esakal | कोण होतास तू? (श्रीमंत माने)
sakal

बोलून बातमी शोधा

shrimant mane

कोण होतास तू? (श्रीमंत माने)

sakal_logo
By
श्रीमंत माने shrimantmane@gmail.com

आजचे आपण सगळे होमो सेपिअन्स प्रजाती. दोन लाख वर्षांपूर्वी तिचा पूर्व आफ्रिकेत विकास झाला. ‘सेपिअन्स’मधील आपलीच ही वाटचाल वाचली की अवतीभवतीचं सगळं अगदीच किरकोळ वाटायला लागतं. एरवी चिंतेत टाकणाऱ्या, विचलित करणाऱ्या किंवा आनंद-दुःख देणाऱ्या घटनांबाबत आपण स्थितप्रज्ञ बनतो जणू. किमान ७० हजार वर्षं एवढ्या मोठ्या कालखंडाचं समालोचन ‘सेपिअन्स : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्यूमनकाइंड’ या एका पुस्तकात सामावण्याचं अवघड काम लेखक युवाल नोआ हरारी यांनी कमालीच्या यशस्वीपणे साधलंय.
विस्मयचकित करणाऱ्या या पुस्तकाविषयी...


तुम्हाला सतत भटकायला, प्रवास करायला आवडतं? तुमच्या स्वप्नांमध्ये ते अज्ञात प्रदेश किंवा अजस्र प्राणी नेमके येतात कुठून? माणूस अमक्‍या वेळी असंच व तमक्‍या वेळी तसंच का वागतो? वय वाढताच शरीराच्या पेशी नष्ट होण्याची प्रक्रिया थांबवण्यात विज्ञानाला यश आलंय? माणसाला अमरत्व प्राप्त झालं तर पृथ्वीतलाचं काय होईल? या व अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं माणसाच्या कित्येक हजार, काही लाख वर्षांच्या उत्क्रांतीत, तसंच प्राणी म्हणून चिम्पांझी ते हुशार माणूस या प्रवासात आणि त्यातून विकसित झालेल्या ‘डीएनए’मध्ये दडलेली आहेत.

होय, हे विस्मयकारक वाटत असलं तरी ‘सेपिअन्स’ या पुस्तकाच्या लेखकाच्या मते हे खरं आहे. त्याच्या पृष्ट्यर्थ अनेकविध पुरावे युवाल नोआ हरारी या ४३ वर्षांच्या लेखकानं दिले आहेत. जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात ते जागतिक इतिहास शिकवतात. ‘सेपिअन्स : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्यूमनकाइंड’, ‘होमो डेअस : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टुमारो’, ‘२१ लेसन्स फॉर द ट्‌वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ ही त्यांची गाजलेली पुस्तकं. ‘सेपिअन्स’ हे जगभर चर्चित ‘इंटरनॅशनल बेस्टसेलर’. ‘सेपिअन्स’ आणि ‘होमो डेअस’चं मराठी भाषांतर झालं असलं तरी, चव बिघडू न देता, विस्मयकारक माहितीचा रवंथ करत, शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारं ‘सेपिअन्स’ वाचण्याची खरी मजा आहे ती इंग्लिशमध्येच. ‘कॉग्निटिव्ह रिव्होल्युशन’ (जाणिवांची क्रांती), ‘ऍग्रिकल्चरल रिव्होल्युशन’ (कृषिक्रांती), ‘द युनिफिकेशन ऑफ ह्यूमनकाइंड’ (मानवाचं एकीकरण) आणि ‘द सायंटिफिक रिव्होल्युशन’ (वैज्ञानिक क्रांती), अशा चार भागांतलं हे पुस्तक वाचणाऱ्याची स्वत:कडं अन्‌ एकूणच मानवी व्यवहारांकडं पाहण्याची दृष्टी बदलल्याशिवाय राहत नाही.

आजचे आपण सगळे होमो सेपिअन्स प्रजाती. दोन लाख वर्षांपूर्वी तिचा पूर्व आफ्रिकेत विकास झाला. ‘सेपिअन्स’मधील आपलीच ही वाटचाल वाचली की अवतीभवतीचं सगळं अगदीच किरकोळ वाटायला लागतं. एरवी चिंतेत टाकणाऱ्या, विचलित करणाऱ्या किंवा आनंद-दुःख देणाऱ्या घटनांबाबत आपण स्थितप्रज्ञ बनतो जणू. किमान ७० हजार वर्षं एवढ्या मोठ्या कालखंडाचं समालोचन एका पुस्तकात सामावण्याचं अवघड काम हरारी यांनी कमालीच्या यशस्वीपणे साधलंय. औद्योगिक क्रांतीनंतर गेल्या २०० वर्षांत आपण कार्यालयीन कर्मचारी, कारखान्यांतले कामगार, शेतकरी-शेतमजूर अशा विविध व्यवसायांमध्ये आहोत. ही २०० किंवा शेतीची व पशुपालनाची आधीची जवळपास दहा हजार वर्षंदेखील ‘निमिषार्ध’ वाटावीत इतका मोठा कालपट हरारी उलगडून दाखवतात.
‘पल दो पल का राही हूँ।’ असं आपल्याला वाटायला लागतं. अवतीभवतीच्या घटनांचं अगदीच वेगळ्या अंगानं आकलन होतं. विश्‍लेषण, कारणमीमांसा व कार्यकारणभाव शोधण्याचा दृष्टिकोन बदलतो.

विश्‍वाच्या निर्मितीचा प्रारंभ साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वीचा. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती. ३८० कोटी वर्षांपूर्वी पहिला सजीव पृथ्वीवर अवतरला. ६० लाख वर्षांपूर्वीपर्यंत चिम्पांझी व माणसाची जन्मदात्री एकच असावी. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत २५ लाख वर्षांपूर्वी माणसाच्या प्रजाती अवतरल्या. अश्‍मयुगातली पहिली आयुधंही याच कालखंडातली. २० लाख वर्षांपूर्वी आफ्रिका व युरेशियात माणसांच्या विविध उपप्रजाती होत्या. यापैकी निअँडरथल नावाची उपप्रजाती पाच लाख वर्षांपूर्वी युरोपात व पश्चिम आशियात प्रमुख होती. तीन लाख वर्षांपूर्वी माणसानं आगीचा वापर सुरू केला. ७० हजार वर्षांपूर्वी सेपिअन्सच्या जाणिवा विकसित झाल्या. आद्यभाषा वापरात आली. इतिहासाची सुरवात झाली. सेपिअन्स आफ्रिकेबाहेर पडले. आपली पृथ्वी गेल्या चार अब्ज वर्षांमध्ये तापमानवाढ व शीतकालाच्या (वॉर्मिंग व कूलिंग) अनेक आवर्तनांमधून गेलीय. ग्लोबल वॉर्मिंग आताच घडतंय असं नाही. आधीही अनेक वेळा घडलंय. तापमान वाढलं की हिमशिखरं वितळतात. समुद्राची पातळी वाढते. जमिनी पाण्याखाली येतात. साधारणपणे दर एक लाख वर्षांनंतर हिमयुग अवतरतं. त्या वेळी पृथ्वी थंड होते. बर्फाच्छादन वाढतं. समुद्राचं पाणी उतरतं. दूर असणारी बेटं जवळ येतात. अशाच एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाचा टापू सेपिअन्सच्या आवाक्‍यात आला. ४५ हजार वर्षांपूर्वी तिथं सेपिअन्सचं पहिलं पाऊल पडलं. त्यानं प्रचंड वनसंपदा नष्ट केली. अजस्र प्राणी नामशेष झाले.

३० हजार वर्षांपूर्वी निअँडरथल या माणसाच्या प्रजातीचा ऱ्हास झाला. १३ हजार वर्षांपूर्वी फ्लेअरसिन्सिस ही शेवटची मानव प्रजाती नष्ट झाली. फक्‍त आपण आणि आपणच पृथ्वीतलावर मानवप्राणी म्हणून उरलो. त्याच्या तीन हजार वर्षं आधी सेपिअन्स हे अमेरिका खंडावर अलास्कात युरोपच्या उत्तर भागातून पोचले होते. कृषिक्रांतीनंतर सुरवातीची सात हजार वर्षं जागा मिळेल तिथं, विस्कळितपणे शेती कसली जात होती. पहिलं राज्य किंवा संस्थान पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं. सार्वजनिक वर्तणुकीची शिस्त म्हणून अनेकेश्‍वरवादी धर्म आला. लिपी, चलन आदींची गरज भागवण्यासाठी कल्पनांना वाव मिळाला. सव्वाचार हजार वर्षांपूर्वी भूमध्य सागर, काळा समुद्र व कॅस्पिअन समुद्र यांच्या खोबणीत मेसोपोटामियामध्ये सरगॉनला अक्‍काडियन हे पहिलं साम्राज्य स्थापन झालं. उत्तरेकडं अक्‍काडियन व दक्षिणेला सुमेरियन मिळून ते एकच साम्राज्य असलं तरी भाषा, संस्कृती वेगळ्या होत्या. त्याच वेळी इकडं भारतीय उपखंडात हडप्पा व मोहेंजोदडो संस्कृती विकसित झाली होती. अडीच हजार वर्षांपूर्वी पर्शिअन साम्राज्याच्या स्थापनेनंतर पहिली ‘युनिव्हर्सल पॉलिटिकल ऑर्डर’ निघाली. त्या वेळी भारतात बौद्ध धर्माचा प्रसार होत होता. दोन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये हान साम्राज्य, तर भूमध्य समुद्राच्या परिसरात रोमन साम्राज्य उभं राहिलं. ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार होऊ लागला. त्यानंतर ६०० वर्षांनंतर इस्लाम धर्म आला. त्यानंतरची जवळपास हजार वर्षं ही धर्मप्रसाराच्या संघर्षाची. ५०० वर्षांपूर्वी वैज्ञानिक क्रांती झाली अन्‌ धर्म विरुद्ध विज्ञान असा नवा संघर्ष आकार घेऊ लागला.

डोमेस्टिकेट कुणी कुणाला केलं?
पुरातत्वीय उत्खनन व अभ्यासाअंती मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे माणसाचा ज्ञात इतिहास ७० हजार वर्षांचा. आधीची जवळपास ५८ हजार वर्षं तो भटक्‍याचं जिणं जगत होता. १२ हजार वर्षांपूर्वी माणूस शेती करू लागला. तिची सुरवात भटकंती करताना पोट भरण्यासाठी निसर्गातून मिळणाऱ्या वनस्पती, प्राणी माणसाळण्यानं झाली. जंगली गवतांमधून गहू, तांदूळ, मका वगैरे तृणधान्यं आली. कंदमुळांमधून बटाटे आले. गव्हाची लागवड तुर्कस्तानात सुरू झाली. तांदूळ चीनमधून अन्यत्र गेला. मका व बटाटा मेक्‍सिकोमधून आले. अनेक खाद्यपदार्थांचं मूळ असं जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आहे. जंगलातले प्राणीही पाळीव बनवले गेले. कुत्रा मात्र आद्यमित्र. शिकारीसाठी तो माणसाला मदत करायचा. त्यामुळं कृषिक्रांतीआधीच तो माणसाचा मित्र बनला. हरारींचा एक लक्षवेधी युक्‍तिवाद असा की माणसानं वनस्पती व प्राणी ‘डोमेस्टिकेट’ केले हे पूर्णांशानं खरं नाही. वनस्पती जमिनीत पिकत होत्याच. नंतरही त्या तिथंच होत्या. माणसाला एके ठिकाणी वस्ती करून राहायला त्यांनीच बाध्य केलं. शेतीची सुरवात मुख्यत्वे आफ्रिका, आशिया किंवा दक्षिण अमेरिकेत झाली. हे टापू विषुववृत्ताच्या उत्तर-दक्षिण बाजूला. पर्यायानं हवामान, जमीन वगैरे पोषक. प्रारंभीच्या शेतीचा पुरावा इजिप्तमधल्या गुहांमध्ये अंदाजे साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या कातळचित्रांच्या रूपात उपलब्ध आहे. शेतीमुळं माणसांच्या वस्त्या वसल्या. धान्य मोजण्याच्या गरजेपोटी आकडे आले. जगात लिखाणाची सुरवात अक्षरानं नव्हे, तर आकड्यांनी झाली. आज जगाला माहीत असलेला पहिला माणूस कुणी देव, प्रेषित, प्रतिभावान कवी-लेखक नव्हता, तर कुशिम नावाचा सुमेरियन संस्कृतीतल्या ऊरुक शहरातला हिशेबनीस होता. त्यानं बार्ली मोजण्यासाठी वापरलेली चिन्हांकित भाषा, त्यातला २९०८६ हा आकडा व खाली त्याचं नाव हा वालुकामय तुकड्यांच्या रूपातला प्राचीन पुरावा. घरदार, जमीन किंवा अन्य संपत्तीची मोजदाद करणारी क्‍विप्यू नावाची पद्धत इंका साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर स्पॅनिश आक्रमकांना दक्षिण अमेरिकेत सापडली. एका काठीवर वेगवेगळ्या रंगाचे धागे व त्यांना संपत्तीच्या प्रमाणात गाठी मारण्याची ही पद्धत.

विस्मयकारी काल, अस्वस्थ आज अन्‌ भयप्रद उद्या...
* ७० हजार वर्षांपूर्वी माणूस नावाच्या सजीव प्रजातीच्या अनेक उपप्रजाती होत्या. रुडाल्फेन्सिस, होमो इरेक्‍टस (दोन पायांवर उभा राहणारा), निअँडर खोऱ्यातला निअँडरथलेन्सिस, सोलो खोऱ्यातला होमो सोलोन्सिस व फ्लोरेसेन्सिस, होमो इरगास्टर वगैरे प्रजाती टप्प्याटप्प्यानं नामशेष होत गेल्या. फक्‍त होमो सेपिअन्स उरले.
* ‘टॉलरन्स इज नॉट सेपिअन्स ट्रेडमार्क’ असं एका ठिकाणी हरारी सांगून जातात. किरकोळ कारणावरून आज अवतीभवती घडणाऱ्या हिंसाचाराच्या अनुषंगानं किती महत्त्वाचं निरीक्षण. आज आपण कितीही हुशारीच्या, ज्ञानी पिढीच्या गप्पा मारत असलो तरी आपले भटके पूर्वज आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी हुशार होते. त्यांचं ज्ञान व्यापक, सखोल व विविधांगी होतं. एकाच माणसाला शेतीतली कामं जमायची. कुऱ्हाड व अन्य हत्यारं तो स्वत:च बनवायचा व वापरायचा. जमिनीवर व पाण्यावर प्रवासाची वाहनं तयार करायचा. बरंच काही एकाच माणसाला जमायचं. आता या प्रत्येक कामासाठी माणसाला सेवेकरी लागतात.
* आपलं आजचं वैयक्‍तिक किंवा सामूहिक भावविश्‍व, आवडी-निवडी, खाण्या-पिण्याच्या सवयी, पचनसंस्था, मानसिकता, मेंदूची जडणघडण आणि विचार करण्याची पद्धती, नातेसंबंधांची वीण, संघर्ष, युद्धं, रक्‍तपाताला सामोरं जातानाची मानसिकता हे सारं काही लाखो, हजारो वर्षांच्या वाटचालीतून आलंय. ‘वुई लव्ह टू विन अंडरडॉग’. अमक्‍या अशा प्रसंगाच्या वेळी माणूस असाच का विचार करतो किंवा तमका निर्णय का घेतो? अगदी स्वप्नं अशीच का पडतात? वगैरेचं मूळ इतक्‍या मोठ्या कालखंडात बदलत गेलेल्या आपल्या ‘डीएनए’मध्ये आहे.
* माणसाचा इतिहास आणि जीवशास्त्र लाखो वर्षं एकमेकांच्या हातात हात घालून चालत राहिलं. जीवशास्त्रीयदृष्ट्या माणसाचं बदलत जाणं व त्यातून भवताल बदलण्यातून इतिहास घडत गेला. माणसानंच धर्म निर्माण केले. माणसाच्या निर्मितीची मिथकं रचली गेली. सगळ्याच धर्मांनी एकतर विश्‍वाचं सारं काही समजलंय किंवा माणसाच्या दु:खाचं मूळ समजलंय असा दावा केला. विज्ञानानं मात्र अजाणतेपणाची कबुली दिली. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या इतक्‍या प्रगतीनंतरही कुणी संशोधक व शास्त्रज्ञ अंतिम सत्य सापडल्याचा दावा करत नाही. विज्ञान यासाठी थोर आहे.
* पैसा, धर्म आणि राजकारण या तीन गोष्टींनी जगभरातला माणूस जवळ तरी आला किंवा एकमेकांचा वैरी तरी बनला. तरीही जग एकत्र आणण्यात पैशाचं योगदान अन्य दोन्ही गोष्टींपेक्षा खूप मोठं आहे.
‘मनी इज द मोस्ट युनिव्हर्सल अँड मोस्ट इफिशिअंट सिस्टिम ऑफ म्युच्युअल ट्रस्ट एव्हर डिव्हाइज्ड्’. पैसा म्हणजे नाणी, नोटा नव्हेत, तर तो माणसांनी एकमेकांवर ठेवलेला विश्‍वास आहे; पण सोबतच भांडवलशाही, वसाहतवाद आला.
* हजारो वर्षं वेगवेगळे मानवसमूह एखाद्या परग्रहावर राहावेत तसे स्वतंत्र राहिले. महासागर किंवा पर्वतरांगा सोडा, अगदी नदीच्या पैलतीरावर, डोंगराच्या पल्याड, दुसऱ्या मैदानात कोण राहतंय, त्यांचं काय चाललंय हेदेखील पाहण्याची तसदी घेतली गेली नाही. अगदी अलीकडं युरोपियनांनी जग पादाक्रांत केलं तेव्हादेखील बाजूच्या राजाचा, सम्राटाचा पराभव झाला का, झाला असेल तर त्याची कारणं काय, आक्रमणाच्या पद्धती कोणत्या आहेत, हे पाहण्याचं शहाणपण न दाखवल्यामुळे अनेक सत्ता संपुष्टात आल्या.
* हरारींनी सुमेरिअन संस्कृतीतल्या राजा गिल्गामेशचं मिथक नमूद केलंय. परमप्रिय मित्र एनकिडूच्या मृत्यूनंतर शोकाकुल गिल्गामेश कित्येक दिवस मृतदेहाशेजारी बसून राहिला. मृतदेह सडू लागला. नाकातून अळ्या बाहेर पडू लागल्या तेव्हा भयांकित राजानं मृत्यूवर विजय मिळवण्याचा निर्धार केला. अमरत्वासाठी शक्‍य ते सारं केलं; पण अपयश आलं. आता विज्ञानाच्या आधारे माणूस मृत्यूवर विजय मिळवू पाहतोय. वैज्ञानिक संशोधनावर आधारित अमरत्वाचे दावे अधूनमधून होतात. निर्मिती व विनाश ही देवत्वाची लक्षणं असतील तर आण्विक अस्त्रांच्या रूपानं माणसानं विध्वंसाची शक्‍ती मिळवलीच आहे. आता कृत्रिमरीत्या जीव जन्माला घालून तो निर्मिक होऊ पाहतोय. थोडक्‍यात, कधीकाळचा यःकश्‍चित प्राणी स्वत:च देव बनू पाहतोय. ‘देव पाहावयासी गेलो। तेथे देवचि होऊन ठेलो।' असं काहीसं आहे हे!

सेपिअन्स : अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्यूमनकाइंड
प्रकाशक : पेंग्विन रॅंडम हाउस, इंग्लंड
लेखक : युवाल नोआ हरारी
पृष्ठं : ४८५
ऑनलाइन किंमत : ३३८ रुपये

loading image
go to top