एक गुगली; सगळे बोल्ड! (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

कोविड 19 महासाथीनं असा काही गुगली खेळ जगताला टाकला आहे, की सगळे अगदी क्‍लीन बोल्ड झाले आहेत. खेळ जगताला याचे दूरगामी धक्के सहन करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पर्धेला अर्थकारणाचे चटके सहन करावे लागणार असल्याने त्याचा धक्का खेळाडूंनाही बसणार आहे. खेळाडूंना मिळणारं अव्वाच्या सव्वा मानधन झटक्‍यात कमी होणार आहे. संघचालकांना प्रायोजकांशी सांभाळून व्यवहार करताना त्यांच्या ख्यालीखुशालीचा विचार मनात ठेवावा लागणार. तीच गोष्ट प्रक्षेपण हक्कांची होणार आहे. त्याचा करार अगोदर झालेला असला, तरी नवीन समीकरणांत त्याची पुर्नबांधणी करणं गरजेचं होणार.

संयोजक असो, प्रायोजक असो, प्रक्षेपण करणारी टीव्ही चॅनेल्स असोत वा खेळाडू असोत- सगळ्यांनाच पुढची दोन वर्षं खेळ जगताकरता फक्त "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या चालीवर चालण्यावाचून दुसरा प्रभावी पर्याय राहणार नाही.

महान बास्केटबॉल खेळाडू कोबे ब्रायंट अपघातात मृत्युमुखी पडला, तेव्हा जग हादरून गेलं होतं. ""खेळातल्या यशापयशापेक्षा जीवन किती महत्त्वाचं असतं, हे मला आता उमगतं आहे,'' न्यूझीलंडला भेटलो असताना विराट कोहली मनातली निराशा व्यक्त करताना म्हणाला होता. त्याच विराट कोहलीला शेवटचा कसोटीत सपाटून मार खाल्ल्यावर मी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला होता, की "किती जास्त सामने भारतीय संघ सतत खेळतो आहे. किती प्रवास सतत करतो आहे. तुम्ही भले सलीम-जावेद असलात, तरी रोज एक शोले नाही लिहू शकत.' त्यावर विराट मनापासून हसला होता. "भारतातून निघालेलं विमान थेट मैदानात उतरवून थेट सामना खेळणंच आता फक्त बाकी आहे. तुम्ही म्हणता आहात ते खरं आहे...वय दर वर्षी कमी होत नाही- ते वाढतंच. थकवा जाणवू लागला, की मधूनच मी ब्रेक घेतो; पण संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला दोन महिने विश्रांती मिळणं अशक्‍य आहे,'' विराट म्हणाला होता.
काय मजा आहे बघा, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ जमून आली. भारतीय संघ न्यूझीलंडहून परतला, तेव्हा विमानतळावर कोरोना व्हायरस आजारासंदर्भात थर्मल स्क्रीनींग सगळ्यांचं झालं होतं. नंतर थोड्या विश्रांतीनंतर संघ धरमशालाला एकदिवसीय सामना खेळायला गेला- कारण भारतीय संघ न्यूझीलंडहून परतत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येऊन बसला होता. सामन्याच्या दिवशी धरमशाला गावात जोरदार पाऊस पडला- ज्यामुळे सामना रद्द केला गेला. तो जणू कोविड 19 महासाथीनं दिलेला इशारा होता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला, की आता बस करा शहाणे व्हा. सगळं गुंडाळून ठेवा आणि घरी बसा. बीसीसीआयला अखेर सुबुद्धी सुचली आणि दक्षिण आफ्रिकेसमोरची मालिका रद्द केली गेली. दक्षिण आफ्रिकन संघाला नंतर मजल दरमजल करत मायदेशी पोचायला पाच दिवस लागले.
जागतिक महासाथीचं संकट घोंघावत असतानाही बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांना 2020ची आयपीएल स्पर्धा वेळापत्रकानुसार भरवण्याची स्वप्न पडतच होती. समोर लाख अडचणी दिसत असून बीसीसीआयनं 15 एप्रिलला अंतिम निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. काही विद्वान तर विविध पर्यायांची पडताळणी करत होते. हा प्रकार म्हणजे घराला आग लागली असताना व्हायोलिन वाजवणाऱ्या राज्यासारखा होता. शेवटी कोविड 19 महासाथीनं असं काही उग्र रूप जगभर धारण केलं, की कोणी काही बोलायची वेळ आलीच नाही. 2020 आयपीएल स्पर्धा अनिश्‍चित काळाकरता पुढे ढकलली गेली.

आयपीएलचं सोडा हो. जगातल्या विविध खेळांच्या नामांकित स्पर्धा रद्द करायची वेळ कोविड 19 महासाथीमुळे आली. जगातल्या सर्वांत श्रीमंत अमेरिकेतल्या नॅशनल फुटबॉल लीगपासून ते रुढी, संस्कृती, परंपरा जपणाऱ्या विंम्बल्डनपर्यंत आणि इंग्लिश प्रीमिअर लीगपासून ते आयपीएलपर्यंत सगळं रद्द करण्यावाचून पर्याय उरला नाही. जपान सरकार अजूनही टोकियो ऑलिंपिक्‍स वेळेवर होतील अशी भाबडी आशा बाळगून आहे- म्हणजेच ते थोडक्‍यात सांगायचं, तर समोर दिसणारं मरण टाळायचा प्रयत्न करतं आहे.
एक नक्की आहे, की कोविड 19 महासाथीनं क्रीडा जगतालासुद्धा आरपार हादरवून टाकलं आहे. तुमच्या माझ्यासारख्या खेळवेड्या भाबड्या लोकांना खेळ म्हणजे "खेळ' वाटतो. प्रत्यक्षात तो किती प्रचंड अवाढव्य मोठा कारभार झाला आहे याची प्रचिती खेळ जगताच्या आर्थिक उलाढालीचे आकडे अभ्यासल्यानंतर येते. पहिला धक्का तुम्हाला एक आकडा देऊन देतो. जगातल्या खेळ व्यवसायाची उलाढाल 80 हजार कोटी रुपये. होय! ही अजिबात अतिशयोक्ती नाहीये.

भेदिले शून्य मंडळा
सन 2012 मध्ये जगात फक्त इंग्लंडमधला मॅन्चेस्टर युनायटेड क्‍लब दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सचं मूल्य अभिमानानं बाळगून होता. नंतर जगात खेळ जगताला असं काही उधाण आलं, की आता एक ना दोन तब्बल पन्नास क्‍लब दोन अब्ज म्हणजेच 15 हजार कोटींचं आर्थिक मूल्य बाळगून आहेत. यातली अजून एक लक्षणीय बाब अशी, की अमेरिकेतल्या नॅशनल फुटबॉल लीगमध्ये सहभागी होणारे सर्व संघ या यादीत अभिमानानं जागा पटकावून बसले आहेत. बरेच नॅशनल बास्केटबॉल लीग म्हणजेच एनबीएचे संघ जागा पटकावून बसलेत आणि नॅशनल बेसबॉल लीगचेही संघ यादीत दिसतात. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर युनायटेड, अर्सेनल, चेल्सी, लीव्हरपूलसारखे संघ आढळतात. इतकंच काय, स्पॅनिश लीगमधील रियाल माद्रिद आणि बार्सिलोना फुटबॉल क्‍लब पहिल्या पाच जणांच्या यादीत आहेत.
यातला शेवटचा धक्का आता देतो. सर्वांत श्रीमंत क्‍लबचं स्थान कोण बाळगून आहे कल्पना आहे का तुम्हाला? अमेरिकन फुटबॉल लीग (एनएफएल) या स्पर्धेतलं डल्लास काउबॉइज संघाचं खेळ बाजारातलं मूल्य तब्बल पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार कोटी रुपये इतकं आहे आणि त्यांचा नफा दोन हजार आठशे कोटी रुपये आहे. लक्षात घ्या- हा संघ जागतिक पातळीवर कोणतीही स्पर्धा खेळत नाही. तो फक्त अमेरिकेतली एक स्पर्धा खेळतो; पण त्या स्पर्धेची लोकप्रियता इतकी उच्च कोटीची आहे, की त्यांना प्रायोजक भरभरून प्रतिसाद देतात.

आकडे आयपीएलचे
दहा वर्षं यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या आयपीएल स्पर्धेचं बाजारमूल्य 47 हजार कोटी इतकं झाल्याचं बोललं जातं. या स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेताना रिलायन्स उद्योगसमूहानं सर्वांत जास्त बोली मुंबई संघाकरता लावली होती. त्यावेळी त्याचे आकडे बघता सगळ्यांनी तोंडात बोटं घातली होती. दहा वर्षांनंतर मुंबई इंडियन्स संघाचं बाजारमूल्य आठशे कोटींचा आकडा पार करून गेलं आहे. 730 कोटींवर चेन्नई सुपर किंग्ज संघ जास्त मागे नाहीये बाजारमूल्याच्या बाबतीत.
प्रमुख भारतीय खेळाडूंना प्रत्येक आयपीएल हंगामातून 15 कोटी ते 7 कोटी रुपये मिळतात. 15 कोटींच्या वर्गात महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. मी गंमतीनं म्हणेन, की जगातील प्रमुख क्रिकेटपटूंना गेल्या दहा वर्षांत आयपीएलनं दिलेला अर्थकारणाचा हात अविश्वसनीय आहे. किरॉन पोलार्ड, ड्‌वेन ब्राव्हो, अफगाणिस्तानचा खेळाडू रशीद खान, डेव्हिड वॉर्नर इत्यादी खेळाडूंनी आपल्या नवीन बंगल्याचं नाव "आयपीएल कृपा' ठेवलेलं असल, तर मला आश्‍चर्य वाटणार नाही.
यात सर्वांत हुशार ठरला तो शेन वॉर्न. शेन वॉर्न पहिल्यांदा राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. पहिली आयपीएल स्पर्धा शेन वॉर्ननं नवख्या खेळाडूंना हाताशी धरून राजस्थान रॉयल्सनं जिंकली होती. असं समजलं, की शेन वॉर्ननं डोकं चालवून फक्त भरपूर फी घेण्याऐवजी जरा धोका पत्करून संघमालकीचा हिस्सा घेतला. असं समजतं, की वाटाघाटींनंतर तीन टक्के हिस्सा शेन वॉर्नला मिळाला होता. त्या तीन टक्‍क्‍यांचे किती कोटी रुपये शेन वॉर्नला मिळू शकतात याचा विचार केलेला बरा.
यात वाईट पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूचं वाटतं. पॅट कमिन्सला यंदाच्या आयपीएल लिलावात साडेपंधरा कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. प्रचंड मोठा आर्थिक फायद्याचा घास पॅट कमिन्स हातात धरून बसला होता. जो महासाथीच्या संकटानं तोंडात काही गेला नाही.

जोर का धक्का धीरे से लगे
जेम्स बॉंन्डच्या सिनेमात कपटी खलनायक जे विचार करू शकले नाहीत, ते संकट आत्ताच्या घडीला जगावर कोविड 19 महासाथीनं आलं आहे. कोणी जात्यात कोणी सुपात असं चित्र नसून, संपूर्ण जगच या महासाथीच्या समस्येनं भरडलं जात आहे आणि पुढील काही वर्षं भरडलं जाणार आहे. मोठमोठे उद्योग संकटांचा सामना करणार असताना खेळाचं क्षेत्र त्यातून लांब कसं राहील?
खेळाची कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्याकरता संयोजकांना उत्पन्नाचे तीन मुख्य मार्ग उपलब्ध असतात. सर्वांत मोठा असतो खेळाच्या प्रक्षेपण हक्काचे पैसे. मग येते प्रायोजकता आणि शेवटी येतो तो गेट मनी म्हणजेच प्रेक्षक तिकिटं विकत घेतल्यावर जमा होणारी रक्कम. कोविड 19 महासाथीनं पहिला मोठा धक्का प्रेक्षकांना दिला आहे- कारण आता गर्दीच्या जागी जाणं दुरापास्त झालं आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठी कुऱ्हाड आल्यानं त्याचे विपरीत परिणाम प्रायोजकता आणि अंतिमत: खेळ प्रक्षेपणाच्या म्हणजेच टीव्ही राईटस्‌वर होणार आहेत.

कोविड 19 महासाथीचं संकट जगातून नष्ट कधी होईल याचा अंदाज लागत नाहीये- ज्यामुळे अनिश्‍चितता भेडसावत आहे. खेळ जगताला याचे दूरगामी धक्के सहन करावे लागणार आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक स्पर्धेला अर्थकारणाचे चटके सहन करावे लागणार असल्याने त्याचा धक्का खेळाडूंनाही बसणार आहे. खेळाडूंना मिळणारं अव्वाच्या सव्वा मानधन झटक्‍यात कमी होणार आहे. संघचालकांना प्रायोजकांशी सांभाळून व्यवहार करताना त्यांच्या ख्यालीखुशालीचा विचार मनात ठेवावा लागणार. तीच गोष्ट प्रक्षेपण हक्कांची होणार आहे. त्याचा करार अगोदर झालेला असला, तरी नवीन समीकरणांत त्याची पुर्नबांधणी करणं गरजेचं होणार.

संयोजक असो, प्रायोजक असो, प्रक्षेपण करणारी टीव्ही चॅनेल्स असोत वा खेळाडू असोत- सगळ्यांनाच पुढची दोन वर्षं खेळ जगताकरता फक्त "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या चालीवर चालण्यावाचून दुसरा प्रभावी पर्याय राहणार नाही.
एक नक्की आहे कोविड 19 महासाथीनं असा काही गुगली खेळ जगताला टाकला आहे, की सगळे अगदी क्‍लीन बोल्ड झाले आहेत. खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अचाट मेहनत, ध्येयासक्तीपासून सकारात्मकता आणि हार-जीत पचवण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी खेळानं माणसाच्या जीवनात खोलवर रुजल्या आहेत. जेव्हा कधी हे संकट दूर होईल, तेव्हा "शो मस्ट गो ऑन' म्हटलं जातं, त्याप्रमाणंच खेळ चालू होणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com