आता कळेल मोल (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

नव्या जमान्यातल्या क्रिकेटपटूंना चाहत्यांचं मोल आता तरी कळेल का? जेव्हा महासाथीनं प्रेक्षागृह रिकामी ठेवायची वेळ येईल, तेव्हा तरी फॅन्सचं प्रेम काय जादू करून जातं हे मोठी स्टाईल मारणाऱ्या भारतीय संघातल्या खेळाडूंना उमगेल का? प्रत्येक चाहत्याला थांबून भेटा किंवा फोटो काढून द्या अशी अवास्तव अपेक्षा कोणीच करणार नाही; पण किमान मान किंवा त्यांच्या प्रेमाची जाणीव हे खेळाडू ठेवतील का? जर तसं झालं तर उत्तमच; पण दुर्दैवानं तसं झालं नाही, तर तो दोष चाहत्यांचा नसेल, तर खेळाडूंचा करंटेपणा म्हणावा लागेल.

प्रसंग मोठा गंमतीदार होता. भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला असताना एका सामन्याची तयारी चालू होती, ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानाच्या सराव सुविधांवर भारतीय संघाचा कसून सराव सुरू होता. सरावाचं मैदान मुख्य रस्त्याला लागून असल्यानं काही उत्साही चाहते सराव बघायला जमा झाले होते. त्यातला एक कंपू शाळा- कॉलेजच्या उंबरठ्यावरचा होता- ज्यात ५ मुलं होती. भारतीय खेळाडूंना त्यातल्या त्यात जवळून बघायला ती मुलं धडपडत होती. सरावात मारलेल्या फटक्याला किंवा झेलांनाही टाळ्या वाजवून दाद देताना खेळाडूंचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती. मैदान आणि रस्त्यादरम्यान मोठी खणखणीत जाळी असूनही सुरक्षा अधिकारी उगाचच त्या मुलांवर लक्ष देत होता- जणू काही १० फुटी कुंपण ओलांडून ती मुलं टुणकन् आत उडी मारणार होती.

मी सगळं बारकाईनं निरीक्षण करत असताना मजेदार प्रसंग बघायला मिळाला. फलंदाजीच्या सरावानंतर विराट कोहली क्षेत्ररक्षणाचा सराव करू लागला. चांगली वीस मिनिटं कसून सराव केल्यावर घामाळलेल्या थकल्या अवस्थेत तो सराव थांबवून निघाला. संघाच्या सपोर्ट स्टाफमधल्या एकानं विराटला दोन पाण्याच्या बाटल्या दिल्या. त्यातली एक बाटली विराटनं खाली बसून घटाघट पिऊन टाकली. मग तो उठला चालू लागला असताना दुसरी बाटली त्यानं उघडली. त्यातला एक घोट प्यायला असताना ती मुलं विराटच्या नावानं ओरडू लागली. विराटनं त्यांना हात केला. त्यातल्या एका मुलानं, ‘विराट, फीलिंग थर्स्टी...कॅन वी गेट सम वॉटर’, असं म्हणत पाणी मिळेल का अशी नम्रपणे विचारणा केली. विराट चालतचालत त्या मुलांपाशी गेला आणि त्यानं हसतहसत कुंपणावरून हातातली बाटली त्या मुलांकडे टाकली. त्या पाच मुलांनी त्या बाटलीतलं पाणी तीर्थ प्यावं तसं थोडंथोडं प्यायलं. इतकं कमी, की सगळे संपवलं नाही. विराटनं त्यानं स्वत: प्यायलेल्या बाटलीतलं पाणी आपल्याला मिळाल्यानं ती मुलं आनंदानं खिदळू लागली.
त्या मुलांना नंतर मी भेटलो असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद बघून माझ्या मनात विचार आला, की किती प्रेम करतात चाहते खेळाडूंवर. खेळाडूंना खरंच त्या प्रेमाचं मोल कळतं का?

प्रसंग क्रमांक दोन : मला पक्का आठवतो तो दिवस. नऊ जून तारीख होती २०१९ची- जेव्हा वर्ल्डकप स्पर्धेतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगला होता. त्या सामन्यात भारतीय संघानं संपूर्ण वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं होतं. त्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच आला असताना तो म्हणाला : ‘‘आजच्या सामन्यात आम्हाला बराच काळ वाटलंच नाही, की सामना इंग्लंडमध्ये सुरू आहे. आम्हाला वाटत राहिलं, की सामना भारतीय मैदानावर सुरू आहे- कारण खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहातले ८५ टक्के प्रेक्षक भारतीय संघाचे पाठीराखे होते. मला खूप कौतुक वाटतं भारतीय क्रिकेट चाहत्यांचं. ते जगाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय संघाचे चांगले सामने बघायला बरोबर जमा होतात. भारतीय संघाला आवाजी पाठिंबा देतात. तिकिटांचे दर काहीही असले, तरी भारतीय चाहते खिशात हात घालायला मागंपुढं बघत नाहीत. मला खूप हेवा वाटतो या बाबतीत भारतीय संघाचा.’’

पाठोपाठ भारतीय कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत आला तेव्हा भारतीय संघाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल विचारलं गेलं. ‘‘होय आम्हाला जबरदस्त पाठिंबा लाभतो. पण तसं बघायला गेलं, तर जगात कुठंही जा- भारतीय संघाला असा सपोर्ट मिळतोच. एका अर्थानं आम्हाला त्याची सवय झाली आहे,’’ असं विराट कोहलीनं सरळ सांगितलं होतं.
तसं बघायला गेलं, तर दोघाही कर्णधारांचं म्हणणं आपापल्या जागी योग्य होतं. फरक इतकाच होता, की फिंचला त्याचं कौतुक किंवा हेवा वाटत होता, तर विराट कोहलीला त्याचं फार मोठं कौतुक वाटत नव्हतं- इतकी भारतीय चाहत्यांच्या प्रेमाची सवय भारतीय क्रिकेट संघातल्या खेळाडूंना झाली होती. मग दुसरा विचार मनात आला, की भारतीय क्रिकेट संघातले आणि खास करून आत्ताच्या जमान्यातले खेळाडू हे चाहत्यांचे प्रेम ‘गृहीत’ धरतात का?

मोल आहे का नाही?
गेली वीस वर्षं भारतीय संघाचा पाठलाग करत जगभर क्रिकेट सामन्याचं वार्तांकन करताना खेळाडूंच्या वागणुकीत आणि विचारात झालेले काही बदल जाणवणारे आहेत. तुम्हाला हे बदल झटकन कळावेत म्हणून काही उदाहरण देतो. भारतीय संघाचा एक चाहता दिलीप जजोडीया सन १९८३ मध्ये भारतीय संघ लॉर्ड्‍‍सच्या मैदानावर वेस्ट इंडीज विरुद्ध अंतिम सामना खेळत असताना संघासोबत मेरलीबोन क्रिकेट क्लबच्या सुरक्षेला गुंगारा देऊन चक्क भारतीय संघासोबत ड्रेसिंग रूममध्ये बसून सामना बघत होता अशी कमाल कहाणी मला ऐकायला मिळाली आहे. तो काळ असा होता, की खेळाडू चाहत्यांना प्रेमानं वागवायचे. त्यांच्याशी दोस्ती करायचे. श्रीलंकेत असाच एक चाहता राजन उधेशी संघातल्या सर्व खेळाडूंचा जानी दोस्त होता आणि आहे. इतका, की संपूर्ण संघासह प्रशिक्षक जॉन राईटही राजन उधेशीच्या घरी एकत्र जेवायला जायचे. अट्टल मांसाहारी खेळाडूही राजनच्या घरी गपचूप शाकाहारी जेवण जेवायचे. इतकंच नाही, तर सचिन तेंडुलरकनं त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्याकरता राजन उधेशीला खास निमंत्रण देऊन मुंबईला बोलावलं होतं आणि राजन त्याकरता खास मुंबईला आला होता.

सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर हे सगळे महान खेळाडू संघात असेपर्यंत चाहत्यांना जमेल तेव्हा काही क्षण का होईना प्रेमानं भेटायचे. कधी सह्या करून द्यायचे, तर कधी फोटो काढायला हसत उभे राहायचे. गेल्या पाच वर्षांत या समीकरणात झपाट्यानं बदल झालेला आढळतो आहे. नव्या जमान्यातल्या संघासोबत बऱ्याच वेळेला भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यां‍सोबत परदेशी सुरक्षा कर्मचारी नेमण्याचा प्रकार चालू झाला. त्यांनी काम एकच केलं ते म्हणजे प्रत्येक माणूस जणू हल्ला करेल अशा भीतीनं सगळ्यांना संघापासून आणि खेळाडूंपासून चार हात नव्हे तर चार कोस दूर ठेवायला सुरुवात केली. खेळाडूही स्टाईल मारताना मोठे हेडफोन लावून आणि डोळ्यावर गॉगल चढवून आपलं चाहत्यांकडे लक्षच नाही, असं दाखवण्यात धन्यता मानू लागले.
अतिशयोक्ती करत नाही असा प्रसंग तुम्हांला सांगतो. २०१९ वर्ल्डकप दरम्यान भारतीय संघ साउदम्पटनला सराव करत असताना सराव मैदानावर साधारणपणे २०० मीटर अंतरावर एका छोट्या टेकडीवरून काही अस्सल क्रिकेटचे दर्दी चाहते भारतीय संघाचा सराव दुरून बघत असताना याच ‘कर्तव्य दक्ष’ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांनाही सराव बघायची परवानगी नाही, असा नियम सांगत हाकलले होते. हा खरंच अतिरेक होता. चाहत्यांशी केल्या जाणाऱ्या वर्तणुकीचा हा बदल भयावह होता.

आता काय होणार?
नुकतीच एक क्लिप सोशल मीडियावर बघायला मिळाली. मैदानात दोन तुल्यबळ संघांतला फुटबॉल सामना रंगला आहे आणि कोविड १९ परिस्थितीमुळे एकाही प्रेक्षकाला सामना बघायला मैदानात सोडलेलं नाही, असं मोकळे स्टँड बघून समजतं. मग कौशल्य दाखवत एक खेळाडू मस्त गोल करतो आणि अचानक प्रेक्षकांचा गलका ऐकू येतो. एक क्षण वाटतं, की खेळाडूंना प्रेरणा मिळावी म्हणून मुद्दाम असं रेकॉर्ड केलेला आवाज ध्वनी यंत्रणेवरून लावला गेला आहे; पण जेव्हा कॅमेरा मागं सरकतो, तेव्हा मैदानाबाहेरच्या दोन इमारतीच्या गच्चीवर शेकडो प्रेक्षक त्याच सामन्याचा आनंद घेताना आणि गोल मारल्यावर ओरडत नाचताना दाखवले आहेत. मला ही क्लिप बघून प्रेक्षकांच्या दर्दीपणानं एक क्षण डोळ्यात पाणी आलं.
कोविड १९ महासाथीनंतर क्रिकेट सामने खेळवले जातील, तेव्हा प्रेक्षकांना सामना मैदानात बसून बघायची परवानगी मिळेल का? मिळाली तरी किती टक्के प्रेक्षकांना मिळेल? खेळाडूंना प्रेक्षकांविना सामना खेळताना काय वाटेल? असे नाना प्रश्न मला भंडावू लागले. भारतीय क्रिकेट संघाला आवाजी पाठिंबा देणारे प्रेक्षक हजर नसताना खेळंवे लागलं तर काय वाटेल, या प्रश्नानं मला वेड लावलं.

प्रेक्षक म्हणजे ऊर्जा
बहुपैलू कलाकार प्रशांत दामलेला त्याच्या लेखी प्रेक्षकांचं मोल काय आहे असं विचारलं असता, प्रशांत क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला : ‘‘प्रेक्षक म्हणजे ऊर्जा...मी कलाकार म्हणून ती ऊर्जा असल्याशिवाय कला सादर करू शकत नाही. समजा एखादं गाजलेलं नाटक फक्त टीव्हीच्या प्रेक्षकांकरता रेकॉर्ड करताना नुसते कॅमेरे आहेत आणि प्रेक्षक नाहीत अशी अवस्था असताना मला नाटक सादर करताना गांगरायला होते... खूप कष्ट करून अभिनय करावा लागतो. तेच प्रेक्षागृह खचाखच भरलेलं असलं, तर मी अगदी सहजी कला सादर करतो... ते नातं मला दुहेरी वाहतुकीसारखं वाटतं... मी कला सादर करतो आणि प्रेक्षक मला दाद देतात... ती ऊर्जा मला कलाकार बनवते... नाटक असो वा खेळ मला तरी प्रेक्षकांविना अधुरा वाटेल.’’

अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रेक्षकांचं मोल हे चाहते म्हणून आहे, तसंच ते शुभेच्छा चिंतणारे म्हणून जास्त आहे. ते प्रांजळपणे कबूल करतात, की ‘कुली’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या पोटाला झालेली दुखापत जिवावर बेतली असताना कोट्यवधी चाहत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याकरता केलेली प्रार्थना त्यांना वाचवून गेली. सचिन तेंडुलकरही त्याच्या टेनिस एल्बो दुखापतीतून बाहेर आला ते ऑपरेशनमुळे आणि त्यानंतर चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे हे कबूल करता कृतज्ञता व्यक्त करतो.

शेवटी हाच विचार मनात पिंगा घालतो, की नव्या जमान्यातल्या क्रिकेटपटूंना चाहत्यांचं मोल आता तरी कळेल का? जेव्हा महासाथीनं प्रेक्षागृह रिकामी ठेवायची वेळ येईल, तेव्हा तरी फॅन्सचं प्रेम काय जादू करून जातं हे मोठी स्टाईल मारणाऱ्या भारतीय संघातल्या खेळाडूंना उमगेल का? प्रत्येक चाहत्याला थांबून भेटा किंवा फोटो काढून द्या अशी अवास्तव अपेक्षा कोणीच करणार नाही; पण किमान मान किंवा त्यांच्या प्रेमाची जाणीव हे खेळाडू ठेवतील का? जर तसं झालं तर उत्तमच; पण दुर्दैवानं तसं झालं नाही, तर तो दोष चाहत्यांचा नसेल, तर खेळाडूंचा करंटेपणा म्हणावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com