
मग मात्र अन्नपूर्णाला धीर धरवेना. स्वयंपाकघराच्या खिडकीतून ती पाठमोऱ्या पाहुण्यांना पाहू लागली. क्षणभर तिच्या छातीत धस्स झालं.
ती मनात म्हणाली : ‘होय, हे तेच आहेत...चालण्याची लकब तीच आहे...ते यजमानांशी बोलत असताना मघाशी त्याचा घोगरा आवाज ऐकला तेव्हाच शंका आली होती...’
घड्याळात संध्याकाळचे पाचचे ठोके पडले तशा मालतीबाई उठल्या आणि ‘चला, उद्याची तयारी करायला हवी’ असं मनाशी म्हणत त्यांनी अन्नपूर्णाला हाक मारली. तशी लगबगीनं अन्नपूर्णा त्यांच्या खोलीत येऊन म्हणाली : ‘‘वहिनी, मला बोलावलंत?’’
‘‘हो अगं, तुला सांगायचीच विसरले. उद्या दुपारी आपल्याकडे ‘ह्यां’चे एक मित्र येणार आहेत. माधवराव सरनाईक त्यांचं नाव. ते जेवायलाच येणार आहेत, तेव्हा ‘काय मेनू करू या’ असं तुलाच विचारावं म्हणून बोलावलं. पाहुण्यांचं नाव ऐकून अन्नपूर्णा काहीशी बिचकली; परंतु चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता म्हणाली : ‘‘गरमागरम पुऱ्या, बासुंदी, बटाट्याची भाजी, मसालेभात, पालकाच्या पानांची भजी, अळूच्या वड्या, काकडीची कोशिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, गुलकंद घालून घरी तयार केलेला नागवेलीच्या पानांचा विडा जेवणानंतर...असा सुंदर बेत ठेवू या. आवडेल पाहुण्यांना.’’
जसं काही अन्नपूर्णा पाहुण्यांना अगदी खूप वर्षांपासून ओळखत असावी आणि त्यांच्या आवडी-निवडी तिला अगदी बारकाईनं माहीत असाव्यात असं वाटावं इतक्या सहजपणे तिनं मेनू सांगितला. मालतीबाईंनी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला तशी तिनं अपराधीपणे आपली नजर दुसरीकडे वळवली.
‘‘ठीक आहे’’ असं म्हणून मालतीबाईंनी नोकराकरवी स्वयंपाकासाठीचं सर्व सामान मागवून घेतलं. रात्रीची जेवणं झाल्यावर सर्व आवरून अन्नपूर्णा तिच्या खोलीत झोपायला गेली.
अंथरुणावर पडल्या पडल्या अन्नपूर्णाचं विचारचक्र सुरू झालं...
‘एकाच नावाची दोन माणसं असू शकतात? पण हे तेच असतील कशावरून?’ माधवरावांचा विचार मनात आल्याबरोबर तिचे डोळे आपोआप पाझरू लागले. ज्याच्याविषयी आजवर कुणालाही काही सांगितलं नाही तो तिचा गतकाळ तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागला...
अन्नपूर्णाच्या माहेरची परिस्थिती अगदी बेताची होती. त्यात तिला
सावत्रआई. घरातल्या कामाचं कारण पुढं करून दहावीनंतर आईनं अन्नपूर्णाचं शिक्षण बंद केलं.
अन्नपूर्णा दिसायला सुंदर, सुगरण व गृहकृत्यदक्ष असल्यामुळे माधवरावांचं स्थळ आल्याबरोबर अन्नपूर्णाचं लग्न उरकण्यात आलं. सासरी फक्त सासूबाई आणि माधवराव असे दोघंच. अन्नपूर्णा सासूबाईंच्या मर्जीप्रमाणे सारं काही करून त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, लग्नात मनासारखं मानपान न झाल्यानं सासूबाईंच्या मनात अन्नपूर्णाबद्दल रागच होता. त्यात लग्नाला दोन वर्षं झाली तरी घरात पाळणा हलला नव्हता.
परिणामी, लेकानं आता दुसरं लग्न करावं, असा लकडा सासूबाईंनी लावायला सुरवात केली होती. माधवरावांचं अन्नपूर्णावर खूप प्रेम होतं; पण आईपुढे त्यांचं काहीही चाललं नाही. इथं तिचा आणखी छळ व्हायला नको म्हणून नाइलाजास्तव त्यांनी तिला माहेरी पाठवून दिलं. थोड्याच दिवसांत सावत्रआईनं तिची रवानगी एका महिलाश्रमात केली. स्वतःच्या नशिबाला दोष देत अन्नपूर्णा तिथं स्वयंपाकपाणी करून दिवस काढू लागली. एक तप उलटून गेल्यावरसुद्धा अन्नपूर्णाची चौकशी करायला कुणीही महिलाश्रमाकडे फिरकलं नाही. एक दिवस अचानक मालतीबाई व त्यांचे यजमान त्या महिलाश्रमाला भेट द्यायला आले असताना अन्नपूर्णाची व त्यांची ओळख झाली. त्यांनाही घरात कुणाची तरी गरज होतीच. व्यवस्थापकांच्या संमतीनं ते अन्नपूर्णाला घरी घेऊन आले. इतके दिवस तिला त्यांनी लेकीच्या मायेनं सांभाळलं. थोड्याच दिवसांत अन्नपूर्णा घरात चांगलीच रुळली. मालतीबाईंना ती काहीही करू देत नसे. तिच्या हातचं जेवल्यावर, अन्नपूर्णा हे तिचं नाव किती सार्थ आहे, याची प्रचीती त्यांना आली... हे सगळं आठवत असतानाच अन्नपूर्णाचा डोळा लागला.
***
दुसऱ्या दिवशी लवकर उठून अन्नपूर्णानं साग्रसंगीत स्वयंपाक केला. पाहुणे आले. ख्यालीखुशाली विचारल्यावर जेवायला बसले. मालतीबाई पाहुण्यांना आग्रहानं वाढत होत्या. पाहुणे तृप्त झाले. हात धुताना म्हणाले : ‘‘वा...छानच झालं हो जेवण. अगदी माझ्या आवडीचा मेनू होता. स्वयंपाकघराच्या दाराआडून अन्नपूर्णानं हे ऐकलं मात्र...अन् क्षणभर तीही चमकली. ही तर अगदी ‘त्यांची’च लकब, आवाजही अगदी तसाच! स्वयंपाक आवडला की तेही अशीच दाद देत असत... अन्नपूर्णा मनाशी म्हणाली. मात्र, पुढं होऊन त्यांना पाहण्याचं धैर्य तिला झालं नाही. गुलकंद घालून घरी तयार केलेला विडा यजमानांनी दिल्यावर तर माधवराव अतिशय आनंदित झाले.
मात्र, उघडपणे काहीही न बोलता ते मनाशीच म्हणाले : ‘माझ्या आवडी-निवडी यांना कशा काय माहीत बरं?’
थोड्या वेळानं ते घरी जायला निघाले. मग मात्र अन्नपूर्णाला धीर धरवेना. स्वयंपाकघराच्या खिडकीतून ती पाठमोऱ्या पाहुण्यांना पाहू लागली. क्षणभर तिच्या छातीत धस्स झालं.
ती मनाशी म्हणाली : ‘होय, हे तेच आहेत...तीच चालण्याची लकब...ते मघाशी यजमानांशी बोलत असताना ऐकलेला त्यांचा तो घोगरा आवाज...’
हे सगळं तिच्या ओळखीचंच तर होतं. पटकन बाजूला होऊन ती पसारा आवरू लागली. पाहुण्यांना निरोप देऊन घरात आल्यावर यजमानांच्या बोलण्यावरून तिला एवढंच कळलं की पाहुणे अपत्यहीन आहेत व आईच्या निधनानंतर एकटेच राहत आहेत.
मालतीबाई स्वयंपाकघरात आल्या व अन्नपूर्णाचं कौतुक करत म्हणाल्या : ‘‘तू केलेला स्वयंपाक पाहुण्यांना खूप आवडला.’’
***
दोन दिवसांनी मालतीबाईंच्या यजमानांनी अन्नपूर्णाला हॉलमध्ये बोलावलं व तिला सांगितलं : ‘‘परवा आपल्याकडे जेवायला आलेल्या पाहुण्यांनी मला फोन करून सर्व काही सांगितलं आहे. आपल्याकडे जेवल्यावर त्यांना थोडी शंका आली म्हणून त्यांनी तुझ्या माहेरी तुझ्याविषयी चौकशी केली. तुला महिलाश्रमात ठेवल्याचं कळल्यावर त्यांनी महिलाश्रमाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. तिथं त्यांना कळलं की तू आमच्याकडे आहेस. मला फोन करून त्यांनी सर्व काही सविस्तर सांगितलं आहे. ते तुला परत त्यांच्या घरी घेऊन जायला तयार आहेत.’’
हे सगळं ऐकताना अन्नपूर्णा थरथरत उभी होती. तिला रडू फुटलं, तशा मालतीबाई तिच्या जवळ गेल्या. ती त्यांच्या कुशीत शिरली आणि म्हणाली : ‘‘वहिनी, आता मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही.’’ मालतीबाईंनी तिला समजावलं : ‘‘पोरी, तू आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहेस. आम्ही काय, आज आहोत तर उद्या नाही; पण तुझ्यापुढं सगळं आयुष्य पडलं आहे. तुला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. माधवरावांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू त्यांच्याबरोबर सुखानं संसार करावास असं आम्हाला दोघांनाही मनापासून वाटतं. तू परित्यक्ता नाहीस. तू तर त्यांची गृहस्वामिनी आहेस.’’
अन्नपूर्णालाही हे सगळं पटलं व ती माधवरावांबरोबर जायला तयार झाली.
***
दोन दिवसांनंतर माधवराव अन्नपूर्णाला न्यायला आले. माहेरवाशिणीची सासरी पाठवणी करावी तशा पद्धतीनं मालतीबाईंनी अन्नपूर्णाची ओटी साडी-चोळीनं भरली. जड अंतःकरणानं तिला आशीर्वाद दिला. तिला निरोप देण्यासाठी त्या दारापर्यंत गेल्या. भरल्या डोळ्यांनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मनात म्हणाल्या...‘जा, मुली जा... दिल्या घरी तू सुखी राहा.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.