे हे सगळं?'' श्रीनाथनं बाबांना विचारलं.
बाबा अगदी हळू आवाजात म्हणाले : ""म्हटलं तर सगळं माझ्या डोळ्यांसमोरच चाललं होतं. आपण काय रे, चार-सहा महिन्यांनी चक्कर मारणार. सकाळच्या एसटीनं यायचं, संध्याकाळच्या आत परत जायचं. सगळं दिसत होतं; पण समजत नव्हतं!''
""सगळा कंत्राटदाराचा फायदा झाला बघा. हा तुमच्या वाडा, शेजारची पाच-सहा घरं, झोपड्या, वाटेतली टेकाडं सगळं साफ करायचं काम कंत्राटदार करणार. आपल्या तालुक्‍यात काम आहे त्याचं. दुसरं कुणी हात घालू शकत नाही.'' एकानं माहिती दिली.
""सगळं मटेरिअल विकून पैसे कमावले. थोडे पाच-दहा लाख शाळा बांधायला दिले. त्यातूनच विटा, सिमेंटची नवी शाळा उभी राहतीय बघा.'' दुसरा म्हणाला.
हे बोलणं चाललंय तोवर शाळेचे हेडमास्तर पुढं आले. गावकऱ्यांनी त्यांची ओळख करून दिली.

""मागं मी आलो होतो तेव्हा दुसरे होते सर'' श्रीनाथनं त्यांना विचारलं.
""होय. ते शंकरराव खुबे गुरुजी. ते आता सेवानिवृत्त झाले. आता माझी नेमणूक झाली आहे. ऐकून होतो मी तुम्हा लोकांबद्दल,'' हेडमास्तर उत्तरले.
""शाळेची इमारत अजूनही पूर्ण झाली नाही, तरी वर्ग भरायलाही लागले इथं?''
""होतेय हळूहळू. हे कॉंक्रिटचं स्ट्रक्‍चर तर दोन मजल्याचं उभं राहिलं आहे. वरचीपण स्लॅब झालीय. खालच्या मजल्याच्या भिंती झाल्या झाल्या वर्ग शिफ्ट झाले. तिकडे देवळात भरत होती ना शाळा... देवळांचा जीर्णोद्धार चाललाय आता...''
""त्यासाठी तर पोरं हाकलली ना तिथून!''
""पण सर, शाळेचं काम तर अजूनही पूर्ण नाहीच ना? भिंतींना बाहेरचा राहिला, आत तरी गिलावा आहे का?'' श्रीनाथनं विचारलं.
""अरे नाथा, गेली दोन वर्षं हे काम असंच राहिलं आहे. संस्थेकडे पैसे नाहीत. देणग्या घेऊन प्रवेश द्यायला का ही पुण्या-मुंबईची शाळा आहे?'' बाबा म्हणाले.
""अहो बाबा, पण तिकडे देवळांची कामं चकाचक चाललीयत. बोली लावून कळसाचे पैसे मिळतात, मग इथं शाळेच्या बाबतीत पैसा नाही, हे कसं?''
""कसं म्हणजे? हे असंच आहे! हे या गावाकडचं राजकारण, अर्थकारण आपल्याला कधीच समजणार नाही आणि आपलं कुणी ऐकणारही नाही, म्हणून मीही गावी येणं सोडून दिलं आहे आताशा. आपण चांगल्या शाळेसाठी वडिलोपार्जित वाडा दिला आहे. सगळं चांगलंच होणार आहे, अशी आशा करायची!''