इराणचा वणवा (श्रीराम पवार)

श्रीराम पवार shriram.pawar@esakal.com
रविवार, 12 जानेवारी 2020

इराणचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून संपवलं. एका सार्वभौम देशाच्या लष्करी अधिकाऱ्याचा असा काटा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अनुमतीनंच काढण्याचा अभूतपूर्व प्रकार संपूर्ण पश्‍चिम आशियावर युद्धाचे ढग जमवणारा, म्हणूनच जगाला घोर लावणाराही आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक येऊ घातली आहे.

इराणचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून संपवलं. एका सार्वभौम देशाच्या लष्करी अधिकाऱ्याचा असा काटा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अनुमतीनंच काढण्याचा अभूतपूर्व प्रकार संपूर्ण पश्‍चिम आशियावर युद्धाचे ढग जमवणारा, म्हणूनच जगाला घोर लावणाराही आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक येऊ घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प महाभियोगानं ग्रस्त आहेत. अशा स्थितीत काही भव्यदिव्य, लोकांचं लक्ष वळवणारं आणि देशात राष्ट्रवादाचं भरतं आणणारं घडवणं ही ट्रम्प यांची गरज बनली होती. सुलेमानींना अमेरिकेनं दहशतवादी ठरवून टाकलं, तर सुलेमानींना संपवणं हेच दहशतवादी कृत्य असल्याचं इराण सांगतो आहे. ट्रम्प यांच्या या साहसवादाला इराण तसलंच उत्तर देईल हे स्पष्ट आहे. यातून आधीच आर्थिक आघाडीवर असलेलं चिंतेचं मळभ आणखी गडद होईल. तेलाचे दर वाढण्यातून त्याची सुरवात तर झालीच आहे.

कासिम सुलेमानी यांना संपवल्यानंतर इराणशी अमेरिकेचा संघर्ष गंभीर वळण घेईल हे खरंच. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव नवा नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या व्यवहारात जिथं तिथं नाक खुपसायची अमेरिकी नीती कायम राहिली आहे. यात तेलसंपन्न भागात अमेरिकेचा रस अंमळ अधिकच राहिला. त्यातील बहुतेक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवता आलं तरी इराण हा अमेरिकेच्या हाती कधी लागला नाही. हे दुखणं जुनं आहे. सन १९५३ मध्ये बंड घडवून लोकप्रिय पंतप्रधानांना सत्ताभ्रष्ट करण्याचा मार्ग अमेरिकेनं वापरला होता. सन १९७९ मधील इस्लामी क्रांतीनं खोमेनींच्या नेतृत्वाखाली मौलवींचं राज्य सुरू झालं. ते नेहमीच अमेरिकेच्या विरोधात होतं. क्रांतीच्या वेळी इराणच्या या नव्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकी दूतावासाला ओलिस ठेवलं. पुढं सन १९८३ मध्ये बैरुतच्या अमेरिकी तळावर जाळपोळ घडवून आणली. याच वर्षात अबू मुहादीस या इराकी नागरिकानं कुवेतमधील अमेरिकी दूतावासात कारबॉम्बचा स्फोट घडवला. तो इराणच्या मदतीनंच निसटला. नंतर अनेक दहशतवादी हल्ल्यांत त्याचं नाव आलं. तो इराकचा संसदसदस्यही बनला. सुलेमानींवर हल्ला झाला तेव्हा तो सोबत होता. ओबामा यांच्या काळात इराणशी अन्य पाश्‍चात्य देशांसोबत अणुकरार झाला होता. यात इराणमधील उदारमतवादी नेतृत्वाचा वाटा मोठा होता. ट्रम्प यांनी मात्र हा अणुकरार अमेरिकेच्या हितसंबंधांच्या विरोधात असल्याचं सांगत रद्द केला. तेव्हापासून इराणसोबतचा तणाव वाढत राहिला. यातूनच अलीकडच्या काळातील हल्ले-प्रतिहल्ले आणि अखेर सुलेमानीला संपवणं इथपर्यंत हे प्रकरण आलं आहे.

अमेरिकेनं हल्ला करून संपवलेले कासिम सुलेमानी हे इराण-इराक-सीरिया या भागासाठीचं अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व होतं. एका बांधकाम मजुराचा कुपोषणग्रस्त मुलगा ते या भागातील अत्यंत सामर्थ्यसंपन्न लष्करी अधिकारी हा सुलेमानींचा प्रवास अमेरिकेच्या हल्ल्यानं संपवला गेला तसा इराण आणि अमेरिकेतील, पर्यायानं पश्‍चिम आशियातील संघर्ष नव्या वळणावर आला, म्हणूनच सुलेमानींना ठार करणं हे तिसऱ्या जागतिक युद्धाची भयछाया दाखवणारं बनलं. आता इराण आपल्या सर्वात शक्तिशाली कमांडरच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. हे तसं त्यांनी जाहीरच केलं आहे. अमेरिकी तळावर क्षेपणास्त्रं डागून त्याची चुणूकही इराणनं दाखवली आहे. हा तणाव प्रत्यक्ष युद्धात आणि त्याही पलीकडं जागतिक युद्धात परावर्तित होईलच असं नाही. मात्र, पश्‍चिम आशियाच्या अशांततेत सुलेमानींचा मृत्यू भर टाकेल हे निश्‍चित. इराणच्या इराकविषयक धोरणांना आकार द्यायचं काम सुलेमानींकडेच होतं. सद्दाम हुसेन यांच्या पाडावानंतर इराकच्या घडणीत सर्वाधिक प्रभाव असलेला कमांडर म्हणूनही सुलेमानींचं नाव घेतलं जातं. कधी तरी पडद्याआडच्या कारवायांत गुंतलेले सुलेमानी सीरियातील संघर्षानंतर जगाच्या नजरेत स्पष्टपणे आले. सीरियात एका बाजूला इसिसचं आवाहन पेलताना सीरियातील पुढची सूत्रं कुणाकडं हा कळीचा मुद्दा होता. त्यातूनच तिथली कारवाई रखडत होती. यात सीरियाच्या बशर-अल्-असदच्या राजवटीला पाय रोवून उभं ठेवण्यात सुलेमानींचा व्यूहात्मक आणि प्रत्यक्ष पाठिंबा मोलाचा होता. इराणमधील शहाची सत्ता क्रांतिकारी फौजांनी उलथवली आणि सुलेमानी या गटांत सामील झाले. शहाला हटवण्याविरोधात प्रतिक्रांती म्हणून पाडण्यासाठीच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड’चे सदस्य बनवले. यासाठी त्यांनी दोन महिन्यांचं लष्करी प्रशिक्षण घेतलं. तेच त्यांनी घेतलेलं एकमेव प्रशिक्षण. कुर्द बंडखोरांना चिरडून टाकणाऱ्या कारवाईतील सहभागानं त्यांचं महत्त्व वाढू लागलं. इराण-इराक यांच्यातील रक्तरंजित संघर्षात त्यांचा सहभाग होता. पश्‍चिम आशिया किंवा मध्य पूर्वेत सुन्नी आणि शिया यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष स्पष्ट आहे. सौदीच्या पुढाकारानं अमेरिकेच्या पाठिंब्यावर प्रभाव ठेवून असलेल्या गटाला शह देताना इराणनं आपलं प्रभावक्षेत्र वाढवण्याचा चंग बांधला. त्याचं पर्यवसान या भागातील इस्लामी जगतातच दोन तट पडण्यातही झालं. सुलेमानी यांनी या भागातील शिया प्रभावाची रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. हे नेहमीच त्यांनी सरळ मार्गानं केलं नाही. म्हणून त्यांच्या अनेक कृत्यांना अमेरिका-इस्राईल आणि पाश्‍चात्यांच्या आक्षेप होता. अमेरिका त्यांना दहशतवादी ठरवते याचं कारणही त्यांचे देशाबाहेर हत्यांचे आणि कारस्थानांचे मार्ग. पश्‍चिम आशियातील अनेक दहशतवादी संघटनांना सुलेमानींचा आशीर्वाद होता म्हणूनच ‘हमास’पासून ‘हिज्बुल्ला’पर्यंतचे सशस्त्र गट ‘सुलेमानींच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल’ अशा धमक्‍या अमेरिकेला देत आहेत. इराणच्या वतीनं अन्य देशांत कारवाया करणाऱ्या सशस्त्र दलाचं नेतृत्व सुलेमानींकडे होतं. यामार्फतच अनेक सशस्त्र दहशतवादी गट त्यांनी पोसले आहेत. त्यांचा वापर परराष्ट्रनीतीत करण्यात सुलेमानी निष्णात होते. इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर सुलेमानी हेच सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व मानलं जात होतं. खोमेनींशी थेट संपर्क असलेले ते एकमेव लष्करी अधिकारी होते. इराणमधील निवडून आलेल्या अध्यक्षांहून सुलेमानींचा प्रभाव अधिक होता. प्रामुख्यानं परराष्ट्रधोरणात सुलेमानींचा शब्द अंतिम बनला होता, तसाच अंतर्गत मुद्द्यांवरही सुलेमानी प्रभाव ठेवून होते. सुरक्षाविषयक समस्यांचं आणि भूराजकीय स्थितीचं भान सुलेमानी यांना चांगलंच होतं. त्यांचं बहुतांश आयुष्य अमेरिकेच्या विरोधातील गटांना बळ देण्यात गेलं. तरी अफगाणिस्तानात तालिबानविरोधात आणि सीरियात इसिसविरोधात भूमिका घेऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेला साथही दिली. जगभरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत सुलेमानी यांचा हात असल्याचा संशय होता. सन २००५ मध्ये झालेली लेबनॉनच्या पंतप्रधानांची हत्या, इस्राईलचा दूतावास आणि ब्यूनॉसआयर्समधील ज्यू सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यातही त्यांचा हात असल्याचा संशय होता. ट्रम्प यांनी, सुलेमानी दिल्लीतही हल्ल्याचा कट रचत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत काही वर्षांपूर्वी इस्रायली राजदूताच्या गाडीत स्फोट झाला होता. त्यात इराणी हात असल्याचा संशय होता. सुलेमानींना संपवण्याचे अनेक प्रयत्न याआधीही झाले होते. अनेकदा अशा प्रयत्नांतून बचावलेला हा कमांडर सातत्यानं अमेरिकेला आव्हान देत होता. अमेरिकेसाठी ही डोकेदुखी होतीच. या डोकेदुखीचा शेवट अखेर अमेरिकेनं सुलेमानींना संपवूनच केला.

इराण हा पश्‍चिम आशियातील अपवादात्मक देश आहे, जो प्रदीर्घ काळ अमेरिकेला बधला नाही. या परिसरात सद्दामपासून अनेक हुकूमशहांना अमेरिकेनं उदार आश्रय दिला व नंतर त्यांनाच संपवण्यासाठी सारं सामर्थ्य वापरलं. हे असं करणं हे अमेरिकेचे हितसंबंध, प्रामुख्यानं इथला तेलव्यापार, नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांचा भाग होता. इराणचं महत्त्व यासाठी की अमेरिकेला इराणमध्ये हवं ते प्यादं सत्तेवर कधी आणता आलं नाही. अमेरिकाधार्जिण्या इराणच्या शाहच्या विरोधात क्रांती झाल्यानंतर तिथल्या सत्तेचे संबंध अमेरिकेशी नेहमीच तणावाचे राहिले. इराण हा या भागातील एकमेव शियाबहुल देश आहे, तसेच तो अमेरिकेच्या मदतीविना लष्करीदृष्ट्या सामर्थ्यसंपन्न झालेला देश आहे. यासाठी इराणनं रशिया आणि फ्रान्ससारख्या देशांचं सहकार्य घेतलं. अमेरिकेचा धाक वाटणाऱ्या प्रत्येक देशानं अण्वस्त्रनिर्मिती हा सुरक्षेसाठीचा आधार मानला. इराणनंही अणुकार्यक्रम सातत्यानं सुरू ठेवला. एका बाजूला लष्करी ताकद, दुसरीकडं तेलाचे मोठे साठे असल्याचा लाभ इराणला होत आला. इराण आणि अमेरिकेचे संबंध प्रदीर्घ काळ तणावाचे आहेत. त्याचं आता टोक गाठलं गेलं. सुलेमानींना संपवण्यात आलं ते इराकमध्ये. युद्धानं उद्ध्वस्त झालेल्या या देशात वांशिक संघर्ष आहेच आणि इराकच्या; किंबहुना सुलेमानींच्या पाठबळावर सध्याचं तिथलं सरकार अस्तित्वात आहे. इराक ही नकळत अमेरिका आणि इराण यांच्यासाठीची संघर्षभूमी बनली आहे. इराकमध्ये वर्चस्वासाठी अमेरिका आणि सौदी अरब मिळून करत असलेल्या प्रयत्नांवर सुलेमानींची व्यूहरचना पाणी टाकत होती.
***

ट्रम्प यांनी सुलेमानींना संपवून पश्‍चिम आशियातील आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे यात शंकाच नाही. इराण आर्थिक निर्बंधांच्या ओझ्यानं वाकला असला तरी लष्करीदृष्ट्या ताकदवान देश आहे, तसेच इराक, सीरिया, येमेन आदी भागांतही वजन ठेवून आहे. सुलेमानींच्या मृत्यूनंतर या घटनेचा बदला घेण्याची धमकी देण्यात आली आहे. इतर शिया सशस्त्र गटांनीही अशाच धमक्‍या दिल्या आहेत. त्या पोकळ मानायचं कारण नाही. हा भडका जगाला वेठीला धरणारा ठरू शकतो. याचं कारण इराणच्या इशाऱ्यावरून अमेरिकेच्या सैन्यानं आणि मुत्सद्द्यांनी इराक सोडावा असं इराकनं जाहीर केलं आहे. इराणनं सन १९७९ मध्ये अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पकडून तब्बल ४४४ दिवस ओलीस ठेवलं होतं हा इतिहास आहे. इराण असलं काहीही वेडं धाडस करू शकतो. त्याचा परिणाम पश्‍चिम आशियात युद्धाचा भडका उडण्यात झाला तर जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. एकतर सुलेमानी यांना मारल्यानंतर लगेचच स्थिर होत असलेल्या तेलाच्या बाजारात अचानक दरवाढीचं आवर्तन आलं आहे. इराणकडून जगानं तेल घेऊ नये यासाठी अमेरिकेनं आटापिटा केला होता. भारतालाही इराणचं तेल बंद करायला लावलं होतं. मात्र, इराणलगतच्या होमूर्झच्या सामुद्रधुनीतून जगातील तेलाचा सुमारे २५ टक्के पुरवठा होतो, तर ३३ टक्के नैसर्गिक वायूचं वहन त्यातून होतं. इराणनं हे नाक दाबलं तर तेलाची प्रचंड दरवाढ अटळ बनेल. ट्रम्प हे अमेरिकेचं जगभरातील संघर्षात गुंतलेलं सैन्य माघारी बोलावण्याचं आश्‍वासन देऊन सत्तेत आले आहेत. त्यांना अफगाणिस्तान असो की सीरिया, यात अजून तरी यश आलेलं नाही. मात्र, इराणशी संघर्षातून अमेरिकेची प्रत्यक्ष लष्करी गुंतवणूक वाढणारच आहे. इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेनं आणखी ३ हजार सैनिक इराकमध्ये धाडायचं ठरवलं हा त्याचाच भाग. याचा दुसरा मोठा परिणाम म्हणजे, ट्रम्प यांनी इराणशी झालेला अणुकरार धुडकावला असला तरी अन्य जगाच्या दबावापोटी अण्वस्त्रविकासाची पुढची पावलं टाकली नव्हती. सुलेमानींच्या मृत्यूनंतर इराणनं सर्व बंधनं धुडकावण्याची जाहीर भूमिका घेतली आहे. युरेनियमसमृद्धीवरची बंधनं इराण नाकारत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. याचा सरळ अर्थ इराण अण्वस्त्रस्पर्धेत नव्यानं सक्रिय होईल. एका बाजूला याच कारणासाठी उत्तर कोरियाच्या विक्षिप्तपणाशी जुळवून घेणारे ट्रम्प इराणला मात्र कोणतीही सवलत द्यायला तयार नाहीत. इराण अण्वस्त्रधारी बनणं पश्‍चिम आशियातील समीकरणं बदलून टाकणारं ठरू शकतं. इराणमध्ये खोमेनी हे सर्वोच्च नेते असताना आणि सुलेमानी हे त्यांच्या पठडीतलं लष्करी नेतृत्व असतानाही निवडणुकीच्या मार्गानं काहीसं मवाळ उदारमतवादी नेतृत्व पुढं आलं होतं. अमेरिकेच्या आततायीपणाचा परिणाम म्हणून हा देश पुन्हा एकदा कट्टरपंथीयांच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे; किंबहुना अमेरिकेला पुन्हा एकदा पश्‍चिम आशियात लष्करी संघर्षात गुतवणं हा इराणमधील कट्टरपंथीयांच्या व्यूहनीतीचा भाग आहे. एकदा असं युद्ध छेडलं गेलं की कधी तरी वाटाघाटींसाठी एकत्र यावंच लागतं. या दिशेनं जाण्याचा भाग म्हणून अमेरिकेच्या लष्करी कंत्राटदाराला ठार करण्याचं पाऊल उचललं गेलं होतं, तसेच बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासाला सशस्त्र गटांनी वेढा टाकला होता. ट्रम्प यांनी हेच निमित्त करून सुलेमानी यांना संपवलं. ते करताना त्यांच्यापुढं देशातील राजकारण प्राधान्याचं बनलं होतं. मागच्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्‍लिंटन यांना सन २०१२ मध्ये लीबियात झालेल्या अमेरिकी राजदूताच्या हत्येवरून लक्ष्य केलं होतं. निवडणुकीला सामोरं जाताना हाच डाव इराणमधील घडामोडींमुळं आपल्यावर उलटू नये यासाठी ट्रम्प यांचा हा आटापिटा आहे. तसंही अमेरिकेत निवडणुकीच्या तोंडावर लष्करी कारवाईतून राष्ट्रवादाचे नगारे वाजवायचे आणि विरोधकांचं तोंड बंद करायचे प्रयत्न अगदीच नवे नाहीत. क्‍लिंटन यांनी महाभियोग सुरू असताना इराकवर केलेला हल्ला याच प्रकारचा होता. आताही ट्रम्प महाभियोगाला सामोरं जात आहेत. ट्रम्प यांच्या अनेक धोरणांची कठोर चिकित्सा अमेरिकेत सुरू आहे. अशा वेळी लक्ष भलतीकडं वळवण्याचा मार्ग म्हणून ट्रम्प यांचा हा साहसवाद आहे असं मानायला जागा आहे. सुलेमानींना संपवल्याचं जोरदार स्वागत ट्रम्प यांचे समर्थक करत आहेत, तर यासाठी अमेरिकी काँग्रेसची अनुमती न घेतल्याबद्द‌ल विरोधक टीका करत आहेत. राजकारणात कणखरपणाचे ढोल वाजवणाऱ्या नेत्यांना हेच तर हवं असतं. ट्रम्प यांनी हा भावनांचा खेळ नेमकेपणानं ओळखला आहे. मात्र, तो जगाला तापदायक ठरणार आहे. जसे इराणशी संघर्षाचे परिणाम जगावर होतील तसेच ते भारतावरही होतील. एकतर तेलाच्या किमती वाढणं हे सध्या ज्या अवस्थेत भारतीय अर्थव्यवस्था आहे त्यात परवडणारं नाही. यासाठी वाढतं परकी चलन मोजावं लागेल. रुपयाच्या घसरणीनं त्याची तीव्रता आणखी वाढण्याचीच शक्‍यता. भारताचं तेलआयातीचं बिल प्रचंड प्रमाणात वाढू शकतं, ज्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होईल. दुसरीकडं या भागातील कोणताही संघर्ष तिथल्या भारतीयांची डोकेदुखी वाढवणारा असतो. या भागातील विविध देशांत सुमारे ८० लाख भारतीय काम करतात आणि ४० हजार कोटींचं परकी चलन कमावतात. युद्धाच्या स्थितीत यातील कित्येकांना भारतात आणावं लागेल. या प्रकारचा संघर्ष सन १९९१ च्या आखाती युद्धात भारतानं अनुभवला आहे. सिनेमात असलं एअर लिफ्टिंग कितीही साहसी दिसत असलं तरी ते सर्वार्थानं ताण आणणारं असतं. म्हणजेच ट्रम्प यांनी इराणमध्ये पेटवलेला वणवा आपल्यालाही झळा देणारा ठरू शकतो.

या घडामोडींत इराण प्रतिकार करेल हे उघड आहे. इराणनं लाल निशाण फडकावून त्याचे संकेत दिलेच आहेत. मात्र, सर्वंकष युद्धाला तोंड फुटण्याची शक्‍यताही कमीच. अशा युद्धात अमेरिकेचं पारडंच जड असेल. मात्र, याच भागात अमेरिकी लष्कराला गुंतवून जेरीला आणणारं संघर्षाचं तंत्र इराण वापरण्याची शक्‍यता अधिक. त्याचाही परिणाम होईलच. येणारा काळ पश्‍चिम आशियातील अस्वस्थतेचा म्हणून जगासाठी चिंतेचा असेल.

श्रीराम पवार लिखित/ संपादित आणि ‘सकाळ’ प्रकाशित ‘राजपाठ : वेध राष्ट्रीय राजकारणाचा’, ‘जगाच्या अंगणात : वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा’, ‘धुमाळी (करंट : अंडरकरंट)’ ‘संवादक्रांती’ आणि ‘मोदीपर्व’ ही पुस्तके उपलब्ध. क्लिक करा इथे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang shriram pawar write iran genral kassim sulemani article