esakal | आयपीएलचं कवित्व (सुनंदन लेले)
sakal

बोलून बातमी शोधा

sunandan lele

एकीकडे कोरोना विषाणूनं सगळ्यांनाच ग्रासलं असताना, आयपीएलबाबत काय होणार त्याबाबत संभ्रम कायम आहे. आयपीएल झाली नाही, तर तिच्याशी संबंधित मोठ्या अर्थकारणाला हादरा बसणार आहे.

आयपीएलचं कवित्व (सुनंदन लेले)

sakal_logo
By
सुनंदन लेले

एकीकडे कोरोना विषाणूनं सगळ्यांनाच ग्रासलं असताना, आयपीएलबाबत काय होणार त्याबाबत संभ्रम कायम आहे. आयपीएल झाली नाही, तर तिच्याशी संबंधित मोठ्या अर्थकारणाला हादरा बसणार आहे. त्यामुळे ती येनकेन प्रकारे पार पाडण्यासाठी आटापिटा सुरू आहे. नक्की काय आहे आयपीएलचं अर्थकारण, ती आयोजित करण्यासाठी इतकी का आतूरता आहे, काय होऊ शकतं आदी गोष्टींवर एक नजर.

जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार जगात व्हायला लागला होता, पण मार्च महिन्यात आयपीएल स्पर्धा होईल का अशी शंका कोणाच्या मनात घर करत नव्हती. भारतीय संघ सहा मार्चला न्यूझीलंड दौर्‍यावरून परत आला, तेव्हाही चर्चा आयपीएलच्या तयारीला लागायची होती. नंतरच्या काही दिवसांतच कोविड १९ संकटानं असं काही भयाण रूप धारण केलं, की सगळेच अडचणीत सापडले. बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यावाचून पर्याय उरला नाही.

महासाथीला तोंड देण्यात जग गुंतलं आणि आयपीएलचीच काय- ऑलिंपिक्सचीसुद्धा चर्चा मागे पडली. या काळात हातातोंडाशी आलेला घास दूर जाण्याचा अनुभव बर्‍याच लोकांना येत आहे. व्यवसाय, धंदा, नोकरी सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यात सर्वांत मोठी चुटपुट लागून राहिलेला एक माणूस आहे ज्याचं नाव आहे पॅट कमिन्स. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असून, २०२० आयपील मोसमाकरता कोलकाता नाइट रायडर्सच्या संघमालकांनी लिलावात १५.५ कोटी रकमेची बोली लावली होती. १४ सामन्यांकरता १५.५ कोटी रुपये म्हणजे प्रत्येक सामन्याला १ कोटी १० लाख ७० हजार रुपये. थोडक्यात सांगायचं, तर पॅट कमिन्स सगळेच्या सगळे १४ सामने खेळला आणि त्यानं प्रत्येक सामन्यात ४ षटकं टाकली, तरी हिशेब करता प्रत्येक चेंडूला त्याचा संघ ४ लाख ६१ हजार रुपये त्याला देणार आहे, असं गंमतीदार गणित डोळ्यासमोर येतं. म्हणून पॅट कमिन्स डोळे लावून बसला आहे, की आयपीएल स्पर्धा कधी होते आहे. नाहीतर त्याच्या हातातला १५.५ कोटींचा घास तसाच वाळून जाईल आणि ते नुकसान सहन करणं कठीण होईल.
सगळ्यांना कसंही करून आयपीएलचं २०२० मधलं पर्व कायम ठेवायचं आहे. येतील त्या अडचणींना आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी संघमालक, खेळाडू आणि बीसीसीआय करत आहे. कारण आयपीएल ही दुभती म्हैस आहे.

काही अडथळे- बाकी सगळं सुरळीत
तसं बघायला गेलं, तर सन २००८ पासून आयपीएलचा कारभार सुरळीत चालू आहे. सन २००९ मध्ये भारतात मुख्य निवडणुका होणार असल्यानं स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत भरवण्यात आली होती. बाकी सर्व स्पर्धा भारतात आणि चांगल्या जोमात पार पडल्या. हे मान्य करावं लागेल, की ३-४ वादग्रस्त घटना घडल्या. पहिल्याच वर्षी श्रीसंतची वागणूक सहन न झाल्यानं हरभजनसिंगनं श्रीसंतच्या श्रीमुखात भडकावली होती. ज्या ललित मोदींनी आयपीएल नावारूपाला आणली त्याच ललित मोदींना बीसीसीआयनं गैरकारभाराकरता सन २०१० मध्ये भारतीय क्रिकेटपासूनच दूर केलं. २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असताना श्रीसंत आणि अजून दोघा खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी कारवाई केली होती.

त्याच वर्षी राजस्थान रॉयल्स संघाचा एक मालक राज कुंद्रा आणि चेन्नई सुपर किंग्जचा संचालक आणि संघमालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपन यानं संघासोबत असताना सट्टेबाजी केल्याचं उघडकीस आलं. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज् दोनही संघांवर दोन वर्षांकरता बंदी घालण्यात आली. असे काही धक्के वगळता आयपीएल स्पर्धा दिमाखात पार पडली आहे, हे नमूद करावंच लागेल.
आयपीएल ही नुसतीच चांगली क्रिकेट स्पर्धा राहिलेली नसून, त्याच्या अर्थकारणाची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. सन २०१९ मध्ये आयपीएलचे प्रक्षेपण हक्क हाती असलेल्या स्टार स्पोर्ट्सनं नुसत्या जाहिराती विकण्यातून दोन हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रत्येक संघचालक आपापल्या घरच्या मैदानावर होणार्‍या कमीत कमी सात सामन्यांतून फक्त तिकीटविक्रीतून २५ कोटी रुपये कमावतो, असं समजतं. २०१८ मध्ये सर्वच्या सर्व आयपीएल संघ चालक स्पर्धेतून गुंतवलेल्या पैशातून चांगला नफा कमावू लागले. यातल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज् संघाचं बाजारमूल्य प्रचंड वाढलं. इतकंच काय, आयपीएल स्पर्धेचं बाजारमूल्य ४५ हजार कोटींवर गेलं आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा होणार अशी चर्चा कानावर पडत असताना चिनी कंपनीचं प्रायोजकत्व घ्यावं का नाही यावरून गदारोळ चालू झाला आहे. सन २०१८ मध्ये दर वर्षी जवळपास ४४० कोटी रुपये देण्याचं कबूल करत विवो कंपनीनं पाच वर्षांकरता आयपीएलची मुख्य प्रायोजक म्हणून उडी घेतली. एकीकडे भारत आणि चीनदरम्यान तणाव कायम असताना चिनी कंपनीच्या प्रायोजकत्वावरून वाद रंग भरतो आहे. मात्र, हेही लक्षात घ्यावंच लागेल, की सध्याच्या परिस्थितीत दीड महिन्यांच्या स्पर्धेकरता ४४० कोटी रुपयांचं प्रायोजकत्व कोणती कंपनी देण्याची हिंमत करेल? शक्यच नाही. तसंच करारानुसार असे तडकाफडकी प्रायोजक बदलणं अशक्य असल्याचं बीसीसीआय पदाधिकारी खासगीत चर्चा होते तेव्हा बोलून दाखवत आहेत. थोडक्यात म्हणजे जे आहे ते बरं आहे समजून पुढं जायचं आहे.

घरी का बाहेर?
आयसीसीनं टी२० वर्ल्डकप अधिकृतरीत्या रद्द करायचा अवकाश- लगेच बीसीसीआय आयपीएल स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करेल. स्पर्धा घरच्या मैदानावर घेण्याकरता सर्व ते प्रयत्न केले जातील, पण जर कोविड १९ ची परिस्थिती आवाक्यात आली नाही, तर नाइलाजानं आयपीएल २०२० स्पर्धा देशाबाहेर भरवली जाईल. यात जर परदेशात जायची वेळ आली, तर दुबई आणि अबुधाबीच्या दोन मैदानांवर ती भरवली जाण्याची शक्यता बोलली जात आहे. आखातात जाण्यायेण्याचा खर्च त्या मानानं कमी आहे, तसंच दुबई-अबुधाबीची मैदानं सुसज्ज आहेत आणि स्थानिक संघटना यजमानपद स्वीकारायला एका पायावर तयार आहेत असं समजतं.
सर्व संघमालकांना २०२० वर्षातली आयपीएल स्पर्धा कसंही करून भारतात भरवणं हवं आहे. त्यांना खर्चार्ची चिंता आहे, तसंच आपापल्या फॅन्सना खूश ठेवायचं आहे. तुम्हाला हे साधं, सरळ सोपं वाटत असेल, तर तसं नाहीये. कारण २०२० वर्षात आयपीएल स्पर्धा झाली नाही, तर चार हजार कोटींचं नुकसान होईल- जे बीसीसीआयला परवडणार नाही. नुसती बीसीसीआयकरता स्पर्धा महत्त्वाची नसून जगभरातले खेळाडू स्पर्धेकडे डोळे लावून बसले आहेत. ‘‘एक तर भारतात येऊन आयपीएल स्पर्धेत सहभागी व्हायचं, हे आमच्याकरता नेहमीचं आणि गरजेचं झालं आहे आणि या स्पर्धेत विविध देशाच्या खेळाडूंसोबत दर्जेदार क्रिकेट खेळता येतं, खूप शिकता येतं आणि खोटं कशाला बोलू- अर्थकारणही मजबूत होतं,’’ नुकताच सराव चालू केलेला स्टीव्ह स्मिथ म्हणाला.

बोलताना मर्यादा पाळा
अमेरिकेत एका निर्दयी पोलिसानं कृष्णवर्णीय माणसाला नुसतं पकडलं नाही, तर त्याच्या मानेवर पायाचा रेटा देत त्याचा श्वास घोटला. या घटनेचे प्रतिसाद जगभर उमटले आणि ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ची चळवळ चालू झाली. गेली काही शतकं कृष्णवर्णीय लोकांना सहन कराव्या लागणार्‍या अन्यायाला परत एकदा वाचा फुटली. यात माजी वेस्ट इंडीजचा कर्णधार डेरेन सॅमीनं आपल्याला काही भारतीय खेळाडू रंगावरून चिडवायचे, असं जगजाहीर केलं. ईशांत शर्माने हैदराबाद सनरायझर्स संघातून डेरेन सॅमीसोबत खेळताना एका फोटोत त्याला असं संबोधलं होतं, हे सत्य आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जे लोक सार्वजनिक स्तरावर काम करत असतील किंवा खेळाच्या प्रांतात मैदानात उतरत असतील, त्यांनी बोलताना मर्यादा पाळणं अनिवार्य होणार आहे.
महान माजी खेळाडू मायकेल होल्डिंग यांनी भावना व्यक्त करताना मांडलेले विचार अंतर्मुख करणारे आहेत. ते म्हणतात, ‘‘मी जमेकाला लहानाचा मोठा झालो, म्हणून सुरुवातीच्या काळात मला वर्णद्वेषाची झळ लागली नाही. आपल्याला लहान वयापासून शिक्षणातून जे बिंबवलं जातं, तेच आपल्या मनात बसतं. अमेरिकेत तेच झालं. एका श्वेतवर्णीय दुकानदार महिलेला कृष्णवर्णीय गिर्‍हाइकानं देऊ केलेल्या २० डॉलरची नोट बनावट आहे का म्हणून संशय आला म्हणून तिनं थेट पोलिसांना फोन केला. तिच्या मनात कुठंतरी हेच असेल, की येणारा पोलीस श्वेतवर्णीय असेल आणि येताक्षणी तो कृष्णवर्णीयाला दोषी मानणार. चूक नसतानाही कृष्णवर्णीय माणसाला तो निर्दोष आहे हे सिद्ध करावं लागणार. वर्षानुवर्षं आपल्याला हे ठसवून ठेवलं आहे. तीच गोष्ट इतिहासाची आहे. बल्बचा शोध थॉमस एडिसननं लावला असंच शिकवलं गेलं आहे. ते अर्धसत्य नाहीये का? कारण बल्बमधल्या फिलामेंटचा शोध ल्युईस लॅटीमरनं लावला हे आपल्याला तितक्यात उत्कटतेनं शिकवलं जातं का?’’
मायकेल होल्डिंग यांच्या या विचारांनी क्रिकेट जगतच नव्हे, तर विचारवंतांना, जाणकारांना, इतिहासकारांना विचार करायला भाग पाडलं आहे. कोविड महासाथीनंतर चालू होणार्‍या जगात खेळाचं स्थान मोलाचं असेल- फक्त त्यातून वर्णद्वेषाला कायमचं हद्दपार केलं गेलेलं असेल, हीच आशा आहे.