इतिहासपुरुष (श्रीकांत पवनीकर)

shrikant pawanikar
shrikant pawanikar

दिल्लीतला ‘पुराना किला’ हा धगधगत्या इतिहासाचा साक्षीदार आहे. महाभारतकालीन संघर्षाची नांदी होण्यापासून मुघलसम्राट हुमायूनचा अंत होण्यापर्यंत अनेक घटनांचा हा साक्षीदार. त्या अर्थाने हा किल्ला म्हणजे इतिहासपुरुषच. या किल्ल्याच्या वैशिष्ट्यांवर एक नजर.

दिल्लीला प्रगती मैदानजवळ एक प्राचीन किल्ला आहे. त्याचे नाव आहे ‘पुराना किला’; पण ‘पुराना किला’ वगेरे असे काही नाव ऐकल्याबरोबरच काहीसे रहस्यमय वलय मनामधे आपोआपच निर्माण होते. अनामिक कुतूहल वाटायला लागते. एक भीतिदायक दृश्य अलगदपणे मनामधे तयार होते. त्या कल्पनेतच मग रात्रीचा अंधार, भयावह अंधारातला एकांत, सतत भीतीचे दडपण, अदृश्य शक्ती असल्याचा भास वाटणे व त्यामुळे भीतीने गाळण उडून एकाएकी ओरडणे व किंचाळणे हे आपण कित्येकदा चित्रपटच्या माध्यमामधले बघितलेले दृश्य दिसायला लागते. पण खरेच असे असते का? भारतातले अनेक असे रहस्यमय किल्ले आहेत, की ज्यात राजेरजवाड्यांनी राज्य करून आपली प्रचंड धनदौलत व अमाप संपत्ती लपवून ठेवल्याच्या व त्याचा शोध घेण्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत व आपण अनेकदा त्या चित्रपट व मालिकांमध्ये बघत असतो व त्यात गुरफटून जातो. त्यामुळे अशा स्थळांबाबत आपल्या मनामध्ये एक विशेष प्रतिमा कोरली जाते.

दिल्लीतल्या यमुना नदीच्या किनाऱ्यावर असाच एक विशाल परिसरात ‘पुराना किल्ला’ आहे. भारतीय पुरातत्व विभागानुसार याचे नावच ‘पुराना किला’ आहे. अतिप्राचीन म्हणता येईल असाच. आजपासून ४८३ वर्षापूर्वी मुस्लिम राज्यकर्ता शेरशहा सुरीने १५३८ ते १५४५च्या दरम्यान बांधलेला हा अतिभव्य व विशाल भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवर असलेला हा किल्ला. येथूनच शेरशहा सूरी व हुमायूनने दिल्ली व भारतावर राज्य केले. मुघल वास्तुशैली, हिंदू आणि अफगाण यांच्या संयुक्त वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम येथल्या सुरेख ऐतिहासिक इमारतींमध्ये जागोजागी बघायला मिळतो. या जागेवर दिना–पनाह नावाचे सन १५३३ मध्ये एक नविन विशालनगर बादशहा हुमायूनने वसवले होते. कालांतराने ते शेरशहा सुरीने नष्ट केले. त्यानंतर या नगराच्या आंतरिक भागात आजचा पुराना किल्ला शेरशहा सुरीने बांधला. दक्षिण दरवाजाला हुमायूनचा दरवाजा म्हणतात व तसा फलक येथे आहे. यात शेरशहा सूरीचासुद्धा उल्लेख आहे. (१५४३-१५४४). या किल्ल्याच्या विशाल भिंती चार ते सहा मीटर रुंद व अठरा ते वीस फूट उंच आहेत.

पण वर वर्णन केल्याप्रमाणे हा किल्ला रहस्यमय व भीतीदायक वगेरे नाही. मात्र, येथे रात्री सहानंतर प्रवेश नाही. या भूमीवर पाय ठेवल्याबरोबर एक विलक्षण अस्वस्थता जाणवायला लागते. ही काही सर्वसामान्य साधी भूमी नाही. ही भूमी भूतकाळाचा मागोवा घ्यायला भाग पाडते. या जागेवर काही बऱ्यापैकी चांगल्या व काही विच्छिन्न झालेल्या सभोवतालच्या मजबूत ओबडधोबड लालकाळ्या दगडी भिंती आणि प्रचंड विशालकाय दरवाजे, छत्र्या बघून भूतकाळातल्या अनेक मोठ्या घटनांची ही भूमी साक्षीदार असल्याची जाणीव हळूहळू व्हायला लागते आणि नकळतपणे मन भूतकाळाच्या अंतरंगात शिरायला लागते.

दिल्लीजवळ एक ‘सारवल’ नावाचे एक गाव आहे म्हणजे आताचे ‘सरबन’! या गावामध्ये सन १३२८ चा एक संस्कृत शिलालेख मिळाला. हा शिलालेख आजही दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या पुरातत्व संग्रहालयात ठेवलेला आहे. या पुराना किल्ल्यात एक सुरेख सखोल माहितीपूर्ण भव्य पुरातत्त्व संग्रहालयसुद्धा आहे. या संग्रहालयात येथला सारा इतिहास दिसायला लागतो. या किल्ल्याच्या उत्खननात सापडलेल्या अनेक ऐतिहासिक, मौर्यकालीन, गुप्तकालीन वस्तू व त्यांचे अत्यंत सुरेख विशाल पोर्ट्रेट्स, भव्य छायाचित्रे या पुराना किल्ल्याच्या १९७३ स्थापन झालेल्या पुरातत्व संग्रहालयात बघायला मिळतात व हे बघायलाच अडीच-तीन तास लागतात. मौर्य काळात सामूहिक स्वयंपाकाची पद्धत होती, असे एकत्रित असलेल्या पाच-सहा मातींच्या सामूहिक चुलींच्या चित्रांवरून स्पष्ट होते. अतिशय सुरेख माहितीपूर्ण पद्धतीने हे संग्रहालय प्रेक्षकांना माहिती देते व मुख्य म्हणजे व्यवस्थित ‘मेंटेन’ केले आहे. या संस्कृत शिलालेखावरून ‘सारवल’ हे गाव ‘इंद्रप्रस्थ जिल्ह्या’त असल्याच्या माहितीचा उल्लेख आहे. म्हणजे आम्ही ज्या भूमीवर होतो ती भूमी म्हणजे महाभारतकालीन इंद्रप्रस्थ नगरीची भूमी होती हे कळायला वेळ लागला नाही. विसाव्या शतकापर्यंत येथे ‘इंद्रप्रस्थ’ या नावासोबत मिळते जुळते असलेले ‘इंदरपत’ नावाचे गाव होते; पण इंग्रज प्रशासनाने विकासाच्या पार्श्वभूमीवर हे इंदरपत गाव उठवले. पण हेच इंद्रप्रस्थ अर्थात खांडववन असल्याच्या शक्यतेचा उल्लेख पुरातत्व विभागाने येथे लावलेल्या अनेक माहितीफलकांवरून दिसून येतो व यात ‘इंदरपत’ या गावाचा उल्लेखसुद्धा बघायला मिळतो. मुस्लिम साम्राज्याचे ऐतिहासिक व महाभारतकालीन अनेक माहितीफलक येथे बघायला मिळतात व त्या काळाच्या घटनांमध्ये व जीवनपद्धतीमध्ये आपण हरखून जातो.

त्या काळात कसे असेल हे खांडववन? हे खांडवप्रस्थ? ज्या जागेवर इंद्रप्रस्थ वसले. यालासुद्धा एक महाभारत कालीन पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली. कौरव आणि पांडवांमध्ये राज्याच्या विभाजनावर जेव्हा मतभेद झाले, त्यावेळी मामा शकुनीच्या सल्ल्यावरून महाराज धृतराष्ट्राने खांडववन नामक हे पडिक जंगल पांडवांना देऊन काही काळाकरिता वातावरण शांत केले. या बंजर भूमीवर नागवंश राजा तक्षकाचा अधिकार होता. येथे जंगलाच्या ठिकाणी मयासुराने वसवलेले एक अतिपुरातन नगर होते. कालांतराने ते नष्ट झाले व त्याचे फक्त अवशेष उरले व त्यानंतर त्याभोवती जंगल निर्माण झाले व हेच पडिक जंगल पांडवांना त्यांच्या राज्याचा हिस्सा म्हणून धृतराष्ट्राने दिले. त्या वेळेस प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन हस्तिनापूरवरून खांडववनच्या या जंगलात आले व पांडवांनी हे खांडववन जाळून तक्षकाला हाकलले व नवीन नगर वसवले. हे पुराना किल्ला स्थळ हस्तिनापूरपासून ४५ किलोमीटरवर आहे.

पण या निर्जन जागेवर हे सर्व बांधव राहणार कसे? या परिस्थितिवर प्रत्यक्ष भगवंताने मार्ग काढला. या जागेवर भगवान कृष्णाच्या विंनंतीवरून मयासुराने पुनश्च विश्वकर्माच्या सहकार्याने या स्थळावर इंद्राच्या स्वर्गासारखे- अक्षरशः अलकापुरीसारखे - इंद्राच्या नावावर असलेले ‘इंद्रप्रस्थ’ वसवले. हेच नवनिर्मित इंद्रप्रस्थ बघण्याकरिता पांडवांनी कौरवांना आंमंत्रित केले आणि त्याच वेळेस या पुराना किल्लाच्या स्थळावर ‘महाभारताचे बीज’ व ‘विनाशाचा पाया’ प्रथमच रोवला गेला आणि महाभारताची सुरवात झाली. त्यापूर्वी जंगलात असलेल्या सोन्याच्या दिव्य रथामधून अर्जुनाला दिव्य धनुष्य व भीमाला दिव्य गदा प्राप्त झाली. तीच ही भूमी. हा जणूकाही इंद्रलोकासारखा पांडवाकरिता निर्मित दुसरा स्वर्गलोकच होता व तोच भाग आताचा पुराना किल्लाच आहे, अशी प्राचीन व परांपरागत मान्यता आहे ..! एका उंचवट्यावर स्थितप्रज्ञ असलेला व महाभारताच्या अनेक कथांना जन्म देणाऱ्या या भूमीत या कथांचे तरंग आसमंतात फिरत आहेत. या ठिकाणाचे प्राचीन अवशेष आज लुप्त झालेले असून काही भग्न अवशेष ‘खंडहर’च्या स्वरूपात आपले अस्तित्व टिकवून आहेत. बडा दरवाजा, हुमायून दरवाजा आणि तलाकी दरवाजा आजही धीरोदात्तपणे मजबुतीने येथे उभे असून आपली ‘दास्तान’ सांगत आहे..! प्रत्येक ‘खंडहर’, प्राचीन परकोट, विशाल दरवाजे, बुरुज आणि उंच छत्र्या आपल्या गतवैभवाच्या कथा येथे अश्रूपूर्ण नेत्रांनी उसासे टाकत आहेत..!
तथाकथित सात नगरांचा समूह असलेल्या दिल्लीच्या आसपासची वस्ती साधारणतः साडेतीन हजार वर्षापूर्वी वसली असावी, असे येथल्या छायाचित्रांवरून वाटायला लागते व पुरातत्व विभागाने तसे अनुमानही काढलेले आहे. सोळाव्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याच्या खंदकाखाली १९५५ ला अनेक स्तरांवर केलेल्या उत्खननात ‘भुऱ्या’ रंगाची भांडीकुंडी सापडली व त्यावर काळ्या रंगाची अनेक चित्रे कोरलेली होती. हे सारे अनाकलनीय होते. पुरातत्त्व विभागात ही भांड्यांवरची चित्रे विख्यात आहेत व ही सारी भांडी इसवीसनपूर्व एक हजार ते बाराशे वर्षापूर्वीची आहेत असे अनुमान आहे. सन १९६९ ते ७३ च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने येथे पुशश्च उत्खनन झाले. यात मौर्यपूर्व काळापासून, गुप्त, शुंग, शक, कुषाण ते मुघलांच्या प्रारंभिक काळापर्यंत असलेल्या अनेक वस्तू सापडल्या आहेत व या संग्रहालयात त्या बघायला मिळतात. यात मातीची कठीण भांडी, नाणी, शिक्के, मोहरा, मानव आणि पशूंच्या मातीच्या मूर्ती, कोरड्या विहिरी, लाकडी खांब, भाजलेल्या विटा, सामूहिक मातीच्या चुली, शिलालेख अशा अनेक मानवनिर्मित वस्तूंची खाणच सापडली. मौर्य, गुप्त काळातसुद्धा येथे वस्ती होती, हे यावरून दिसून येते.मात्र भुऱ्या भांड्यांचा अजून नव्याने शोध लागला. पांडवांनी कौरवांना पाच गावे मागितली त्या गावाच्या शेवटी ‘पत’ हा शब्द येतो असा उल्लेख पुरातत्व विभागाने केलेला आहे. पत याचा संस्कृत अर्थ ‘प्रस्थ’ असा आहे. त्यात इंदरपत, बागपत, तिलपत, सोनीपत व पानिपत ही गावे आहेत. अर्थात ही सर्व गावे दिल्लीच्या आसपासची आहेत. येथून २२ किलोमीटरवर असलेल्या तिलपत येथे झालेल्या उत्खननातसुद्धा अशीच भुऱ्या रंगाची भांडी सापडलेली आहेत. या पाच गावांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेदसुद्धा आहेत. पुरातत्त्व विभाग यातून एका निष्कर्षावर आला, की अशी भांडी त्याच ठिकाणी सापडतात, की ज्या ठिकाणी महाभारताचा थेट संबंध आहे. आताही महाभारताची राजधानी दिल्ली म्हणजे ‘इंद्रप्रस्थ’च असल्याची परंपरागत मान्यता आहे. दिल्ली म्हणजे महाभारताची राजधानी ही सर्वत्र ओळख आहे. त्यातही ‘इंदरपत’ हे इंद्रप्रस्थ या नावाचे अपभ्रंश असलेले गाव या पुराना किल्ल्यात वर्तमान शताब्दीच्या प्रारंभापर्यंत अस्तित्वात होते; पण राजधानी दिल्लीच्या नवनिर्माणाकरिता इंग्रजांनी गावातल्या लोकांचे पुनर्वसन दुसरीकडे केले व हा किल्ला रिकामा करण्यात आला व आता पर्यटकांकरिता खुला आहे.

आता येथे शेरशहा सुरीद्वारा निर्मित कला-ए-कुहना ही झरोक्याची मुघल कलाकृतीची विशाल मशीद, दुमजली अष्टभुजाकार शेरमंडल, जुन्या काळातले दिल्लीचे प्रमुख शेरशहाद्वार, अनेक प्राचीरे, बुरुज, लाल काळ्या रंगाचा सभोवतालचा भव्य परकोट, छत्र्या, भिंतीवरची मुघल व अफगाण कलाकुसर, मेहराब, संगमवरी भिंती, विशाल गोल बावडी संग्रहालाय व अतिभव्य परिसर बघायला मिळतो. या इंद्रप्रस्थ भूमीवर आता महाभारतकालीन सध्या एकच पुरावा आहे तो म्हणजे पांडवमाता कुंतीचे लहानसे ‘कुंती मंदिर’..! संग्रहालयाच्या समोरच; पण काहीसे दूरवर हे प्राचीन मंदिर आहे. या महादेवाच्या व लक्ष्मीच्या मंदिरात महाराणी कुंती रोज सकाळ संध्याकाळ पूजेला व मंदिरात दिवा लावायला येत असत, अशी माहिती प्राप्त झाली म्हणून याला ‘कुंती मंदिर’ म्हणतात. आम्ही या कुंती मंदिराचे दर्शन घेतले. अतिशय मोठ्या वृक्षाखाली हे मंदिर असून लहानशा प्रवेशद्वारातून आत जावे लागते. या मंदिरात राहूनच आता महंत नान्द भारद्वाज या कुंती मंदिराची सेवा करत आहे. हे मंदिर कुणाच्याही अधिपत्याखाली नाही. कुंतीची लहानशी प्रतिमा येथे झाडात बघायला मिळते; पण सारे काही शांत, धीरगंभीर! अंतर्मनात महाभारताचे वादळ निर्माण करणारे असे आहे ‘अस्वथ इंद्रप्रस्थ!’
काय नियती आहे बघा..! कसा योगायोग असतो.! हीच महाभारताच्या संघर्षाची सुरवात झालेली भूमी शेरशहा सुरी आणि मुघलसम्राट हुमायूनला आपली राजधानी म्हणून निवडावीशी वाटली. याच जागेवर पुराना किल्ल्याची निर्मिती करावीशी वाटली? दुसरी कुठलीच जागा सापडली नाही? भारतासोबतच्या संघर्षाकरिता हीच मुघलांच्या नेतृत्वाची प्रमुख भूमी बनली.

बाबरपुत्र मुघलसम्राट हुमायून हा वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी म्हणजे सन १५३० ला मुघलांच्या गादीवर बसला. शेरशहा सुरी व हुमायून हे कट्टर शत्रू व प्रचंड हाडवैरी. दोघेही साम्राज्य विस्ताराला आसुसलेले. सन १५३९ व १५४० ला शेरशहाने लढाईत हुमायून हरवले व १५४० ला स्वतःचा राज्याभिषेक केला. खऱ्या अर्थाने शेरशहाचा शासन काळ फक्त पाच वर्षे म्हणजे सन १५४० ते १५४५ पर्यतच होता. त्यानंतर हुमायूनने सरहिंदच्या युद्धात अफगाण सैन्याचा चा पराभव करून दुसऱ्यांदा १५५५ ला विजय मिळवला. दुसऱ्यांदा राजपाठ सांभाळला तो फक्त १५५६ पर्यंतच. हुमायूनला वाचनाची प्रचंड आवड होती. त्याने येथे स्वतःकरिता या किल्ल्यात असलेल्या ‘शेरमंडलच्या दिनपनाह’ भवनाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर वाचनालयाची निर्मिती केली व असंख्य पुस्तकांचा संग्रह केला.

२७ जानेवारी १५५६ चा दिवस. नमाजाकरिता किल्ल्यात अजानची वेळ झाली... त्यावेळेस बादशहा हुमायून काही पुस्तके आपल्या वाचनालयात चाळत होता व हातात पुस्तकांचे गठ्ठे घेऊन शेरमंडलच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होता. तितक्यात अजान झाला. त्याने अजानचा आवाज ऐकला आणि खाली उतरत असताना अजानच्या आवाजाला भक्तिभावाने किंचित झुकून ‘कुर्सिनात’ करण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय पायघोळ अंगरख्यात अडकला आणि पुस्तकांसहित खाली घरंगळत येऊन जमिनीवर कोसळला. वयाच्या केवळ सत्तेचाळिसाव्या वर्षी या अकस्मात झालेल्या अपघातात डोक्याला प्रचंड व गंभीर मार लागून या मुघल बादशहाचा पुराना किल्ल्यात करुण अंत झाला...! मुघलसम्राट हुमायूनच्या युगाची समाप्ती अशा प्रकारे या महाभारताच्या इंद्रप्रस्थ भूमीवर असलेल्या पुराना किल्ल्यात झाली आणि महाभारताची व इतिहासाची एक विलक्षण सांगड या किल्ल्यात घातली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com